रानातले चावरे

Submitted by अरिष्टनेमि on 24 April, 2020 - 13:48

रानातले चावरे

आता टाळेबंद आहे सारं. घरात बसून काय करावं असा प्रश्न अनेकांना पडलाय. अनेक लोक निसर्गाशी संबंधित अनुभव घेत आहेत. घरातून कसे पक्षी दिसले, कुठं-कुठं रस्त्यावर कसे प्राणी आले! कुठं हरीण, कुठं उदमांजर, कुठं हत्ती तर कुठं चक्क बिबटच. पण म्हणून तुमच्याही गल्लीत काही येईल अशा आशेनं मोठ्या शहरात तुम्ही दिवसभर बसलात तरी काही येणार नाही. कारण येण्यासाठी काही शिल्लकच ठेवलं नाही. सारं गडप झालंय. पण अगदी सारंच गेलंय असंही काही नाही. जरा आपल्या अपेक्षा खाली आल्या तर खजिना सापडायला वेळ नाही लागणार.
आता हेच बघा ना! मोकळ्या वेळात काय करू? काय करू? म्हणून तुम्ही साफसफाई तर केलीच असेल. कोळीष्टकं काढली असतील. पळणारे कोळी पाहून कोणी दुप्पट वेगाने मागे पळून गेले असेल, कोणी झाडू घेऊन मैदान गाजवलं असेल. पण त्या कोळीयानं आपल्या घरातले भारंभार किडे, डास-माशा वगैरे खाऊन आपल्यावर इतके उपकार केलेत. एकदा त्याच्याशी शेकहँड करून त्याला “थॅंक यू” म्हणा. मग तुमच्या लक्षात येईल की त्याच्या आठपैकी कोणत्या हाताशी हात मिळवावा हा प्रश्नच अहे. एकदा त्याच्या नजरेला नजर मिळवून विचारा, “काय रे भाऊ, काय म्हणतोस?” मग तुमच्या लक्षात येईल त्याच्या सहा-आठापैकी कोणत्या डोळ्याला डोळा मिळवावा?

1 (19).jpg

गाड्यांच्या हेडलाईटची कल्पना याला पाहूनच आली असेल काय?
1 (16).jpg

की याला पाहून?
1 (13).jpg

नेहमीच भीती, किळस वाटून घेण्यापेक्षा एकदा कौतुकानं निरखून बघा, त्यातही तुम्हाला मोर सापडतील. मलाही हा मोर उटीच्या जंगलात सापडला.
1 (8).jpg

आता भीती यासाठी की, कोळी चावला तर? अहो बरंय की! चावला तर तुम्हाला या टाळेबंदीत किती मजा? चक्क टेरेसवर उभं रहायचं आणि झूऽऽऽम करुन बिगबझारपर्यंत स्पायडरमॅन बनून जाता येईल. कुठंच अडथळा नाही. गच्चीत उभं राहून दुधाची पिशवी सप्पकन ओढून वर घेता येईल. एकदा असंच फिरता फिरता थेपक्कडूच्या जंगलात एक पक्षी दिसला. ‘कोण आहे बरं हा?’ असं नीट बघेपर्यंत तो खाली झुडूपात उतरला. त्याला नीट बघायला म्हणून खाली वाकलो. वरुन नेमके त्याच वेळी एक भलेभक्कम कोळी महोदय रॅपलिंग करत मजेत खाली उतरत होते. मध्ये मी आलो. अचानकच मी उभा राहिलो आणि कॉलर आणि मान याच्यात तो पहिलवान गाडी अडकला. सणकन हलकीशी सुई टोचल्यासारखं मला वाटलं. मी कॉलर झटकली. तर हा बाबा निघाला. तासाभरात मानेवर गाठ येऊन मानेचे स्नायू कठीण, ताठर झाले. ‘येस्स, मी स्पायडरमॅन झालो होतो.’ नंतर किती वेळा गुपचूप जाळं फेकण्याचा प्रयत्न केला पण काही झालंच नाही हो. काही असो. पण त्या एवढ्याशा कोळ्यानं मला दोनेक दिवसा का होईना पण ‘ताठ’ मानेनं जगायला शिकवलं. नंतर एका कोळ्याचं फोटोसेशन झाल्यावर ते पाहताना मला कोळ्याचा विषारी दात दिसला. दात म्हणजे खरा खरा दात नाही बरं, त्याचं विष टोचायचं इंजेक्शन.
1 (17).jpg

आता जंगलात नुसते कोळीच चावतात असं नाही बरं का? अजून बरंच आहे. म्हणजे साप म्हणत नाही मी. पण असे असे शिलेदार भेटतील कदाचित तुम्ही ऐकलंही नसेल. किंवा ऐकलं असेल पण पाहिलं नसेल.

आता ही जळूच घ्या. ऐकलंच असेल हीचं नाव. दोरीसारखी सडपातळ जळू कधी आपल्याला लागते समजतही नाही. पानावर, पालापाचोळ्यावर उभी राहते अन जवळून जनावर निघालं की पटकन त्याच्या अंगावर जाते. मग त्याच्या कातडीत आपलं तोंड खुपसून रक्त पिण्याचा कार्यक्रम चालू. तिनं सोडल्यावर जेंव्हा रक्ताचा ओघळ सांडायला लागतो, कपडे लाल होतात तेंव्हा कळतं की जळू लागून पडूनसुद्धा गेली. तरी कोकणातल्या ब-या, दक्षिणेतल्या केरळ, तमिळनाडूच्या जंगलातल्या ब-या, अगदी अंदमानच्या घनदाट जंगलातल्याही चांगल्याच. जेंव्हा मेघालय आणि सिक्कीमची जंगलं फिरताना तिथल्या जाडजूड आणि चांगल्या मोठ्या राक्षस जळवा मला लागल्या तेंव्हा मला कळालं की आधी चावलेल्या सा-या जळवा म्हणजे यांच्यापुढं बच्चा होत्या. ही जी तुम्ही पाहताय ना, ही मला कर्नाटकातल्या कावेरी अभयारण्यात भेटली. माझ्या हाताचं चुंबन घ्यायला पहात होती. पण मी तिला आधीच हेरलं आणि सुनावलं, “हे बघा बाई, तुम्ही कानडी आम्ही मराठी. तुमच्या मनातला विचार काढून टाका. हे होणे नाही. जर हे घडलं तर इथं रक्ताचा सडा पडेल सडा.”
1(21).jpg

तरी त्या घनदाट रानाच्या पायवाटेवर गुपचूप काही आल्याच. पोटभर रक्त पिऊन टम्म झाल्या.
1 (4).jpg
हे सगळं अनुभवल्यावर मी शेवटी घरी गेलो. आपलं रक्त तर असंही पिणार, तसंही पिणार. मग ‘जळूपेक्षा बायको बरी’.

जंगलात नुसत्या जळवाच चावतील असंही काही नाही. कडाकडा गांधीलमाशीसारख्या फोडणा-या हॉर्सफ्लाईज तुम्हाला उतरत्या उन्हाळ्यात भेटू शकतील. मानसिंगदेव अभयारण्यात या माशांनी मला हैराण केलं होतं. हीचं असं डासासारखं हळूवार प्रेम नाहीच. डास बिचारा हळू हळू गाणं गुणगुणत येतो. आपल्याला त्रास होणार नाही असा अलगद उतरून चुंबन घेतो अन जातो. तशी ही नाही. युद्धात शत्रूच्या विमानांनी घेरावं अशा गुईं गुईं गुईं करत या घेरतात. मधमाशांसारख्या खूप नाही पण चार-सहा. कोण आधी हल्ला करणार काही समजतच नाही. डावीकडं जास्तच जवळ आली ही माशी. तोवर उजव्या कानपटावर सट्टकन हल्ला झाला अन माशीची तारेसारखी सोंड घुसली. जनावराच्या निबर जाड चामडीत आर-पार घुसणारी हिची सोंड. आग आग. रक्ताचा एक ठिपका आला. उजवा हात त्यावर ठेवला. हाफ शर्ट होता. डाव्या हाताच्या दंडावर रप्पकन दुसरं इंजेक्शन. शेवटी मैदान सोडून पळालो अन सारा शत्रूसैनिक माझ्यामागं. हिचे डोळे पहा, सैतानाचे दिवे.
1(22).jpg

आता ही हिरवी कक्कू वास्प बघा. इतकी मस्त रंगीत आहे. गमती-गमतीनं हात लावायला जाल. पण जर हिनं काटा मारला तर दोन दिवस सुजलेलं बोट घेऊन बसाल.
1 (14).jpg

या बहिणी अशा डॉन आहेत. त्यांच्या मोठ्या ताईची कल्पनाच करू शकत नाही. ही पहा, शेपटीत मजबूत विषारी काटा घेऊन थांबलीये समोर. "चुकलं गं बाई," म्हटलं चार वेळा तेंव्हा हलली.
1 (2).jpg

नुसतं सौंदर्यावर जाऊ नका बरं. सलगी करण्याआधी बाकी गुण जुळतात का हे पहाल. निसर्गात विषसुंदरी कमी नाहीत. पहा, सुंदर म्हणून उचलायला जाल आणि ‘धीरेका झटका हाय जोरोंसे लगेगा’. हा विचित्र खाजरा ठणका तुम्ही कधीच विसरणार नाही. कान्हात आंब्याच्या झाडाखाली ही अळी दिसली मला. हिचा एक अनुभव गाठीशी होता म्हणून यावेळी दुरूनच सावधान पावित्रा.
1 (1).jpg

तीची चुलतबहीण. मावसबहीण, आत्तेबहीण असंही चालेल खरं तर. ही मानसिंगदेव अभयारण्यात मिळाली.
1 (11).jpg

काही नग साधेभोळे छोटे दिसतात. हाच पहा. दिसायला साधा सोज्वळ आहे. लहान आहे म्हणून नादी लागाल तर महागात पडेल. भाईका तो नामही काफी हैं, ‘असॅसीन बग’; बोले तो ‘खूनी कीडा.’ भले तो आपला खून नाही करणार पण तो तुमच्या डोळ्यातून पाणी नक्की काढील. अनुभवाचे बोल आहेत. पावसाळ्याचे दिवस होते. चिखला-पाण्यात दिवसभर पाय बुटात राहिले की कसं तरी होतं, म्हणून स्लीपर घातलेल्या. नागझि-यातला एक छोटासा नाला होता. तो ओलांडला २-३ ढांगात. पलीकडच्या काठावर दुसरं पाऊल पडलं आणि मला तळपायात भयानक वेदना जाणवल्या. इतक्या, की पाऊल पुरतं न टेकवता मी तसंच परत उचललं. स्लीपर झटकता झटकेना. शेवटी हातानं ओढून काढून टाकल्याबरोबर त्यातून एक छोटासा किडा तुरुतुरु गायब झाला. गरम करुन तिखटात माखलेला खिळा पायात घुसवल्यावर जो काही आगडोंब उठेल असं भयंकर दुखत होतं. चक्क तळपायाच्या जाड कातडीला त्यानं सट्टकन भेदलं. किडा चावल्याजागच्या आजूबाजूची तळपायाची कातडी आठवडाभरानं सुकून सुटून गेली. ही माझी आणि ‘खुनी किड्याची’ पहिली ओळख.
1 (10).jpg

गांधीलमाशीसारखा कडकड चावा असं मी आताच म्हटलं. पण जंगलात गांधीलमाशीऐवजी तिची चुलत बहीण अगदी सहज मिळेल. ‘पेपर वास्प’. हिचा प्रसाद न घ्याल तर बरं. गांधील परवडली पण ही नको रे बाप्पा. रागीट आणि तिरसट डोक्याची. तिच्या घरासमोरुन सहज जाणं हा काय गुन्हा झाला? सहज गेलो की खण्ण. सापडेल तिथे दणका.
1 (9).jpg

असंच घर तुम्हाला जंगलात दिसलं तर लांबच रहा. त्यात चाव-या माशा जरी नाही निघाल्या तरी यातल्या झाडमुंग्या तुम्हाला पळता भुई थोडी करतील. या मला सर्वात आधी भेटल्या होत्या मडगावला शिवाच्या घरामागच्या जंगलात. मी, शिवा आणि त्याचा लहान भाऊ असे काजू फळं काढत होतो खायला. एकदम हात झटकत, “माका हुंबल्यान घास मारला.” ओरडत त्याचा लहान भाऊ सरासरा मागं झाला. ही आमची पहिली भेट. या फोटोतल्या मुंग्या पहा. एकमेकींना रस्ता सांगत आहेत. मुंग्या असं लोकेशन शेअरींग करतात आणि त्या मिळालेल्या वासाच्या रस्त्यावर सुरसुर चालत राहतात.
1 (7).jpg

चालून, घामेजून थकलात. माशा-चिलटांनी कंटाळलात तर मस्त मऊ-मऊ गवताच्या गालीच्यावर बसायचा मोह होणारच. अशा गवतातच तर चरुन आलेली सांबरं रवंथ करत बसतात. त्यांच्या अंगावरच्या गोचिडी (Ticks) याच गवतात पडतात; दुस-या सांबराची वाट पहात. आता सांबराऐवजी तुम्ही आलात ही गोचिडीची चूक नाही. ‘सांबरापेक्षा माणूस बरा’. ती बिचारी इमाने इतबारे तिला नेमून दिलेलं काम चोख करते. तिचा चावा तुम्हाला सोसला तर बरा. नाही तर मुंगी चावल्यासारखी ही हलकीशी जखम पुढं बसतच नाही सहा-सहा महिने. गोड-गोड खाजत राहते. खाजवलं की छान गुजीगुजी वाटतं. जखम चिघळून पसरत राहते इसब झाल्यासारखी आणि पाणी येत रहातं. रक्त येत राहतं. कधीकधी ताप वगैरे येऊ शकतो. टीक फीव्हर. त्यामुळं एकदा हा ‘टीक’चा अनुभव घेतला तर जंगलात गेलं की सतत डोक्यातली ही ‘टीक’ची भीती हृदयाचे ठोके वाढवीत राहील.
टीक-टीक वाजते डोक्यात
धडधड वाढते ठोक्यात.
बांबूच्या रानातसुद्धा, विशेषत: हिवाळ्यात; चाललात अन तुम्हाला ‘गुजी-गुजी’ खाज येऊन तुमच्या कपड्याच्या आत हुळहुळ झाली की या गोचिडी अंगावर मिळतील. बघा मिळतायेत का?
1(23).jpg

आणि माझं म्हणणं काय आहे की गोचिड सोडली तर बाकी कीडे परवडले. पण तुम्ही जंगलात बसू म्हणताना गवत ठाकठीक केलं अन असं काही निघालं तर? त्यातही गवत दाबून ठीक करताना हाताला, पायाला चावलं तर बरंच म्हणायचं. बसल्यावर चावलं तर??? कुठं चावलंय हे सांगायचीसुद्धा पंचाईत. माझ्या नशीबानं जेवायला जागा साफ करताना आधीच ही इंगळी सापडली. तुम्हाला छोटी वाटत असेल. पण एक सांगतो, लक्षात ठेवा, ‘इंगळी म्हणू नये धाकली अन सासू म्हणू नये आपली.’ बाकी काय ते तुम्ही पहा बुवा मग.
1 (6)_0.jpg

डास तर तुम्हाला खूप चावले असतील पण हे पाहिलंय का? हा डास चक्क या फळ-पतंगालाच चावायला पहात होता. नंतर त्याच्या लक्षात आलं की ज्याच्या शोधात तो गुणगुण गीत गात निघाला आहे तो गुणी प्राणी हा नाही. तो गुणी प्राणी कॅमे-यामागं आहे. मग तो डास माझ्या हातावर आला. मला त्याच्या हुशारीचं कौतूक वाटलं, “लबाड, शोधलंस ना मला? शाब्बास रे पठ्ठ्या.” म्हणून कौतुकानं त्याच्या पाठीवर मी एक थाप मारली. बिचारा खाली पडून मेला. मी त्याचं इतकं इतकं कौतुक करीन असं त्याला वाटलंच नव्हतं. त्याला बहुतेक हर्षोन्मादानं ॲटॅक आला होता.
1 (18).jpg

हे चावे काय फक्त आपण नाही हो सोसत. ‘जो जन्माला आला, तो चाव्याचा धनी झाला.’ एकदा दुपारी जेवणं करुन मी रिकामटेकडाच बसलो होतो. एक फुलपाखरू फुलावर आलं. त्याचा फोटो घ्यायला गेलो, तर मला त्याच्या अंगावर हे किडे दिसले. जनावराला गोचिड, माणसाला उवा अन फुलपाखराला माईट्स.
1 (15).jpg

म्हणजे नुसतं फुलपाखरूच नाही. हे माईट्स कशावरपण राहतात. कुठंही सापडतील बरं. चतुर (dragonflies), टाचणी (damsel flies), सिकाडा, घरमाशी, साप, पान ढेकूण (leaf bugs) अशा गोष्टींवर मी पाहिलेत. अगदी माणसाच्या अंगावरसुद्धा. ते ‘उ’सारखे केसाच्या मुळाशी कातडी घट्ट धरून रक्त पित राहतात. ‘उ’ आता दुर्मिळ झाली आहे. विशेषत: पूर्वी भटक्या विमुक्त जमातीत ‘उ’ दिसायचीच. आता सारे भटके ‘उमुक्त’ आहेत. असो. गमतीचा भाग सोडला तर मला माइट्स कुठं कुठं दिसले पहा.
हे पहा या देखण्या, कमनीय बांध्याच्या टाचणीवर आहेत.
1 (21).jpg

या ढेकणावर पण आहेत. पिऊन पिऊन उराउरी फुगलाय पहा. पाय टेकले अन पोट उचललंय.
1 (20).jpg

हे माईट्स पक्ष्यांच्या अंगावर पण असतात. एकदम इवले चिवले. दिसत नाहीत, फक्त जाणवतात. तुम्ही कधी अनुभव घेतलाय का? विशेषतः कबुतर खिडकीत घरटं करतं तेंव्हा.
जिथं नुसता गाड्यांचा घर्र-घर्र, पोम-पोम आवाज ऐकून कानाची दिवाबत्ती विझू विझू झालेली असते, तिथं कबूतराचं निरर्थक एकसुरी गुटूर्गु सुद्धा आपल्याला छान वाटतं. आपल्याला वाटतं आपण आलो निसर्गाच्या जवळ. कबूतर एखाद-दुसरं अंडं घालतं. जमलंच तर व्हाट्सअपवर फोटो टाकून आपण स्टेटस ठेवतो आणि बारशाची तयारी करतो. बारसं होतं, पुढच्या १५ दिवसात पिल्लं उडून जातात आणि त्या २-४ दिवसात आपल्या पूर्ण अंगाला हुळहुळ होते. दिसत काहीच नाही. अगदी बारीक, तीक्ष्ण नजरेनं शोधलं तर एखादा ठिपका हलताना दिसेल. ठिपका केवढा? केसाच्या टोकावर २-४ मावतील. हे असतात बर्ड माईट्स, व्हफा म्हणतात त्याला ग्रामीण भाषेत. कमी जास्त सा-या पक्षांना असतात. पण कबूतर, मैना यांना मी जास्त पाहिल्यात.

आमच्या सोसायटीत एक कुटुंब रहायचं. त्यांचं छोटूसं बाळ आजारी होतं. दवाखाना सुरु झाला. एक दिवस मुलाला दवाखान्यातून दाखवून आणलं. ते गाडी पार्क करुन येताना सोसायटीच्या खाली मला भेटले. मी बाळाकडं बघितलं. ते खांद्यावर डोकं ठेवून झोपलं होतं. त्याच्या गालावर आणि इवल्याशा हातावर मला लाल पुरळ दिसले. त्याबरोबर मी म्हटलं, “तुमच्या घरी बाळ झोपतं तिथं कबूतरानं घरटं केलंय.”
ते आश्चर्यचकीत. “हो. खिडकीत आहे.”
मी म्हटलं, “पूर्ण काढून टाका. ती खिडकी आणि पूर्ण घर स्ट्रॉन्ग फिनाईलनं स्वच्छ धुवून काढा. बाळाचे सारे कपडे स्वछ धुवून दिवसभर उन्हात टाका. त्या कबूतरानं घरटं सोडलं की लाखो उपाशी माईट्स तुमच्या घरात घुसतील आणि तुम्हाला पण हा त्रास होऊ शकतो.” त्यांनी माझा सल्ला ऐकला आणि दोन दिवसांनी बाळ एकदम ठीक, टकाटक.
पण सारेच माईट्स असे चावरट हावरट नसतात बरं का. सुंदर आणि निरुपद्रवी पण असतात. ते नंतर कधीतरी.

आज हे लिहायचा मानस नव्हता, पण एका कोळ्याचे फोटो पाहताना हा चाव-या किड्यांचा विषय मला चावला म्हणून लिहिलं. निसर्गात एकदम छोटेसे, सुंदर किंवा विचित्र जीव खूप आहेत. ओळखता आलं पाहिजे असं काहीच नाही. फक्त शोधत रहा अन त्यांच्या सौंदर्याचा आनंद घ्या. कधीतरी अशा सतत दुर्लक्षित उपेक्षितांबाबत पण एक धागा मी टाकीन म्हणतोय.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसलं भारी आहे. फोटो अफलातून आहेत. इतके छोटे छोटे चावरे जीव कधी बघितले नव्हते फोटोत. आणि लिहिलंय झक्कास!

खूप सुरेख, खुसखुशीत लेख आहे.
फोटोही अतिशय सुंदर,
तुमचा जंगलाचा आणि कीटक विषयाचा अभ्यास खूप दांडगा आहे हे जाणवत आहे.
तुमच्या भटकंती साठी शुभेच्छा आणि पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत

फार छान. अशा माइक्रो फोटोंसाठी मोटोने मोटो माइक्रो हँडसेट काढला आहे म्हणतात.
((अरिष्टनेमि हा कृष्ण, बलरामाचा चुलत भाऊ. तोच पुढे जैन तीर्थंकर नेमिनाथ झाला.))

कसले सुंदर सुंदर फोटो आहेत! माहितीही मस्तच!
DSCN2304.JPG

हे घरटं पेपर वास्पचंच आहे का? उत्तराखंडमधे टायगर फॉल्सजवळच्या रस्त्यावर पुलाखाली दिसलं होतं.

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.

@ Srd
अरिष्टनेमि हा कृष्ण, बलरामाचा चुलत भाऊ.>> >> असं पण आहे का? हे नव्हतं माहित हं. आज एक नवीन गोष्ट कळाली. धन्यवाद. मी 'गरुड' या अर्थी 'अरिष्टनेमी' घेतलं होतं.

@ वावे
"हे घरटं पेपर वास्पचंच आहे का?">>>> हो. त्याच आहेत या.

भारिच !!!

वेगळा, माहितीपूर्ण आणि खुसखुशीत .