मन वढाय वढाय (भाग ३९)

Submitted by nimita on 25 April, 2020 - 22:09

स्नेहाची भीती काही अगदीच अनाठायी नव्हती. थोड्याच दिवसांत रजत पुन्हा त्याच्या कामात आणि ऑफिसच्या इतर व्यापात व्यस्त झाला.पण याचा अर्थ तो अजिबातच घरात लक्ष घालत नव्हता असा मुळीच नव्हता. तो जरी बोलून दाखवत नसला तरी त्याचं स्नेहा आणि श्रद्धा कडे लक्ष असायचं... बऱ्याच वेळा घरात चालू असलेल्या घडामोडीत वेळेअभावी तो सहभागी होऊ शकायचा नाही. पण स्नेहा आणि श्रद्धाच्या बाबतीत तो खूप प्रोटेक्टिव्ह होता. त्या दोघींना कोणताही त्रास, कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी त्याचे सतत प्रयत्न चालू असायचे. आणि त्याच्या त्या प्रयत्नांतूनच त्याचं प्रेम स्नेहापर्यंत पोचायचं. हां, बऱ्याच वेळा काही बारीकसारीक गोष्टी, घटना त्याच्या नजरेतून सुटायच्या...पण आता स्नेहाला त्याची सवय झाली होती. रजतच्या शांत आणि अबोल स्वभावाची आणि त्याच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीची सुद्धा! पण स्वतःच्या मनाची कितीही समजूत घातली तरी रजतच्या 'नसण्यामुळे' हळूहळू पुन्हा स्नेहाला एकटेपणा जाणवायला लागला होता. कितीतरी दिवस झाले होते - रजतनी स्नेहाच्या स्टुडिओमधे पायही ठेवला नव्हता... त्यासाठी वेळच नव्हता त्याच्याकडे. त्याचा सकाळचा पहिला चहा पण आता फाईल्स आणि लॅपटॉपच्या संगतीतच व्हायला लागला. या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय पण स्नेहासुद्धा आता त्याच्या सहवासाशिवाय राहायला शिकत होती.

एका रविवारी दुपारच्या निवांत वेळी स्नेहा तिच्या स्टुडिओमधे होती. नुकतंच एक नवीन प्रोजेक्ट सुरू केलं होतं तिनी- यावेळी क्लायंट ला abstract art work हवं होतं. तिनी दोन तीन सॅम्पल स्केचेस् तयार केली होती, आणि त्याबद्दल तिला feedback हवा होता. ती नेहेमीच्या सवयीप्रमाणे रजतला हाक मारणार इतक्यात तिला काय वाटलं कोणास ठाऊक ! तिनी सरळ तिचा फोन उचलला आणि सलीलला व्हिडिओ कॉल लावला.

त्या दिवसानंतर तर जणू काही हे एक रुटीनच झालं. स्नेहाला कधीही काही सल्ला हवा असला तर ती सलीलला विचारायला लागली ; कारण एक तर रजत ऑफिसमधे असायचा किंवा घरी असला तरी त्याच्याकडे या सगळ्या गोष्टींसाठी वेळ नसायचा.

अशातच एक दिवस स्नेहाला अजयचा फोन आला आणि त्यानी त्यांच्या कॉलेजच्या ग्रुपच्या reunion party बद्दल तिला सांगितलं. पंचवीस वर्षांनंतर सगळे मित्र मैत्रिणी पुन्हा एकत्र येणार होते. दोनच दिवसांचा पण चांगला भरगच्च कार्यक्रम आखला होता त्यानी. "एक दोन दिवसात कन्फर्म करते," म्हणत स्नेहानी फोन ठेवला. तिची तर खूप इच्छा होती जायची, पण फायनल 'हो' सांगण्याआधी एकदा रजत आणि श्रद्धाच्या कानांवर घालायचं होतं... अर्थात, ते दोघंही नाही म्हणणार नाहीत याची खात्री होती स्नेहाला; पण तरीसुद्धा! त्या रात्री जेवताना तिनी दोघांना अजयच्या फोन बद्दल आणि reunion बद्दल सांगितलं. दोघांच्याही रिऍक्शन्स अगदी तिच्या अपेक्षेप्रमाणेच होत्या....'आईच्या कॉलेज फ्रेंड्स ची reunion आणि तीही तब्बल पंचवीस वर्षांनंतर !!' श्रध्दाला तर ही कल्पना खूपच आवडली होती. तिनी लगेच तिच्या मित्र मैत्रिणींना सगळं सांगूनही टाकलं..पण तिला फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन होतं- "आई नसताना बाबांना कसं सांभाळायचं!' त्यावर तोडगा म्हणून ती स्नेहाला म्हणाली," आई, तू औरंगाबादला जाण्यापेक्षा त्यांना सगळ्यांना इथे बोलाव ना... इकडेच करा तुमची reunion !" पण तिच्या या सूचनेचा काहीच परिणाम न झाल्यामुळे ती गप्प बसली. रजतनी नेहेमीप्रमाणे सगळं ऐकून घेतलं. थोडा वेळ तो काहीच बोलला नाही. पण मग म्हणाला,"तुझ्या तारखा कन्फर्म झाल्या की सांग; म्हणजे टिकेट्स बुक करता येतील."

जसजसा reunion ला जायचा दिवस जवळ यायला लागला तशी स्नेहाची धावपळ सुरू झाली. तिच्या अनुपस्थितीत रजत आणि श्रद्धाला काही अडचण यायला नको म्हणून तिची धडपड चालली होती. श्रद्धा जणूकाही तिचीच reunion असल्यासारखी उत्साहात होती. अधूनमधून 'तू नसलीस की.....' अशी कुरकुर चालूच होती तिची... पण तरीही ती एकीकडे रजतबरोबर त्या चार दिवसांत काय काय धमाल करायची त्याची प्लॅंनिंग करत होती आणि दुसरीकडे स्नेहाला तिच्या तयारीत मदत करत होती. रजत मात्र वरवर जरी नॉर्मल राहायचा प्रयत्न करत असला तरी 'आता चार दिवस स्नेहापासून लांब राहावं लागणार' या कल्पनेनी तो फारसा खुश वाटत नव्हता. त्याच्या मनाची स्थिती स्नेहाला कळत होती. त्याच्या वागण्यातून, त्याच्या नजरेतून ती स्नेहापर्यंत पोचत होती. त्याचं उगीचच तिच्या आजूबाजूला राहाणं, छोट्या छोट्या कामांसाठी तिला हाक मारून बोलावून घेणं...

'एरवी जेव्हा मी सतत डोळ्यांसमोर असते तेव्हा याचं लक्षही नसतं माझ्याकडे...आणि आता हे असं वागणं !!!कधी कधी वाटतं- मी अजून रजतला पूर्ण ओळखलंच नाहीये !!' स्नेहाच्या मनात आलं.

एखाद्या लहान मुलासारखा वागत होता तो.... हे शोधून दे ; ते कुठे ठेवलंयस ; जरा चहा करून दे... ही आणि अशी कारणं काढून तो स्नेहाचा जास्तीत जास्त सहवास मिळवण्याचा प्रयत्न करत होता. रात्री झोपेत मधूनच स्नेहाला त्याचा स्पर्श जाणवायचा..तो कधी तिचा हात हातात घेऊन झोपलेला असायचा तर कधी तिच्या कमरेभोवती त्याच्या हाताचा विळखा पडायचा....

त्याचं हे असं हळवं रूप स्नेहासाठी देखील नवीनच होतं. त्यांची दोघांची एकमेकांपासून लांब राहण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. त्याआधी बऱ्याच वेळा रजत त्याच्या कामानिमित्त बाहेरगावी गेला होता आणि तेही बऱ्याच दिवसांसाठी! स्नेहा सुद्धा श्रद्धाच्या शाळेच्या सुट्ट्यांमधे बऱ्याच वेळा रजत शिवाय औरंगाबाद ला जाऊन राहिली होती. अर्थात, तेव्हा सुद्धा रजतचा जीव कसनुसा व्हायचा - पण यावेळी त्याचं प्रमाण जरा जास्तच वाटत होतं स्नेहाला. बडोद्याहून निघायच्या आदल्या रात्री तिनी शेवटी रजतला विचारलंच," तुझी तब्येत ठीक आहे ना रजत? तुला काही त्रास होतोय का? तसं असेल तर प्लीज मला सांग." इतर वेळी स्नेहाच्या या काळजीला रजतनी चेष्टेवारी नेलं असतं... ती कशी उगीच काळजी करत बसते - या विषयावर तिची थोडी शाळाही घेतली असती. खरं म्हणजे स्नेहाला देखील त्याच्याकडून तसंच काहीसं उत्तर अपेक्षित होतं; पण झालं वेगळंच ! स्नेहाचा तो प्रश्न ऐकून रजत थोडा वेळ काहीच बोलला नाही; पण मग तिचा हात आपल्या हातात घेऊन, तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला," खरं सांगू का ? मला नक्की काय होतंय ते माझं मलाच कळत नाहीये.... पण सारखं तुझ्या आसपास राहावंसं वाटतंय." त्याच्या उत्तरातला प्रामाणिकपणा त्याच्या डोळ्यांत अगदी स्पस्ट वाचता येत होता स्नेहाला... तिच्याही नकळत ती बोलून गेली," कॅन्सल करू का माझी ट्रिप ?" त्यावर एकदम भानावर येत रजत म्हणाला," नको नको.... जाऊन ये तू. फक्त चार दिवसांचा तर प्रश्न आहे." पण त्याच्या पुढच्या कृतीनी स्नेहा पुरती गोंधळून गेली.... एखाद्या लहान मुलासारखा स्नेहाच्या कुशीत शिरत रजत म्हणाला,"पण मग नंतर मात्र मला एकट्याला सोडून कुट्ठेही नाही जायचं ."

त्याच्या या अशा वागण्याची गंमत वाटण्याऐवजी स्नेहाला त्याची काळजी वाटायला लागली. "आज हे असं अचानक काय झालंय रजतला ? गेल्या काही वर्षांपासून जो माणूस साधं 'I love you' म्हणायला इतके आढेवेढे घेतो.... माझ्या बरोबर नेहेमीचे साधे संवाद साधायला सुद्धा ज्याच्याकडे वेळ नसतो ... तो आज चक्क माझ्याकडे हट्ट करतोय ? इतक्या स्पष्ट शब्दांत आपलं मन माझ्यासमोर उघडं करतोय ?? " तिच्या मनात रजतबद्दल खूप प्रेम दाटून आलं. तिच्याही नकळत तिच्यातल्या मातृत्वाच्या भावनेनी उचल खाल्ली आणि ती एखाद्या लहान बाळाला थोपटावं तसं रजतच्या केसांतून हात फिरवत राहिली. तिला तिच्या कॉलेजमधे असताना वाचलेलं एक वाक्य आठवलं...'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते !!'

त्या रात्री त्या दोघांपैकी कोणालाच शांत झोप नाही लागली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी रजत पुन्हा नेहेमीसारखा भासला स्नेहाला... शांत...अबोल.... composed .... काहीसा तटस्थ !! काल रात्रीचा तो हळवा रजत हाच का ? का त्याच्या भावना जगजाहीर होऊ नयेत म्हणून हा मुखवटा घातला आहे त्यानी ? स्नेहा विचारात पडली.

स्नेहा जेव्हा एअरपोर्टला जाण्यासाठी निघाली तेव्हा रजतच्या नजरेत तिला पुन्हा ती आदल्या रात्रीची निरागस हळवी ओढ दिसली... तिचे हात हातात पकडून "Enjoy and take care" म्हणताना त्याची पकड घट्ट झाल्याचंही जाणवलं होतं तिला.

एअरपोर्ट च्या वेटिंग एरिया मधे बसलेली असताना अचानक तिला काहीतरी आठवलं. रजत म्हणाला होता," पोचलीस की कळव... एअरपोर्ट ला पोचून मला इतका वेळ होऊन गेला. तो घरी माझ्या मेसेज ची वाट बघत असेल का? आणि मी मात्र आठवणींच्या गर्दीत हरवून गेले आणि त्याला कळवायचंच विसरले." आपल्या गतस्मृतींच्या जंजाळातून वर्तमानात येत स्नेहानी पर्समधून आपला फोन काढला. पुढच्या काही क्षणांतच तिच्या औरंगाबाद च्या फ्लाईट ची announcement झाली आणि स्नेहा बोर्डिंग गेट च्या दिशेनी निघाली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users