मन वढाय वढाय (भाग ३३)

Submitted by nimita on 7 April, 2020 - 21:39

'सलीलनी लग्न केलं' ही जाणीव स्नेहाला स्वस्थ बसू देत नव्हती... पण आता हळूहळू तिच्या मनातली विचारांची वावटळ शांत होत होती... विचारांत थोडी clarity यायला लागली होती. तिनी स्वतःच्या मनाला चाचपडून पहायला सुरुवात केली. सिनेमात दाखवतात तसं तिची दोन मनं आपापली बाजू मांडायचा प्रयत्न करत होती. तिचं प्रॅक्टिकल मन म्हणालं, 'सलीलनी लग्न केलं तर त्यामुळे तुला एवढा त्रास का होतोय? प्रेमभंग तर तुमच्या दोघांचा झाला होता ना ? त्याच्या इतकंच तुलाही दुःख झालं होतं... पण तरीही तू रजतशी लग्न केलंसच ना ? आणि आता किती सुखात आहेस तू. मग जर सलीलनी दुसऱ्या एखाद्या मुलीबरोबर आयुष्य काढायचं ठरवलं तर त्याचं काय चुकलं? सुखी राहायचा अधिकार काय फक्त तुला एकटीलाच आहे का?' पण तिचं इमोशनल मन ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नव्हतं... 'पण आजी म्हणाली होती तसं - आमचं दोघांचं नातं तुटलं यात माझी तर काहीच चूक नव्हती ना! त्यानी परस्पर ठरवलं होतं ते... स्वतःच निर्णय घेतला होता - माझ्याशी लग्न न करण्याचा आणि त्यामुळे मग पुढे आयुष्यभर एकटं राहण्याचा! पहिला निर्णय तर अगदी तंतोतंत पाळला त्यानी.... मग दुसरा का नाही पाळू शकला?'

हा युक्तिवाद अगदीच निरर्थक आहे हे स्नेहाला सुद्धा मनोमन पटत होतं. स्वतःच्या मनाला दटावून गप्प करत ती म्हणाली,' याला फक्त स्वार्थीपणा म्हणतात स्नेहा.. आणि तुलाही कळतंय की तुझ्या या म्हणण्याला काहीही अर्थ नाहीये. आणि तसंही- तुला तर वाटत होतं ना की आता सलीलनी पण एखादी योग्य मुलगी शोधून लग्न करावं, संसार थाटावा. तुझीच इच्छा होती ना की आयुष्यातल्या प्रत्येक सुखाचा, प्रत्येक नात्याचा आस्वाद घ्यावा त्यानी. जर कधी भेटला तर तसं सांगणार होतीस ना तू त्याला ? मग आता जेव्हा - त्यानी लग्न केलंय, त्याला मुलगी आहे - हे कळलंय तर आनंद व्हायला हवा तुला !! इतका मनस्ताप का होतोय ?

अच्छा, म्हणजे तुझ्या मनात इतकी वर्षं जो भ्रमाचा भोपळा होता तो आता फुटलाय....तुला वाटत होतं की सलील तुझ्या प्रेमाच्या आठवणी जपत आयुष्य कंठतोय .. आणि तुला सोडून दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाहीये- पण प्रत्यक्षात तसं नाहीये.. तू नसल्याने त्याच्या आयुष्यात काहीही फरक पडला नाहीये.. तो दुसऱ्या कोणाबरोबर तरी सुखात आहे...त्याच्या मनातली तुझी जागा आता दुसऱ्या कोणीतरी घेतलीये....आणि याची जाणीव झाल्यामुळेच तुझा इगो दुखावला गेलाय... त्याला ठेच लागली आहे; हो ना ?' हा प्रश्न मनात येताच स्नेहानी होकारार्थी मान हलवली. खरंच होतं ते...आणि कितीही प्रयत्न केला तरी स्नेहा हे कटू सत्य नाकारू शकत नव्हती.

'हे काय झालंय मला? मी कधीपासून इतका स्वार्थी आणि एककल्ली विचार करायला लागले ? इतकी वर्षं मला वाटत होतं की माझ्या आयुष्यातला सलीलचा अध्याय आता कायमचा संपलाय. I have moved ahead in my life. पण मग आता पुन्हा हे सगळे विचार का त्रास देतायत मला ? म्हणजे इतकी वर्षं मी या भ्रमातच होते का? का आत्ता जी मनाची स्थिती आहे तो भ्रम आहे? नक्की काय खरं आणि काय खोटं? काहीच कळत नाहीये. विचार करून करून डोक्याचा भुगा व्हायची वेळ आलीये.'

जेव्हा स्वतःच्या मनावर, मनातल्या विचारांवर ताबा मिळवणं अवघड व्हायला लागलं तेव्हा स्नेहानी तिच्या जवळ असलेलं शेवटचं अस्त्र वापरायचं ठरवलं. रजत म्हणायचा तसं करायचं ठरवलं... ' just sleep over it'...

रजतचा विचार मनात आला आणि स्नेहा पुन्हा वास्तवात आली. पण आता तिच्या मनात वेगळेच विचार यायला लागले...' What's wrong with me? हे कुठले आणि कोणाबद्दल विचार करत बसलीये मी ? आता रजत आणि श्रद्धा हेच माझी lifeline आहेत. माझा वर्तमान आणि भविष्य सुद्धा! रजत किती प्रेम करतो माझ्यावर... आणि तेही अगदी मनापासून ; बिनशर्त ! आयुष्यात जेव्हा जेव्हा एखादा प्रॉब्लेम किंवा अवघड परिस्थिती आली तेव्हा तो माझ्या बरोबर उभा राहिला...मला नुसती साथच नाही दिली तर वेळप्रसंगी माझ्यासाठी लढला सुद्धा! आजपर्यंत त्यानी मला कुठलीही कमतरता भासू दिली नाहीये.... सुखसोयी, समृद्धी, ...कशाचीच...अगदी त्याच्या प्रेमाची सुद्धा! हां, आता पूर्वीसारखं त्याचं प्रेम तो जाहीर करत नाही, पण तरीही त्याच्या actions मधून पोचतं ते माझ्यापर्यंत. तो माझा पहिला चॉईस नाहीये हे त्याला लग्नाच्या आधीपासूनच माहीत होतं; तरीही त्यानी त्याच्या वागण्या बोलण्यातून मला त्याबद्दल कधीच काही जाणवू दिलं नाही . आणि तरीही आज माझ्या मनात हे सगळे निगेटिव्ह विचार का येतायत?'

स्नेहा जेव्हा जेव्हा अशा भावनिक गुंत्यामधे अडकायची तेव्हा प्रत्येक वेळी ती रजतजवळ आपलं मन मोकळं करायची; आणि रजत सुद्धा अगदी प्रॅक्टिकली तिच्या मनातला गुंता सोडवायला मदत करायचा. 'यावेळीही सांगू का रजतला सगळं? तोच सांगेल माझं कुठे आणि काय चुकतंय ते!' स्नेहानी क्षणभर विचार केला....पण लगेच तो झटकून पण टाकला. 'एखाद्या माणसाच्या चांगुलपणाचा इतका गैरफायदा नाही घेऊ गं! जरा रजतच्या मनाचा पण विचार कर की .... तुझ्या सध्याच्या स्थितीला कोण कारणीभूत आहे हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा त्याला काय वाटेल? इतकी वर्षं त्याच्या बरोबर राहून सुद्धा तुझं पहिलं प्रेम तुला अस्वस्थ करतंय - हे सत्य तो पचवू शकेल का? नक्कीच नाही... किती वाईट वाटेल त्याला... कदाचित रागही येईल - तुझा, सलील चा !

छे! हे सगळं मी रजतला सांगू शकणार नाही. माझा अंतरात्मा मला याची परवानगी देत नाहीये. हा गुंता माझा मलाच सोडवायचा आहे. काय करू ? कोणाची मदत घेऊ? आज आजी हयात असती तर काहीच प्रश्न नव्हता... तिनी अगदी योग्य सल्ला दिला असता मला. मग आता कोणाला सांगू?

अचानक तिला तिच्या आईची फिलॉसॉफी आठवली. आई नेहेमी म्हणते," जेव्हा माझ्यासमोर एखादा न सुटणारा प्रश्न उभा ठाकतो आणि मी त्यापुढे हतबल होते, तेव्हा मी सरळ माझा प्रॉब्लेम देवाला सांगून मोकळी होते. त्याला सांगते - 'मला यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सुचव.' आणि गंमत म्हणजे लवकरच मला त्या दृष्टीनी काहीतरी inputs मिळतात..."

बस्, स्नेहानी पण तेच करायचं ठरवलं. देवघरात जाऊन देवापुढे हात जोडून उभी राहिली. त्याच्यासमोर आपलं मन मोकळं केलं. अचानक तिला खूप हलकं हलकं वाटायला लागलं- जणू काही मनावरचं मणामणाचं ओझं उतरून गेलं होतं.

आता ती देवाकडून मिळणाऱ्या संकेताची; देव काय कौल देतो त्याची वाट बघायला लागली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली चाललेय,पण खरच आता जरा पाणी ओतत असल्यासारखे वाटतंय,फक्त आता ती दत्तक मुलगी आहे नि सलील ने हिच्यासाठी खरंच लग्न केलं नाही असं टिपिकल filmyनको व्हायला

खुपच लांबड लागली आहे.
>>>>> तेच ते विचारांच दळण
कधी ती खुप क्लिअर असते कि सलीलच्या विचारांना स्थान नाही अन नंतर पुन्हा तेच ते

>>खुपच लांबड लागली आहे.>> +१
देवाला कशाला वेठीला धरायचे? मुव ऑन करायचे की पुन्हा पुन्हा भूतकाळात गुंतायचे हा चॉइस शेवटी आपलाच असतो. स्नेहाचे वागणे बघता असे वाटते की तिचे सलीलवर तरी प्रेम होते का की केवळ 'त्यांच्या नात्यावर आणि त्यातल्या पॉसिबलिटीजवर' तिचे प्रेम होते आणि रजत सोबतचे नाते हा दुसरा सोईस्कर पर्याय?

माझ्या कथेची प्रस्तावना तुम्ही वाचलीच असेल.
नसल्यास पुन्हा इथे कॉपी पेस्ट करते आहे.

आज एक नवीन कथा लिहायला घेतली आहे.
असं म्हणतात (आणि मानतात ही) की 'स्त्री च्या मनाचा ठाव अगदी भगवंताला सुद्धा लागत नाही'. बरेच लोक जरी ही गोष्ट चेष्टेवारी नेत असले तरी या वाक्यातली सत्यता नाकारता येणार नाही. कारण स्त्रीचं मन असतंच तसं... विशाल..अथांग...काहीसं गूढ म्हणता येईल इतकं खोल ! तिच्या या मनात एकाच वेळी कितीतरी भाव भावनांचे तरंग उठत असतात.... प्रेम, वात्सल्य, करुणा, दया, माया, या आणि अशा सात्विक भावनांबरोबरच राग, अपमान , द्वेष, तिरस्कार असे नकारात्मक भावही ती आपल्या मनात बाळगून असते. कोणत्या क्षणी कोणती भावना उचल खाईल याचा अंदाज तिला स्वतःला देखील नाही बांधता येत.
एका क्षणी जे बरोबर वाटतं तेच पुढच्या क्षणी चुकीचं ठरतं. परिस्थितीनुसार नैतिक आणि अनैतिक याचे मायने बदलत जातात. पण मनाच्या डोहात जरी हे असं वादळ चालू असलं तरी त्याचे तरंग जगापासून लपवून ठेवायचं कसबही असतं तिच्या कडे. स्वतःच्या मनात असलेल्या असंख्य कप्प्यांत तिनी कडू गोड आठवणींचे असे अगणित क्षण दडवून ठेवलेले असतात. पण तिच्या या मनाच्या डोहाचा तळ मात्र तिच्याशिवाय दुसऱ्या कोणालाच गाठता येत नाही. अशाच एका स्त्रीच्या मनात चालू असलेल्या भावनांच्या ऊन पावसाचा लपंडाव म्हणजे ही कथा...मन वढाय वढाय...
लवकरच या कथेचा पहिला भाग घेऊन येते आहे !

जर कोणी या कथेच्या प्रत्येक भागात काही नाट्यमय घटना किंवा sensational developments ची अपेक्षा करत असेल तर त्यांचा अपेक्षाभंग होईल कदाचित. कारण या कथेमागचा उद्देश तो नाही.
तरीही सगळ्यांच्या प्रामाणिक प्रतिक्रियांबद्दल आभार