पिरॅमिड

Submitted by निशिकांत on 16 April, 2020 - 23:07

चढून गेले, त्यांचा गुदमर
दुरून मजला दिसतो आहे
पिरॅमीडच्या पायथ्यास मी
मजेत जीवन जगतो आहे

जरी तळागाळात राहतो
उंचच असते ध्येय आमुचे
ध्येय न मिळता दु:ख कशाला?
जीवन गाणे गेय आमुचे
चढून गेलो जरी पर्वती #
तोच हिमालय म्हणतो आहे
पिरॅमीडच्या पायथ्यास मी
मजेत जीवन जगतो आहे

परावलंबी नसून मी का
उगा कुणाला लगान द्यावा?
टरकावुन ती जन्म कुंडली
भाग्याचा मी लगाम घ्यावा
स्वप्न उद्याचे आज लोचनी
सळसळते मी बघतो आहे
पिरॅमीडच्या पायथ्यास मी
मजेत जीवन जगतो आहे

पिरॅमीडच्या थोडे वरती
मध्यमवर्गी वस्ती असते
गरिबीशी नाते तुटलेले
श्रीमंती आभासच असते
चक्रव्युहाच्या आत घेरला
जो तो का फरपटतो आहे
पिरॅमीडच्या पायथ्यास मी
मजेत जीवन जगतो आहे

शेळीच्या शेपटी प्रमाणे
मध्यमवर्गी जीवन असते
उडवाया माशांस निकामी
शेळीची ना लाज झाकते
मध्यमवर्गी वरी न खाली
अधांतरी तो लटकत आहे
पिरॅमीडच्या पायथ्यास मी
मजेत जीवन जगतो आहे

पिरॅमीडच्या टोकावरती
श्रीमंताची तुरळक वस्ती
ताठ मान अन् अबोल सारे
शिष्ट भेटती रस्तोरस्ती
एकलकोंडा समाज तेथे
आतुन जो तो कण्हतो आहे
पिरॅमीडच्या पायथ्यास मी
मजेत जीवन जगतो आहे

पिरॅमीडासम समाज रचना
शाप म्हणू? वरदान म्हणू मी?
दु:ख सोबती शाश्वत असता
सुख नसता का उगा कण्हू मी?
मृगजळ पुढती दूर सुखाचे
समाज मागे पळतो आहे
पिरॅमीडच्या पायथ्यास मी
मजेत जीवन जगतो आहे

# पुण्यातील एक टेकाडी जिथे बरेच लोक सकाळी/सायंकळी फिरायला जातात.

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users