नरभक्षकाच्या मागावर !

Submitted by रश्मिनतेज on 23 April, 2020 - 04:23

केनेथ अँडरसन म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर दक्षिणेचा जिम कॉर्बेट ! लालित्यपूर्ण भाषेत जंगलाचं चित्र उभं करण्यात अतिशय वाकबगार असणाऱ्या केनेथ ची पुस्तके १९५० च्या दशकापासून पुढे खूप गाजली. जीवावर बेतू शकणाऱ्या साहसात आनंदाने उडी घेऊन नरभक्षकाचा खात्मा करणे हे या स्कॉटिश वीराचे आवडते काम ! निसर्गावर आणि प्राणिमात्रांवर अतोनात प्रेम करणाऱ्या केनेथ ने मजा म्हणून शिकार करण्याचे उदाहरण अगदी क्वचितच मिळेल. अशा या केनेथ अँडरसन च्या "जवळागिरीचा नरभक्षक" ह्या कथेचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे :

भाग १
-----------------------------------------------------------------------------------
ज्यांनी ज्यांनी म्हणून जंगलांत, तेही विशेषतः विषुववृताजवळील प्रदेशात भटकंती केली आहे , त्यांना कोणालाच चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेल्या टेकड्यांची नि दऱ्याखोऱ्यांची आणि त्यातच उजळपणे दिसणाऱ्या कुरणांची, विस्तीर्ण पसरलेल्या वृक्षांची विलॊभनीयता स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. या झाडांच्या पानांना छेदून चंद्रकिरणे खाली पोहोचू शकत नसल्याने अद्भुतरम्य अशा दाट सावल्यांचं राज्य जंगलभर पसरलेलं असतं आणि यामध्ये दडलेली असतात हिंस्त्र श्वापदं , सजग हरणं आणि अन्नाच्या शोधात असलेले इतर असंख्य प्राणीजन..

जवळागिरीच्या जंगलात वरवर सर्व आलबेल दिसत असलं तरीही मृत्यूशी गाठ पडेल अशा धोकादायक जागा पावलोपावली होत्या. चोरटी शिकार करणाऱ्याचं त्रिकुट हरणाचं मांस मिळवण्याच्या हेतूनं आपल्या २ जुनाट अशा ठासणीच्या बंदुकांसह दबा धरून बसलं होतं. तळ्याच्या दिशेने उतरत जाणाऱ्या काठावर त्यांनी अतिशय हुशारीने एक लपण बनवलं होतं आणि तिथे आपली तहान शमवायला येणाऱ्या हरणाच्या शिकारीसाठी ते सूर्यास्तापासून सावधपणे बसले होते.
काही तास सरले, पौर्णिमेचा चंद्र मध्यावर आला होता आणि त्याचा अगदी लख्ख प्रकाश पडला होता. अचानक त्यांच्या डावीकडे असणाऱ्या हिरव्यागार झुडुपांच्या झाडोऱ्यातून पाचोळा खसफसण्याचा आणि पाठोपाठ डुरकण्याचा आवाज आला. रानडुक्कर .. निश्चितपणे ! स्वादिष्ट जेवण आणि उरलेलं मांस विकून येणारे पैसे क्षणभर त्यांच्या डोळ्यांसमोर चमकले. शिकाऱ्यांनी कानोसा घेतला पण ते जनावर काही उघड्यावर आलं नाही.. वाट पाहून पाहून संयम सुटत चाललेल्या टोळीच्या म्होरक्याने तसाच वेध घेण्याचा धोका पत्करला. आपली बंदूक उंचावून, आजूबाजूला पसरलेल्या काळोखातूनही उठून दिसणाऱ्या त्या सावलीच्या हालचालींचा अंदाज घेऊन त्या दिशेने त्याने बार टाकला. रागाने गुरगुरत , डरकाळी फोडून आसपासच्या झुडपांना संतापाने ओरबाडत घशातून " व्हुफ व्हुफ" असे आवाज काढत जंगलाच्या दिशेने त्याने धाव घेतली आणि शांतता पसरली.

डुक्कर नव्हे तर वाघ !! प्रचंड भेदरलेल्या त्या त्रिकुटाने कसाबसा त्यांचा गाव गाठला आणि उरलीसुरली रात्र त्यांच्या करणीचा काय परिणाम होईल हा विचार करत घालवली. पण सकाळी त्यांना जरा हायसं वाटलं कारण ऐन यौवनात असलेला ढाण्या नर वाघ जंगलात मरून पडला होता. अंधारात चालवलेल्या त्या जुनाट बंदुकीने थेट वाघाच्या हृदयाचा वेध घेतला होता. मग काय, मुनिअप्पा आणि त्याचे मित्र गावाचे नायक ठरले होते आणि त्यांच्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं.
मात्र त्यापुढील रात्री एक वेगळीच कथा आकाराला येत होती. जसाच सूर्य अस्ताला गेला, तास वाघिणीचा तिच्या मृत जोडीदाराचा शोध घेणारा संतापी गुरगुराट चालू झाला . तो वाघांच्या मीलनाचा हंगाम होता आणि केवळ एका रात्रीपूर्वीच ती वाघीण तिचा जोडीदार यशस्वी झाली होती. पण त्या नराच्या अनाकलनीय रित्या गायब होण्याने त्रस्त झालेल्या वाघिणीने ह्या गोष्टीचा संबंध अचूकपणे मनुष्याच्या हालचालींशी लावला होता.
आठवडाभर रात्रीमागून रात्री वाघिणीच्या अस्वस्थ हालचाली सुरु होत्या. दिवस दाट जंगलातून ते रात्री अगदी गावाच्या वेशीपर्यंत तिच्या गुरगुरण्याचे आणि डरकाळ्यांचे आवाज पोहोचत होते.

जॅक लिओनार्ड नावाचा तरुण वाघाची शिकार मिळवायला उत्सुक होता. त्याला गावकऱ्यांनी तातडीने सांगावा धाडला आणि पुढच्या दिवशी सकाळी तो तिथे पोहोचला आणि त्याने परिस्थितीची पाहणी केली. वाघिणीचा मुक्त संचार असल्याचे त्याच्या लक्षात आल्यावर आणि वनविभागाच्या विश्रामगृहाच्या एकाकी रस्त्यावर वाघिणीच्या पावलांचे ठसे दिसल्यावर त्याने त्याच संध्याकाळी त्याचे नशीब अजमावण्याचे ठरवले. ५ वाजेच्या सुमाराला एका वारुळाचा आडोसा घेऊन तो त्या वाटेवर उभा राहिला. काही मिनिटे गेली आणि सव्वासहाला सगळीकडे सांजावलं. अचानक पानांच्या सळसळीचा हलकासा आवाज आला आणि एक चुकार खडा घरंगळून त्याच्या उजवीकडे पडला. लिओनार्डने डोळे ताणून वाघीण कुठे दृष्टीस पडते का ते पाहिलं , पण कशाचाही मागमूस नव्हता. आणखी काही मिनिटे गेली आणि मग जलद वेगाने त्याच्याच बाजूने रस्त्याच्या कडेने येणारी वाघीण त्याच्या नजरेस पडली. घाईने रायफल चा दस्ता डाव्या खांद्यावर ठेवून आणि झुडुपातून शक्य तितके बाहेर झुकून वाघीण जास्तीत जास्त नजरेच्या टप्प्यात येईल अशा प्रकाराने लिओनार्डने वाघिणीच्या छातीचा वेध घेतला. जराही उजवीकडे गोळी लागली असती तर तो निश्चितच प्राणघातक असा नेम ठरू शकला असता. हाय ! असे न घडता , लिओनार्डची ची गोळी वाघिणीच्या उजव्या खांद्यामध्ये खोल रुतून बसली आणि प्रचंड डरकाळी फोडून वाघीण जंगलात नाहीशी झाली. अतिशय खट्टू होऊन लिओनार्ड माग काढण्यासाठी सकाळ होण्याची वाट पाहत बसला. माग काढत असता, खूप जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झालेला त्याला दिसला. कठीण खडकाळ प्रदेश , घनदाट झाडीने पसरलेल्या दऱ्या , त्यातच रानबाभळीसारख्या काटेरी झुडपांच्या प्रादुर्भावामुळे त्याला त्याच्या शिकारीचा माग काढण्यात अपयश आले.

काही महिने सरले आणि जवळागिरीपासून ७ मैल अंतरावर असणाऱ्या आणि दाट जंगलात वसलेल्या सुळेकुंटा नावाच्या गावात एक घटना घडली. ह्या गावात असणाऱ्या एका देवस्थानाला जवळच्या गावातील भक्तगण दर्शनाला यायचे. असंच एक पुरुष, त्याची बायको आणि १६ वर्षांचा मुलगा पूजा आटोपून परत आपल्या घरी निघाले होते. मंदिरापासून केवळ पाव मैल अंतरावर असणाऱ्या चिंचेच्या झाडाखालून निघाले असता तो मुलगा अर्धकच्च्या आणि आंबट अशा चिंचा गोळा करायला तिथे जरा रेंगाळला. तेवढ्यात त्याच्या माता-पित्यानी हलकी गुरगुर ऐकली आणि त्यापाठोपाठ मुलाची भेदून जाणारी आर्त किंकाळी ऐकू आली. पाठीमागे वळून पाहताच त्यांना वाघाने जबड्यात धरलेला त्यांचा मुलगा दिसला. तेवढ्यात वाघ त्या एकुटवाण्या रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या झऱ्यात उडी मारून दिसेनासा झाला. त्या वृद्ध जोडप्याने हिंमतीने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, हिंस्त्र प्राण्याला जोरजोरात शिव्याशाप देऊन आरडाओरडा केला, मात्र उत्तरादाखल त्यांना फक्त त्यांच्या एकुलत्या एका लेकाचे शेवटचे कण्हणे दोनदा ऐकू आले आणि पुन्हा एकवार सन्नाटा पसरला.

त्यानंतर भल्या मोठ्या प्रदेशातून एका मागोमाग एक बळींच्या बातम्या येऊ लागल्या. अति उत्तरेकडे असणाऱ्या जवळागिरी पासून ते सुमारे ३० मैल दक्षिणेकडे असलेल्या गुंडलम च्या गोठयांपर्यंत; ते म्हैसूर राज्याच्या सीमेपासून आत २० मैल पश्चिमेकडून ते देकनीकोट्याच्या हमरस्त्यापर्यंत अशा जवळजवळ ४५ मैलांच्या प्रदेशात १५ बळी गेले. ह्या सैतानी जनावराला बळी पडलेल्यात तीन मुलीही होत्या आणि त्यापैकी एकीचे तर नुकतेच लग्न झाले होते. तेव्हा मला माझ्या मित्राने, जो त्यावेळेस होसूर प्रांताचा उपजिल्हाधिकारी होता, त्याने ह्या सैतानाचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीचे बोलावणे पाठवले.
उपजिल्हाधिकाऱ्याने सांगितल्यानुसार जिथे ह्या सर्व त्रासाची सुरुवात झाली त्या जवळगिरीला पोहोचून मी सर्व माहितीची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. त्यातून असे निष्पन्न झाले कि हे नरभक्षक जनावर वाघ नसून वाघीण आहे आणि चोरट्या शिकाऱ्यांनी तिच्या जोडीदाराला मारून तिच्यापासून हिरावले आहे. त्यातच कहर म्हणून लिओनार्डने धैर्याने मारलेल्या परंतु अपयशी ठरलेल्या बंदुकीच्या गोळीमुळे वाघीण जखमी झालेली आहे.

ताजे ठसे दिसण्याच्या आशेने मी जवळागिरीहून दरमजल करत सुळेकुंटाच्या दिशेने निघालो पण माझे दुर्दैव माझ्या आड आले. अशामध्ये नवीन बळींची नोंद त्या ठिकाणी झाली नव्हती आणि तिथे चरणाऱ्या कळपांमुळे तेथील पाऊलखुणाही पुसट झाल्या होत्या. नरभक्षकाच्या छायेतील प्रदेशाच्या दक्षिण बाजूस तेवीस मैलांवर असणाऱ्या गुंडलम येथे मी माझा तळ ठोकण्याचे ठरवले. कारण गायी-गुरांच्या या प्रदेशात सर्वाधिक बळींची नोंद झाली होती आणि गेल्या चार महिन्यात सात गुराख्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.
माझ्या उपजिल्हाधिकारी मित्राने अगदी विचारपूर्वक तीन धष्टपुष्ट रेडकू मला देऊ केले. मी त्यांना शिकार साधण्याच्या दृष्टीने मोक्याच्या असणाऱ्या जागांवर आमिष म्हणून बांधण्यासाठी घेऊन गेलो. पहिल्याला मी गुंडलमला खेटून वाहणाऱ्या मैलभर अंतरावरच्या नदीजवळ बांधले. सिगेहळ्ळी नावाच्या या ठिकाणी नदीला अजून एक उपनदी येऊन मिळत होती आणि हा वाघिणीचा तिचा नेहमीचा फेरीमार्ग (बीट) असल्याची नोंद होती, मात्र वर्षाच्या या हंगामात नदीतून अगदी थोडे पाणी वाहत होते.
दुसऱ्याला मी ४ मैल लांब शेजारच्या गावाकडे , अनशेट्टी कडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधले आणि उरलेल्या तिसऱ्या रेडकूला मी गुरं आणि गुराख्यांचा पाण्याचा दैनंदिन स्रोत असणाऱ्या पाणलोटाशी बांधले. अशाप्रकारे तिन्ही आमिषांची व्यवस्था लावून पुढचे दोन दिवस मी माझ्या .४०५ विंचेस्टर रायफलीला हातात घेऊन जंगलाच्या प्रत्येक दिशेने पायपीट केली. मला आशा होती की मला ताजे ठसे पाहायला मिळतील किंवा प्रत्यक्ष नरभक्षक तरी !
WhatsApp Image 2020-04-23 at 10.23.39.jpeg

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! केनेथ अँडरसनचा अनुवाद! वाचते.
अक्षरशः पारायणं केल्येत मी त्याच्या पुस्तकांची. बरीचशी घरी आहेत. इथे आशुचँपनी मस्त लिहीलंय केनेथ अअँडरसन बद्दल.

केनेथ अँडरसन... वा... अनेकानेक वर्षांनी नाव वाचले. विस्मरणात गेले होते. पूर्वीच्या एका नियतकालीकात ("नवनीत मराठी डायजेस्ट" असे नाव होते बहुतेक त्याचे) यांच्या शिकारकथा असत. झपाटल्यासारख्या वाचून काढल्या होत्या. पुन्हा एकदा इतक्या वर्षांनी त्या कथा Happy नक्की वाचणार!

@शाहिर,अज्ञानी - प्रतिसादाबद्दल आभारी आहे !
@रायगड , खरंय अगदी अँडरसन च्या कथांची "चटक" लागते आणि पारायणं होत राहतात. आशुचॅम्प ह्यांचा लेख खूप रोचक आहे, वाचला !
@atuldpatil, मराठी अनुवादित होत्या का त्या कथा ? मिळाल्यास इथे अगदी आठवणीने टाका. हा अनुवाद देखील आवडेल अशी आशा आहे Wink
@वेडोबा, धन्यवाद
@भाग्यश्री१२३, पुढचा भाग लवकरच टाकतो.

मस्तच. येऊ द्या पुढचा भाग लवकर.

लहानपणी मला माझा मामा जिम कॉर्बेटच्या गोष्टी सांगायचा त्या आठवल्या.

जंगलच्या कथा अतिशय रंजक असतात..
तुम्ही त्याचा ताजेपणा छान जपला आहे.

मागे आकाशवाणीवर युववाणीमधे किरण पुरंदरे त्यांच्याच पुस्तकाचे वाचन करत.. हरवून जायला होते ऐकताना..
तुम्ही या पुस्तकाचे वाचन करून YouTube वर टाकू शकता. ऐकायला आवडेल