मूक सारे भोगले 

Submitted by निशिकांत on 7 April, 2020 - 12:03

मूक सारे भोगले 

 भोवती गर्दी तरीही एकटेपण सोसले
प्राक्तना जगलो कुठे मी? मूक सारे भोगले

चांगले, वाईट केली वर्गवारी मी तरी
वाटले होते बरे तेही निघाले त्यातले

भेटला नाही कधीही, पाहिला नाही कुणी
पण तरी का ईश्वराला फक्त शाश्वत मानले?

केवढी आमंत्रणे अन् केवढे सत्कार ते!
जीवनाच्या सांजवेळी आठवांना खोडले

झोत वार्‍याचा बघोनी वागले जे जीवनी
तत्व भिरकाऊन त्यांनी ध्येय खुरटे गाठले

एकटा अंताक्षरी मी खेळलो माझ्यासवे
लागली भेंडी कुणाला? वाद ना घोंगावले

खुश रहायाचा जिवाला छंद जडवा आगळा
याच मार्गे दु:ख माझे मी सदा हाताळले

आठवांच्या जळमटांना काढता का या क्षणी?
सांजवेळी सोबतीला तेच साथी चांगले

शल्य का "निशिकांत" इतके जीवनाच्या शेवटी?
दूर गेल्याने जवळचे, शुन्य हाती लागले

निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

शेवटचा शेर....

शल्य का "निशिकांत" इतके जीवनाच्या शेवटी?
दूर गेल्याने जवळचे, शुन्य हाती लागले

नकारात्मकतेचा सूर काढूनही चांगला वाटेल बहुतेक.....

शल्य निशिकांतास नाही जीवनाच्या शेवटी,
दूर गेले जवळचे पण पूर्ण हाती लागले..