घोरपड

Submitted by अरिष्टनेमि on 18 April, 2020 - 05:19

लहानपणी म्हणजे पहिली-दुसरीला असताना आमच्या शाळेत थोडी गडबड गडबड झाली. "अय, घोरपड हे घोरपड, पळा." पोरं वर्गात पळतच घुसली अन दार खटकन लोटून घेतलं. मला टेन्शन. ‘घोरपड?’ ज्या अर्थी शाळेत इतकी पळापळ झाली, अगदी जैशाय, सु-यासारखे वांडसुद्धा घाबरले त्या अर्थी घोरपड म्हणजे भयंकरच असणार आहे. आज शाळेला सुट्टीच द्यावी लागणार आता. प्रकरण गंभीर आहे.

मी मित्राला विचारलं, "घोरपड म्हणजे काय रे?" हो. म्हणजे काय की शाळेतून विविध प्रसंगी पळून जाण्याबाबत माझी घरी आणि गल्लीत ख्याती होती. लहान असलो तरी याबाबत माझा कौशल्यविकास अगदी उत्तम होता. समजा आज शाळा लवकर सोडली आणि घरी गेलो तर आधी आजी विचारेल, "पळून आला का रे?" समोरच्या मालनकाकू विचारतील, दुकानावर बसले असतील तर उस्मानभाई विचारतील. तर या सगळ्यांना शाळेवर आलेल्या प्रसंगाचं गांभीर्य मला समजावून सांगावं लागणार होतं. त्यासाठी हे घोरपड-घोरपड म्हणतात त्याची मला माहिती घ्यावी लागणार होती.

तेवढ्यात शिक्षकांनी वर्गाचा ताबा घेतल्यानं विषयावर पुढची चर्चा नाही होऊ शकली. विशेष म्हणजे शाळा काही सोडली नाही. लहान-लहान पोरांच्या जीवाची शाळेला काही काळजीच नव्हती. घोरपडीनं एखाद्या पोराला मारलं असतं आणि त्या पोराच्या घरचे आले असते भांडायला ‘आमचं पोरगं द्या भरून’ म्हणजे शाळेला कळालं असतं चांगलंच!

मी आपलं दप्तर मांडीशी एकदम तयारीत ठेवलं आणि सावध बसलो सगळ्यांबरोबर. समजा अचानक घोरपड आली आणि आमच्याच वर्गावर हल्ला केला तर? दरवाजा एकच होता. एकतर खूप पटकन तिथून बाहेर पळून जाणे किंवा नाही पळता आलं तर? अशा वेळी घोरपड अंगावर येईल, एकदम हे असं दप्तर उचलायचं आणि दोन्ही हातात धरून जोरात घोरपडीच्या तोंडावर मारायचं. घोरपड बेशुद्ध पडेल किंवा तिच्या दातात हे दफ्तर अडकलं की आपल्याला पळून जाता येईल अशी अटकळ होती. मी बाकीच्यांच्या तयारीचा अंदाज घेतला. बाकी मूर्ख मुलं कसल्याच तयारीत नव्हती. माझ्या मागे ‘मोत्या’ तर दोन्ही हात दप्तराच्या पिशवीत घालून नुसताच तोंड आ करून समोर फळ्याकडं बघत बसला होता. ‘तो रोज मेंढीचं दूध पितो म्हणून त्याची बुद्धी मेंढीची झालीय’ असं पोरं म्हणायची.

देवा रे देवा! मला वाचव. मी, दादा, बन्या, ठमी, पिंट्या, योग्या आम्ही सगळ्यांनी रविवारी घरामागं एक मातीचं देऊळ बांधून त्यात देव पण ठेवला होता. मी आजीनं दिलेल्या १० पैशातून कालच एक बिस्किट आणलं होतं. विशेष म्हणजे सांगू? ते पार्ले किंवा साठे बिस्किटासारखं चौकोनी नव्हतं, गोल होतं. ते मी अख्खं देवाला वाहिलं. मी काहीच नाही खाल्लं. देवाला नक्की लक्षात असणार की ‘बाकी पोरांनी काहीच नाही दिलं, पण या मुलाने ते नवीन आलेलं बिस्किट दिलंय. हाच माझा खरा भक्त आहे.’

जीव मुठीत धरून उरलेला वेळ असा-तसा काढला आणि शाळा सुटल्याबरोबर मागंसुद्धा न पाहता तकाट घर गाठलं. सा-या रस्त्यानं दप्तरातली पेन्सिली ठेवलेली पत्र्याची कंपासपेटी बैलाच्या गळ्यातली घाट वाजावी अशी खुळूम-खुळूम वाजत होती. रस्त्यात एकूण एक माणूस ओळखीचा होता, तरी त्या कंपासच्या आवाजाचा मला आधार वाटला. मी घरी आल्यावर घोरपडीची गोष्ट आजीला सांगितली. म्हणजे खरं तर अशा महत्वाच्या गोष्टी आपल्याला कळाल्या की त्या मोठ्या माणसांना सांगणं फार आवश्यक असतं. म्हणजे लहान मुलांना पण महत्वाचं समजतं हे मोठ्या माणसांना लक्षात येतं' हे मला अगदी नक्की समजलं होतं. मला वाटलं की घोरपडीची गोष्ट ऐकून आजी आता आश्चर्यचकित होणार. मी धीटपणे तरीपण शाळेतच बसलो याचं कौतुक करणार. पण आजीच्या सुरकुतलेल्या चेह-यावर काही रेषा हलली नाही. उलट तिनंच मला जाम हलवून टाकलं. ती म्हणे, “अरे माझे सासरे अशा घोरपडी ओढून काढायचे. दहा बैलाची ताकद असते तिला.” अरे बाप रे! हे माहीत नव्हतं हं. पण असं असल्याशिवाय का तानाजीनं ‘यशवंती’ घोरपडीच्या कमरेला दोरी बांधून अख्ख्या सैन्याला कोंडाण्याचा कडा चढवला? असणारच. इतके लोक लटकले तरी तिनं सगळ्यांना वर ओढून घेतलं. तानाजी काय खोटं सांगणार होता? खरं तर त्यानं त्या घोरपडीला युध्दाच्या तिथं न्यायला पाहिजे होतं. म्हणजे तिनं उदेभानाला आधीच मारून टाकलं असतं. कोणीतरी अशी आयड्या बिचा-या तानाजीला द्यायला पाहिजे होती.

पण एकंदरीत घोरपड हा प्राणी भयंकर आणि महाशक्तीशाली असतो यात काही शंकाच नको. आता तो कसा दिसतो तेवढं पाहायचं बाकी होतो. ती जरा जरा मोठ्या पालीसारखी असते आणि शेपटीनं मारू शकते हे मात्र नक्की. एकतर शाळेत मित्रानं ते सांगितलं होतंच. शिवाय आजीपण हो म्हणाली. पुढं अनेक दिवस घरात टपोरी पाल दिसली की मी माझ्या मोठ्या भावाला सांगायचो, "दादा ते बघ. ती काय पाल नाही बरं का. छोटी घोरपड आहे. ती शेपटीनं मारते." मारते म्हणजे जीवच घेत असणार. त्याशिवाय का मित्र असं सांगत होता?

नंतर पुन्हा घोरपड भेटली ती अशी एकाएकी घरपोच. कोणाशी तरी बोलता बोलता आजी म्हणाली, “मुन्नानी शेरीतून घोरपड आणलीय. ते काय घरामागं सोलतोय.” ते ऐकल्याबरोबर मी धूम बाहेर पळालो.

मुन्ना आमच्यापेक्षा मोठा. आमच्या घरामागं राहायचा. आता मला घोरपड पाहता येणार होती. अगदी जवळून. मुन्ना म्हणजे तसा शूरच होता हं. पण पाहून वाटत नव्हता बिलकूल. मुन्ना शेरीतून निघाला असेल. सुनसान रस्त्यात टपून बसलेली घोरपड अचानक त्याच्यावर धावली असेल. मुन्ना पळाला असेल. घोरपडीनं हल्ला करून त्याला धरायचा प्रयत्न केला असेल, त्याला शेपटी मारली असेल. पण मुन्नाने तो वार चुकवला असेल. त्यानं शेवटी चपळाई करून त्या घोरपडीला असा काही फटका दिला असेल की बस! खल्लासच. खरंच मुन्ना कसला भारी होता! माझ्या डोळ्यासमोर ‘मुन्ना आणि घोरपडीची’ लढाई सगळी दिसत होती.

घरामागं मुन्ना दोन पायावर बसला होता. हातात चाकू होता. जवळ-जवळ एक हात लांब घोरपड त्याच्या पायात पडली होती. अजून दोन-तीन तशाच बाजूला पडल्या होत्या. दोन पायावर बसल्याने त्याचा मातकट पांढरा पायजमा पोटरीच्या वर आला होता. मी हळूच त्याला फेरी मारून निरखलं. उजव्या पायाला जरासा रक्ताळलेला ओरखडा होता. एवढ्या घोरपडी मारल्या. त्यांनी शेपटी मारलीच असणार. रक्तच काढलं होतं की. पण मुन्ना काही मागं हटला नसणार. घोरपडी छोट्याशाच होत्या. दोन-दोन फुटाच्या असतील. म्हणून तर मुन्ना मारू शकला. खरी मोठी एखादी डेंजर घोरपड तिथं असती तर मुन्नाचं बिचा-याचं काही खरं नव्हतं.

तो शांतपणे हातात एक घोरपड घेऊन सोलत होता. हिरव्यागार घोरपडीचं हिरवट पांढरं मांस काढून त्यानं भांड्यात भरलं. तिथं पडलेल्या कोणत्याच घोरपडीला डोकं नव्हतं. बहुतेक मुन्नानं मुंडकं उडवूनच त्या मारल्या असणार. मुंडकं कापून पडलं तरी तिच्या अंगातून लाल रक्त-बिक्त काही वाहत नव्हतं. पाण्यासारखं, पण हिरवट पांढरं रक्त होतं. ते पण अगदीच थोडं. कडसर वास येत होता. पण या सा-याच घोरपडींना खूपच पाय होते; टोकदार, काटेरी. या इतक्या बारक्या-बारक्या पायांनी पळताना घोरपड कशी दिसत असेल? मला प्रश्न पडला, “ही घोरपड?” “एवढुशी?” याच्यात घाबरण्यासारखं काय आहे? ही तर एकदम घायपाताच्या पानासारखी आहे. जरा जाड लुसलुशीत आहे इतकंच. या घोरपडी अजिबातच पालीसारख्या दिसत नव्हत्या.

आपलं काही चुकत तर नाही ना? मी मुन्नाला विचारलं, “मुन्ना हे काय आहे?” मुन्ना म्हणाला, “घोरपड.” बोलताना त्याचा ‘घ’ चा उच्चार थोडा अस्पष्ट होता. त्याचं लक्ष ती घोरपड सोलण्यात होतं शिवाय त्यानं तमाखूची गुळणी धरली होती म्हणून असेल कदाचित.

पण काही असो. घोरपडीचा एक तरी प्रकार आज पाहिला होता. पण मग हिरव्यागार घोरपडी कशा लपून बसतात, त्या कशा शेपटीच्या फटक्यानं मारतात अशा-अशा न कशा-कशा गोष्टी मी अजून लहान मुलं गाठून सांगत जाई.

पुढं जरा मोठा झाल्यावर मला अक्कल आली असं लोकही म्हणू लागले. तेंव्हा एकदा कोणाच्या तरी घरी गेल्यावर समजलं की ‘घोरपड’ घोरपड असते आणि ‘कोरफड’ कोरफड असते.

नंतर सातवीला वगैरे असताना घरी अभ्यास होईना म्हणून वर्गातले ३-४ मित्र शाळेत राहायला आले. एक दिवस त्यांच्याकडं चक्क पाच रुपये. शाळेच्या मैदानाच्या कडेला असणा-या कडूलिंबाच्या झाडाखाली बसणा-या ‘मुळीणबाई’ कडून या पाच रुपयांच्या गोळ्या घेऊन आम्ही खाल्ल्या. पण “इतके पैसे आणले कोणी?”. याचं उत्तर मला अजानं दिलं. हे पैसे कोणी आणले-बिणले नव्हते, कमवले होते.

झालं असं की शनिवारी दुपारी शाळा सुटल्यावर ही पोरं इकडं-तिकडं काही करत होती. तेवढ्यात शाळेच्या शांत व्हरांड्यात घोरपड आलेली यांनी पहिली. झालं. यांनी गोटे हाती घेऊन तिला ताणलं आणि कोपच्यात गाठून मारलं. आता मारलं गमतीनं-गमतीनं तर तिचं करावं काय? दिली तिथंच टाकून.

आमच्या शाळेच्या मागून मळ्यात यायचा-जायचा रस्ता. पन्नाशी उलटलेला झगड्या पारधी त्या रस्त्यानं वस्तीवर निघाला होता. झगड्याला अख्खा गाव ओळखायचा. या पोरांनी त्याला पाहिल्यावर हाक मारली, “अय झगड्या, घोरपड पायजे काय?” आता जातीचा पारधीच तो, घोरपडीला नाही म्हणणार होता काय? खिडकीच्या गजांशी दोन हात टेकवून म्हणाला, “दे की.” पोरं म्हणे, “मंग दे दहा रुपय.” पारधी होय तो, घोरपड काय विकत घेऊन खाईल? असा रानात फिरला तर एकाला दोन घोरपडी घेऊन येईल. पण आता जेवणाची वेळ होत आली होती. घोरपड स्वत: साक्षात पुढ्यात ठाकून ‘मला ताटात घे’ म्हणत होती. झगड्याच्या मनाला आस लागली, तोंडाला पाणी सुटलं. ध्यानी-मनी नसताना दुपारच्या कालवणाचा खारा बेत जमून आला होता.

बाभळीच्या काटेरी फासाटातून होल्याची पिल्लं अज्जात काढावीत तशी मांजरपाटाच्या कोपरीच्या खिशातून रोख पाच रुपयाची नाणी त्यानं काळजीकाट्यानं काढली. ती घामट तळहाताच्या पंजावर पसरून झगड्या म्हणाला, “पाचाला दे ना! बारीक तं हाये घोरपड. दहाला कोन घेईन बाबा? मोठी आसती तं मीच घेतली असती ना मंग. दे रे बाबा. पैशे नाय ना.” झगड्या बोलायचा भारी. शब्दाच्या पहिल्या अक्षरावर भार देऊन कवळ्यात घेत पुढची अक्षरं हलक्यानं ठोकत जायचा. सा-या पारध्यांची अशीच गत.

तो ‘झगड्या पारधी’ होता अन पोरंही 'बिझनेस माईंडेड' होती. पाच तर पाच. नाही तर हेही नाही मिळायचे. अशा विचारानं शेवटी ती घोरपड त्याला पाचाला विकली. त्या पाच रुपयांच्या गोळ्या आम्ही दिवसभर चघळल्या.
ते दिवस गेले, तो ‘झगड्या’ गेला, त्या गोळ्याही गेल्या. आता नुसत्या आठवणी चघळायच्या.

अशा या घोरपडी. आता अनेकदा पाहतो. पण अजूनही या लहानपणच्या आठवणीतल्या घोरपडी दहा बैलांची घट्ट पकड घेऊन बसल्या आहेत. आता आताच दोनेक महीने झाले; एका भक्कम सागवानावर उन्हं शेकणारी ही मस्तवाल घोरपड मला दिसली, तेंव्हा ती पहिली-दुसरीच्या शाळेतली घोरपड मला जाम आठवली. मला असं राहून राहून वाटतंय की बहुतेक ही तीच शाळेत घुसलेली घोरपड असणार. ती माझ्याकडंच पाहून हसत होती. आता तीही मोठीच झालीये.

Monitor-Lizard_1.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोरफड! (हाः हाः)
लहान मुलांचे भावविश्व खूप वेगळे आणि सुंदर असते. डोळ्यांपुढे उभे केलेत.

त्या काळातलं लहान मुलांचं भावविश्व खरंच सुंदर उभं केलंत..>>>>>+१११ Proud
लिखाण आवडले, फक्त घोरपड खाण्याचा उल्लेख नाही आवडला. Sad पण ते वास्तव असेल तर त्याला तुमचा काय ईलाज असणार?

>>त्या काळातलं लहान मुलांचं भावविश्व खरंच सुंदर उभं केलंत..>>>>>+१
फोटो फार छान आहे.
लहानपणी माहेरी आवारात अधून मधून एक घोरपड दिसायची. काही वेळा कौलांवर मस्त ऊन खात बसायची. ही कौलं स्वयंपाकघरावर होती. एकदा तिचे गणित चुकले आणि ती कसे कुणास ठाऊक पण कौल सरकवून आत आली. खुडबुड ऐकून आईने वर बघितले तर घोरपड ! मी आणि बहीण उपम्याच्या वाट्या घेवून अंगणात ! कामाला येणार्‍या आजी म्हणाल्या काठी ठोका भिंतीवर म्हणजे जाईल. तोपर्यंत काहीतरी गडबड झालेय हे त्या जीवालाही समजले असवे. आली तशी गेली बापडी. एरवी कौल फुटले वगैरे तर दुसरे लावणे वगैरे काम माझे असे पण त्यादिवशी ते सरकवलेले कौल जागी लावायला मी काही छपरावर जाणार नव्हते. आजी मग त्यांच्या लेकाला घेवून आल्या, त्या दादांनी कौल लावले.

@अज्ञातवासी
हो. बरोबर. घोरपड म्हणजेच मॉनिटर लिझार्ड.

लहानग्यांच्या भावना छान मांडल्यात !
डिस्कवरीला कमोडो ड्रैगन किंवा मुव्हि चॅनेलवर गॉड़झीला पाहिल्याने हल्लीच्या काळात लहानपणी घोरपड़ म्हणजे असेच काहीसे भयावह प्रकरण वाटू शकते.

@रश्मी
घोरपड खाण्याचा उल्लेख नाही आवडला. >>>>>

तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. कायद्यानंसुद्धा घोरपड मारणं, खाणं यावर बंदी आहे. ७ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे. पण लोक हे सारं करतात. खातात, तेल काढतात, विकतात-विकत घेतात. सुशिक्षितसुद्धा. नाईलाज आहे.

मस्तच.
घोरपड म्हणजे एखादा मगरीसारखा बलवान, जाडजूड, खडबडीत, ओबडधोबड पण निरुपद्रवी प्राणी असावा अशी माझी बरीच वर्षे कल्पना होती.

छान लिहिलंय.
मी लहान असताना आमच्या घराच्या मागे अगदी जवळजवळ चिकटून आवळ्याचं प्रचंड झाड होतं. खूप खूप जुनं. त्याच्या ओबडधोबड खोडावर एक घोरपड आली होती. मोठी होती बरीच. बहुतेक गावातल्या कुणीतरी येऊन ती मारली असावी. पण तोपर्यंत आमचं मांजर तिथे बसून होतं. घोरपड पळून गेली नाही. साप, घोरपड हे प्राणी मांजराला घाबरतात असा आमचा अनुभव आहे. घाबरतात म्हणण्यापेक्षा मांजर समोर असताना ते जाग्यावरून हलत नाहीत.

काही लोक घोरपडी ला अत्यंत क्रूर पद्धतीने मारून खातात. म्हणे ती खाऊन हाडे मजबूत होतात.
राजेंद्र जक्कल हा अत्यंत कुप्रसिद्ध खुनी. त्याच्या कॉलेजमधील एका मित्राने आठवण सांगितली आहे. ते वर्णन वाचताना शहारे येतात. ज्या मित्राने हा प्रसंग पाहिला त्याला गरगरू लागले. असल्या संस्कारामुळे हा माणूस असा संवेदना बधीर झालेला खाटीक बनला आणि १० खून केले.
ह्याच प्राण्याच्या वाट्याला हे क्रौ र्य का? हा एक अनुत्तरित प्रश्न आहे.

कोरफड! (हाः हाः)
लहान मुलांचे भावविश्व खूप वेगळे आणि सुंदर असते. डोळ्यांपुढे उभे केलेत.>>>++१११११

आवडले लिखाण....घोरपडकधी पाहिली नाही.... पण आईच्या तोंडून ऐकलय की तिचे काका याच तेल वापरायचे चाई वर उपाय म्हणून
Endangered आहे का हा प्राणी आता ...... आपण माणसं कशालाच सोडत नाही Sad

घोरपडीचं चामडं खंजिरी बनवण्यासाठी वापरतात. इतर खंजीऱ्यांपेक्षा मजबूत आणि वाजते पण छान