शुद्ध श्याम आणि कुमार!

Submitted by kulu on 8 April, 2020 - 09:38

खूप दिवसांपासून लिहायचं म्हणतोय पण बसून लिहायला तसा वेळच मिळेना, क्रूझच्या शेवटच्या दिवसांत सॅम्पल्स घेण्याची एवढी गडबड सुरु आहे. शिवाय आता इंटरनेट आल्यावर सगळी मोबाईलवर गुंग होणार, तेव्हा ते व्हायच्या आत शक्य तेवढा वेळ निव्वळ माणूस म्हणून उघड्या पडलेल्या माझ्या कलिग्ज बरोबर घालवायची ओढ पण होतीच. अशी माणसे फार छान असतात, इंटरनेट आलं कि ज्याची त्याची आभासी व्यक्तित्वे ज्याची त्याला जाऊन चिकटतात! पण सांगायचा मुद्दा असा की हे लिहायला वेळच मिळेना. अर्थात हे लिहायलाच पाहिजे असंही काही नाही, पण मला आलेला शुद्ध श्याम चा अनुभव इतका उत्कट होता कि तो नुसता एकदा अनुभवून समाधान होतंच कुठे? लिखाणाच्या निमित्ताने पुन्हा तो अनुभव जगायची संधी मिळते म्हणून तो उतरवून काढायची हि गडबड!

ती संध्याकाळ एकतर होती मऊ, साजिरी! म्हणून कुमारांचा शुद्ध श्याम लावला होता! कुमारांचं गाणं कसं? तर जसं तुकोबांनी विठ्ठलाचं वर्णन केलंय तसं.... पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे! तसं कुमारांच्या गाण्याचं भूत एकदा मानगुटीवर चढून बसलं कि सगळा खेळ खल्लास.. मरेस्तोवर ते भूत घेऊन फिरायचं आणि कदाचित त्यानंतरही! कुमारांची पहिली ओळख मी सहावीत असताना झाली. खरंतरं कळत्या वयात नाट्यसंगीत हा एक प्रकार असतो हे सुद्धा त्याच वेळी कळलं. त्या आधी ऐकलं असेल पण हेच ते नाट्यसंगीत असं अचानक समजलं तो हा क्षण. कोल्हापूर आकाशवाणीला रात्री साडेआठ वाजता तो कार्यक्रम होता नाट्यसंगीताचा, अवघा १५ मिनिटांचा. त्यात पहिलं गाणं होतं वसंतरावांचं "मृगनयना रसिक-मोहिनी" आणि दुसरं लागलं "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी"! आहा, काय भारी वाटलेलं ऐकताना, त्यात "धुसफुसणे" हे कुमारांनी असलं भारी म्हटलंय की ते ऐकताना हसलो मी. हे सगळं आई किचनमधून बघत होती हे मला नव्हतं माहित. गाणं पूर्ण ऐकू दिले तिने मला आणि मग सांगितलं कि हे पंडित कुमार गंधर्व आणि गायिका वाणी जयराम! कुमार गंधर्व हे तेव्हा कळले. त्यानंतर परत कुमारांची गाणी लागतील म्हणून तो प्रोग्रॅम न चुकता ऐकायचो, मम्मी तर आठवण करून द्यायचीच पण मावशीच्या घरी रेडिओ सतत सुरु असायचा त्यामुळे नेहमीची वेळ सोडून नाट्यसंगीत लागलं कधी तर मावशी पण फोन करून सांगायची कि रेडिओ लाव, नाट्यसंगीत लागलंय! हे लिहिता लिहिता हे लक्ष्यात येतंय की अशा कुटुंबात जन्माला आलो हे माझं काय भाग्य!

तर कुमार हे नाट्यसंगीत गातात आणि ती नाट्यगीते आपल्याला भयानक आवडतात हे एवढंच कुमारांबद्दल माहित होतं मला मोठं होईस्तोवर अगदी! पुढे मागे शास्त्रीय संगीत ऐकू लागलो तेव्हा कुमारांचे ख्याल ऐकले आणि कुमारांचा आवाका पाहून अवाक् झालो! कुमारांचं शास्त्रीय गायन समजायला थोडा वेळ लागतो म्हणतात, अगदी आमच्या पिढीतले श्रोते सुद्धा! आमच्या आधीच्या पिढीतल्या श्रोत्यांचं न समजणं किंवा त्यांना कुमारांचं गाणं न मानवणं मी समजू शकतो. केसरबाई, मोगुबाई, पंडित पलुसकर, पंडित सवाई गंधर्व, उस्ताद अमीर खान अशा दिग्गजांचे पारंपरिक ख्याल त्यांनी ऐकले! पण त्यानंतरच्या काळात किशोरीताई, जसराज, वसंतराव यांनी शास्त्रीय गायनात आणि तिकडे पंडित रवि शंकर, निखिलदा, पंडित हरीप्रसाद चौरसिया यांनी शास्त्रीय वादनात बरीच क्रांती घडवून आमचे कान सगळ्या बदलांसाठी तयार करून ठेवले!! त्यासगळ्या नंतर कुमारांचं ऍब्स्ट्रॅक्ट गाणं समजायला अवघड व्हायची गरज नाही! पण गायन समजणं म्हणजे तरी काय? तर कळत नकळत श्रोता त्या गायनात विचार शोधत असतो- गायकाचा, रागाचा, बंदिशीचा किंवा या सगळ्याचा! गाण्याचं कैवल्यात्मक स्वरूप खरंतर कितीही म्हटलं तरी मानवी मनाला पटत नाहीच! कुठल्याही गोष्टीच फक्त असणं हे फसवं वाटतं, त्यामुळे हा विचार शोधायची गरज भासते. आणि कुमारांचा त्या गायनामागचा विचारच मुळी खूप ऍबस्ट्रॅक्ट आहे, ढोबळ नाही, कितीही संहत असला तरी बटबटीत नाही आणि म्हणून तो समजून घ्यायला अवघड जात असावा असा आपला माझा अंदाज!

कुमारांनी जे अनेक आनंद मला दिले त्यात एक अतिशय दुर्मिळ असा शृंगारिक, खऱ्या अर्थाने युगुल-प्रेमाचा राग ऐकण्याचा आनंद हा खूप वरचा! असं आहे कि आपल्याकडे बऱ्याच रागांत शृंगाररस आहे असं म्हणतात, पण तसं म्हणायला वातावरण निर्मितीतून तो भाव सिद्ध तरी व्हायला पाहिजे. कुठेतरी मी वाचलं कि बागेश्रीत पण शृंगाररस आहे, आता विरहाचं दुःख सांगणाऱ्या बागेश्रीच्या धैवत-गंधराच्या जोडगोळीत शृंगाररसाला कुठे वाव आहे ते मला काही समजलं नाही! पण कुमारांचा शुद्ध श्याम! आह! अल्फा मराठीवर नक्षत्रांचे देणे असा एक कार्यक्रम असायचा, थोर-मोठ्यांच्या जीवनावर, त्यात कुमारांच्या कारकिर्दीवर बोलणाऱ्या भागात पहिल्यांदा ऐकला शुद्ध श्याम भुवनेश कोमकली यांचा! ऐकल्यावर इतकं प्रसन्न प्रफुल्लित वाटलेलं, कि ते अजून लक्ष्यात आहे! अर्थात शृंगार रस वगैरे कळायचं ते वय नव्हतं. त्यानंतर तो राग विस्मरणात गेला आणि अचानक मागच्या वर्षी ऐकला. NIO तुन घरी आलो संध्याकाळी, माझ्या बाल्कनीत चहा पीत बसलो होतो त्यावेळी ऐकला! मीच काय माझ्याबरोबर भोवतीचा सारा समां गुलाबी झाला, प्रेमाच्या सुखाची ती संहत भावना वेळ काळाच भान ओलांडून सगळ्यांना आपलं करून टाकत होती. शुद्ध श्यामचं हे प्रेम संध्याकाळी व्यक्त झालेलं आहे, किंबहुना संध्याकाळीच व्यक्त झालेलं आहे! दुपारचं, सकाळचं नाही ते नुसतं! रागात जसं एखाद्या स्वराला त्यामागच्या स्वराचा कण लागतो तसं पूर्ण दिवसभराचा कण लागला आहे त्या शुद्ध श्यामला! उठल्यापासून सकाळी सुरु झालेली मींड दिवसाचा प्रवास करून संध्यासमयी सम घेऊन विसावते तेव्हा व्यक्त झालेलं प्रेम हे शुद्ध श्यामचं आहे! असं वाटतं कि शांत कुठेतरी समुद्रकिनारी संध्याकाळ तिच्याबरोबर व्यतीत करावी, प्रेमाच्या गप्पा, लटकी भांडणं, मुद्दाम छेडणं, हलक्या स्पर्शाने झालेल्या गुदगुल्या हे सगळं जाणवलं मला त्या शुद्ध श्यामात! किनाऱ्यावरच्या रेतीचा प्रत्येक कण, समुद्राच्या पाण्याचा प्रत्येक थेंब प्रेमात बुडालेला आहे! दोन मनांचं झालेलं मीलन तर शुद्ध श्याम दाखवतॊच पण नंतर रजनीच्या साक्षीने दोन तनांच्या होणाऱ्या अद्वैताचे सुद्धा नाजूक संकेत त्यात देतो! त्यावेळी तिथे नावाला देखील नकारात्मक काही नाही! कुमारांची ताकद किती ती, असं भावविश्व कुमारांनी उभं केलं आणि त्याने फक्त मला व्यापलं नाही तर अवघा परिसर व्यापला, भावाची व्याप्ती ती किती?

कुमारांना हे असं भावविश्व उभं करायचं होतं का? मला ते माहित नाही! श्याम कल्याणातील कल्याण वेगळा काढून शुद्ध श्याम कुमारांना दाखवायचा होता. पण प्रेमाचा तो हवाहवासा हळवेपणा कुमारांनी स्वतःहून त्यात आणला असं मला वाटत नाही, कारण कुमार हे साधक होते आणि त्यामुळे स्वतःच काही त्या रागात न आणता तो राग म्हणजे केवळ रागच समोर ठेवणे, त्या रागाला आपल्या गळ्यातून प्रकट होऊ देऊन आपण नामानिराळे राहणे हे साधकच करू शकतो! प्रेम हा शुद्ध श्यामचा स्थायी भाव आहे असं मला वाटतं आणि असं भाव-विश्व उभं करताना कुमार हे फक्त माध्यम झाले त्यासाठी! किशोरीताई पण म्हणतात कि मी कामोद गाते तेव्हा त्या कामोदालाच आवाहन करते कि माझ्यातून तूच तू प्रकट हो! हे असं का? कारण त्या रागाचं वातावरण कितीही अजस्त्र, विश्वव्यापी असलं तरी ते असतं खूप तरल, आणि गायक वादकाने जरा जरी
रागाच्या भाव-विश्वात ढवळाढवळ केली तरी ते कोलमडतं! त्यामुळे कुठल्याही रागाचं भाव-विश्व एक तर पूर्ण उभं राहतं तरी किंवा मग त्याचा अजिबात मागमूससुद्धा नसतो, या दोहोंच्यामधली शक्यता नाही, ते अर्धवट उभं नाही राहू शकत! त्यामुळे गायक मारवा गाताना कितीही आनंदी असला तरी मारव्याचं भावविश्व आनंदित होत नाही आणि भैरव गाणारा गायक अगदी कितीही हसरा नाचरा असला तरी भैरव आपली गंभीरता सोडू शकत नाही! आणि हे सगळं होताना मारवा पूर्ण दुःख उभं तरी करतो किंवा फसतो तरी, अर्धवट दुःख झालं वगैरे असलं काही नसतं तिथे! कुमारांनी शुद्ध श्याम च ते केलं! त्याचं भावविश्व स्वतःला त्यातून वेगळं करून उभं होऊ दिलं, म्हणून शुद्ध श्याम हा शुद्ध प्रेम म्हणून व्यक्त झाला!

आता यात कुमारांचं मोठेपण केवढं ते! जुने सिद्ध राग पिढ्यानपिढ्या गायले गेलेले असतात. कित्येक शतके पूर्वजांनी गाऊन उभ्या केलेल्या त्या रागाच्या भावविश्वांना तो राग आता या घडीला गाताना सुद्धा आवाहन केले जाते! त्यामुळे यथा तथा गायला गेलेला यमन सुद्धा मनाला गोडवा देतोच कारण अनेक युगे त्या यमनाची जी आवर्तने झाली, त्या वेळी उभ्या झालेल्या त्या भावविश्वांची पूर्वपुण्याई तिथे कामी येते! पण नव्या रागांना स्वतःचा असा भाव असला तरी त्यांना जुन्या आवर्तनांच्या भावविश्वांच पूर्वसंचित नसतं, त्यामुळे असे राग पहिल्याप्रथम पूर्ण ब्रह्मांडात प्रकट जेव्हा होतात गायकाच्या माध्यमातून तेव्हा त्यांना आपलं भाव-विश्व उभं करायला साधक सुद्धा तशाच तपश्चर्येच फलित अंगात भिनवलेला असावा लागतो! हे काम सोपं नाही आहे! नवीन रागाचं विश्वरूपदर्शन व्हावं लागत...अर्जुन कृष्णाचा इतक्या वर्षांचा सखा, पण दिव्यचक्षु देऊन सुद्धा तो कृष्णाचं विराटरूप पाहून घाबरला, सहन करू शकला नाही! त्यामुळे एकतर एखादा नवीन राग दिसणं, मग त्याचं भाव-विश्व दिसणं आणि मग स्वतःच्या माध्यमातून त्याचं भाव-विश्व प्रकट होऊ देणं यासाठी साधना अनेक जन्मांची हवी आणि म्हणून हे कुमारांना जमलं, कारण ते या जन्मीचे गायक नव्हेत! हे नुसतं एका नवीन रागाच्या सिद्धतेबद्दल झालं! कुमारांनी असे किती तरी राग प्रकट होऊ दिले- जोगकंस (ज्याला कुमार कौंसी म्हणायचे), मधसुरजा, अहिमोहिनी, सोहनी-भटीयार, मालवती! म्हणून कुमार अलौकिक होते. राग दुसऱ्याला जसाच्या तसा दाखवण्याआधी तो स्वतःला दिसावा लागतो पण कुमरांना जे आधी कधीच कुणाला दिसले नाहीत अशा कित्येक रागांचं अखंड दर्शन झालं! कुमारांना लाभलेली अनन्यसाधारण तरल प्रतिभा आणि सूक्ष्मातिसूक्ष्माचे निरीक्षण करण्याची शक्ती तर त्यातून दिसतेच पण त्यांची समोरच्याचे डोळे दिपवणारी तेजोमय साधना सुद्धा त्यातून दिसते!

आणि एकदा असं रागाचं वातावरण सिद्ध झालं कि मी, तू, तो असं काही उरत नाही, सगळ्यांचं अस्तित्व वेगळं असूनही सगळे तेच तो झालेले असतात, तसा शुद्ध श्याम त्या संध्याकाळी झालेला बोटीवर! बऱ्याचदा होतो तसा इथे तो! दिवसभर ढगांचा कुठे मागमूसही नसतो.... पण सूर्य मावळतीला केशरी उधळण करू लागतो, समुद्राची पश्चिमा जर नेसते, कुमार शुद्ध श्याम आळवायला लागतात, तो प्रकट होऊ लागतो आणि सगळं शुद्ध श्याम व्हायला लागतं; तसे हे ढग कुठूनसे येतात आणि क्षितिजावर जमा होतात करड्या तलम वस्त्राची घडी सोनेरी कपाटात ठेवल्यासारखे! त्यामागे समुद्र, सूर्य, सगळंच लपल्या न लपल्यासारखे होतात! का? कारण तिथे अनादी काळापासून चालू असलेलं पृथ्वीप्रकृती आणि सुर्यपुरुषाचं मीलन होतंय, अवघा आसमंत त्यांच्या प्रेमाने हरखून शद्ध श्याम झालाय! निसर्गात द्वैताचं अद्वैत होतंय, मग प्रकृतीने लाजून ढगांचा झिरझिरा पडदा समोर ओढला तर तिचं काय चुकलं?

शुद्ध श्याम : https://www.youtube.com/watch?v=OAOOZ7Kclgc

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निसर्गात द्वैताचं अद्वैत होतंय, मग प्रकृतीने लाजून ढगांचा झिरझिरा पडदा समोर ओढला >>वाह्, लेख खूप आवडला .
तुम्ही असे काही तरी लिहता मग मला संगीतातले काही कसे कळत नाही हे प्रकर्षाने लक्षात येते.
वसंतरावांचं "मृगनयना रसिक-मोहिनी" आणि दुसरं लागलं "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी"! >>हे आजोबा गुणगुणत असायचे, त्यांची आठवण झाली.
तुमचे विशुद्ध मन आणि संगीतावरचे तुमचे प्रेम यामुळे तुमचे सगळे लेख अप्रतिम होऊन जातात.
असेच लिहीत रहा Happy .

लेख वाचला, त्यावर प्रतिक्रिया देणार एवढ्यात आदीश्री यांची प्रतिक्रिया वाचली. आणि त्याला हजार अनुमोदन Happy
लिहीत रहा!!!

सूर आणि समा यात एकरूपता साधण्याची तुम्हाला मिळालेली देणगी दैवी आहे.
हे सर्व त्या स्वर्गीय सुरांमुळे, मोहाळ वातावरणामुळे, तुमच्या तादात्म्यामुळे, की या सगळ्याच्या समसमासंयोगामुळे !
नेहमीप्रमाणेच हाही लेख उत्कट आणि अर्थात सुंदर.

एकदा असं रागाचं वातावरण सिद्ध झालं कि मी, तू, तो असं काही उरत नाही, सगळ्यांचं अस्तित्व वेगळं असूनही सगळे तेच तो झालेले असतात.,>>>>>> अगदी खरंय
कुमारजी अप्रतिमच.......

छान !

सगळ्यांनी किती भरभरून प्रतिसाद दिले आहेत.
@आदिश्री आणि @हीरा, तुमच्या प्रतिक्रिया वाचून कानकोंडं व्हायला झालं. फार स्तुती केलीत.
@चनस, @अज्ञातवासी, @ऋतुराज, @अजिंक्यराव पाटील थांक्यु व्हेरी मच Happy
@अनिंद्य सुंदर शब्दप्रयोग Happy

हा लेख काल टाकताना मला माहित नव्हतं की 8 एप्रिल हा कुमारांचा जन्मदिवस. कुमार असते तर 94 वर्षांचे झाले असते काल!

तुम्ही खूपच सुंदर लिहिता.... वाचताना कुठल्यातरी वेगळ्याच दुनियेत असल्यासारखे वाटते.

मला गाण्यातले काहीही कळत नाही. सुरवात कशी करावी यावर तुम्ही एक लेख लिहिलेला असे आठवतेय. जर असेल तर लिंक द्या ना.

सुंदर लेख!
>>कुमारांचं गाणं कसं? तर जसं तुकोबांनी विठ्ठलाचं वर्णन केलंय तसं.... >> हे फारच आवडले!

साधना +१०१,
कुलू, प्लीज लिंक असेल तर नक्की द्या.. ऐकायची आवड आहे पण कळत काहीच नाही झालंय. लेख असेल तर खुप मदत होईल.. Happy

खूप छान..माझ्या लेकाने जेव्हा बासरी वर बागेश्री पहिल्यांदा वाजवला होता तेव्हा मला अगदी असच हृदयात खूप खोल काहीतरी तुटतंय अस वाटलं होतं..तुम्ही लिहिता ते अगदी आतुन मनाला आपलंसं वाटतं...तुमचे लेख मी त्याला वाचायला दिले आणि तोही आता तुमचा मोठा फॅन झाला आहे..

कुमारांच्या स्वर-विश्वाला शब्दांंत मांडणे ही कल्पनाच् विचक्षण आहे... त्याच्या अनुभूतीचे वर्णन करायला साधर्म्य असणारे आनंद-भाव पारखण्याचे कुठले मापदंड आणायचे ?
तुम्ही हे शिवधनुष्य उचललेत यातच सर्वकाही आले..
कुमार ऐकतो तेव्हा माझ्या संगीत मित्राचे एकच वाक्य आठवते.
कुमार गातात हे संगीतावर त्यांचे उपकार आहेत...।

किती सुंदर! किती तरल लिहिता हो! त्या शब्दाशब्दांतून ओथंबणारी भावना आणि त्या लाटांवर स्वार झालेले वाचक! खरचं जणू अनुभवतो आहोत तो राग!
फार फार अप्रतीम लिहिता.. तुमचे सगळे लिखाण एकसलग वाचायचे आहे एकदा.. पाहू कधी योग् येतोय तो!

कुलू,
या पूर्वी वेळेअभावी किंवा अन्य काही कारणाने प्रतिसाद देणे शक्य झाले नसेल. पण तुमचं लेखन वाचते तेव्हा देवी सरस्वती तुमच्यावर प्रसन्न आहे याचा प्रत्यय येतो. तुम्ही लिहीत राहा आणि तुमचा अनुभव, आनंद आमच्यापर्यंत पोचवत रहा ही विनंती.
शास्त्रीय संगीत अजिबात कळत नसल्यामुळे एका अनुभूतीला मी मुकते अशी खंत वाटते. बघू, या जन्मात ती कधी आणि कशी दूर होते ते Happy सद्यातरी तुमच्या लेखांमधून त्या अनुभूतीची कल्पना करू शकते. हे ही नसे थोडके!

Khupach chhan lihalay. Kharach tumchyavar Saraswati prasann ahe...:-)

आहाहा... निव्वळ अप्रतिम... हे असं दिसायला आणि पुन्हा जसं च्या तसं शब्दांत मांडून इतरांना दाखवता येण्यासाठीही प्रतिभा लागते.. प्रतिभावान आहेस खरा...