कोरोनाविरुद्ध बढाई नव्हे लढाई!

Submitted by Asu on 7 April, 2020 - 04:55

कोरोनाविरुद्ध बढाई नव्हे लढाई!

आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजींनी देशावर ओढवलेल्या कोरोना साथीच्या संकटात अहोरात्र सेवा देत असलेल्या अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी रविवार दि.२२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू दरम्यान सायंकाळी पाच वाजता घराच्या खिडकीत, गॅलरीत टाळी, थाळी, घंटानाद करण्याचे सर्व भारतीयांना आवाहन केले होते. तसेच, रविवार दि.५ एप्रिल २०२० रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे घरातील सर्व लाईट बंद ठेवून बाल्कनीत दिवे आणि मेणबत्त्या लावून कोरोना विरुद्धच्या लढाईत एकी दर्शवून मनोधर्य वाढविण्याचे आवाहन सर्व भारतीयांना केले होते.
मा.पंतप्रधानांचा उद्देश चांगलाच होता परंतु याबाबत मत मतांतरे दिसून आली. याबाबत एक लक्षात आणून द्यावेसे वाटते की आपण भारतीय उत्साहप्रिय लोक आहोत. मग त्यासाठी कोणतेही कारण चालते. किंबहुना तशा कारणाच्या शोधातच आपण असतो. वरील दोन्ही आवाहनांना सर्व भारतीयांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसते. यात काहींनी भक्ती म्हणून, काहींनी कोरोनाची भीती म्हणून तर काहींनी सक्ती (उगाच देशद्रोहाचा शिक्का लागायला नको) म्हणून, तर काहींनी कारण पटले म्हणून वा इतर करतात म्हणून या आवाहनाचे पालन केलेले असावे. या दोन्ही घटनांचे टीव्हीवरून जे चित्र दिसले ते बघून मात्र खेद वाटला.
अतिउत्साही लोकांनी थाळीनादाचे तीन तेरा वाजवले. एकत्र येऊन मिरवणुका काढून, नाचतगात, जयघोष करीत थाळीनादाचा सार्वजनिक कार्यक्रम केला. खरं म्हणजे थाळीनादाचा कार्यक्रम घरात म्हणजे उंबरठ्याच्या आत करणे अपेक्षित असतांना बऱ्याच जणांचा गैरसमज दिसला की, सोसायटीचे आवार, गच्ची म्हणजे घरच जणू! या अतिउत्साही लोकांनी अनेक ठिकाणी एकत्र येऊन घरबंदी व जनता कर्फ्यूची वाट लावत हा उत्सव साजरा केला.
या गैरशिस्तीचा अनुभव गाठी असतांनाही तशाच प्रकारे रविवार दि.५ एप्रिल २०२० रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे दिवे लावण्याचे आवाहन सर्व भारतीयांना करण्यात आले. आणि ते करतांनाही बऱ्याच जणांनी 'दिवे लावले'! काहीकाहींनी तर व्यक्तीपूजेतून जयघोषही केला. आवारात फटाके फोडून एकत्र येऊन सर्वांनी सार्वजनिक दिवाळी साजरी केली. आणि हे सगळं घरात बसणं आवश्यक असतांना!
त्यातही विद्युत ग्रीड फेल्युअरबद्दल केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या निवेदनात तफावत असल्यामुळे जनतेच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. अशावेळी एखाद्या अधिकृत शासकीय वीजतंत्रज्ञाने याबाबत स्पष्टीकरण केले असते तर बरे झाले असते. कदाचित सरकारने असा सल्ला घेतलाही असेल. पण मुळात अशा संवेदनशील वातावरणात गोंधळ निर्माण होईल अशा गोष्टी करायच्याच कशाला? शासकीय अधिकाऱ्यांवरही उगाचच ताण!
मला असे वाटते की, कोरोनाविरुद्धच्या संवेदनशील लढ्यात आणि विशेषतः लॉक डाऊन असतांना अशी अशास्त्रीय कार्यक्रम करण्याची आवाहने कृपया कुणीच करू नये. कारण, एखाद्या चांगल्या गोष्टीचेही विडंबन होते. मग विवादास्पद गोष्टीबद्दल काय सांगावे? हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न असला तरीही निदान आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात तरी असे कार्यक्रम करण्याचे आवाहन करू नये. तसेच अशा गोष्टी केवळ एखाद्या व्यक्तीच्या वा समूहाच्या इच्छेनुसार व अशा गोष्टीचे विकृतीकरण होऊ शकते ही शक्यता विचारात न घेता अशी कृती करण्याचे आवाहन न केलेलेच बरे! तेव्हा असे कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम न करता उंबरठ्याच्या आत घरातच (सोसायटीच्या आवारात किंवा गच्चीवर नाही) बसावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. मला काहीही होणार नाही अशा भ्रमात कुणीही राहू नये.
कोरोना विषाणू चीनमधून आल्याने असेल कदाचित तो साम्यवादी आहे. श्रेष्ठ-कनिष्ठ, गरीब-श्रीमंत असा भेद तो मानत नाही. सर्वांना एकाच पातळीवर मोजतो. तो केव्हा कुठे कसा तुमच्यात संक्रमण करेल हे काहीच सांगता येत नाही. तरुणांना जरी वाटत असेल की मला काहीच होणार नाही तर तेही खरे नाही. तसेच त्यांना स्वतःला जरी काही झाले नाही तरी ते इतरांना कोरोना संक्रमित करण्यासाठी कारण ठरू शकतात. एक जण जरी घराबाहेर पडला तरी तो स्वतःचाच नव्हे तर हजारो लोकांचे जीव धोक्यात घालत असतो. आणि तसे करण्याचा कुणालाही काहीही अधिकार नाही. थाळीनाद व दिवे लावण्याच्या कार्यक्रमात अशा बेशिस्तीच्या घटना कमी असतीलही पण कोरोना विरुद्धच्या युद्धात एक जणही जरी फितूर झाला तरी नियम पाळून लढणाऱ्या इतर हजारोंच्या प्रयत्नांवर पाणी पडते. एवढेच नव्हे तर त्यांच्या जीवावरही बेतते. त्यामुळे अशा घटना थोड्याफारच झाल्या असे म्हणून सोडून देता येणार नाही.
तरी, कृपया कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी काहीही करू नका फक्त घरात स्वस्थ बसा. कळकळ वाटल्याने सांगितल्याशिवाय राहावले नाही म्हणून हा प्रपंच. असो!
******
प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.07.04.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults