वन वर्ल्ड : टुगेदर ॲट होम

Submitted by झुलेलाल on 7 April, 2020 - 12:44

करोनाविरोधातील लढ्यात जिवाची बाजी लावणारे आरोग्य सेवक, आणि या आघाडीतील प्रत्येकाच्या धैर्यास सलाम करण्यासाठी आम्ही थाळ्या वाजविल्या, टाळ्या वाजविल्या आणि दिवे-पणत्या लावून त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. असे काही केल्याने करोनाची महामारी नष्ट होणार नाही हे माहीत असूनही देशातील तमाम जनता यामध्ये सहभागी झाली, तर अनेकांनी विरोध व्यक्त करीत पंतप्रधानांची खिल्ली उडविली.
या कार्यक्रमांवरून देशातील समाजमाध्यमांच्या जोडीने प्रसारमाध्यमांमध्येही वैचारिक द्वंद्व जुंपले असताना, जागतिक आरोग्य संघटनेने अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आभासी मंचावरून जगाला एकत्र आणून करोनाविरोधी लढ्यातील आघाडीच्या वीरांना सलाम करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या १८ तारखेला जगभर कृतज्ञता सोहळा साजरा होणार आहे.
अशा वेळी आपण आणि आपली माध्यमे कोणती भूमिका घेणार, हा मुद्दा आता चर्चेला येणारच...
**** ****
करोनाच्या जागतिक महामारीचा सामना करताना स्वतःचा जीव पणाला लावणाऱ्या वैद्यकक्षेत्रातील प्रत्येकाच्या लढ्यास सलाम करण्यासाठी आणि त्यांना भावनिक पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ‘वन वर्ल्डः टुगेदर ॲट होम’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम येत्या १८ तारखेला प्रसार माध्यमांच्या जागतिक मंचांवरून सादर करण्याचा संकल्प ‘ग्लोबल सिटिझन’ आणि ‘जागतिक आरोग्य संघटने’ने जाहीर केला आहे.
करोनाचे संकट थोपविण्यासाठी विज्ञान आणि आरोग्यसेवेच्या आधुनिक उपायांचाच वापर करावा लागणार आहे, पण अशा कठीण काळात या महामारीशी मुकाबला करणाऱ्या प्रत्येकाच्या धैर्यास सलाम करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम जगभर प्रसारित करण्यात येणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अदानॉम यांनी काल या कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले. आपण काही काळाकरिता एकमेकांपासून दूर असू, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आभासीपणाने का होईना, एकत्र येऊन ‘कृतज्ञतेचा हा सोहळा’ साजरा करून लढवय्यांच्या धैर्यास सलाम करू या, असे आवाहन त्यांनी केले. वन वर्ल्डः टुगेदर ॲट होम हा कार्यक्रम म्हणजे, जगाला भेडसावणाऱ्या एका भयाच्या विरोधातील शक्तिप्रदर्शनाचा सोहळा असेल, असे ते म्हणाले. करोनाच्या विळख्यात सापडलेल्या प्रत्येकासोबत आणि या युद्धात आघाडीवर राहून प्रत्येक जिवाच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या आरोग्य क्षेत्रातील प्रत्येकाच्या पाठीशी आपण उभे आहोत, हे दाखविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत, मनोरंजन आणि परिणामकारकतेच्या माध्यमातून या जागतिक युद्धाच्या आघाडीवर लढणाऱ्या प्रत्येकास भावनिक बळ मिळेल, असा विश्वास ग्लोबल सिटिझनचे सहसंस्थापक आणि मुख्याधिकारी ह्युज इव्हान्स यांनी व्यक्त केला.
वन वर्ल्डः टुगेदर ॲट होम हा प्रदीर्घ कार्यक्रम जगभरातील विविध डिजिटल मंचांवरून प्रसारित होणार आहे. अलीबाबा, अमेझॉन प्राईम व्हिडियो, ॲपल, फेसबुक, इन्स्टाग्राम, लाईव्हएक्सलाईव्ह, टेनसेन्ट, ट्वीटर, याहू, युट्यूब आदी मंचांवरून हा कार्यक्रम जगभरातील जनतेस अनुभवता येईल, व या कृतज्ञता सोहळ्यात भावनिकदृष्ट्या सहभागीही होता येईल. अधिक माहिती www.globalcitizen.org/togetherathome
येथे उपलब्ध होईल.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानेही कंबर कसली असून, या कार्यक्रमात आमचाही सहभाग असेल, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेश यांनी जाहीर केले आहे. करोनाविरोधातील लढाईत संयुक्तपणे सहभागी होण्यासाठी याहून मोठे निमित्त नाही. त्यामुळे, या उपक्रमात आम्ही आहोत, आणि याद्वारे आम्ही सारे एकत्र येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
One World: Together At Home is special broadcast curated by Lady Gaga in support of healthcare workers on the frontlines of the COVID-19 crisis and the World Health Organization.

Group content visibility: 
Use group defaults