मन वढाय वढाय (भाग ४०)

Submitted by nimita on 28 April, 2020 - 21:22

रजतच्या वेळेच्या अंदाजाप्रमाणे आत्तापर्यंत स्नेहाचा एअरपोर्ट वर पोचल्याचा मेसेज यायला हवा होता. तसं पाहता स्नेहा काही पहिल्यांदाच एकटी बाहेरगावी जात नव्हती. आणि खरं म्हणजे रजत तिची कॅब राईड ट्रॅक करतच होता. त्यामुळे ती पोचली होती हे त्याला कळलं होतं. पण तरीही बाकी formalities सुरळीतपणे पार पडल्या की नाही याची खातरजमा करून घ्यायची होती त्याला. आज त्याचं त्यालाच खूप आश्चर्य वाटत होतं. "What's wrong with me? स्नेहा बद्दल इतकी काळजी का वाटतीये मला? ती जाऊन अजून तासभर ही नाही झाला आणि मी ऑलरेडी तिला मिस करतोय." रजतच्या मनातले विचार बहुदा त्याच्या चेहेऱ्यावर दिसत असावे. कारण श्रद्धा म्हणाली," बाबा, अहो आईनी अजून फोन नाही केला तर तुम्ही करा ना तिला फोन - आणि विचारा नीट पोचली की नाही ते." तेवढ्यात स्नेहाचा मेसेज आलाच -' boarding. तिकडे land झाल्यावर कळवते.' तिचा तो मेसेज वाचून रजतची काळजी मिटली. त्यानी आपला लॅपटॉप उघडला आणि मेल्स चेक करायला लागला.

पण त्याला हे असं काळजी करताना बघून श्रद्धा पण थोडी बुचकळ्यात पडली. एकीकडे तिला त्याच्या या अचानक काळजी करण्याचं आश्चर्य वाटत होतं आणि त्याचवेळी त्याचं स्नेहावरचं प्रेम बघून खूप छान, secured वाटत होतं. गेल्या एक दोन वर्षांपासून तिला तिच्या आई बाबांच्या नात्यातले वेगवेगळे पैलू लक्षात यायला लागले होते.. वाढत्या वयाबरोबर आता तेवढी समज आणि वैचारिक परिपक्वता आल्यामुळे असेल कदाचित ! तिच्यासाठी तिचे आई बाबा म्हणजेच तिचं विश्व होते. आजपर्यंत तिला जेव्हा जेव्हा मदतीची , आधाराची गरज भासली तेव्हा तिला दुसरीकडे कुठेच शोधावं लागलं नाही. तिच्यासाठी त्या दोघांकडे नेहेमीच वेळ असायचा. तिच्या मनात तिच्या लहानपणच्या आठवणींचा एक अनमोल ठेवा होता....वीकएंड ला बाबांबरोबर दंगामस्ती करणं, खोट्या खोट्या कुस्तीत त्यांना हरवणं, आईच्या कुशीत झोपून गोष्टी ऐकणं, तिघांनी मिळून पिकनिकला, बाहेर फिरायला जाणं - या आणि अशा कितीतरी आठवणी होत्या त्यात! पण हळूहळू तिच्या बाबांच्या कामाचा व्याप वाढत गेला आणि त्या तिघांना एकत्र वेळ मिळणं अवघड झालं. तेव्हा जरी तिला त्यामागचं कारण कळत नव्हतं तरी आता तिला लक्षात येत होतं...'बाबांना ऑफिसच्या कामांपुढे दुसरं काहीही दिसत नाही.. अगदी आई आणि मी सुद्धा ! पण जरी ते पूर्वीसारखा आम्हांला वेळ देऊ शकत नसले तरी त्यांचं घरातल्या घडामोडींकडे, आमच्या दोघींकडे दुर्लक्ष नाही होत. आम्हांला दोघींना कोणताही त्रास, कोणतीही गैरसोय होणार नाही याची नेहेमी काळजी घेतात ते. जास्त गाजावाजा न करता सगळी कामं करत असतात. पण बाबांच्या या अशा गप्प राहण्यामुळे आई मात्र कधीकधी अगदी हिरमुसली होते. तिनी जरी बोलून दाखवलं नाही तरी तिच्या चेहेऱ्यावर तिचा हिरमोड झालेला अगदी स्पष्ट दिसतो मला. पण जेव्हापासून ती पुन्हा तिच्या कॉलेजच्या फ्रेंड्स ना भेटलीये तेव्हापासून किती बदल झालाय तिच्यात.... आता किती खुशीत असते नेहेमी. किती बरं वाटतं तिला असं बघून.... औरंगाबादहून परत आली की सगळ्या गमतीजमती ऐकणार आहे मी तिच्याकडून. पण तोपर्यंत इथला हा किल्ला लढवायला हवा- तसं प्रॉमिस केलंय मी आईला.' हा विचार मनात आला आणि श्रद्धानी रजतच्या दिशेनी आपला मोर्चा वळवला. पुढच्या चार दिवसांत दोघांनी मिळून काय काय मजा करायची याची परत एकदा उजळणी झाली. पण खरं सांगायचं तर रजतचं फारसं लक्षच नव्हतं श्रद्धाच्या बोलण्याकडे. त्याच्या मनात राहून राहून स्नेहाचेच विचार येत होते.

स्नेहा पण विमानाच्या खिडकीतून बाहेर बघत रजतचाच विचार करत होती. तिला विमान प्रवासात खिडकीतून बाहेर बघायला आवडतं हे त्याला माहित होतं आणि म्हणून तो नेहेमी तिकिटं बुक करताना तिच्यासाठी window seat च बुक करायचा. 'खरंच, किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो रजत," स्नेहाच्या मनात आलं. "पण प्रामाणिकपणे सांगायचं तर आता मला त्याचं वागणं कळतच नाही. मी त्याच्या स्वभावाचा अंदाजच नाही बांधू शकत आता. कधी खूप इमोशनल होऊन माझ्या समोर त्याचं सगळं मन रिकामं करतो - काल रात्री सारखं.... तर कधी आपल्याच कोषात गुरफटून बसतो. प्रत्येक वेळी सगळं त्याच्या मनस्थिती प्रमाणे ! पण मग माझ्या मनाचं काय ? माझा नवरा या नात्यानी माझ्या मनाचा विचार त्यानीच करायला पाहिजे ना? जर कधी तशीच गरज पडली तर त्याच्या स्वतःच्या मनाला मुरड घालून सुद्धा !! मी पण तर तेच करते ना नेहेमी; मला माहितीये, त्याला माझ्याशिवाय राहायला आवडत नाही. आजसुद्धा सकाळपासून मला जाणवत होतं ते. पण मला या ट्रिपमुळे आनंद मिळणार आहे हे माहित आहे त्याला...निदान माझ्यासाठी तरी त्यानी मला हसत हसत निरोप दिला असता तर काय बिघडलं असतं ? आता पूर्ण reunion मधे मला त्याचा तो गंभीर चेहेरा आठवत राहील.. आणि साहजिकच तो खुश नाहीये हे माहीत असताना मी तरी कशी एन्जॉय करू शकेन ?'

"Mam,would you like to have some juice ?," एअर होस्टेस च्या प्रश्नानी स्नेहा भानावर आली. तिच्या ट्रे मधून ज्यूसचा ग्लास उचलून घेत तिनी आजूबाजूला पाहिलं. विमानानी रनवे सोडून आकाशात झेप घेतली होती. आपला फोन aeroplane mode वर लावून स्नेहासुद्धा पुन्हा विचारांच्या लाटांवर स्वार झाली. "नेहेमी हे असंच होतं. जेव्हा जेव्हा मी रजतला सोडून कुठे बाहेरगावी जाते तेव्हा प्रत्येक वेळी त्याच्या या अशा वागण्यामुळे माझ्या मनात राहून राहून त्याचेच विचार येत असतात; सारखी त्याचीच काळजी... एकटा कसा मॅनेज करत असेल... चहा घेतला असेल का... वेळेवर जेवला असेल का... हजार काळज्या असतात डोक्याला. पण आता यावेळी मात्र मी ठरवलंय की हे चार दिवस ते सगळं विसरायचं. अगदी out of sight: out of mind असंच करायचं.....कितपत जमेल शंकाच आहे; पण प्रयत्न करून बघणार आहे मी यावेळी... मी तर ठरवलंय- सगळ्या मित्र मैत्रिणींबरोबर खूप एन्जॉय करायचं....अगदी कॉलेजमधे असताना करत होते तस्संच.... परत कधी सगळे एकत्र भेटू शकू काय माहीत? " आता तिच्या विचारांची गाडी औरंगाबादच्या रुळांवरून धावायला लागली. 'अजयनी ठरवलेल्या प्रोग्रॅम प्रमाणे जर खरंच सगळ्या ऍक्टिव्हिटीज झाल्या तर किती धमाल येईल. इतक्या वर्षांनंतर पुन्हा कॉलेजच्या कॅन्टीन मधे पूर्वीसारखेच गप्पांचे फड रंगतील. त्या दिवसांतल्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतील..... कॅन्टीनमधे जास्तीत जास्त वेळ बसायला मिळावं म्हणून एकदम सगळ्यांनी एकत्र चहा न पिता दर अर्ध्या तासानी एक कप चहा ऑर्डर करणं, तिथे बसून प्रोफेसर्सच्या आणि इतर विद्यार्थ्यांच्या केलेल्या नकला, इतर वेळी नुसत्या गप्पा आणि गोंधळ चालू असला तरी परीक्षेच्या वेळी मात्र सगळ्यांनी एकत्र बसून केलेला तो अभ्यास, .... कितीतरी आठवणी सामावल्या होत्या त्या जागेत ! कॉलेज कॅन्टीनबद्दल विचार करत असताना स्नेहाला तिची आणि सलीलची ती भेट आठवली...सलील IIT ला जाण्याच्या आदल्या दिवशीची.... तिचं मन काही क्षण तिथेच रेंगाळलं...पण आज तिला त्या आठवणींच्या गर्दीतून बाहेर पडायची घाई नव्हती. खूपच nostalgic झाली होती ती आज. तिनी पर्स मधून फोन काढला आणि अजयनी व्हॉट्सऍप वर पाठवलेली itinerary पुन्हा एकदा चेक केली. प्रोग्रॅम मधे दौलताबाद किल्ल्यावर हेरिटेज वॉक पण होता. अजय म्हणाला होता की त्या दिवशी त्यांच्या हेरिटेज क्लबचे तेव्हाचे सगळे मेंबर्स येणार आहेत... स्नेहा पुन्हा आठवणींच्या 'मेरी-गो-राउंड' वर स्वार झाली. ज्युनियर कॉलेजच्या त्या दोन वर्षांत सलीलबरोबर केलेले सगळे हेरिटेज वॉक्स तिच्या डोळ्यांसमोरून गेले. पण अचानक कोणीतरी जागं केल्यासारखी ती तिच्या तंद्रीतून बाहेर आली... ' आज हे काय झालंय मला? मगाचपासून सारखे सलीलचे विचार, त्याच्या आठवणी का दाटून येतायंत मनात ?' स्वतःच्या विचारांना आवर घालत तिनी स्वतःच्या मनाला समजावलं,' पुढचे चार दिवस तुला फक्त त्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे. त्या फक्त आठवणी आहेत याची जाणीव ठेव.... त्यांना पुन्हा नव्यानी अनुभवायचा, नव्यानी जगायचा प्रयत्न करू नकोस. त्यांना त्यांच्या योग्य जागीच राहू दे...भूतकाळात .... हो... भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांची गल्लत नको करू.. असं केल्यानी तू स्वतःच स्वतःचा भविष्यकाळ बरबाद करशील हे लक्षात असू दे.'

पण इतक्या स्पष्ट शब्दांत समजावून सुद्धा आज स्नेहाचं मन वस्तुस्थिती मानायला तयारच नव्हतं. ती त्याला पुन्हा पुन्हा ओढून वर्तमानात आणत होती पण ते मात्र एखाद्या नाठाळ गुरासारखं फिरून फिरून पुन्हा भूतकाळात जाऊन रमत होतं.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users