द वर्ड्स विथ सायलेंन्स...

Submitted by अजय चव्हाण on 22 April, 2020 - 05:59

सकाळची सहाची वेळ आणि स्वारगेट बसस्टाॅप. फेरीवाल्यांचे आवाज, दुर कुठूनतरी टेपवर मोठ्याने लावलेली गाणी, कंडक्टरचं ते "चला ऽऽऽ चलाऽऽ" ओरडणं परत त्या शिट्टीचा आवाज, बसच्या हाॅर्नचा आवाज, बाहेरील प्रायवेट बसच्या ऐजंटच्या -
"मुंबई..मुंबई..कोल्हापूर..कोल्हापूर सातारा..सांगलीऽऽ" अशा आरोळ्या ह्या सगळ्या गदारोळात मी हेडफोनमध्ये माझं फेवरेट भावगीत "केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली" ऐकत मस्त वाफळत्या चहाचा आस्वाद घेतेय. खरंतर हे गाणं कधीच संपू नये असं वाटतं. ह्या गाण्याचे सूर सुरेख आहेतच पण ह्यातले शब्द मला जास्त भावतात. शब्दवेडीच आहे मी. आवडतं मला शब्दांशी खेळणं. शब्द म्हणजे श्वास, शब्द म्हणजे ओढ, शब्द म्हणजे बंध, शब्द म्हणजे मन आणि शब्द म्हणजे आनंद. मी स्वतःशीच विचार करतेय. कानातलं गाणं केव्हाच संपलं होतं आणि कपातला चहादेखील. गाडीची वेळ होत आलेली. मी कानातले ते बोळे काढून तसेच मानेवरून लोंबकळत खाली ठेवले.

इतक्यातच बस आली. मी लगबगीने चढले तशी सिट आधीच आरक्षित केलेली पण तरीही मला नेहमीच घाई असते कारण एकदा सामान व्यवस्थित ठेऊन बसलं की मोकळं. नंतर लोक येत राहतात आणि सामान वरच्या रॅकवर ठेवताना धक्का वैगेरे लागतो किंवा गाडी सुरू झाली की मग ती सामान ठेवायची सर्कस करावी लागते. मी माझी बॅग व्यवस्थित वर ठेवली आणि बसले एकदाचे. वरच्या ए.सी. चे गोळे हवा व्यवस्थित यावी म्हणून अॅडजस्ट केले आणि पाय पसरून मस्त आरामात बसावं म्हणून पाय पसरले तर पायाला काहीतरी जाडजूड पुस्तक का काहीतरी लागलं. मी वाकून उचललं तर कुणाचीतरी डायरी होती. कदाचित पुढच्या माणसाची असावी असं समजून त्याला विचारलं तर त्याने नकार दिला. डायरी तशीच दाखवत मी उभे होते आणि अचानक बस सुरू झाली. झालं! सगळा सत्यानाश.. मी पुढच्या सीटवर धडकले आणि हातातली डायरी पुढच्या माणसाच्या टकल्यावर.

"बिचारा चौदहवी का चांद" काय बोलणार इतक्यात मीच साॅरी साॅरीचा जप केला आणि डायरी त्याची आहे का विचारलं तर त्याने "मेरा नहीयेऽऽ" शक्य तितक्या रागात सांगत डायरी उचलून परत मला दिली. हात उंचावून मी डायरी डायरी ओरडत होते पण सगळेच नकारार्थी मान हलवत होते. डेपोत जमा करण्याचा प्रश्नच नव्हता कारण ज्याची आहे त्याला पुढच्या सात जन्मात डेपोतून मिळणं शक्यच नव्हतं.

मी गुमान सिटवर बसले. ह्या सगळ्या गदारोळात माझ्या बाजूला येऊन बसलेल्या हिंडीबाकडे माझं लक्षचं नव्हतं ती मला "खाऊ का गिळू" ह्या नजरेने पाहत होती मी हलकं स्माईल दिलं. ज्या डायरीसाठी मी पुढचा टकल्या आणि ह्या हिंडीबाला त्रास दिला त्या डायरीचा मालकाचं नाव तरी काय म्हणून पहिलं पान उलटलं तर नावचं नव्हतं फक्त एक मोठं टिंब तेवढं होतं. काय विचित्र माणूस आहे ह्याला नावगावं आहे का नाही का टिंब हे नाव आहे? मला थोडा रागच आला. शेवटचं पान उघडलं कारण काही लोकांना शेवटच्या पानावर नाव लिहायची सवय असते तर तिथेही काही नाही नुसतचं कोरं. मी पुढचं दुसरं पान उघडलं मस्त मोगर्याच्या फुलांचा सुंगंध आला आणि सुरेख अक्षरात लिहलेली सुगंधित कविता

"तुझ्या केसांतली "ती" फुले..
कधी रूसलेली कधी अचंबित.
इर्षा असावी बहुधा त्यांना..
कारण त्याहूनि "तू" सुगंधित..

हरवली मने ती.. हरवल्या भावना
जपल्या आठवां मी.. जपल्या त्या खुणा..
एक ओंजळ माझी ही..
आणि एक कळी तुझी ती..
कधी हर्षित तर कधी धुंदीत..

वा!! सुरेख.. नकळत मनातून शब्द उमटले. मी अजून काही पाने पाहीली. पन्नास एक पानावर अशाच कविता लिहलेल्या. मला जणूकाही घबाड मिळाल्याचा आनंद झाला तो क्षणभरचं.
नंतर गिल्ट वाटलं कारण अशी दुसर्याची डायरी वाचणे बॅड बॅड मॅनर्स पण मला मोह आवरता आला नाही आणि अजून चार पाच कविता वाचल्या. सार्याच कविता अप्रतिम होत्या. मनातल्या मनात त्या अनोळखी कवीला दादही दिली. त्याच्या कविता वाचताना नकळत मन प्रफुल्लित झालं होतं. शब्दांच्या त्या सुंगधाने एकप्रकारची धुंदी येऊ लागलेली आणि त्या धुंदीत कधी मी ती डायरी छातीशी कवटाळून झोपी गेले हे माझं मलाच कळलं नाही. जाग आली तेव्हा मी माझ्या स्टाॅपच्या आधीच्या स्टाॅपवर पोहचलेले.

बापरे! इतकी कशी मी गाढ झोपले ह्याचं मला आश्चर्यच वाटलं. काय करावं ह्या डायरीचं? द्यावी का डेपोत? हिचा मालक शोधत असेल तर? त्याला ती परत मिळाली नाही तर ह्या कवितेचे कागद केवळ चण्या-शेंगदाणाच्या पुड्या होतील? नाही! नको मीच देते परत. शोधेन मी त्याला कसं ते माहीत नाही पण नक्की शोधेन त्याला. एक मिनिट! 'त्याला की तिला' हे कुठं माहीत आहे? पुरूषच असेल पहिल्या कवितेवरून तरी तेच वाटतयं. शोधू आपण.. हा सगळा विचार करत असताना माझा स्टाॅप आलादेखिल. मी माझं सामान घेऊन उतरले.

मयुरी माझी रूममेट स्कूटीवरून मला घ्यायला आलेली.. मी काहीच न बोलता गुमान बसले. घरी गेल्यावर काॅफी पिता पिता मयुरीला सगळं सांगितलं. तिने आधी मला वेड्यातच काढलं. इतकी लोकसंख्या असलेल्या देशात त्याला कसं शोधणार असं म्हणाली. तिचही बरोबर आहे म्हणा पण एक मिनिट! देशात कुठे शोधायचं आपल्याला. महाराष्ट्रात शोधलं तरी भेटेल की तो पण शोधायचं कसं हाही प्रश्न होताच कारण एकट्या महाराष्ट्राची लोकसंख्या करोडोनी आहे. बघू काहीतरी नक्कीच मार्ग निघेल. दुसर्या दिवशी मनिष माझा ऑफिसमित्र तो ही कविता लेख लिहतो त्याला सगळं सांगितलं. त्याने एक आयडीया दिली आणि ती म्हणजे जिथे कविता रजिस्टर केल्या जातात तिथे चौकशी करायची ह्या कविता रजिस्टर्ड असतील तर त्याच नाव तरी किमान कळू शकेल. मनिषचा एक मित्र त्या ऑफिसात कामाला होता त्याला त्याने कवितेची काही नावे सांगून रजिस्टर्ड आहेत का हे तपासायला सांगितलं. दुसर्या दिवशी सांगतो म्हणाला. मला तर खूपच आनंद झाला. चला जर कविता रजिस्टर्ड असतील तर नक्कीच काहीतरी माहीती मिळेल पण कसलं काय? एक दोन सारख्याच नावाच्या कविता होत्या पण त्यातल्या एकही मॅच नाही म्हणजे हा ऑप्शन बाद.

मयुरीने सांगितल्याप्रमाणे वर्तमानपत्रात जाहीरात दिली, फेसबूकवर पोस्ट करून झालं,व्हाॅटसअपवरसुद्धा शेअर केलं. कुणीतरी नक्की पोस्ट वाचून संपर्क करेल ह्या आशेवर दिवस सरत होते. पोस्ट केल्यापासून तब्बल एका महिन्याने फोन आला. कोण आनंद झाला सांगू पण खात्री केल्याशिवाय ओळख पटणार कशी म्हणून एक ओळ ऐकवून पुढची ओळ ऐकवायला सांगितली तर पठ्ठ्याने फोनच ठेवला बाकी मुलांचे भलते सलते मॅसेज आणि काॅल्सचा त्रास झाला तो वेगळाच. आता काय करायचं? विचार करून डोक्याचा नुसता भुगा झालेला अशात मनिषने अजून एक आयडीया सांगितली आणि ती म्हणजे कविता सादर करण्याचे कार्यक्रम होतात तिकडे हा कवी नक्की हजेरी लावत असणार. आपण असे पुण्या मुंबईत होणारे कार्यक्रमांच्या आयोजकांना अपिल करूया जर तो आला तर त्याला कळेल आणि संपर्क करणं सोप्पं होईलं. मला तर ही आयडीया खुप आवडली पण देव जाणे ईट्स वर्क ओर नाॅट.

दोन वर्षे झाले कुठून काहीच संपर्क होत नव्हता पण मी अजून धीर सोडला नव्हता. एक दिवस नक्की तो भेटेल. असचं एकदा ऑफिसवरून घरी जात असताना कॅबमध्ये रेडीओवर
"मन की बात" हा कार्यक्रम लागलेला. ह्या कार्यक्रमात आपण मनातलं सगळं ओळखीच्या व्यक्तीपर्यंत पोहचवू शकतो फक्त तो कार्यक्रम त्याचवेळी त्या व्यक्तीने किंवा त्याच्या ओळखीच्या कुणीतरी ऐकायला पाहीजे. मी लगेच नंबर डायल केला. अठराव्या प्रयत्नांनी तो जोडला गेला आणि मी सांगितलं सगळं आणि माझा मेलआयडी संपर्कासाठी दिला. फोन नंबर देणार होते पण मागचे आलेले काॅल्स आणि मॅसेजेसचा त्रास मला पुन्हा नको होता. आठवडाभर मी रोज मेल चेक करत राहीले पण अपेक्षित कुठलाच मेल आला नव्हता आणि आता तर माझी उरलीसुरलेली आशाच माळलेली. अशातच दहा दिवसांनी एक मेल येऊन धडकला.फायनली अपेक्षित मेल आलेला पण लगेच आनंदीत न होता खात्रीसाठी कवितेच्या एक एक ओळ पाठवून पुढच्या ओळी पाठवायला सांगितल्या पण रिप्लाय शून्य म्हणजे हा पण फेक मेल होता तर..

कंटाळून ती डायरी माझ्याजवळचं ठेवायचा मी निर्धार केलेला. दुसर्यादिवशी सहज म्हणून चेक केलं तर त्याच आयडीवरून एक पूर्ण कवितेचा मेल आलेला. तिच कविता होती अगदी तंतोतंत जुळणारी. कसला आनंद झाला सांगू. "भगवानके घरपे देर है मगर अंधेर नही" हे कुठेतरी मला आता पटलं होतं. मी माझा फोन नंबर दिला. थोड्याच वेळात त्याचा फोन आला..

"नमस्कार, तुम्ही इतक्या दिवस..साॅरी वर्षे डायरी सांभाळलीत त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद..मी तुम्हाला माझा पत्ता पाठवतो तिकडे कुरीअर कराल का प्लिज..हवे तर कुरीअरचे पैसे मी देतो"

" ठीक आहे.." इतकं बोलून मी पत्ता लिहून घेतला आणि माझ्या गुगल पे ला पैसे पाठवायला सांगितले. त्याचं बोलणं ऐकून खरंतरं मला रागच आल कारण एकतर त्याची डायरी त्याला मिळाली ह्याचा आनंद व्हायला हवा होता तो फारसा त्याच्या आवाजात जाणवत नव्हता आणि दुसरं म्हणजे कुरीअर पाठवा म्हणजे काय?त्याला मला प्रत्यक्ष भेटून साधं नीट धन्यवादही देऊ वाटलं नाही. नुसतं फोनवरच काय धन्यवाद..ते ही जबरदस्तीने..किती आटपिटा केला मी. वर्तमानपत्रात जाहीरात दिली. त्याचे पैसे मागितले का मी? कुरीअर चार्जेस देतो म्हणे.

मी मुकाट्याने कुरीअर करायला गेले. आता त्या डायरीचा मला तिरस्कार वाटू लागला होता. इतक्या छान कविता लिहणारा माणूस इतका रूक्ष कसा काय असू शकतो? कुरीअर तर करतेच पण नंतर त्या पत्त्यावर जाऊन चांगलेच खडसावते त्याला. दुसर्या दिवशी कुरीअर मिळाल्याचा त्याचा मॅसेज आला त्यातही फक्त "कुरीअर पोहचले" इतकेच दोन शब्द लिहलेले. पत्ता तर पुण्यातल्याच होता. तसंही जाणारचं आहे मी पुण्यात तर जाऊनच येते.

मला नेहमीच कसा दिसत असेल तो? कसा बोलत असेल तो? असे अनेक प्रश्न पडायचे. त्याच्या कविता इतक्या सुंदर आहेत की मी प्रेमातच पडले होते त्या कवितेंच्या किंवा त्याच्याही. त्याच्याही? खरंचं!! हो कदाचित कारण प्रेमाशिवाय त्या कविता मी जपल्याच नसत्या. त्याला परत मिळवून देण्याची धडपड मी केलीच नसती पण त्याने साधं माणूस म्हणूनही नीट वागू नये. हयाच आश्चर्य वाटतयं. असो.. मी त्याच्या घराजवळ आलेले. अंगणात चाफ्याची, मोगर्याची फुले लावलेली.

दुपारच्या त्या मंद झुळकेत त्या फुलांचा सुंगध सामावलेला.
मी चाचरत दाराची बेल वाजवली. दारात एक माणूस उभा होता. मी त्याचं नाव सांगितलं. त्याने मला आत घेतलं. मी पाहतच राहीले. संपूर्ण घर पांढर्या रंगाने रंगवलेलं. काही भिंतीवर सुबक पेंटीग्स लावलेल्या. काही फुलांच्या, काही सुबक आकृतीच्या. दारावरचे पांढरे पडदे अलगद हवेत लहरत होते आणि घरभर मोगर्याचा सुगंध दरवळलेला.

मनातला सगळा राग कुठल्या कुठे पळून गेला. मन अगदी प्रफुल्लित झालेलं. जणू काही त्याच्या इथे असलेल्या अस्तित्वाने माझं मन भारलं जात होतं. त्याचं घर, घरातल्या वस्तूंवर त्याने लिहलेल्या कवितेंच्या शब्दांप्रमाणेच त्याचा प्रभाव जाणवतं होता आणि हा प्रभाव सुखद, शांत अशी अनुभूती देत होता.

त्या माणसाने मला बसायला सांगितलं तसं मी बसले. मग त्याने काचेच्या ग्लासात पाणी आणून दिलं.

"चहा काॅफी काही घेणार का आपण?" त्याने अदबीने विचारलं.

मी नाही सांगितलं. त्याचा आवाज मला परिचयाचा वाटला.... आधीही कुठेतरी ऐकल्यासारखा! पण त्याच्याकडे पाहून हा "तो" असेल असं वाटत नव्हतं. नव्हे, हा तो नाहीये, ह्याची मला शंभर टक्के खात्रीच होती. मी ग्लास ओठांवर लावत विचार करत होते.

पाणी आणून पिऊन झाल्यावर मी सहजच "कुठे आहेत ते?" असे विचारल्यावर त्याने एका खोलीत इशारा केला. मी त्या खोलीच्या दिशेने गेले आणि आत डोकवलं. आत पाच-सहा किशोरवयीन मुले बसलेली आणि समोर तो हातानेच मूकपणे मुलांना कविता ऐकवत होता. मनात उमटलेले सगळे भाव स्तब्ध झाले. शब्दांच्या हृदयात राहूनही त्यांना स्पर्श करू न शकणारा तो शब्दांशी प्रेम करत होता. शब्दवेड्याच्या ओठांतून न उमटलेले ते शब्द आज त्याच्या हातातून उमटू पाहत होते. माध्यम वेगळं असलं तरी भावना तीच होती. तोच अर्थ होता फक्त तो स्पर्श नव्हता आणि मी शब्दांना स्पर्श करता येऊनही आज निशब्द होते..

( स्पंदन ह्या इ-मासिकात पूर्वप्रकाशित)

समाप्त.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

खूप सुंदर...

शेवटचा परिच्छेद तर एकदम मस्त... तुमच्या फोटो कडे पाहून तुम्ही असले काही हळवे लिखाण लिहीत असाल असे वाटले नव्हते.

धन्यवाद प्रितम, मनीम्याऊ, प्रज्ञा, जुई, दिप्तीताई, सामो, अज्ञातवासी, पाफा, राधानिशा, वावे, माऊमैया, योगी900 , आसा.

अरेच्या तुम्ही तर मायबोली सोडली होती ना....>>>>
हो काही पर्सनल इश्शू होते..आता साॅर्ट आऊट झालं म्हणून आलो परत आणि तसंही सुबह का भूला शाम को वापस घर आए तो उसें भूला नही कहते...

खूप सुंदर...

शेवटचा परिच्छेद तर एकदम मस्त... तुमच्या फोटो कडे पाहून तुम्ही असले काही हळवे लिखाण लिहीत असाल असे वाटले नव्हते. >>>>> दिसण्यावर काही नसतं हो.. म्हणूनच तर म्हणतात don't judge a book by its cover..

मूकबधिर मुलांना कविता हातवारे करून सांगत होता का तो ?>>>>> च्रप्स हो...कथेतला नायक मुका आहे..

मला वाटतं तो स्वतः मुका होता. त्याने फोन त्या दुसर्‍या व्यक्तीमार्फत केलेला होता.>>> सामो एकदम बरोबरं ओळखलतं...

Story Chan ahe... Kuni kahi vicharude ... Tu lksh nko deu.. savay aahe tyana .. tyana jmt nahi lihayla na mg potdukhi hote... Ignore ...

अप्रतिम
तुमच्या कथा नेहमीच सुंदर आरस्पानी असतात. >>> +१