मन रे तू काहे ना धीर धरे

Submitted by किंकर on 10 April, 2020 - 11:06

एखादे गाणे शतकातून एकदाच जमून जाते. काही गाणी अशी असतात कि त्याचे श्रेय कोणाला किती द्यायचे असा जेंव्हा प्रश्न पडतो तेंव्हा त्या श्रेयाची विभागणी करण्याचा अधिकार आपल्याला नाहीच असेच समजावे

कारण साहिर, रफी आणि रोशन या त्रयीने अशीच एक भेट रसिकांना दिलीय कि ज्यात गीतातील अर्थ गहन आहे , आवाजात दर्द आहे , संगीत स्वर्गीय आहे .
राग यमन मध्ये बांधलेली हि गीत रचना आहे १९६४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रलेखा या चित्रपटातील .

या गीताविषयी लिहताना चित्रपट कथानक आणि त्यातून दिलेला संदेश यावर काही भाष्य करण्यापेक्षा मला या गीत रचनेबाबत बोलायला आवडेल . मुळात दिवसाची संघ्याकाळ हि वेळच प्रत्येकाला अंतर्मुख करणारी , सूर्य अस्ताकडे चालला आहे , दिवसभर आपल्याच व्यवधानात गुंतलेला प्रत्येकजण थोडासा विसावला आहे . आजचा दिवस पार पडला या आनंद बरोबरच तो कसा पार पडला ? किती धावपळ सुरु आहे आयुष्याची ? यासारखे विचार आपल्याला आपल्याच अंतरंगात डोकावण्यास भाग पाडत असतात . अशा वेळी धूसर वातावरणात शांत पार्श्वभूमीवर दूरवरून हलकेच रफीचा धीर गंभीर आवाज हलकेच कानावर येतो ....

मन रे तू काहे ना धीर धरे
वो निर्मोही मोह ना जाने,
जिनका मोह करे
मन रे तू काहे ना धीर धरे

आणि स्वर्गीय सुखाची बरसातच सुरु होते .या गाण्याने जीवनाचे सार इतक्या सहजतेने मांडले आहे कि , जणू काही आपले सर्व जीवनच एका अदृश्य शक्ती द्वारे नियंत्रित होत आहे असा भास होतो. मग ती शक्ती कोणासाठी परमेश्वर रूपात असेल तर कोणासाठी निसर्गातील एखादा चमत्कार असेल. या शक्ती समोर नतमस्तक होताना त्याच्या निर्गुण रूपाचा साक्षात्कार घेताना प्रत्येकाला अगदी एकट्यानेच सामोरे जायचे आहे .

रोजचे जगणे असो किंवा आयुष्यात कोसळलेली संकटे असोत त्यामुळे येणाऱ्या अडचणींना जर कोणी मदत केलीच किंवा तुमचे दुःख हलके करण्यास मदत केली तर ते तुमचे भाग्य समजुन पुढे जा त्यापेक्षा अधिक कसलीच अपेक्षा अगदी प्रियजनांकडूनही ठेवू नका आणि हे सगळे साहिर केवळ एका वाक्यात सांगताना सहजच म्हणून जातो - ' कोई न संग मरे '
पण हे - " कोई न संग मरे " जेंव्हा रफीच्या गळ्यातून उतरते तेंव्हा त्या वाक्यातील आरोह अवरोह काळीज पिळवटून टाकतात आणि आवाजातील चढ उतार जीवनाच्या चढ उतारांची मनोमन खात्रीच करून देतात .

आणि गाणे संपवताना साहिर आपल्याला पुन्हा एकदा अशा वास्तवाची जाणीव करून देतो कि , माणूस जगात येताना त्याला मोह माया याची जाणीव नसते पण आसपासच्या परिस्थितीने तो आपोआप अशा गोष्टींकडे खेचला जातो आणि म्हणूनच शेवटी पुन्हा एकदा म्हणतो -

मन रे तू काहे ना धीर धरे
वो निर्मोही मोह ना जाने,
जिनका मोह करे
मन रे तू काहे ना धीर धरे

तर मग एखाद्या निवांत संध्याकाळी जीवनाचे सत्यरूप काव्यातून ऐकण्यासाठी क्लिक करा -
https://www.youtube.com/watch?v=ES5yOtqQGks

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर लिहिलेय, खूप आवडले.

कधी कधी निराशेचे ढग दाटून येतात तेव्हा,

उतना ही उपकार समझ
कोई जितना साथ निभा दे
जन्म मरण का मेल है सपना
ये सपना बिसरा दे.... कोई न संग मरे .

हे शब्द मनावर हलकीशी फुंकर घालतात...

साहिरने हिंदीतही किती सुंदर रचना केलीय. त्याच्या उर्दू रचना लाजवाब आहेतच....