भेट सज्जनगडाची

Submitted by Kashvi on 12 April, 2020 - 11:51

डिसेंबर च्या थंडीत पहाटे च्या वेळी आमची गाडी वेगाने चालली होती. पहाटे ची वेळ असल्यामुळे रस्ता अगदीच रिकामा होता.आम्ही जेव्हा गडाखाली पोहचलो तेव्हा सकाळ चे 7 वाजत आले तरी फारस उजेडलं नव्हतं.'जय जय रघुवीर समर्थ 'म्हणत म्हणत आम्ही गडावर गेलो.
छोटे छोटे मंदिराचे दर्शन घेत आम्ही मुख्य गाभाऱ्यात पोहोचलो तुळशी चा फुलांचा सुगंध ,अष्टगंधाचा सुवास आणि स्वामींच्या सानिध्यातली निरव शांतता.समाधी ला बघत ध्यान लागलं आणी एकही शब्द न बोलता मन अगदी मोकळं होत होत,डोळ्यातून अश्रू का वाहत होते ते माझं मलाच कळत नव्हते. माझी ही गुरुमाऊली म्हणजे
“शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरी ज्ञान योगेश्र्वराचे। कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।”
समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमी च्या  दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकर होता. लहानपणी नारायण साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. एकदा नारायण लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर त्याने दिले होते.या मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्याचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी "सावधान" हा शब्द उच्चारताच तो ऐकून, नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रांनिशी नारायण लग्नमंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण त्यांनी तातडी करून गांवाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली.पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी  रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली.छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास यांचे शिष्य होते. स्वराज्य रक्षणासाठी रामदासांनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले आहे.मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगूळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपाची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, काखेस झोळी, अशा थाटात समर्थांची रुबाबदार आणि दुसऱ्यावर छाप पाडणारी मूर्ती संचार करीत असे.समर्थांची शिकवण व्यावहारिक शहाणपणाची, सावधानतेची, आत्मविश्वास उत्पन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाचीही होती.

एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ काही शब्दात सांगता येते - कर्म ,उपासना, ज्ञान, विवेक. भक्ती, प्रयत्‍न व सावधानता.

समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला; कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची, वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनांत ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले -
जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।

प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की -
प्रपंची जे सावधान। तोचि परमार्थ करील जाण।
प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।
अशा या माझ्या गुरू माऊली नि सज्जन गड इथे समाधी घेतली.
अश्या या माझ्या गुरू माऊली च्या सज्जनगडावर राहण्याची ,जाण्या येण्या ची उत्तम सोय आहे.अध्यात्मिक आणि अतिशय निसर्ग रम्य स्थळी आपण एकदा तरी भेट द्यावी.

सज्जनगड सातारा पासून 12 km अंतरावर आहे.जवळच ठोसेघर नावाचा सुंदर धबधबा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख! माहिती आवडली.
एक सुचवतो, भेट सज्जनगडाची यावर तुम्ही लेख लिहीत असताना सज्जनगडाची अजून विस्तृत माहिती लिहिता आली असती. उदा राहण्याची सोय, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर वगैरे. म्हणजेच लेख अजून खूप माहितीपूर्ण झाला असता आणि खुलवता आला असता असे वाटते.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

धन्यवाद अज्ञातवासी ,सज्जनगड च्या पायथ्या पर्यंत बस किंवा गाडी जाते.गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.ज्या भाविकांना पायऱ्या चढणे शक्य नाही त्याच्या साठी डोली व्यवस्था आहे.तिथे राहण्याची व्यवस्था आणि दोन वेळा जेवण नाश्ता चहा अगदी विनामूल्य आहे.उंच गड असल्यामुळे आजूबाजूचा परिसर अत्यंत रम्य आहे.

मला वाटलं ह्या लेखामध्ये निसर्ग वर्णन किंवा प्रवास वर्णन असेल .
आणि त्या बरोबरच गडाचे ऐतिहासिक संदर्भ सुद्धा सांगितले असतील पण दोन्ही पण गोष्टी ह्या लेखात नाहीत.