तुझ्या दुर्लक्षण्याने लक्ष आहे हेच कळते

Submitted by सुप्रिया जाधव. on 16 April, 2020 - 14:46

पहाटेला दवाचे थेंब येती पापणीवर
उशाला स्वप्न घेउन कूस इच्छांची बदलते
नवी आशा निराशेच्याच पोटी जन्म घेते
तमाने राज्य केल्यावर खरी सृष्टी उजळते
तुझ्या दुर्लक्षण्याने लक्ष आहे हेच कळते

दुपारी सूर्यकिरणांची प्रखरता तीव्र होते
झळांना सौम्य करण्या आठवांची ढाल धरते
जराश्या संयमाने चांगले होणार असते
उन्हाच्या तीव्रतेने आमराई चक्क फळते
तुझ्या दुर्लक्षण्याने लक्ष आहे हेच कळते

मने उद्विग्न करण्या भक्क संध्याकाळ येते
जखम हृदयातली भरली तरीही याद छळते
प्रबळ इच्छेमुळे कुठला न कुठला मार्ग निघतो
प्रकाशाला प्रसवण्या वात समईतील जळते
तुझ्या दुर्लक्षण्याने लक्ष आहे हेच कळते

निराशेला लपेटून गच्च काळी रात्र कुढते
कळीचे फूल होण्या मात्र एकाकीच झटते
हवे ते साध्य होते स्वार्थ थोडा त्यागला तर
नव्याने पालवी फुटण्यास फुलले फूल गळते
तुझ्या दुर्लक्षण्याने लक्ष आहे हेच कळते

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users