भगीरथ

Submitted by Theurbannomad on 8 April, 2020 - 05:53

" शुभ संध्याकाळ, मन्सूर बोलतोय.उद्या किती वाजता आणि कुठे भेटायचंय?" दिवसभराचं काम संपवून घरी निघालेलो असताना गाडीत बसणार तोच मोबाईल खणखणला आणि पलीकडून अपरिचित माणसाचा परवलीचा प्रश्न आला. दर वेळी नवा प्रोजेक्ट हातात आलं, की सुरुवातीची 'किक-ऑफ' मीटिंग होते आणि मग त्या प्रोजेक्टशी जोडलेले कोण कोण कुठून कुठून असेच फोन करत असतात. ' साईट व्हिसिट' च्या वेळी सगळे जण एकत्र आले, की संभाषणातून काही वेळातच त्यातले 'सुपीक मेंदू' आणि 'नुसत्याच कवट्या' कोण आहेत हे सरावाने आता मला ओळखता येत असल्यामुळे मी माझ्या प्रोजेक्ट ची पहिली मीटिंग 'साईट'वर घेणं पसंत करतो. मुळात कोणत्याही प्रोजेक्टची टीम मोठी असल्यामुळे त्यात उडदामाजी काळे गोरे असतातच, त्यात एकेकाचे स्वभाव, अहंकार, कामाची पद्धत कधीही सारखी नसल्यामुळे बरेच वेळा खटके उडणं स्वाभाविक असतं. त्यामुळे ऑफिसच्या वातावरणाबाहेर प्रत्यक्ष साईटवर सगळ्यांना पहिल्यांदा एकत्र आणणं संवादाच्या दृष्टीने फायदेशीर असतं. आमच्याच दुसऱ्या ऑफिस ब्रांच मधला हा मन्सूर अब्दुल हादी नावाचा कुवैती इंजिनिअर आमच्या ' जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ' त्या नवीन प्रोजेक्टचा 'पाणी-तज्ज्ञ' होता.

" सकाळी ८ वाजता तुला भेटेन...जवळच्या कोणत्याही पेट्रोल स्टेशनचं लोकेशन पाठव, तिथेच येतो. "

" नको, माझ्या घराखाली ये, आपण माझी गाडी घेऊन जाऊ. त्या वाळवंटात तुझ्या गाडीपेक्षा माझी 'फोर व्हील' बरी.."

" ठीक आहे, जाताना रस्त्यात खाऊया काहीतरी.." औपचारिकता जाऊन लवकरात लवकर मोकळा संवाद सुरु व्हावा म्हणून बाहेर जाताना बरोबर जो असेल, त्याच्याशी अशा पद्धतीने ' चाय पे चर्चा ' करायची ही माझी जुनी सवय. समोरचा अगदीच घुम्या आणि अबोल असेल, तरच एकापेक्षा जास्त चहाचे कप लागतात, अन्यथा पहिल्या कपात समोरचा माणूस मोकळा होतोच, हा माझा आजवरचा अनुभव आहे.

अर्थात हा माणूस पक्का अरबी असल्यामुळे याचा ओढा कॉफी कडे जास्त असणार, हे मला माहित होतं आणि अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या दिवशी आम्ही जिथे चहा-कॉफी घ्यायला थांबलो, तिथे त्याने मोठ्यातला मोठा कॉफीचा कप आणि अरबी 'श्वारमा' उचलला. भाजलेल्या गोमांसाचा तो श्वारमा आणि त्यावर हा इतका मोठा कॉफीचा कप बघून हा उद्या सकाळी तासभर कुंथत बसणार अशी भीती माझ्या मनाला चाटून गेली.

त्याचा सकाळच्या नाश्त्याचा हा प्रकार बघून मला त्याच्या चहूबाजूंनी पसरलेल्या आंगिक विस्ताराचं कारण समजलं. हा माणूस खरोखर धिप्पाड होता. घुमारदार आणि रांगडा आवाज, सहा फूट उंची, भली मोठी दाढी, भरपूर नाक, भव्य कपाळ, अरबी पद्धतीचे कुरळे सोनेरी केस आणि जणू काही हे सगळं तयार केल्यावर मटेरियल संपत आलं म्हणून देवाने हातचं राखून दिलेले थेट चिनी लोकांशी स्पर्धा करतील असे मिचमिचे डोळे अशी ही मूर्ती खरोखर अर्कचित्र काढण्यासाठी साजेशी होती. त्याचे बूट एखादा उंट घालू शकेल इतके प्रचंड होते. पोट पॅन्टच्या पट्ट्यावरून खाली सांडलेलं असल्यामुळे या माणसाने स्वतःची पावलं शेवटची कधी पाहिली असतील, याचं मला कुतूहल वाटत होतं. हा अगडबंब देह माझ्या गाडीत कसा शिरला असता, याचं विचार करत असताना मन्सूरचा तो जड घुमारदार आवाज माझ्या कानावर पडला..

" जरा त्या बाजूला त्या मोठ्या खुर्चीकडे चल, इथल्या या छोट्या खुर्च्यांवर माझे कुल्ले अर्धेच टेकतात.."

त्यानंतर त्याचं ते गडगडाटी हास्य ऐकून आजूबाजूच्या माणसांच्या माना आमच्याकडे वळल्या. त्या मोठ्या सोफावजा खुर्चीवर सुद्धा ते कुल्ले जेमतेमच मावले आणि बसल्यावर खोचलेला शर्ट मागून बाहेर आला. त्याच्या पार्श्वभागाच्या बाजूने 'आतले कपडे' बाहेर डोकावायला लागले आणि त्याच्या ते लक्षात आल्यामुळे त्याने शर्ट पुन्हा कसाबसा आत खोचून पाठ खुर्चीला घट्ट टेकवली. कदाचित अशा माणसांमुळेच एखाद्या अरबी माणसाने 'कंदुऱ्याचा' शोध लावला असावा, असा विचार माझ्या मनात तरळून गेला.त्याची ती धडपड दोन-तीन मिनिटांनी एकदाची संपली , तो खऱ्या अर्थाने स्थानापन्न झाला आणि त्याने पोटाच्या वर टेबल सरकवून घेऊन कॉफीच्या कपाकडे मोर्चा वळवला.

हा माणूस मुळातच अघळपघळ होता. बोलताना समोरच्याला काय वाटेल, याचा विचार नं करता त्याचे काहीसे साधे आणि बरेचसे कमरेखालचे विनोद आजूबाजूच्या दहा माणसांना कळतील अशा आवाजात सुरु होते. सामान्य माणसांना तो श्वारमा संपवायला आठ-दहा घास लागले असते, पण त्याने तिसऱ्या घासात त्या अक्ख्या श्वारमाचा फडशा पाडला. अर्धा लिटरची पाण्याची बाटली एका दमात रिचवली आणि मूत्रपिंडांवर भार पडल्याची जाणीव झाल्यावर तो पोट रिकामं करून आला. कॉफीचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, कारण त्याला उकळती कॉफी कोमट करून प्यायची सवय होती. शेवटी कॉफीमध्ये फुंकर मारायच्या निमित्ताने त्याची अखंड सुरु असलेली वटवट थांबली आणि मी जवळ जवळ वीस मिनिटांनी बोलायला तोंड उघडलं.

" तू वॉटर इंजिनीरिंग केलंयस म्हणे...मला सांग नं हे नक्की काय असतं..."

" अरे, वॉटर इंजिनीरिंग म्हणजे पाण्याशी संबंधित जे जे म्हणून तंत्रज्ञान असतं ना, त्याचा अभ्यास. अगदी भूगर्भातील पाणीसाठे शोधण्यापासून ते सांडपाणी पिण्यायोग्य करण्याच्या सगळ्या तंत्रज्ञानाची मला माहिती आहे आणि त्यासंदर्भातले अनेक प्रोजेक्ट मी केलेयत मागच्या वीस वर्षात..."

" वीस?"

" हो, मी पंचेचाळीस वर्षाचा आहे." काही माणसांचं वय ओळखणं अवघडच जातं.

" अरे, मी मूळचा कुवेत देशाचा आहे ना...तुला माहित्ये, आमच्याकडे १९३० च्या दशकात काय झालेलं ? अमेरिकन अभियंते आमच्या अमिराकडे तेल शोधण्याचा परवाना मागायला गेले होते. त्यांच्या मते आमच्या भूमीत प्रचंड तेलसाठे होते, आणि ते खरंही होतं. आमच्या अमीराने त्यांना सांगितलं, तुम्ही जर आमच्यासाठी अनेक वर्ष पुरतील इतके गोड्या पाण्याचे साठे शोधाल ना, तर तेलासाठी हव्या तितक्या जागेत हवं तितकं खोदायला मी परवानगी देईन...आमच्याकडे पाणी खूप कमी होतं ना. दुर्भीक्ष्यच होतं गोड्या पाण्याचं...माझे आजोबा सांगायचे, प्यायच्या पाण्याइतकं मौल्यवान दुसरा काहीही नव्हतं आमच्या देशात."

माझ्यासाठी हे सगळं खूपच मजेशीर होतं. आज कोट्यवधी डॉलरचा व्यवहार होत असलेलं हे कुवैती तेल काढायचे परवाने साध्या पाणी शोधायच्या कामगिरीच्या मोबदल्यात अमेरिकेच्या पदरात पडले, यातच अमेरिकेला 'हुशार व्यापाऱ्यांची कर्मभूमी' का म्हणतात या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. पुढच्या काळात कुवैतने लाखो-करोडो डॉलरच्या उलाढालीची गणितं मांडली असतील, त्या पैशांच्या जोरावर समुद्राचं खारं पाणी गोड करायचे भव्यदिव्य प्रकल्प उभे केले असतील, पण त्या सगळ्याचं उगमस्थान हे असं साधं होतं.

गाडीत बसल्यावर आमच्या पुढच्या गप्पांना आता रंग चढला. मन्सूर जर्मनीहून पदवी आणि त्यापुढचं शिक्षण घेऊन पुन्हा अरबस्तानात आलेला होता. पहिली पाच वर्ष जन्मभूमीत काढून मग वाळवंटातल्या या स्वर्गात - दुबईमध्ये - त्याने बस्तान बसवलेलं होतं. कामाच्या निमित्ताने अनेक देश पालथे घातलेला आणि अगदी आफ्रिकेपासून दक्षिण अमेरिकेपर्यंत अनेक देशांमध्ये पाण्याच्या संदर्भातली अनेक प्रोजेक्ट हाताळलेला हा माणूस कर्तृत्ववान असला, तरी जमिनीवर होता आणि बिनधास्त वाटत असला, तरी बेलगाम नव्हता.

" अरे, माझ्या वडिलांबरोबर एकदा मी गेलेलो जर्मनीला. माझे वडील कुवैतच्या म्युन्सिपालिटीत ऑफिसर होते. आमच्या देशासाठी ' पाणी शुद्धीकरण प्रकल्प' तयार करण्याच्या दृष्टीने त्यांनी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि शिष्टमंडळ तयार करून युरोपला अभ्यास करायला जायचा निर्णय घेतला. पहिलीच भेट होती जर्मनीला. मी सांगतो तुला, तिथे आम्ही एका भल्या मोठ्या शुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली. आधी तिथल्या अधिकाऱ्याने आम्हाला आत नेलं तेव्हा नाकाचे केस जळाले आमच्या...इतकी घाण....सांडपाणी जमा होत असलेली जागा होती ती. तिथून मग काही अंतरावर आलो ते थेट एका आधुनिक कार्यालयात. तिथे आम्ही पाणी प्यायलो तेव्हा त्या जर्मन अधिकाऱ्याने सांगितलं, हे जे तुम्ही प्यायलात ना, ते त्याच सांडपाण्यातून शुद्ध केलेलं पाणी आहे. आधी आम्ही सगळे दचकलो....काहींनी बाटली चटकन खाली ठेवली...पण मग आम्ही सगळे विचारात पडलो, की असं पण होऊ शकतं? मी भारावलो...म्हणून मग पुढे शिकायला तिथेच गेलो, शिकलो आणि त्या ज्ञानाचा उपयोग मी आता करतोय. "

चार महिने व्यवस्थित पाऊस पडत असल्यामुळे भारतात तशी बारमाही शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय सहज होऊ शकते, पण इथे या वाळवंटात नावालाही पाऊस नसल्यामुळे आणि वर्षाचे सहा-सात महिने वर आग ओकणारा सूर्यदेव जमिनीवरचंच काय पण तोंडचं सुद्धा पाणी पळवत असल्यामुळे 'पाणी' या विषयाला इथे अमर्याद महत्व आहे. तेलातून आलेला पैसा काही काळ पाणी विकत घ्यायला खर्च करता येईलही, पण आपल्याकडे शुद्ध पाणी तयार करता यावं, म्हणून प्रयत्न झाले पाहिजेत हा विचार इथल्या अरबी राज्यकर्त्यांनी खूप लवकर केला असल्यामुळे आज इथल्या प्रत्येक देशात मोठे मोठे प्रकल्प उभे आहेत. द्रष्टेपणा असला, की संकटांवर कशी मात करता येते याचा हे सुंदर उदाहरण ठरू शकेल!

मन्सूर मग मला कामाच्या निमित्ताने भेटतच गेला. एकदा त्याने मला त्याच्या घरी बोलावलं, तेव्हा मला या महाप्रचंड देहाच्या आत दडलेला ' माणूस' दिसला आणि माझा या माणसाबद्दलचा आदर शतपटीने वाढला.

" अरे, हे काय रे? तुझा घर म्हणजे छोटीशी प्रयोगशाळाच आहे की.."

" हो आहेच...मी इथे बघ काय बनवलंय.." त्याने एका फळीवर ठेवलेला कसलासा नळीसारखा दिसणारा प्रकार मला दाखवला.

" फक्त पाच डॉलर खर्च येईल हा फिल्टर बनवायला. ही नळी आहे ना, त्याच्या आत पाच थर आहेत फिल्टर चे...तू ही नळी खालच्या बाजूने समुद्रात बुडव की नाल्यात, वरून ओढलंस की ते पाणी फिल्टर होऊन तुझ्या तोंडात गोड शुद्ध पाणीच येणार. रसायन किंवा तत्सम पदार्थ सोड, पण खारेपणा, माती, सूक्ष्म जीवजंतू या फिल्टरने वेगळे होऊ शकतात. "

" आता काय करतोयस याचं?"

" अरे आफ्रिकेत असे शेकडो फिल्टर मी पाठवणार आहे, अगदी फुकट. तिथे कॉलरा, पटकी असे पाणीजन्य आजार खूप आहेत रे...हे फिल्टर छोटं पोर सुद्धा वापरेल सहज...तितकाच माझा खारीचा वाटा त्यांच्या आयुष्याला सुसह्य करण्यात...'

बाहेरून कातळासारखा टणक वाटणारा हा माणूस आतून इतका संवेदनशील असेल, याची मला जराही कल्पना नव्हती. कोका-कोला, पेप्सी यासारख्या भूजलाचा अनिर्बंध उपसा करणाऱ्या कंपन्यांवर याचा प्रचंड राग होता. नद्या, तलाव, ओढे अशा नैसर्गिक पाणीस्रोतांना प्रदूषित करणारे उद्योगधंदेच मनुष्यप्राण्यांना एक दिवस पृथ्वीवरून संपवतील, असं त्याचं ठाम मत होतं. ज्या दिवशी पुन्हा एकदा आपण नदीचं किंवा तलावाचं पाणी ओंजळीत घेऊन थेट पिऊ शकू, त्या दिवशी पृथ्वी खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम झालेली असेल, हे त्याने मला समजावलं तेव्हा मला आपल्याकडच्या पाणितज्ञांची या गोष्टीला दुजोरा देणारी मतं आठवली. पंजाब, हरयाणा यासारख्या सुपीक प्रांतांमध्ये वाढीला लागलेलं वाळवंटीकरण पाण्याच्या अनिर्बंध वापरातूनच होतं असल्याचे इशारे आपल्याकडे अनेक तज्ज्ञांनी दिलेले असूनही त्याकडे सोयीस्करपणे होणारं दुर्लक्ष्य कदाचित भविष्यात आपल्यासारख्या देशाला रसातळाला घेऊन जाऊ शकतं, याची जाणीव मला अस्वस्थ करून गेली.

काही महिन्यांनी आमचं ते प्रोजेक्ट पुढच्या टीमकडे हस्तांतरित झालं आणि मी माझ्या बाकीच्या कामात गुंतलो. आठवड्यातून एकदा-दोनदा मन्सूरशी संभाषण होतं होतं. अचानक एके दिवशी त्याने राजीनामा दिल्याची बातमी आली आणि मी त्याला फोन केला.

" काय रे, काय झालं?"

" कंटाळा आला रे...काहीतरी नवं , माझ्या कुवतीला शोभेल असं काही करायचंय आता...आणि तशी संधी आली म्हणून मी रामराम ठोकला या नोकरीला.."

" मग आता कुठे? चंद्रावर पाणी शोधणार कि मंगळावर?"

" तिथे मला नाही जाता येणार...रॉकेट उडणारच नाही माझ्या वजनाने..." तो त्याच सुपरिचित गडगडाटी आवाजात हसला.

" मग कुठे आता? "

" चाललोय आफ्रिकेला...सुदानला. तिथे आता मला खार्टूम आणि आजूबाजूच्या भागाचा अभ्यास करायचाय, पाण्याचे साठे शोधायचेत, तिथल्या गव्हर्नमेन्टला पुढच्या ५० वर्षाचा पाणी नियोजनाचा आराखडा करून हवाय आणि दोन भव्य शुद्धीकरण प्रकल्प तयार करून हवेत..." त्याने पुढच्या वाटचालीचा आराखडा माझ्यासमोर मांडला आणि मी त्याला मनोमन सलाम केला.

अजून कधी कधी त्याच्याशी संभाषण होतं आणि त्याच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या कल्पना ऐकून माझी मती कुंठित होते. आपल्या पुराणात भगीरथाने घोर तपश्चर्या करून स्वर्गातून गंगा या धरेवर आणल्याची गोष्ट आहे. हा आधुनिक भगीरथ त्याच पद्धतीने शून्यातून गंगा निर्माण करण्याचा काम आज अविरत करतो आहे. शेवटी पाणी गंगेच्या पात्रातलं असलं काय किंवा झमझमच्या विहिरीतलं असलं काय, ते गोड असल्यामुळेच हजारो वर्षांपासून त्याचं पावित्र्य जिवंत आहे, नाही का?

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

वेगळ्या विषयावरचे लिखाण. आवडले.

७० टक्के पाणी असलेल्या आपल्या ग्रहावर कोट्यवधी लोकांना साधे पिण्याचे स्वच्छ पाणी मिळू नये यापरीस दैवदुर्विलास तो कोणता.

धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.

https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/

Great