कुणी नाही जिला पृथ्वी तिची वाली असावी

Submitted by सुप्रिया जाधव. on 11 April, 2020 - 15:20

कदाचित ह्याचसाठी वावटळ आली असावी
मनाची पोकळी निर्वात ही झाली असावी

शिखर गाठून झाल्यावर प्रकर्षाने उमगले
गुरूकिल्ली सुखाची राहिली खाली असावी

तिचे उत्तर मिळाले ना नजर चोरूनसुध्दा ?
पसरलेली तिच्या गालांवरी लाली असावी

पुन्हा पाहून रामायण जरा निश्चिन्त झाले
कुणी नाही जिला पृथ्वी तिची वाली असावी

तुझ्यानंतर जिकीरीने जिला सांभाळले मी
तुझ्याविण ही जिवाची नोट बिनचाली असावी

महामारी कधी वादळ कधी जातीय दंगल
असावी जगबुडी तर कोणत्या साली असावी ?

निरोपाच्या क्षणी दे ओघळू दे चार अश्रू
विषाचे घोट ती आयुष्यभर प्याली असावी

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर! अप्रतिम!!

निरोपाच्या क्षणी दे ओघळू दे चार अश्रू
विषाचे घोट ती आयुष्यभर प्याली असावी >> निःशब्द!

नेहमीप्रमाणेच अप्रतिम.

पुन्हा पाहून रामायण जरा निश्चिन्त झाले
कुणी नाही जिला पृथ्वी तिची वाली असावी

>>> नीटसा कळाला नाही. रामायणातील वाली चा पण रेफरन्स जोडता येइना

खूप छान! आवडली गझल.
तुमच्या सगळ्या गझलमध्ये नवनवीन कल्पना असतात. छानच!