डॉ.सी.के.प्रल्हाद : एक ज्ञानयोगी!

Submitted by Charudutt Ramti... on 15 April, 2020 - 15:51

भौतिक शास्त्रातील ‘सर सी. व्ही. रमण’ ह्यांच्या पासून, ते अर्थ शास्त्रातील ‘अमर्त्य सेन’ ह्यांच्या पर्यंत; आणि आणि महान गणितज्ञ् ‘रामानुजम’ ह्यांच्या पासून ते अवघ्या जगात सिनेसृष्टीतील अध्वर्यू समजल्या जाणाऱ्या ‘सत्यजित रे’ ह्यांच्या पर्यंत, भारतीय वंशाच्या अनेक 'तीर्थां'नी हे विश्व अनेक पटींनी समृद्ध केले आहे. अश्याच उच्चतमकोटीच्या बुद्धिजीविंच्या मांदियाळीत सहज गुंफलं जाईल असं अजून एक नाव अधोरेखित केलंच गेलं पाहिजे आणि ते म्हणजे “डॉ. सी. के. प्रल्हाद”! व्यवस्थापन शास्त्रातील जागतिक पातळी वरील 'गुरु' (ग्लोबल मॅनेजमेण्ट गुरु) ह्या दुर्मिळ उपाधीने ज्यांना संबोधले गेले, असे डॉ. सी. के. प्रल्हाद! अत्यंत कमी जणांना खऱ्या अर्थानं मॅनेजमेंट गुरु म्हणता येईल, त्यातली काही निवडंक नावं म्हणजे पीटर ड्रकर, फिलिप कोटलर, आणि त्याच तोडीची असामान्य बुद्धिमत्ता आणि विचारक्षमता लाभलेले सी. के. प्रल्हाद! पराकोटीचे व्यासंगी, द्रष्टे आणि खरंच ज्यांच्या अंगी 'गुरुस्थानी' असण्याची पात्रता असावी असे हे व्यवस्थापन ह्या विषयातील तत्वज्ञानी.

ब्रिटिश कालीन मद्रास येथे न्यायमूर्ती असलेले जस्टीस कृष्णराव हे कामगार कायद्यात पारंगत म्हणून सुप्रसिद्द तर होतेच, पण त्यांचे भारतीय तत्वज्ञान ह्या विषयातील पांडित्य सुद्धा सर्वश्रुत होते, त्यावर त्यांनी काही ग्रंथलेखनही केले होते. न्यायमूर्ती कृष्णरावांची पत्नी अत्यंत गृहकृत्यदक्ष. ह्या ब्राम्हण दाम्पत्यास शुक्रवार दि. ८ ऑगस्ट १९४१ रोजी एक अपत्य जन्मास आले. जन्म स्थान कोईम्बतूर. अपत्याचे नाव सुद्धा ‘कोईम्बतूर’ असेच ठेवण्यात आले. तीर्थरुपांप्रमाणेच 'कोईम्बतूर' सुद्धा अगदी कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते.

वयाच्या एकोणिसाव्या वर्षी चेन्नई येथील लोयोला महाविद्यालयातून भौतिक शास्त्राची पदवी प्राप्त करून, उमद्या वयातील ‘कोईंबत्तूर’ (सी.के.) युनिअन कार्बाइड ह्या (अमेरिकन) बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये रुजू झाले. ( ‘युनिअन कार्बाइड’ पुढे जाऊन भोपाळ वायू गळतीमुळे ८४ साली वादात सापडली, पण त्या घटनेचा सी के प्रल्हादाच्या जीवन प्रवासाशी काहीही संबंध नाही). युनिअन कार्बाइड मध्ये त्यांनी पहिल्या नोकरीचा अनुभव घेतला आणि अवघ्या चारच वर्षात त्यांनी युनियन कार्बाइड च्या नोकरीस रामराम ठोकला. युनियन कार्बाईडच्या नोकरीचा राजीनामा देऊन पुढील उच्चशिक्षणासाठी भारतीय प्रबंध संस्थान, (इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात IIM अहमदाबाद) येथे व्यवस्थापन शास्त्र शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रमास सुरुवात केली. साल साधारण चौसष्ट. गंमत अशी की IIM अहमदाबाद ची स्थापनाच सन १९६१ ची. सी.के. हे IIM अहमदाबाद ह्या प्रतिष्टीत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या ६४ साली अभ्यासक्रम सुरु झालेल्या प्रथम तुकडी (1st batch) चे पदवीधर स्नातक. त्या पहिल्या वर्षीच्या दीक्षांत समारंभात सुवर्ण पदकाचे मानकरी सुद्धा सी.के. च ठरले.

IIM अहमदाबाद येथे आपले व्यवस्थापन शाखेतील उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील काही वर्षे त्यांनी त्याच संस्थेमध्ये विद्यादानाचे कार्य सुरु केले. पण मुळातच अफाट वाचन,अचूक विश्लेषण आणि अगाध चिंतन क्षमता असलेल्या ह्या असामान्य बुद्धिमत्तेच्या असामीने त्याच्या पुढील ज्ञानक्षुधातृप्ती करीता, अमेरिकेतील हार्वर्ड ह्या जगद्विख्यात विश्वविद्यालयाकडे झेप घेतली आणि वयाच्या ऐन पस्तिशीत "बहुराष्ट्रीय व्यवस्थापन" ह्या विषयात संशोधन करत ह्या विषयातील शोधनिबंध प्रकाशित करून हार्वर्ड विश्वविद्यालयाची "विद्यावाचस्पती" (डॉक्टर ऑफ मॅनेजमेंट सायन्स) ही अत्यंत सन्मानाची आणि दुर्मिळ अशी पदवी संपादन केली. ते साल होते ७५!

भारतातून संशोधनासाठी गेलेले सी. के. प्रल्हाद, परत येताना डॉ. सी. के. प्रल्हाद बनून पुन्हा एकदा आपल्या IIM अहमदाबाद येथील संस्थेमध्ये विद्यादानाच्या कार्यासाठी रुजू झाले. पण काळ आपले फासे कसे टाकतो आणि नियती आपले दान कसे देईल हे सांगता येणं अत्यंत कठीण आहे. ज्या वर्षी सी.के. आपली 'डॉक्टोरेट' ही पदवी घेऊन अमेरिकेतून भारतात परतले नेमक्या त्याच वर्षी २६ जून १९७५ रोजी भारतात आणीबाणी लागू झाली. विचार,व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दुर्दैवी घाला घातला गेला आला आणि लोकशाहीचा अभद्र गर्भपात झाला. लोकशाहीच्या ह्या दुर्दैवी नाटयांकानंतर जानेवारी १९७७ ला आणीबाणी उठल्यावर डॉ. सी. के. प्रल्हादांनी अमेरिकेस परत जाण्याचा निर्णय घेतला.

१९७७ साली IIM अहमदाबाद येथील प्राद्यापक पदाचा राजीनामा देऊन ते अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात रॉस महाविद्यालयात व्यवस्थापन विषयाचे प्राध्यापक म्ह्णून रुजू झाले. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. एकंदरच उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कॉर्पोरेट जगतात आणि व्यवस्थापन शास्त्रातील नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी अत्यंत सुयोग्य वातावरण असलेल्या अमेरिकेत सी. के. प्रल्हादाच्या कुशाग्र बुद्धीची चुणूक दिसायला वेळ लागला नाही.

'कोअर कॉम्पिटन्स' (मूलगामी सक्षमता) ह्या अलीकडील काळात कोर्पोरेट जगतात प्रचलित झालेल्या संकल्पनेचे मूळ “जनक” जर कोण असतील तर ते म्हणजे भारतीय वंशाचे सी.के. प्रल्हाद. अमेरिकेत मिशिगन विद्यापीठातील रॉस महाविद्यालयात ‘कॉर्पोरेट स्ट्रॅटेजि’ (कॉर्पोरेट जगतातील धोरण) विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर, काही काळातच त्यांनी "हार्वर्ड बिझनेस रीव्य्हू" ह्या प्रतिष्टीत नियतकालिकात "कोअर कॉम्पिटन्स" ह्या विषयावर निबंध प्रकाशित केला. आणि ते व्यवस्थापन शास्त्राच्या जगाच्या प्रकाशझोतात आले. व्यवस्थापन ही विद्ये ची शाखा "शास्त्र" आणि "कला" ह्या दोन्ही वर्तुळांच्या बरोब्बर मधोमध आरपार जाते. त्यामुळे व्यवस्थापनातील अभ्यासाच्या शाखांना in-exact सायन्स असे संबोधले जाते. अर्थशास्त्र (Economics) , सांख्यिकी (Statistics) , मानसशास्त्र (psychology) , अश्या अनेकविध विद्या शाखांचा अनोखा संगम म्हणजे व्यवस्थापन शास्त्र. अत्यतं क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे हे विषय. पण ह्या सर्व विषयांच्या प्रायोगिक संकल्पांनां पुढे जाऊन प्रत्यक्षात फायदेशीर रित्या 'बाजारपेठेत' कश्या आणायच्या ह्या विषयाचा सखोल अभ्यास म्हणजे व्यवस्थापन शास्त्र आणि व्यवस्थापन कला. दोन गुणिले दोन बरोबर चार, असं सरळ सोपं गणित कधीच ह्या कॉर्पोरेट जगतात घडत नाही. गळेकापू स्पर्धेच्या त्या युगात डॉ. सी. के. प्रल्हाद ह्यांच्या सारखा तरुण प्रतिभावान विचारवंत लवकरच, एक निष्णात व्यवस्थापन सल्लागार म्हणून कोर्पोरेट जगतात नावारूपाला आले!

कोअर कॉम्पिटन्स ही संकल्पना कॉर्पोरेट विश्वाला पूर्ण पणे समजे उमजायच्या आतच, त्यांनी डॉमिनंट लॉजिक (प्राबल्याचे तर्कशात्र) आणि को-क्रिएशन (सह-सृजन) ह्या आणखी दोन नवीन नाविन्यपूर्ण संकल्पना सुद्धा लवकरच प्रकाशीत केल्या आणि आधीच नावारूपाला आलेलं त्यांच्या प्रतिभेचं पान, व्यापार आणि उदीम जगतातील लोक अजूनच गांभीर्याने वाचू लागले. व्याख्यानांमध्ये अत्यंत शांत पद्धतीने आपले विचार उलगडून दाखवणारे आणि सखोल अभ्यासानंतरच एखादा प्रमेय मांडणाऱ्या डॉ. प्रल्हादांनी बघता बघता ऐशी च्या आणि नौवद च्या दशकात अमेरिकेत आणि अमेरिकेबाहेरसुद्धा "व्यवस्थापनातील गुरु" अशी ख्याती प्राप्त केली.

परंतु ह्या सर्व त्याच्या अथक परिश्रमाच्या अभ्यासाच्या प्रबंधांव्यतिरिक्त डॉ. प्रल्हादांनी जर एक अत्यंत नवीन आणि अभूतपूर्व असा जर कोणता विचार कॉर्पोरेट जगतास दिला असेल तर तो म्हणजे त्यांनी मांडलेली "फॉर्च्युन ऍट द बॉटम ऑफ पिरॅमिड" ही संकल्पना. ह्याच नावाचे त्यांनी एक ग्रंथ सुद्धा प्रकाशित केला. सतत उच्चभ्रू आणि सधन ग्राहकांच्या मागे लागून लागून आपल्या वस्तू आणि सेवांचा व्यवसाय आणि नफा वाढवण्यासाठी धावणाऱ्या कॉर्पोरेट विश्वाला हा ‘फॉरचून ऍट द बॉटम ऑफ पिरॅमिड’ म्हणजे एक अत्यंत वेगळा विचार! “ह्या बॉटम ऑफ पिरॅमिड” संकल्पनेला व्यावसायिकतेच्या आणि तद्दन नफ्या तोट्याच्या गणिताबरोबरच माणुसकीची कॉर्पोरेट जगतात सहसा कमी पाहायला मिळणारी माणुसकीची अतिशय दुर्मिळ अशी एक झालर आहे.

"फॉरचून ऍट बॉटम ऑफ द पिरॅमिड" ची संकल्पना थोडक्यात सांगायची म्हणजे जगाच्या पाठीवर रोज दोन अमेरिकी डॉलर (साधारण रोज सव्वाशे ते दीडशे रुपये) पेक्षा कमी उत्पन्न असलेली आहे लोकसंख्या तब्बल ४०० कोटींच्या घरात आहे. उच्चभ्रू कोर्पोरेट जगतातील उद्योगपतींची आणि कंपन्यांची गुंतवणुकीची प्रचंड क्षमता (Capacity to invest) आणि जोखीम घेण्याची पात्रता (Capability to take risk) ही ह्या दारिद्र्य रेषेच्या आजूबाजूला , वरखाली असणाऱ्या पण संख्येने प्रचंड असणाऱ्या लोकांचं रोजचं जीवनमान उंचावण्यासाठी उपयोगी पडू शकेल का? असा हा सामाजिक विचार आहे. पण हे असे सर्वसामान्य आणि निम्न वर्गासाठी विविध वस्तू ( मार्केटिंग च्या भाषेत 'प्रॉडक्ट्स' ) विकसित करताना तो संबंध प्रकल्प 'व्यावसायिक पातळीवर' नफ्याचा असला पाहिजे, एन.जी.ओ. ज्या प्रमाणे ना नफा ना तोटा तत्वावर प्रकल्प राबवतात त्या प्रकारे नाही. कारण जर केलेल्या गुंतवणुकीवर किमान मोबदला (Return on investment) मिळाला नाही तर तश्या वस्तू आणि सेवा / Goods and Products पुरवणारे प्रकल्प हे अल्पजीवी ठरतील, ते दीर्घायुषी ठरणार नाहीत.

आता जीवनमान उंचावणाऱ्या वस्तू म्हणजे कोणत्या? झोपडपट्या, वाड्या, वस्त्यांमधले लोक आणि त्यांची मुलं सतत आजारी पडतात. मग त्यांना अत्यंत कमी भावात हात धुण्याचा / अंघोळीचा साबण उपलब्ध करता येईल का? तसेच निम्न वर्गातील महिलांच्या साठी अत्यंत रास्त भावात सॅनिटरी पॅड्स तयार करता येतील का? किंवा तळागाळातील मुलांच्या जेवणाचे आणि कुपोषणाचे त्यांचे प्राथमिक शिक्षणाचे, प्रश्न! असे अनेक प्रश्न घेऊन त्यांच्यावर उपाय म्हणून वस्तू आणि सेवा विकसित करून त्यांचं व्यावसायिक तत्वावर नफ्यासहीत उत्पादन आणि त्या वस्तूंची विक्री करणं. आता इथं मुळातंच ग्राहक हा आर्थिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल घटकातील असल्यामुळं, वस्तूची मूळ विक्री मूल्य आणि त्यावरील नफा हा अत्यंत रास्त हवा हे वेगळं सांगायला नको. मग उद्योग पतींना आणि कंपन्यांना एवढी मोठी गुंतवणूक कशी परवडणार? तर त्याचं उत्तर हे की हा पिरॅमिड चा बॉटम म्हणजेच तळ जरी असला तरी त्याचा जागतिक बेस (पाया किंवा व्याप्ती) मात्र ४०० कोटी लोकसंख्या इतका प्रचंड आहे. म्हणजेच प्रचंड मोठी बाजारपेठ - 'मार्केट' ह्या वर्गाच्या रूपात जगत आहे. त्यांच्या सुद्धा काही गरजा आहेत, त्या मोफत नसल्या आणि सशुल्क जरी कुणी पुरवल्या तरी त्या पुरवलेल्या गरजांमुळे त्यांचं जीवनमान उंचावयाला मदत होणार आहे. आणि हा बेस च खूप मोठा असल्या मुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि लाखोंच्या संख्येनं उत्पादन करावं लागणार. जेवढं उत्पादनाचं प्रमाण (volume) जास्त तेवढा त्याचा खर्च कमी. कारण हे उत्पादनाचं आणि खर्चाचं गणित “व्यस्त प्रमाणांचं” आहे. जेवढा उप्त्पादनाचा खर्च कमी तेवढं त्याचं विक्री मूल्य कमी आणि त्यामुळेच वस्तूंची होणारी विक्री जास्त. प्रत्येक विकल्या जाणाऱ्या दर वस्तू मागील नफा (per unit margin) कमी असला तरी उत्पादनाच्या संख्येचं प्रमाणंच (व्हॉल्युम) मुळात प्रचंड असल्यामुळं एकंदर नफा भरपूर. तसेच केलेल्या गुंतवणुकीवरचा मोबदला लवकरात लवकर आणि पुरेपूर, अशी ती सगळी एकंदर प्रक्रिया. म्हणजे एकीकडे ह्या अति निम्न स्तरातील जनतेचं जीवनमान आणि त्यांचं आयुरारोग्य सुधारणार आणि दुसरी कडे उद्योगपती त्यांचे व्यवसाय तोट्यात नाही तर फायद्यात असल्यामुळे तसे प्रकल्प व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत दीर्घायुषी ठरणार. वर वर पाहायला गेली तर सुटसुटीत वाटणारी (पण प्रत्यक्षात खरंतर खूपच क्लिष्ट) संकल्पना. ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यामागे लागते ती प्रचंड मेहनत, जोखीम घेण्याची तयारी आणि मुख्य म्हणजे तितकाच सखोल अभ्यास व संशोधन (मार्केट रिसर्च). ह्या संकल्पनेच्या आधारे , टाटा, प्रॉक्टर अँड गॅम्बल, युनिलिव्हर, आय.टी.सी, अश्या एफ.एम.सी.जी. क्षेत्रातील अनेक उद्योग संस्थांनी वस्तू आणि सेवा बाजारात आणून यशस्वी केल्या. बँका 'मायक्रोक्रेडिट' नावाची जी योजना राबवते त्या संकल्पनेचं मूळ 'बॉटम ऑफ पिरॅमिड' मधेच लपलेलं आहे.

एकीकडे पंचतारांकित कॉर्पोरेट जग आणि दुसरीकडे रोज धड ‘शंभर दीडशे’ रुपये सुद्धा कमाई नसणारा निम्न आर्थिक स्तरातील प्रचंड मोठा वर्ग. ह्या दोन अतिशय भिन्न आर्थिक स्तरांमधील 'बॉटम ऑफ पिरॅमिड' ही विसाव्या शतकातील अत्यंत दूरगामी संकल्पना जन्माला घालत ह्या दोन भिन्न आर्थिक स्तरांमधील दुवा बनून जगलेल्या डॉ. सी. के. प्रल्हाद ह्यांच्या सारखा द्रष्टा विचारवंत शतकातून क्वचितच जन्मतो. संपत्तीच्या आणि नफेखोरीच्या प्रचंड उन्माद असणाऱ्या कोर्पोरेट विश्वात, अफाट बुद्धी लाभलेल्या ह्या आधुनिक ‘व्यासा’ने, जगातील असंख्य उपेक्षितांच्या विषयी हृदयात खोल कुठेतरी आपल्या जपलेले आपल्या जाणिवांचे आणि संवेदनांचे मज्जातंतू सतत जागृत ठेवणाऱ्या डॉ. सी. के. प्रल्हादाच्या सारखा संवेदनक्षम ज्ञानपुरुष ह्या अवघ्या विश्वाला दिला हे खरे तर संबंध भारतीयांचेच भाग्य. भारत सरकारने २००९ साली डॉ. प्रल्हादांचा पदमभूषण पुरस्काराने यथायोग्य सन्मान केला. पण तत्पूर्वी त्यांनी जागतिक कीर्तीचे अनेक पुरस्कार आणि पारितोषिके अत्यंत नम्र पणे स्वीकारली होती.

आज “सोळा एप्रिल”. डॉ. सी. के. प्रल्हादांना आज ह्या प्रचंड अश्या आर्थिक दरीने दुभंगलेल्या विरोधाभासी जगाचा कायमस्वरूपी निरोप घेऊन एक दशक पूर्ण झाले, आज त्यांचा दहावा स्मृती दिन. अश्या ह्या अतीव विद्वान, ज्ञानयोगी आणि तितक्याच संवेदनक्षम विचारवंतास, ही स्मृतिलेख स्वरूपी शब्दांजली!!

चारुदत्त रामतीर्थकर
१६ एप्रिल २०२०, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults