नरभक्षकाच्या मागावर ! - भाग २

Submitted by रश्मिनतेज on 24 April, 2020 - 12:05

भाग २
-------------------------------------------------------------

दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी गुंडलम नदीच्या मऊशार वाळूवर मला वाघिणीच्या पावलांचे ठसे आढळून आले. रात्री नदी शेजारून पाणथळ ठिकाणी जिथे मी पहिले रेडकू आमिष म्हणून बांधले होते तिथवर पोहोचली होती हे तिच्या ठशांमुळे अधोरेखित होत होते, त्याला बघून ती क्षणभर थांबली,मात्र त्याला स्पर्श ही केला नव्हता. तसेच पुढे चढून ती शेजारच्या टेकडीला वळसा घालून अनशेट्टी च्या दिशेने गेली होती. त्यापुढे टणक जमिनीमुळे माग काढणे अवघड झाले होते.

तिसऱ्या सकाळी मी माझा शोध घेणे सुरु ठेवले, तळावर पोहोचून गरमगरम पाण्याने आंघोळ आटपून दुपारचे जेवण लवकर करण्याची तयारी करत असताच, अनशेट्टी गावचा पाटील इतर गावकऱ्यांसह तिथे येऊन पोहोचला. त्याने मला खबर दिली की वाघिणीने पहाटेच अनशेट्टी च्या दक्षिणेकडे केवळ मैलभर अंतरावर असलेल्या पाड्यावर एक नरबळी घेतला आहे. दावणीला बांधलेल्या गुरांच्या अस्वस्थ हंबरण्याच कारण शोधायला म्हणून तो खेडूत त्या पहाटे बाहेर पडला होता आणि परतलाच नव्हता. त्यानंतर त्याचा भाऊ आणि मुलगा त्याला शोधायला म्हणून बाहेर पडले तेव्हा त्यांना गोठ्याबाहेर पडलेली त्या खेडूतांची घोंगडी आणि काठी दृष्टीस पडली. त्याचबरोबर त्या टणक जमिनीवर, खेडुतावर झेपावताना उमटलेल्या वाघिणीच्या मागच्या पायांच्या नखांच्या खुणा ही त्यांना अस्पष्टशा दिसून आल्या. भयचकित होऊन, आणखी पुढे न जाता ते दोघे पाड्यावर पळून आले आणि नंतर अनशेट्टी ला पोहोचून, जमाव गोळा करून गावच्या पाटलाला पुढे घालून ते घाईघाईने माझा शोध घेत आले होते.
hamlet_bw.jpeghamlet_bw.jpegपाडा
आंघोळीला फाटा देऊन,घाईने मी जेवण उरकले आणि लगेच अनशेट्टी च्या पुढे असलेल्या पाड्याच्या दिशेने आम्ही निघालो. हल्ला झालेल्या ठिकाणी हे स्पष्ट होत होते की वाघिणीने बळी घेतलेल्या माणसाला आवाज करण्याची ही संधी मिळाली नव्हती. तिथल्या जमिनीच्या कठीण आणि खडकाळ पोतामुळे माग काढणे अतिशय हळू आणि जिकिरीचे होऊन बसले होते. अशा परिस्थितीत आम्हाला बाभळीच्या काटेरी झुडूपांची मदत झाली ते अशाकरिता की वाघिणीने त्या खेडूताला उचलून नेताना काट्यांमुळे धोतर फाटून त्याच्या धोतराच्या चिंध्या इतस्ततः विखुरल्या होत्या. अशा विदारक परिस्थितीतही, त्या वाघिणीच्या काट्यांपासून स्वतःला वाचवून अडथळे पार करण्याच्या हुशारीचे मला कौतुक वाटले.

तिथून सुमारे ३०० यार्डांवर असलेल्या उंबराच्या झाडाखाली असलेल्या गचपणात तिने मृताचा भार उतरवला होता आणि कदाचित तिथेच मृताचा फडशा पाडण्याची तिची योजना होती. पण कदाचित काही व्यत्ययामुळे तिने विचार बदलला आणि ३० मैल अंतरावर असलेल्या मुख्य कावेरी नदीच्या दक्षिणेला वाहणाऱ्या खोल झऱ्याच्या दिशेने ती निघाली.
त्यानंतर माग काढणे सोपे गेले कारण वाघिणीने तिच्या बळीला मानेस न धरता पाठीस जबड्यात धरले. ह्याआधी गळ्याशी धरल्याने रक्तप्रवाह होत नव्हता मात्र आता रक्ताचे थेंब झुडपांच्या पानावर पडल्याने आणि दाटीला चाटून जात असल्याने मग काढणे तुलनेने सोपे झाले होते. आणखीन १०० यार्डांवर आम्हाला त्या खेडुताचे पूर्णतः सुटे झालेले आणि काट्यांवर रुतलेले धोतर दृष्टीस पडले.

पुढे चाल केल्यावर झऱ्याशी पोहोचल्यावर मऊशार कोरड्या वाळूत वाघिणीच्या पावलांचे ठसे स्पष्टपणे उमटले होते आणि त्याच्या एका बाजूला पुसटशी घसडखूण ही दिसली, निश्चितच खेडुताला वाहून नेताना त्याच्या पायाचा स्पर्श वाळूला झाला होता !

tiger_pugmarks_bw.jpegपावलांचे ठसे

आता माग काढायची गरज उरली नव्हती आणि जमावाच्या गोंधळाची शक्यता असल्याने मी विनाकारण धोका न पत्करता त्यांना तिथेच थांबायचे सांगून एकटाच काळजीपूर्वक पुढे सरसावलो, झऱ्याच्या दोन्ही काठांवर असलेल्या दाट गचपणावर सावधगिरीने नजर ठेवत मी अगदी सावकाश चाल करत होतो कारण त्याच गचपणात लपून राहीलेली वाघीण तिच्या मागावर असलेल्या व्यक्तीवर नजर ठेवून बसली असण्याची शक्यता होती. झऱ्याच्या दोन वळणांना पार करून गेल्यावर पात्रातच असलेल्या खडकाचा एक भाग दिसला आणि मी माझ्या हालचाली चोरपावलाने करू लागलो. नीट निरीक्षण केल्यावर खडकापलीकडे एक गडद आकार दिसू लागला आणि तिथे निश्चितपणे होते ते त्या दुर्दैवी खेडुताचे शव !

भक्ष्याचा जवळजवळ अर्धा भाग फस्त केल्याने वाघिणीचे बऱ्यापैकी पोट भरले होते आणि जेवणाच्या प्रक्रियेत जांघेपासूनचा एक पाय आणि एक हात विलग होऊन पडले होते. वाघीण जवळपास नसल्याची खात्री करून घेत मी गावकरी थांबले होते त्या जागी परतलो आणि माझ्यासाठी त्या जागेवर एक लपण जिथे बसून मी ती हिंस्त्र वाघीण शिकारीवर परतण्याची वाट पाहू शकेन असे बांधण्यास सांगितले. मला खात्री होती की सूर्यास्तापूर्वी वाघीण नक्की येणार.

बसण्यासाठीची याहून अयोग्य जागा कल्पना करूनही मिळाली नसती. ज्यावर लपून बसता येईल किंवा मचाण बांधता येईल अशा कुठल्याही झाडांचा तिथे पूर्णपणे अभाव होता, मग आम्हाला कळून चुकले की आता केवळ २ शक्यता होत्या : पहिली म्हणजे झऱ्याच्या विरुद्ध किनाऱ्यावर जिथून शव स्पष्टपणे दिसू शकेल अशा ठिकाणी बसणे आणि दुसरी म्हणजे झऱ्याच्या पात्रापासून सुमारे १० फूट उंचीवर असणाऱ्या त्या खडकाच्या उतारावर बसणे, जिथे खडकाच्या वरच्या टोकापासून ४ फूट अंतरावर एक नैसर्गिक घळ तयार झाली होती . पहिला पर्याय अत्यंत धोकादायक असल्याने मी लगेच बाद केला कारण ती वाघीण नरभक्षक होती, ह्यामुळे त्या घळीत बसण्याशिवाय माझ्याजवळ पर्याय उरला नव्हता. तिथून मला फक्त शव च दिसणार नव्हते तर आम्ही ज्या दिशेने आलो होतो त्या झऱ्याच्या वळणापर्यंतचा आणि दुसऱ्या दिशेस अचानक उजवीकडे वळण घेणारा सुमारे २० यार्ड लांबीचा भाग नजरेच्या टप्प्यात येणार होता.
jungle_stream_bw.jpegझरा

भवतालच्या परिस्थितीशी साधर्म्य साधणाऱ्या आणि खडकापासून जवळच उगवलेल्या काटेरी झुडपांच्या फांद्या तोडण्याचा जरासाही आवाज न करता आम्ही झऱ्याच्या वरच्या बाजूला शक्य तितक्या लवकर आमचे काम आटोपले. अगदी कौशल्याने आणि धूर्तपणे घळीच्या तोंडावर ह्या फांद्या पसरवून ठेवल्या जेणेकरून मी झऱ्याच्या कुठल्याही बाजूने दृष्टीस पडता कामा नये. सुदैवाने आधीच विचार करून मी माझे ब्लॅंकेट, पाण्याची बाटली आणि टॉर्च सोबत आणली होती. तरी टॉर्च चा रात्रीचा बहुतांश वेळ फारसा उपयोग होणार नव्हता कारण पौर्णिमा जवळ आली होती आणि चंद्र लवकर उगवत होता. दुपारच्या ३ वाजेपर्यंत मी माझ्या जागेवर तयार होऊन बसलो होतो आणि पुढच्या सकाळी गरम चहाचा थर्मास आणि सँडविच आणण्याच्या सूचनेचा स्वीकार करून गावकरी निघून गेले होते.
Jungle_path_bw.jpegजंगलवाटा

दुपार अगदी सावकाशपणे सरली,सूर्य उघड्या पडलेल्या खडकावरच आग ओकत होता आणि मी घामाने न्हाऊन निघालो होतो. खाली पसरलेल्या झऱ्याच्या दोन्ही बाजूस सर्वकाही शांत स्थिर होते आणि भाजलेल्या जमिनीतून जीवाची काहिली करणाऱ्या झळा निघत होत्या. आकाशात गिधाडांचा मागमूसही दिसत नव्हता कारण वाघिणी ने त्या खडकाच्या तीव्र उताराखाली शव दडवून ठेवले होते. ५ वाजेच्या सुमारास एका कावळ्याच्या दृष्टीस ते पडले आणि कावकाव करून त्याने आपल्या जोडीदाराला बोलवून घेतले. पण मनुष्य गंध आल्याने अस्वस्थ झालेले दोन्ही पक्षी शिकारीवर तुटून पडले नाहीत. असाच वेळ गेला आणि सूर्याचा तांबडाभडक गोळा जंगलांनी वेढलेल्या दूर टेकड्यांच्या मागे अस्ताला गेला. एकामागोमाग एक कावळे दूरच्या झाडावर वस्ती करण्यासाठी उडाले आणि दुसरा दिवस उजाडताच भुकेने व्याकुळ झालेले ते पक्षी,मनुष्य गंधाच्या भीतीचा लवलेश न बाळगता भक्ष्यावर तुटून पडणार होते. मावळणाऱ्या दिवसाची वार्ता रानकोंबड्याच्या उत्साहित करणाऱ्या आवाजाने चारी दिशांना पसरली आणि त्यापाठोपाठ झऱ्याच्या कोरड्या पडलेल्या पात्राच्या खालच्या बाजूकडून मोराने आपला कर्कशध्वनी सादर केला. आता "ती वेळ" झाली होती आणि नरभक्षकाच्या परतीची मी डोळ्यात प्राण आणून अतिशय सजगतेने वाट बघत होतो. पण काहीच घडले नाही आणि जोराने फडफड करत मोराचा उडण्याचा आवाज आला आणि मावळतीनंतर लगेच तिन्हीसांज झाली.

सुदैवाने चंद्रोदय लवकर झाला आणि त्या चंदेरी प्रभेने माझ्या नजरेच्या आवाक्यात जराशी सुधारणा झाली. दिवसाचे पक्षी आता निवाऱ्याला गेले होते आणि त्यांची जागा निशाचर पक्ष्यांनी घेतली होती. रात्रीचे पहीले दूत असणाऱ्या रातव्यांनी त्यांचा " चक्कू चक्कू चक्कू " स्वर नेटाने लावला होता आणि थंडावणाऱ्या झऱ्याकाठी त्यांचे कीटक शोधण्याचे प्रयत्न सुरु होते. अजून काही काळ गेला आणि त्या ठिकाणी मृतवत शांतता पसरली. त्या स्तब्ध हवेत रातकिड्यांची किरकिर ही थांबली होती आणि माझे दोस्त असणारे रातवे ही भक्ष्याच्या शोधार्थ दुसरीकडे निघून गेले होते. त्या मृत अवशेषांकडे लक्ष टाकताच मला असे जाणवले की त्याचा एक हात माझ्या दिशने उंचावलेला आहे आणि जणू त्याच्या मृत्यूचा बदल घेण्याची विनवणी मला करत आहे. सुदैवाने डोके दुसरीकडे वळलेले होते, ज्यामुळे मी दुपारी पाहीलेले ते भीतीदायक विद्रुप चित्र मला परत दिसत नव्हते.

एकदम अचानक सांबराने जोराचा अलार्म कॉल दिला आणि शांततेचा भंग झाला आणि माझ्या अंदाजानुसार अर्धा मैल अंतरावर असणाऱ्या जागेपासून अशाच प्रकारचे कॉल एकामागोमाग एक ऐकू येऊ लागले, मग चितळाचा तीव्र आवाजातला कॉल आला आणि त्यापाठोपाठ पावशाच्या "पेर्ते व्हा पेर्ते व्हा " अशा उच्च लयीतला आवाज त्या झऱ्याच्या परिसरात घुमत राहीला. मी सुटकेचा निश्वास टाकला आणि स्नायू ताणून सज्ज झालो. माझ्या मित्रांनी, जंगलाच्या रात्रीच्या पहारेकर्यांनी निष्ठेने आपली कामगिरी पार पाडली होती आणि मला कळून चुकलं होतं की वाघिण निघालेली इतर प्राण्यांनी पाहिली आहे.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जबरदस्त वर्णन.... उत्कंठावर्धक...

पुढचा भाग लवकर टाकणे...

अशी वर्णन करायला लेखकाचा कसं लागतो.
आणि इथे लेखन शैली अतिशय उत्तम असल्या मुळे.
कथा चित्र रुपात पाहत आहोत असा भास होत आहे स्वतः जंगलात असल्याचा फील सुद्धा वाटत आहे.