समाज आणि लहान मूल

Submitted by Sandy_Joggy on 25 April, 2009 - 16:16

कुणी म्हणते की भारतीय समाज म्हणजे मेंढरे. कुणीही कशीही हाका. याना हाकणारा कुणी हवा असतो आणि हाकणार्यांची मग काय कमी? म्हणूनच आपण राजकारणी पाहतो जे नित्य नवीन इश्यू शोधून समाजात फुट पाडत असतात, आणि आपला आपला गट बनवून त्याला झुलवत असतात. याला मग आपण 'वोट बॅंक पोलिटीक्स म्हणतो. मला वाटते की कुठल्याही समाजात लहान मुल असते, युवक असतो, वयस्क असतो. तसे पहिले तर समाज यांचाच तर बनलेला असतो, पण मला हे वयोगटांचे प्रतिनिधित्वा इथे अभिप्रेत नाही. मला समाजातले जे लहान मुल अभिप्रेत आहे ते वेगळ्या प्रकारे आहे.

आपण सगळे याला सहमत असाल की मुल लहान असतानाच त्याला आपण चांगले संस्कार द्यावेत म्हणजे मोठेपणी ते एक चांगला माणूस बनू शकते. तसेच समाजाचे ही असते असे मला वाटते. त्याला ही संस्कार देणे फार गरजेचे असते. चांगले संस्कार ना देता बापाने नुसते हातात पैसे दिले तर मुले काय करतात ते आपल्याला माहीतच आहे.

तर, लहान मुलाला जशी आपण शिस्त लावतो तशीच समाजाला ही शिस्त लावणे फार गरजेचे असते. आपण शिस्ता लावायला गेलो की कुठलेही लहान मुल ती टळायला बघते. वडील शिस्त लावत असतील तर आईचा आधार घ्यायला बघते. अश्यावेळा आई आणि वडील, दोघांनी ही समन्वय राखून काम करणे गरजेचे असते नाही तर मुल बिघडायचा धोका असतो. तसेच समाजाला शिस्त लावायला गेले की त्याचा ही कल तिला एन केन प्रकारेण टाळण्याकडे जास्त असतो.

आपण पुणेकर असाल तर आपल्याला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी एका ट्रॅफिक डिपार्टमेंट च्या इनस्पेक्टर ने पुण्याला लेन्स ची शिस्त लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पुणेकरांनी त्याला ना जुमानण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्या शिस्तीच्या बाडग्यापुढे काही चालत नव्हते, पण शेवटी या सार्‍या प्रकरणात असुरक्षित वाटू लागल्याने राजकारण्यांनी त्याची बदली करून टाकली. म्हणजे समाजाला हाकू शकणार्‍या दोन घटकांमध्ये समन्वयाचा संपूर्ण अभाव होता आणि त्याचे फळ म्हणजे, अजूनही पुण्याच्या वाहतुकीला अजिबात शिस्त नाही. आपण म्हणतो की पुणेकर मुंबई ला गेले की कसे वाहतूकीची शिस्त पाळतात? आणी अमेरिकेत गेले की बघायलाच नको, तेथे अशी शिस्त पाळतात की अमेरिकन ही मागे पडेल. याला कारण म्हणजे मुंबई चा समाज हे जास्त शिस्तीत वाढलेला आहे. आणि अमेरिकन तर त्याही पेक्षा जास्त. मग पुणेकर ही त्या शिस्तप्रिय समाजात गेला की तिथला होऊन जातो, कारण तिथे तो अल्पसंख्या असतो.

बहुसंख्य समाजाला चांगली शिस्त लागली, तो शिकला, शिक्षणाने प्रगल्भ बनला, तर तो विचार करेल आणि त्याने विचार केला तर तो लोकशाही मध्ये राजकारणीही चांगलेच मागेल, मग आजकालच्या राजकारण्यांचे कसे फावेल? पण या उलट, तो बहुसंख्येने बेशिस्त राहिला, अशिक्षित राहिला, उठता बसता बहुसंख्येने चुका करत राहिला, तर त्यालाही आपोआप बहुसंख्येने या भ्रष्टचारी व्यवस्थेचा भाग बनून जावे लागेल. जे काही विचार करणारे असतील ते अल्पसंख्य असतील, आणि ते अल्पसंख्य असल्या मूळे काहीही करू शकणार नाहीत, आणि थोडक्यात राजकारणाचे गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचार, याला असला समाज कधीही आळा घालू शकणार नाही.

पुण्यचेच उदाहरण घेतले तर काही मोजकी मंडळी कितीही वाहतुकीचे नियम पाळण्या संदर्भात जागरूकता वाढवायचे केविलवणे प्रयत्न करत असतील, तरी त्याला यश येणे शक्या नाही. त्याला यश तेव्हाच येईल जेव्हा या समाजाचे पालक म्हणून जे घटक असतात त्यांना वाटेल की आता काही नियम राबवून घेतले नाहीत तर काही खरे नाही.

गुलमोहर: 

>>>>जे काही विचार करणारे असतील ते अल्पसंख्य असतील, आणि ते अल्पसंख्य असल्या मूळे काहीही करू शकणार नाहीत, आणि थोडक्यात राजकारणाचे गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचार, याला असला समाज कधीही आळा घालू शकणार नाही. <<<
अल्पसंख्यांक म्हणजे आता नक्की होण हाच प्रश्न आहे.
बाकी पुण्यातील वाहतूक हा एक संशोधनाच विषय नक्कि होऊ शकतो.
आपला लेख आवडला.

प्राजु
http://praaju.blogspot.com/

कशाला पुणेकरांच्या वाट्याला जाताय...? एकवेळ कुत्र्याचे शेपूट सरळ होईल पण पुण्यातलं ट्राफिक... Proud