‘रेड फ्लॅग’ युद्धसराव रद्द

Submitted by पराग१२२६३ on 29 April, 2020 - 05:29

सध्या जगभरात पसरलेल्या ‘कोरोना’च्या साथीचा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत, नियोजित स्पर्धा आणि अन्य कार्यक्रमही रद्द होत आहेत. त्यातच एक बातमी आली, की अमेरिकेतील अलास्का येथे आयोजित होणारे ‘रेड फ्लॅग 20-1’ हे जगातील हवाईदलांचे संयुक्त युद्धसरावही रद्द करण्यात आले आहेत. या वर्षी हे सराव 30 एप्रिल ते 15 मे काळात आयोजित केले जाणार होते. या सरावांमध्ये भारतीय हवाईदल तिसऱ्यांदा सहभागी होणार होते. ही बातमी ऐकल्यानंतर भारतीय हवाईदलाने सहभाग घेतलेल्या मागील ‘रेड फ्लॅग’ युद्धसरावाच्या वेळी वाचलेल्या बातम्या पटापट आठवू लागल्या.

2016 मध्ये आयोजित केलेल्या ‘रेड फ्लॅग 16.1’मध्ये भारतीय हवाईदल तोपर्यंतच्या मोठ्या पथकासह सहभागी झाले होते. त्या सरावांसाठी जामनगरच्या हवाईतळावरून 4 सुखोई-30 एमकेआय, 4 जग्वार डॅरिन-2, 2 आयएल-78 एमकेआय आणि 2 सी-17 ग्लोबमास्टर-3 या विमानांनी 3 एप्रिल 2016 रोजी अलास्काच्या दिशेने उड्डाण केले. वाटेत या विमानांनी बहरिन, इजिप्त, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा या देशांमध्ये थांबे घेतले होते. संपूर्ण मार्गात आयएल-78 एमकेआय विमानांच्या मदतीने सुखोई आणि जग्वार विमानांमध्ये हवेत उडत असतानाच इंधन भरले जात होते. या मार्गाच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण कॅनडा ओलांडून अलास्काला जायचे होते. कॅनडाचा विस्तार प्रचंड आहे. परिणामी तेथील तीन हवाईतळांवर ही विमाने काही काळ विसावून पुढे गेली.

चार खंडांमधून सुमारे 20 हजार किलोमीटरचे अंतर 18 दिवसांमध्ये पार करत भारतीय हवाईदलाच्या विमानांनी 20 एप्रिलला अलास्कातील नियोजित आईलसन हवाईतळाच्या धावपट्टीला स्पर्श केला. युद्धसरावांसाठी जाताना आणि येताना वाटेत थांबे घेतलेल्या देशांबरोबरच्या भारताच्या संबंधांना अधिक भक्कम करण्याचा आणि त्या देशांच्या हवाईदलांबरोबर परस्पर विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय हवाईदलाने नेहमीच्या शिष्टाचारानुसार 'हवाई राजनया'च्या माध्यमातून केला. त्या सरावांसाठी पोहचण्यासाठी हवाईदलाने लांबचा मार्ग निवडला होता. यामुळे भारतीय हवाईदलाला ‘खंडपार तैनाती’तही आपली कार्यक्षमता किती उच्च पातळीची आहे, हे जगाला दाखवून देता आले. यंदाही अशाच मार्गाने भारतीय विमाने अलास्कापर्यंत जाण्याची शक्यता होती.

‘रेड फ्लॅग’ युद्धसराव हे जगातील सर्वांत कठीण हवाई युद्धसराव मानले जातात. अमेरिकेत नेवाडा राज्यातील नेलिस आणि अलास्का राज्यातील आईल्सन येथील हवाईतळांवर हे सराव चार टप्प्यात आयोजित केले जातात. अमेरिकेत ‘रेड फ्लॅग’ हवाई युद्धसरावांचे आयोजन आपल्या तसेच मित्रराष्ट्रांच्या हवाईदलांना उच्च कोटीचे प्रशिक्षण पुरवून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याच्या हेतूने केले जात असते. या सरावांमध्ये आपले पथक पाठवण्यासाठी येणारा मोठा खर्च विचारात घेऊन भारतीय हवाईदल मात्र दर पाच वर्षांनी या सरावांमध्ये सहभागी होत असते.

व्हिएतनाम युद्धातील नामुष्कीनंतर अमेरिकेने 1975 पासून हे युद्धसराव सुरू केले. यामध्ये खऱ्या-खुऱ्या लढाईसारखी परिस्थिती निर्माण केली जात असते आणि त्यासाठी अमेरिकेन हवाईदलाच्या दोन वेगवेगळ्या तळांवरून दोन गटांमध्ये सहभागी राष्ट्रांची विमाने उड्डाण करत असतात. अलास्कामधील सरावांचे आयोजन अमेरिकन हवाईदलाच्या पॅसिफिक एअर फ्लीटकडून आईल्सन आणि एल्मन्डॉर्फ येथील हवाईतळांवर केले जात असते.

भारतीय हवाईदल 2008 पासून ‘रेड फ्लॅग’ युद्धसरावांमध्ये सहभागी होऊ लागले आहे. मात्र अलास्कातील युद्धसरावांमध्ये भारतीय हवाईदल 2016 मध्ये पहिल्यांदाच सहभागी झाले होते. या दोन्ही वेळी भारतीय हवाईदलाच्या हवाईयोद्ध्यांच्या कौशल्याने अमेरिकेच्या हवाईदलाला संमोहित केले. ‘रेड फ्लॅग’ युद्धसरावांमध्ये मिळणारे अनुभव जवळजवळ युद्धजन्य परिस्थितीप्रमाणेच मिळत असल्यामुळे ते अतिशय उच्च दर्जाचे ठरतात. या सरावांसाठी सुमारे पावणेदोन लाख चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या क्षेत्रफळाचे हवाईक्षेत्र निश्चित केले जात असल्यामुळे विमानांना पूर्ण क्षमतेने सरावांमध्ये उतरता येते. या युद्धसरावांमध्ये अमेरिकेबरोबरच अन्य सहभागी मित्रदेशांची हवाईदले निळ्या (आक्रमक) गटात, तर त्यांना प्रतिकार करण्यासाठी अमेरिकन हवाईदल आणि नौदलाबरोबरच अन्य अमेरिकन दलांची युनिट लाल (संरक्षक) गटात समाविष्ट होत असतात. भारतीय हवाईदलाने या दोन्ही गटांमध्ये भाग घेतला होता.

नियोजित ठिकाणी पोहचल्यावर पहिल्या टप्प्यात भारतीय वैमानिकांनी आपल्या विमानांसोबत सरावांसाठीच्या प्रदेशाची, 'नाटो'च्या वैशिष्ट्यपूर्ण संकेतांची, रेडिओ संदेशवहन संकल्पनांची माहिती करून घेतली होती. या सुरुवातीच्या टप्प्यातच निळ्या गटात समाविष्ट असलेल्या अमेरिकन एफ-16 विमानांच्या तुकडीने भारतीय हवाईदलाच्या वैमानिकांच्या कौशल्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले होते. यानिमित्ताने अमेरिकेच्या हवाईदलाने कोणत्याही सरावांमध्ये प्रथमच पाचव्या पिढीचे एफ-22 विमान उतरविले होते. त्याबरोबर एफ-15, एफ-16, एफ-18 या अमेरिकन लढाऊ विमानांसह सुखोई विमानांचा प्रामुख्याने आक्रमक (निळ्या) गटात सहभाग होता. त्यामुळे या जगातील आघाडीच्या आणि अत्याधुनिक विमानांबरोबर सराव करून महत्त्वाचा अनुभव भारतीय वैमानिकांना घेता आला होता. त्याचवेळी जगातील सर्वोत्कृष्ट बॉम्बिंग ग्राऊंड म्हणून ओळख असलेल्या जेपीएआरसी या मैदानात भारतीय जग्वार डॅरीन-2 विमानांनी अमेरिकन विमानांच्या साथीने बॉम्बवर्षावाचा सराव केला होता.

शून्याच्या जवळ असलेल्या तापमानात आपली विमाने कशी कार्यरत ठेवायची आणि मुख्य भूमीपासून इतक्या दूरवरच्या प्रदेशातही कर्मचारी आणि विमाने कशी कार्यक्षम ठेवायची याचाही महत्त्वाचा अनुभव रेड फ्लॅग अलास्का 16-1 या युद्धसरावांमुळे भारतीय हवाईदलाला प्राप्त झाला होता. शून्याच्या जवळपास असलेल्या तापमानातही आपली सर्व विमाने युद्धसरावांसाठी सज्ज ठेवण्यासाठी अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनत घेतली होती आणि त्याचे फळ भारतीय पथकाला असे मिळाले, की संपूर्ण तीन आठवड्यांमध्ये सर्वच्या सर्व विमाने उपलब्ध राहिली. म्हणजेच त्यांची उपलब्धता 100 टक्के होती. अशा किचकट युद्धसरावांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याच्या कामामध्येही सुखोई आणि जग्वार विमानांच्या ताफ्यातील हवाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या संपूर्ण युद्धसरावांमध्ये तीन मोहिमांचे नेतृत्व पूर्णपणे भारतीय हवाईदलाने केले होते. यावेळी शत्रुच्या हल्ल्यात आपले लढाऊ विमान कोसळलेच, तर त्यातून वैमानिकाची तातडीने सुटका करून विमानांचे अवशेष तेथून परत आणण्याचाही सराव करण्यात आला होता.

l2016050483234.jpg

हे युद्धसराव संपल्यावर या सरावांच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या अमेरिकेच्या 354व्या फायटर विंगचे व्हाईस कमांडर कर्नल विल्यम कल्व्हर यांनी काढलेले उद्गार भारतीय हवाईदलाच्या क्षमतेला दाद देणारेच होते. ते म्हणाले, यंदाचे सराव मी आजपर्यंत पाहिलेल्या सरावांमध्ये सर्वोत्कृष्ट होते. भारतीय हवाईदलाने या सरावांमध्ये प्रदर्शित केलेल्या अत्युच्च दर्जाचे मला कौतुक केलेच पाहिजे. इतक्या दूरवर आणि विरुद्ध वातावरणात भारतीय हवाईदलाने आणलेल्या विमानांची उपलब्धता 100 टक्के राहिल्याचे पाहून त्यांनी देखभाल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

13 मे 2016 ला युद्धसराव संपल्यावर भारतीय विमानांनी 14 मेपासून परतीची वाट धरली. वाटेत या पथकातील सुखोई विमानांनी अबुधाबीतील महत्वाच्या अल धाफ्रा हवाईतळावर संयुक्त अरब अमिरातीच्या हवाईदलासोबत युद्धसराव केले होते. या सर्व सरावांच्या माध्यमातून आपण ‘सामरिक हवाईदल’ झाल्याची प्रचिती भारतीय हवाईदलाने पुन्हा एकदा करून दिली होती. ‘रेड फ्लॅग’सारख्याच रशिया, फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया अशा अन्य देशांबरोबरील सरावांच्यावेळी भारतीय हवाईदलाने ‘खंडपार तैनाती’मध्ये सतत उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाथफाईंडर, आज लष्कराने दिलेली मानवंदना हा कोणत्याही प्रकारे छोटा युध्दसराव मानला जाऊ शकत नाही. युध्दसरावामध्ये त्यापेक्षा जास्त गांभीर्य असते. आजच्या इव्हेंटमध्ये ते नव्हते.

ओके. Happy
तिकडे आज काश्मिर मधे धुमश्र्चक्री चालू आहे. जग X चीन अशी परिस्थिती आहे. सामान्य माणसाला अंदाज न येऊ देता तयारी / सराव असावा का? असे वाटले होते.