वारसा

Submitted by शुभम् on 12 April, 2020 - 03:57

रात्रीचे बारा वाजले होते .गोल गरगरीत चंद्र पांढराशुभ्र प्रकाश संपूर्ण धरतीवर फेकत होता . गावाबाहेर असलेल्या डेरेदार वडाच्या झाडाखाली एक म्हातारी गुडघ्यात मस्तक घालून बसली होती . भेसुर आवाजात ती रडत होती . चंद्राचा प्रकाशामुळे पडणाऱ्या पारंब्याच्या सावल्या वाहणार्‍या वार्‍याबरोबर सळसळत होत्या . त्या सळसळत्या सावल्यांचं एक वेगळंच चित्र तयार होत होतं . म्हातारीचा रडण्याचा आवाज हळूहळू कमी झाला . तिला तिच्यासमोर काहीतरी हालचाल जाणवली . पारंब्यांच्या सावल्यातून काहीतरी आकार धारण करत जमिनीवर उभा राहत होतं . चंद्राच्या त्या चंदेरी प्रकाशाने , वडाच्या पारंब्याच्या ज्या सावल्या पडल्या होत्या व सोबतीला असलेले म्हातारीच्या रडणे आणि रातकिड्यांची किरकिर या सर्वांनी मिळून एका अभद्र आकाराला जन्म दिला होता .

काळ्या सावलीच्या मध्येमध्ये चंद्राचा पांढरा प्रकाश धारण करत काळ्यापांढर्‍या पट्ट्यांनी बनलेला तो आकार म्हातारी पुढे बसला . म्हातारीने तिची मान वर करून पाहिलं , म्हातारीबरोबर त्या आकारानेही हालचाल केली , जसं काही तो तिची नक्कल करत होता . म्हातारीला तो आकार दिसला . तिचे डोळे विस्फारले शरीर थरथरू लागलं . तिने उठायचा निष्फळ प्रयत्न केला पण शरीर तिला साथ देत नव्हतं . ती जागीच बसून राहिली . आतापर्यंत त्या आकाराने मानवी शरीराची नक्कल केली होती . काळी सावली व पांढरा प्रकाश या मिश्रणाने त्याने स्वतःच असं विकृत शरीर तयार केलं होतं . त्या प्रकाश व सावलीच्या बनलेल्या शरीराचा हात पुढे करत त्याने म्हातारीच्या उजव्या हाताच्या कोपराला स्पर्श केला . भरलेल्या फुग्यातील हवा काढावी तसं म्हातारीच्या शरीराचं झालं . त्या काळ्यापांढर्‍या शरीराच्या हातात तिचे कातडं होतं व त्याच्यातील उरलेले तिचे शरीर कुस्करून करून टाकलेल्या टोमॅटो प्रमाणे चेंदामेंदा होउन खाली पडलं होतं . एखादा पोशाख परिधान करावा इतक्या सहजतेने त्या आकाराने म्हातारीची ती कातडी परिधान केली आणि विचित्र पणे चालत ती आकृती गावाकडे निघाली .

म्हातारी चालत हळूहळू गावातील तिच्या घरापर्यंत पोहोचली . तिची प्रत्येक हालचाल यांत्रिकपणे होत होती जणू ती एखादी कळसूत्री बाहुली होती. त्या आकाशी निळ्या रंगाच्या लाकडी दारावर असलेली कडी तिने संथपणे वाजवायला सुरुवात केली . आतून कोणीतरी शिवी हासडत उठल्याचा आवाज आला .
दाराकडे पडणारी पावले दाराजवळ येउन थांबली आणि दार उघडलं गेलं . दारात एक पंचविशीचा तरुण उभा होता .

" आज्जे , इतक्या राच्चं तू काय करायली इथं....? ओ पप्पा , आज्जी आलीय बघा.....

असं म्हणत तो आत गेला . ती म्हातारी दारातून आत आली व पाठीमागून तिने दार लावून घेतलं . काही वेळ ती तशीच थांबली . थोड्या वेळाने पन्नाशी उलटलेल्या एक लठ्ठ माणूस उघड्या पोटाने टॉवेल गुंडाळून बाहेर येताना दिसला . म्हातारी जवळ येत त्याने रागात तिचा कोपर धरला , दार उघडलं व ओढतच तिला बाहेर नेऊ लागला .

" हे बघ आय्यं , तुझी जमीन आम्हाला दिउ नकु पण दररोज राच्याला हिथं इऊन कालवा करत जाऊ नगं..."

दाराबाहेरच धोतर घातलेला , छातीचा पिंजरा झालेला खांद्यावरती टॉवेल लटकवलेला आणि डोक्यावर टोपी घातलेला म्हातारा उभा होता .

" आबा , तुमाला कितीदा सांगितलं आयवर लक्ष ठिवत जावा म्हणून...

" आरं , मी तरी किती लक्ष ठिवणार , कवानकाच पळून जाती... तो म्हातारा एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर टावेल टाकत म्हणाला .

म्हातारीचा कोपर धरत म्हातारा त्या म्हातारीला घेऊन रस्त्यावरून चालत जाऊ लागला. इकडे त्या म्हातारीचा पोरगा घरात परत गेला होता . म्हातारीने त्या म्हातार्‍याला हिसका देत त्याच्या कमरेच्या करदोड्याला बांधलेली तंबाखूची पिशवी काढून घेतली . तंबाखूचे पिशवीतील मुठभर तंबाखू घेत तिने तोंडात कोंबली व चुन्याच्या डबीत बोट घालत तोंड जळेल एवढा चुना तिने तोंडात टाकला. म्हाताऱ्याने तिला दोन-तीन शिव्या हासडल्या आणि एक कानाखाली लगावली.

" ठार येडी झाली तु .... काय अक्कल हाय का नाय तुला... देवऋषि दावल्याशिवय परयाय न्हाय आता...."

म्हाताऱ्याने हात तिच्या तोंडात घालत तंबाखू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण ती वेड्यासारखी तंबाखू चावत होती . तंबाखू बरोबर तोंडात आलेला म्हाताऱ्याचा हातही ती जोरात चाउ लागली . म्हातारा ओरडू लागला तिच्या तोंडात गेलेल्या उजव्या हाताच्या तीन बोटांचे तुकडे पडले तेव्हा तो हात बाहेर निघाला . म्हाताऱ्याच्या बोटातून रक्त ठिबकत होते पण काहीच झालं नाही अशा आविर्भावात ती म्हातारी बोटांचे तुकडे सहजपणे चावत होती . तिच्या तोडून रक्ताच्या धारा बाहेर येत होत्या .

आता म्हातारा जोरजोरात ओरडत होता त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे बाहेर झोपलेले दोन-तीन लोक जमा झाले .

" काय झालं र गणपा ...? एका धिप्पाड उंच आणि पैलवान सारख्या दिसणाऱ्या गड्यांने विचारले..

रात्रीच्या अंधार व चंद्राच्या अर्धवट प्रकाशात थोडं जवळ येताच त्याला झालेला प्रकार दिसला . मोठ्या आवाजात म्हातारीला शिव्या हासडत त्याने आजु बाजूला तिला पकडण्यासाठी काही सापडते का हे शोधायला सुरुवात केली...

तोपर्यंत पुढे आलेल्या दोघांनाही झालेला प्रकार कळला होता. हे पाहुन एकाने जाऊन त्याच्या घरातून दावं आणि एक फडका आणलं . दुसऱ्याने गणपाचा टॉवेल काढून त्याच्या जखमेभोवती जोरात दाबुन धरला .

त्या माणसाने आणलेले दावे पैलवानांने घेतले आणि म्हातारी भोवती फेकत तिला तिचे हात शरिराभोवती करकचून बांधले . आणलेले फडके एका काठीने तिच्या तोंडात कोंबले .

बांधलेल्या म्हातारीला हातभर अंतरावर ती ठेवत तो तिच्या लेकाच्या घराकडे चालत निघाला . मागोमाग गणपा , त्या म्हातारीचा नवरा आणि इतर दोघे देखील होती .

" सोमा , ये सोमा , तुझी म्हातारी झपाटलेली दिसतेय बघ , आरं तुझ्या म्हाताऱ्याची बोट करा करा चावून खाल्ली....

त्याच्या आवाजातली भीती त्याने कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी त्याला लपवता आली नव्हती . आवाज ऐकून तो माणूस पुन्हा एकदा उघडा पोटाने टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत पोट चोळत बाहेर आला.

" आयचा , सुखानं झोपीबी लागुदी नाही ही म्हातारी...काय झालं आणि....

त्यांना जे काही पाहिलं , त्याला धक्का बसला . आलेली उलटीची उबळ त्याने कशीबशी रोखून धरली

" येए... , मोबायल आण गं जरा... " तो त्याच्या बायकोला आवाज देत म्हणाला .

" काय केलं आता म्हातारीनं... ती आतुन कुरकुर करत म्हणाली . तिने जेव्हा म्हातारीच्या तोंडावरून मानेपर्यंत जाणाऱ्या रक्ताचे वगळ व म्हातारीच्या हातात भोवती लपेटलेला टॉवेल पाहिला , तिला ते सहन झालं नाही . ती आत निघून गेली मात्र आतून ओकल्याचा आवाज येत राहिला .

सोमाने मोबाईल घेतला व बाजुला जाउन कोणालातरी फोन लावला .

" राम देवऋषाला फोन लावलाय , येतु म्हणलाय पण आणाय जावं लागंन..... आसं करुया , आय आणि आबाला त्यांच्या घराकडे घिऊन जाउया....

म्हातारा म्हातारीला घेऊन सोमा आणि तो पैलवान गडी त्यांच्या घराकडे निघाले . म्हातारीला खोलीत कोंडून व म्हाताऱ्याला बाहेर बसवलं . पैलवान निघून गेला . सोमा गाडीवरती बसत देवऋषाला आणायला निघाला .

देवऋषाला घेऊन यायला सोमाला बराच उशीर झाला . जेव्हा तो देवऋषी घेऊन माघारी आला तेव्हा त्याच्या आई वडिलांच्या घरासमोर गर्दी जमली होती . त्याला नको ती शंका आली . घाबरत घाबरतच गर्दीतून वाट काढत तो पुढे सरकल . त्याला जे दृष्य दिसले ते फारच भयानक होतं म्हाताऱ्याच्या शरीराचे तुकडे इतस्ततः पडलेले होते . म्हातारी चवीने त्याचं मांस चाखत होती. तो मोकळी हवा घेण्यासाठी गर्दीतून बाहेर आला व देवऋषा जवळ गेला ...

" म्हातारा संपला ... तो देवऋषाच्या कानात म्हणाला .

" काय म्हनलन हुतं मी , आपण हिथं पोचोस्तोर काम हुनार म्हणजे हुनार...

त्या देवऋषाने त्याच्या खिशात लपवलेली छोटीशी बाहुली काढली आणि तिची मुंडी पिरगाळली . बाहुलीची मुंडी पिरगाळताच तिकडे म्हातारी जागीच कोसळली .

" सोमा , आपल्याला नदीकडली एकर पाहिजे बघ , ... तो सोमाला म्हणाला .

" देऊ रे , देऊ .वारशानं माझ्याकडंच येतीय जमीन , आता थोड्यादिवस रडायची नक्कल करायची , सूतक हाय अन् बऱ्याच गोष्टी हायेत...

सोमा हळू आवाजात बारीक हसत म्हणाला.

Group content visibility: 
Use group defaults

त्याच्या आवाजातली भेटी (भिती) त्याने कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी तिला आपली (ती लपली) नव्हती
असे अनेक ठिकाणी भयंकर टाइपो आहेत. पोस्ट करण्यापूर्वी किमान पूर्ण वाचून तर घ्यायची Lol
वेलकम बॅक करण्यासाठी इतकी घाई बरी नव्हं ...
असो !
बादवे एक कथा मायबोलीवर नुकतीच पोस्ट झालीय आणि तुम्ही तीच संकल्पना वापरलीय असे वाटते... खखोदेजा

म्हातारीच्या हातात भोवती लपेटलेला टॉवेल पाहिला , तिला ते सहन झालं नाही . इथे म्हातारा पाहिजे होता

शुभम ही कथा खूप भारी झाली... फक्त टायपो अजूनही आहेत...