मन वढाय वढाय (भाग ३४)

Submitted by nimita on 10 April, 2020 - 21:45

तो उरलेला सगळा दिवस स्नेहानी अगदी यंत्रवत घालवला. तिचं गप्प गप्प राहणं श्रद्धा आणि रजतच्या सुद्धा लक्षात आलं. रजतनी खुणेनीच श्रद्धाला त्याचं कारण विचारलं; पण तिला तरी कुठे काय माहीत होतं? शेवटी न राहवून रजतनी स्नेहाला विचारलं," काय झालंय स्नेहा? बरं वाटत नाहीये का?" त्याला मानेनीच नकार देत स्नेहा स्वैपाकघरात निघून गेली. स्नेहा जरी काही बोलली नसली तरी कुठेतरी पाणी मुरतंय हे रजत च्या लक्षात आलं होतं. पण त्याच्या स्वभावाला अनुसरून तिच्या अस्वस्थतेचं कारण विचारायच्या भानगडीत काही तो पडला नाही. 'जर तिला गरज वाटली तर सांगेलच की ती ' असा विचार करून जास्त खोलात न शिरता रजत पण आपला लॅपटॉप उघडून बसला.

त्या रात्री बराच वेळ स्नेहा जागीच होती. आता हळूहळू तिच्या मनाची विचार करायची शक्ती पण संपत आली होती. जणू काही तिचं मन एका dead end पाशी येऊन पोचलं होतं. एक तर डोक्यात विचारांची गर्दी आणि त्यामुळे झोप नाही...तिचं डोकं बधीर झालं होतं. शेवटी तिनी रजतचा time tested formula आजमवायचं ठरवलं...'just sleep over it. ' रजतला तर केव्हाच गाढ झोप लागली होती. स्नेहा पण त्याच्या शेजारी आडवी झाली. ती अशी किती वेळ पडून होती कोण जाणे! भावनेच्या भरात तिनी झोपलेल्या रजतचा हात आपल्या हातात घेतला.... किती आधार वाटत होता तिला; म्हणतात ना - 'बुडत्याला काडीचा आधार' - तसंच झालं होतं तिच्या बाबतीत. आणि पुढच्या क्षणी तिला आपल्या हातावरची पकड घट्ट झाल्यासारखी वाटली. तिनी चमकून रजतकडे बघितलं.... तो तर शांत झोपला होता... पण झोपेतही तिचा हात घट्ट पकडून होता.….स्नेहाला तिच्या देवाचा कौल मिळाला होता. तिच्या मनातलं वादळ हळूहळू शांत झालं. तिच्या विचारांना योग्य ती दिशा मिळाली होती. झोपलेल्या रजतच्या खांद्यावर डोकं ठेवत तिनी एक दीर्घ श्वास घेतला. रजतनी पण झोपेतच तिला आपल्या मिठीत ओढलं. त्याचा तो निरागस स्पर्श होताच स्नेहाच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले. किती निर्व्याज प्रेम करतो हा माझ्यावर; आणि मी मात्र .... शीः ! किती चुकीचा विचार करत होते मी. मनोमन रजतची माफी मागत स्नेहा त्याच्या मिठीत विसावली. काही वेळातच तिलाही शांत झोप लागली...

दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहाला पुन्हा नेहेमीसारखं फ्रेश आणि उत्साहात बघून रजतला बरं वाटलं. स्नेहानी आणलेल्या ट्रे मधून चहाचा कप उचलून घेत त्यानी विचारलं," काल तुला बरं वाटत नव्हतं ना ? आज कशी आहे तब्येत?" त्याच्या या प्रश्नावर भुवई उंचावत स्नेहा म्हणाली," मला कुठे काही झालं होतं? तू असताना कोणाची बिशाद आहे मला त्रास द्यायची?" स्नेहाच्या त्या प्रश्नात एक खोडकर छटा जाणवली रजतला. पण तो काही म्हणायच्या आत स्नेहाच म्हणाली," रात गयी; बात गयी।" स्नेहाचा एकूण आविर्भाव बघून रजत म्हणाला," आज काही वेगळाच मूड दिसतोय राणीसरकारांचा ! या सेवकाला काही सांगाल का? एका रात्रीत असं काय झालं?" त्यावर गालातल्या गालात मिश्किल हसत स्नेहानी अजून एक गुगली टाकला..." वा ! जणू काही काल रात्री काय झालं ते तुला माहीतच नाही !! स्वतःच करायचं आणि स्वतःच विचारायचं !!" स्नेहाच्या या उत्तरानी तर रजत पुरता गोंधळला... "काल रात्री ? मी ? म्हणजे आपण ??? काय केलं मी काल रात्री? सांग ना नीट? " त्याचा काहीसा confused आणि वैतागलेला चेहेरा बघून स्नेहाला खूप मजा येत होती. त्याला अजून चिडवत ती म्हणाली, " आठवून बघ.. काही लक्षात येतंय का ते? " आणि त्याला तसंच गोंधळलेल्या अवस्थेत सोडून ती स्वैपाकघरात निघून गेली.

रजतसुद्धा ऑफिसला जाण्यासाठी तयार व्हायला लागला. पण त्याच्या मनात पूर्ण वेळ एकच विचार येत होता.... 'काल रात्री स्नेहा खोलीत यायच्या आधीच मला झोप लागली होती... नक्कीच! पण ती तर म्हणाली - स्वतःच करायचं आणि स्वतःच विचारायचं- पण मी नक्की केलं तरी काय ? जाऊ दे, काही का असेना...पण त्यामुळे स्नेहाचा मूड ठीक झालाय ना!'

"रजत..."स्नेहाच्या हाकेनी त्याची विचारशृंखला मधेच तुटली. खोलीत येत स्नेहा म्हणाली," ऑफिसला जायच्या आधी प्लीज एकदा स्टुडिओ मधे ये ना. एका पेंटिंगच्या बाबतीत तुझा सल्ला हवा आहे."

"आज जरा घाईत आहे गं. लवकर पोचायचं आहे ऑफिस मधे. एक महत्वाची मीटिंग आहे. आणि तसंही माझ्यापेक्षा तुला जास्त समजतं त्या आर्ट वगैरे बद्दल. " एकीकडे स्नेहाशी बोलता बोलता रजत आपली लॅपटॉप बॅग घेऊन ऑफिसला जायला निघाला सुद्धा!

"अरे पण, तुझा ब्रेकफास्ट ..." त्याच्या मागे मागे मुख्य दारापर्यंत जात स्नेहानी विचारलं. पण तिचा प्रश्न रजतला ऐकूच आला नाही... का त्यानी मुद्दाम ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं ?

"आज पुन्हा ऑफिसच्या कॅन्टीनमधलं काहीतरी अरबट चरबट खाईल, " एक सुस्कारा सोडत स्नेहा म्हणाली आणि श्रद्धाच्या खोलीत गेली.

पुढच्या महिन्यात श्रद्धाचा अठरावा वाढदिवस येणार होता. पण तिनी आत्तापासूनच त्यासाठी जोरदार प्लॅंनिंग करायला सुरुवात केली होती. सगळ्या मित्र मैत्रिणींची लिस्ट बनवली होती.. पण त्यात रोज बदल होत होते. कोणी add होत होते तर कोणी delete होत होते! पार्टीचा मेन्यू पण जवळजवळ ठरलाच होता. श्रद्धाची खूप इच्छा होती की तिचे दोन्ही आजी आजोबा तिच्या या खास दिवसासाठी हजर असावे. पण काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांना औरंगाबाद सोडून येणं शक्य नव्हतं; म्हणून मग स्नेहानी एक कल्पना सुचवली होती... श्रध्दा चा वाढदिवस तिच्या आजी आजोबांबरोबर सगळ्यांनी औरंगाबाद ला साजरा करायचा आणि मग बडोद्याला येऊन तिच्या मित्र मैत्रिणी ना जंगी पार्टी द्यायची. "Wow, म्हणजे दोन दोन celebrations !! काय मस्त आयडिया आहे आई , थँक्स!! " स्नेहाला घट्ट मिठी मारत श्रद्धा म्हणाली. सुरुवातीला रजतला हा प्लॅन काही फारसा पटला नव्हता....इतके दिवस ऑफिसमधून सुट्टी घ्यायची म्हणजे किती कामं खोळंबतील ! पण मग श्रध्दाच्या हट्टापायी त्यानी माघार घेतली आणि त्यांचा औरंगाबादला जायचा प्लॅन फायनल झाला.

खरं म्हणजे हा असा प्लॅन करून स्नेहानी एका दगडात दोन पक्षी मारले होते... एक तर श्रद्धाची इच्छा पूर्ण होणार होती आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे रजतला त्याच्या ऑफिसच्या कामातून एक ब्रेक मिळणार होता. आणि त्याच्यासाठी, त्याच्या तब्येतीसाठी तो खूप आवश्यक होता. गेल्या काही वर्षांत त्याला ऑफिस आणि ऑफिसचं काम याशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. आणि या सगळ्या दगदगीचा त्याचा तब्येतीवर परिणाम होऊ नये म्हणून स्नेहाची सतत धडपड चालू असायची. औरंगाबादच्या या ट्रिप मुळे रजतला आवश्यक तो बदल मिळेल आणि घरच्यांना भेटणंही होईल.... हाच विचार करून स्नेहानी हा पर्याय सुचवला होता.

आता हळूहळू ते तिघंही आपापल्या परीनी औरंगाबाद ट्रिपच्या तयारीला लागले.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज काही वेगळाच मूड दिसतोय राणीसरकारांचा ! या सेवकाला काही सांगाल का? एका रात्रीत असं काय झालं?" त्यावर गालातल्या गालात मिश्किल हसत स्नेहानी अजून एक गुगली टाकला..." वा ! जणू काही काल रात्री काय झालं ते तुला माहीतच नाही !! स्वतःच करायचं आणि स्वतःच विचारायचं !!">>> प्राइसलेस. कॉलिंग द फारेंड.

छान फुलवत आणलीये कथा.. मध्येच वाचताना खेचल्यासारखी वाटते पण एक स्त्री असाच विचार करते. हे मनाला पटतंच. पुभाप्र! Happy