स्वप्न... आपली की त्यांची?

Submitted by प्रिंसेस on 12 December, 2007 - 22:50

"अरे पण तू डॉक्टर झालासच का मग?" मी चिडुन विचारलं.
"कारण... ते माझ्या आई वडिलांचे स्वप्न होतं. डॉक्टर होऊन मी काय करणार? मला ऑपरेशन करतांना सुद्धा मी शेफ आहे आणि चिकन तळतोय असे दिसलं तर?" इति मिकी.
मिकीने नायर कॉलेजमधुन एमबीबीएस केल्यानंतर दोन वर्षे घरी बसुन नंतर रेस्टॉरंट उघडण्याचा निर्णय घेतला होता. मिकी माझ्या भावाचा मित्र. अभ्यासातही चांगला होता. एक दिवस अचानक त्याने डॉक्टरकी न करण्याचा निर्णय घेतल्याचे कळले. मला आश्चर्य तर वाटलच शिवाय रागही आला. डॉक्टर होण्याचे कोणाचतरी स्वप्न तोडुन त्याने ती सीट मिळवली असेल आणि आता त्याचा काहीच उपयोग न करता सरळ दुसरच काहीतरी करायचय त्याला.

माझा राग कदाचित चेहरा लपवु शकत नव्हता. ते पाहुन मिकी म्हणाला "दिदी तू सांग, आयुष्यात तू जे काही करतेय त्यातले किती तू तुला वाटलं म्हणुन केलय?"
त्याचा हा प्रश्न मला खुप अंतर्मुख करुन गेला. गेले दोन दिवस फक्त तोच एक विचार आहे मनात. आज जर आठवायचं ठरवलं तर माझे स्वप्न कोणते तेच आठवेना मला.

मला डॉक्टर व्हायच होतं... नाही होता आलं. "डॉक्टर किंवा इंजिनीयर" या रोगाचे शिकार माझ्या घरातले लोक पण होते. म्हणुन मग माझी इच्छा नसतांना इंजिनीयरिंगला गेले. अभ्यासात बरी होतेच त्यामुळे सगळ्या वर्षांना चांगले टक्के मिळवुन पासही झाले. पण कॉलेजच्या चार वर्षात प्रत्येक वेळी मला वाटत होत की "नाही... हे माझे क्षेत्र नाही. this is not my cup of tea." पण तरीही मम्मी पपांचे स्वप्न मी माझ्या डोळ्यात वागवत राहिले.

इंजिनियरिंग संपल्यावर ठरवले सगळे करतात ते नको करायला. आयटी नको काहीतरी वेगळं हवं म्हणुन मग एचपीसीएल मध्ये ऑफिसरची एक्झाम दिली. पासही झाली. हेच हेच हवं होते मला, असे म्हणत जॉईन झाले. सरकारी घर, गाडी, सलाम करणारे लोक वयाच्या बावीसाव्या वर्षी मी मिळवलय याचेच अप्रुप वाटायचं मला.

लग्न ठरले तेव्हा "सासुबाईंचे मत" होते की मी आयटी मध्ये जावं त्यांचे मत "माझे स्वप्न" कधी बनले तेच कळलं नाही. मग एवढ्या मोठ्या नौकरीला लाथ मारुन मी आयटीमध्ये हातपाय मारायला सुरुवात केली. तिथेही यशस्वी झाले (यशस्वी??? हं... नौकरी मिळवली आणि दिलेले सगळी काम करतेय, बॉसही खुष असतो... यालाच यशस्वी म्हणतात ना?) पण प्रत्येक क्षणाला वाटतं... हेच हवे होते का मला? जे आज मी मिळवलय ते मला हवे होते का? की दुसर्‍या कोणाची तरी स्वप्न आपली मानुन मी तेच साकार करत गेले.

आजुबाजुला बघते तेव्हा माझ्यासारखे खुप लोक दिसतात मला. कोणाच्यातरी स्वप्नाच, अपेक्षांच ओझे आयुष्यभर वाहतांना. " आईला वाटलं म्हणुन, बाबांनी सांगितल म्हणुन, सासुबाईंचे मत होते म्हणुन, आजोबांचे अधुरं स्वप्न होते म्हणुन..." अगदी न संपणारी यादी आहे ही. मग त्यातलाच कोणीतरी मिकी फक्त स्वतःच्या स्वप्नांच्या मागे धावायच ठरवतो तेव्हा तो आपल्याला वेगळा वाटतो... त्याचा राग येतो... माझ्यासारखेच कितीतरी लोक त्याला निरनिराळे प्रश्न विचारुन भंडावुन सोडत असतील. त्याच्या स्वप्नपुर्ती पासुन त्याला दुर करतील. मग तोही स्वत:च्या स्वप्नांची आहुती देउन पुन्हा आईवडिलांच्या स्वप्नाच्या मागे धावु लागेल. सगळे पुन्हा गप्प बसतील. आणि दुसर्‍याच क्षणी पुन्हा धावायला लागतील स्वप्नांच्या मागे... पण कोणाच्या?

(आई वडिलांचे किंवा दुसर्‍या कोणाचेही अधुरे स्वप्न पुर्ण करण्यात एक निर्मळ, निखळ आनंद असतो तो मात्र मी नक्कीच मिळवलाय. )

गुलमोहर: 

नेहमीप्रमाणेच छान अन नेमक लिहिल आहेस!!

अगदी नेमकं. छान लिहिलयस.
माझ्याबरोबरचा ऐटीतला एक आठ वर्षांन्नी डोक्टरकीत शिरला आणि दुसरा एक तीन वर्षं सर्जरी करून ऐटीत आला....

मला एक शहाणा भेटला होता. भलताच हुशार. त्याने भरपूर पैसा देणारी नोकरी केली, मोजकीच वर्षं. आणि आता आपलं स्वप्नं पुरं करतोय. त्या नोकरीचा ह्या स्वप्नाशी काहीही संबंध नाही. मुळात आपला व्यवसाय आणि स्वप्नं त्याला वेगळच ठेवायचं होतं. व्यवसायात कराव्या लागणार्‍या तडजोडी स्वप्नाच्या बाबतीत "स्वप्नातही" शक्य नव्हत्या, त्याच्यामते.
असली combinations किती असतात? खूप कमी. तू म्हणतेयस तोच प्रकार जास्तं.
व्यवसाय, दुसर्‍यांची स्वप्नं आणि अपरिहार्य तडजोड हा इतका घट्ट पीळ आहे की, वेगळं काढता येणं कठीण आहे.... छ्छे भलत्याच गहन विषयाला हात घातलास, राजकन्ये!
(तुझा लेख सुंदरच)

तुझा अनुभव छान शब्द बद्ध केला आहेस पण कित्येक माझ्यासारखेच असतील की ज्याना काहीच स्वप्न न दिसता पोटापाण्याच पहायच म्हणून कराव लागल. Happy
अर्थात तिथे काहीच ऑप्शन नसतोच. त्या केस मध्ये काय????????????????????????????????????????????
आणि बाकी दाद ने जे उदाहरण दिलय तस करु शकतोच की माणुस.
थोडे वर्ष काम करा भरपुर पैसा कमवा. आणि नीट प्लॅनिंग करुन मग सगळ सोडा आणि जे जे आवडत तेच आणि तेच करा. Happy

खरच विचार करायला लावणारा लेख आहे.....

प्रश्न चांगला मांडलाय पण व्याप्ती फक्त हव ते शिक्षण, पेशा आणि काम येव्हढाच मर्यादित नाहीये. कित्येक छोटी छोटई स्वप्न, इच्छा किंवा अगदी छोटे छोटे आनंदाना आपल्याला मुकाव लागत ,कुणाची स्वप्न पुरी करावीत म्हणुन नाही तर जगराहाटीत, रॅटरेस मधे आपण कितीतरी गोष्टिना मुकतो

राजकन्ये आलिस कधि परत? सुंदर आहे ललित! अंतर्मुख करणारे!
ति बंधन पुरि कर बघु आता!

म्हणते मी पण. Happy
प्रिन्सेस, विचार सही मांडला आहेस. 'त्यांची' स्वप्नं आपली व्हायला वेळ नाही गं लागत!

घरच्यांची, नातेवाइंकांची मतं आपली स्वप्नं कधी बनतात कळत देखील नाही! काही लोक स्वप्न वेगळी ठेवतात पण त्या सगळ्यांनाच ती स्वप्न पुर्ण करता येत नाहीत...जबाबदारी असते, इतरही कारणे असतात मग मन मारुन आहे तेच काम करत राहावं लागतं. अश्या वेळेस जे काम करतोय त्यातच आनंद शोधुन ते करणं चांगलं नाही का?

राजकन्ये... अगदि वास्तवादि लिहिलयस, विचार करायला लावणारं ! मस्त लेख !
तिऊ.. शेवटचं वाक्य अगदि पटेश. आहे ते mentally accept केलं कि त्रास नाहि होत, त्यातच आनंद शोधायचा. सगळ्या जगावर आणि स्वत:वर खूष असणारी, होतय ते आनंदाने स्विकारणारी माणसं विरळीच.

माणिक !

छान लिहिल आहे, स्वप्न??? उगाच विचार नको करायला. माझी स्वप्न खतरनाक आहेत Happy

राजकन्ये,खरच गं खरच.
मी सुध्धा " इलेक्ट्रिकल ला का गेले होते, कुणास ठाऊक? काही वर्ष त्या स्बजेक्ट मध्ये प्राध्यापकी केली,पण माझी खुपच घुसमट होत होती. आता मी सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनीअर म्हणुन काम करतेय्.--मोकळ्या मनाने.
पण लोक काय म्हणतील म्हणुन जर मी इलेक्ट्रिकल मध्येच राहीले असते,तर कदाचित फक्त श्वास घेतेय म्हणुन जिवंत्--नाहीतर मनाचा दगड होऊन राहीले असते.
पण आपण ही अवेअर राहुन अशा लोकांना नावं न ठेवता जमलि तर मदतच केली पाहीजे.

आजुबाजुला बघते तेव्हा माझ्यासारखे खुप लोक दिसतात मला. कोणाच्यातरी स्वप्नाच, अपेक्षांच ओझे आयुष्यभर वाहतांना. " आईला वाटलं म्हणुन, बाबांनी सांगितल म्हणुन, सासुबाईंचे मत होते म्हणुन, आजोबांचे अधुरं स्वप्न होते म्हणुन..." अगदी न संपणारी यादी आहे ही. मग त्यातलाच कोणीतरी मिकी फक्त स्वतःच्या स्वप्नांच्या मागे धावायच ठरवतो तेव्हा तो आपल्याला वेगळा वाटतो... त्याचा राग येतो... माझ्यासारखेच कितीतरी लोक त्याला निरनिराळे प्रश्न विचारुन भंडावुन सोडत असतील.
प्रिंसेस,
२००७ चा तुमचा लेख मी आज वाचला, तुम्ही आजच लिहिलाय अस वाटतोय,आजही तो उपयोगी आहेच !
असे प्रश्न आपल्या मनात ठेऊन कधी त्यांना उत्तर देण्याच टाळत,तर कधी पुढे ढकलत, समजुत काढत जगणं यालाच तर जीवन म्हणायच आणि आपला हक्काचा आजचा दिवस आनंदाने जगण्याचा प्रयत्न मात्र करायला हवा.
पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ यायला लागते, तुमच्या मनात आहे ते करायला नक्कीच संधी मिळते अस म्हणतात ते खरंच आहे अस मला वाटतं.

थ्री इडीयट फेम(?) चेतन भगत चा मौलिक सल्ला:
work for the job that pays for your passion..
२००% अनुमोदन.. वैयक्तीक अगदी अचूक लागू पडलय आणि दोन्ही बाजूने समाधान.. Happy

चेतन भगतने सल्ला बरोबर दिला पण किती जणांना डिग्रीला जाण्यापुर्वी किंवा डिग्री झाल्यानंतर समजते की माझई नक्की पॅशन काय आहे ?

माझ्यामते फारच थोडे लोक असे असतात ज्यांना हे समजते. बाकीचे फक्त आई किंवा वडीलांच्या इच्छेला मान देतात आणि शिकतात. मग पुढे नोकरी करतात. आजच्या समाजात अपेक्षांच ओझ फार वाढल्याने मुल फारच हवालदिल असतात. सामन्य आई किंवा वडील हे काही करीयर मार्गदर्शक नसतात. ते समाजातल्या प्रचलित ट्रेंडला अनुरुप मार्गदर्शन करतात. हे कधी बरोबर ठरते किंवा कधी नाही ठरत.

माझ्या माहीतीत एक गृहस्थ आहेत. त्यांचे वडिल एका मोठ्या इंजिनियरींग कंपनीमध्ये जनरल मॅनेजर होते. त्यांच्या मते मुलाने इंजिनियर व्हायला हवे म्हणुन पुण्यात इंजिनियरिंग कॉलेजेस चे पेव फुटलेले नसताना, त्याला बारावीला कमी मार्क्स मिळाल्यामुळे ज्ञानेश्वर विद्यापिठाची पदवी धारण करणे भाग पडले.

या गृहस्थाला झाडे, पाने फुले आणि मासे ( शोकेस मधील ) याचे प्रचंड आकर्षण आहे. हा गृहस्थ डिस्कस या अती महाग माश्यांच्या अनेक जोड्या योग्य ती काळजी घेऊन जन्माला घालु शकतो. ( डिस्कस मासा अतिषय संवेदनशील असतो. जरा भिती वाटल्यास सर्व अंडी स्वत:च खाउन मोकळा होतो )

हे गृहस्थ गेले अनेक वर्षे नाईलाज म्हणुन नोकरी करतात. घरी गेल्यावर अनेक तास न कंटाळता मासे. झाडे यांचे संगोपन करतात.

जर त्यांना आणि त्यांच्या वडीलांना आयुष्याच्या सुरवातीलाच हे कळले आणि पटले असते तर आज त्यांचा छंद त्यांचा व्यवसाय झाला असता. काही नाही तर किमान इतकी वर्ष आयुष्याशी करावी लागणारी तडजोड टाळता आली असती.

शैलजा, दाद , झकासराव,एक्नकाशी, पाटील, आशु२९, टिउ,माणक्या पल्ला, सत्यजित, अनघावन, अनिल७६, योग, नितीनचंद्र सगळ्यांचे खूप आभार.

अनिल७६ तुमचे स्पेशल आभार. माझ्याही विस्मृतीत गेलेल्या लेखाला वर आणण्यासाठी.

नितीनचंद्र ,<<<< हे गृहस्थ गेले अनेक वर्षे नाईलाज म्हणुन नोकरी करतात. घरी गेल्यावर अनेक तास न कंटाळता मासे. झाडे यांचे संगोपन करतात.

जर त्यांना आणि त्यांच्या वडीलांना आयुष्याच्या सुरवातीलाच हे कळले आणि पटले असते तर आज त्यांचा छंद त्यांचा व्यवसाय झाला असता. काही नाही तर किमान इतकी वर्ष आयुष्याशी करावी लागणारी तडजोड टाळता आली असती.>>>>>>>>>>>>>>>> किती चिकाटी म्हणावी. माझ्यासारखे काही लोक तर सरळ स्वप्नांवर, आवडींवर , छंदांवर माती ढकलुन मोकळे होतात. आज विचार करते तर मला माझी स्वप्ने खरेच आठवत नाही. पण सध्या मी माझ्या छंदाला वेळ देणे मात्र नक्कीच सुरु केले आहे.

आईवडिलांची स्वप्नं वगैरे सगळं एका मर्यादेपर्यंत ठीक आहे पण शेवटी हे आपलं आयुष्य आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आयुष्याच्या अखेरीला 'हे करायला हवं होतं, ते करायला हवं होतं" ही खंत आपल्याला वाटते, ती शेअर करायला कोणी येत नाही. आपल्याला पाहिजे ते करायचं असेल तर अगदी जवळच्या मायेच्या लोकांचा विरोधही सहन करावा लागतो. आपली काही चूक झाली की "बघ, सांगत होतो/होते तुला" हेही ऐकावं लागतं. "स्वार्थी, हेकेखोर" ही लेबलं लागतात. तुमचा निर्णय बरोबर असेल तर तसं कबूल करणारे लोक भेटले तर तुम्ही भाग्यवान. तुम्ही कसे चूक आहात ते पटवणारे लोकच जगात जास्त भेटतात ही सत्यपरिस्थिती आहे. एकूणात ही तारेवरची कसरत आहे, नेहमी जमेलच असं नाही Sad एक चांगला विषय मांडलात.

>>तुमचा निर्णय बरोबर असेल तर तसं कबूल करणारे लोक भेटले तर तुम्ही भाग्यवान. तुम्ही कसे चूक आहात ते पटवणारे लोकच जगात जास्त भेटतात ही सत्यपरिस्थिती आहे.

अगदी... सौ बात की एक बात!

>>चेतन भगतने सल्ला बरोबर दिला पण किती जणांना डिग्रीला जाण्यापुर्वी किंवा डिग्री झाल्यानंतर समजते की माझई नक्की पॅशन काय आहे ?माझ्यामते फारच थोडे लोक असे असतात ज्यांना हे समजते. बाकीचे फक्त आई किंवा वडीलांच्या इच्छेला मान देतात आणि शिकतात. मग पुढे नोकरी करतात. आजच्या समाजात अपेक्षांच ओझ फार वाढल्याने मुल फारच हवालदिल असतात. सामन्य आई किंवा वडील हे काही करीयर मार्गदर्शक नसतात. ते समाजातल्या प्रचलित ट्रेंडला अनुरुप मार्गदर्शन करतात. हे कधी बरोबर ठरते किंवा कधी नाही ठरत.>>>

बरोबर आहे. जोपर्यंत आर्थिक दृष्ट्या पालकांवर अवलंबून आहात तोपर्यंत त्यांचे निर्णय तुमच्या आयुष्यात (तुम्हाला पटो वा न पटो) तुमच्यावर लादले जाण्याची शक्यता अधिक असते. अर्थातच चेतन भगतचा सल्ला तुम्ही जेव्हा आर्थिक दृष्ट्या अधिक स्वावलंबी असाल किंवा तेव्हडी वैचारीक परिपक्वता असेल त्यावेळी जास्त योग्य ठरतो असेच मला म्हणायचे होते. ("मी कुठल्या क्षेत्रात नोकरी/करीयर करू" यावर त्याला mba/iit मध्ये विचारलेल्या प्रश्णाला ऊत्तर देताना तो तसे म्हणला..). असो.

सत्त्य परिस्थिती अशी आहे की सर्वसाधारणपणे सामान्य्/मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात पहिली १८ वर्षे पर्यंत तुम्ही पालकांच्या अधिपत्त्याखाली असता. १८-२२ डिगरी घेण्यात जातात, तिथेही आर्थिक दृष्ट्या बहुतांशी पालकांवर अवलंबून. नशीबाने नोकरी लागली तर २२-२५ स्वतासाठी पैसे कमवण्यात, ऊधळण्यात, चैनीत, जातात. २५-२८ नोकरी मध्ये नोकरी बढती, भविष्याच्या दृष्टीने बचत वगैरे म्हणून घाम गाळण्यात जातात. २८-३२ लग्न झाले तर नव्याची नवलाई, जोडीदाराबरोबर गुलाबी दिवस घालवण्यात, पुन्हा जास्त पैसे उढळण्यात जातात.. ३२ नंतर यथावकाश एक्/दोन मुले झाली तर ३२-४० हा काळ पुन्हा एकदा वाढलेल्या कुटूंबाच्या वाढलेल्या जबाबदार्‍या, आर्थिक खर्च, एव्हाना तुमच्यावर अवलंबून असणार्‍या पालकांना वेळ देणे, शिवाय नोकरी मध्ये अधिक बढती, पैसा या साठी घाम गाळणे वगैरे यात जातो. ४०-५० पुन्हा एकदा वाढत्या वयातील मुलांचे संगोपन, शिक्षण, ईतर कौटूंबीक जबाबदार्‍या, एव्हाना स्थिर स्थावर झालेल्या नोकरीत मासिक पगारासाठी रतीब घालणे, थोडे पर्यटन, समारंभ, ई. मध्ये जातो. ५०-५५ आपल्या म्हातारपणाच्या चिंता, नविन आजार, दुखणी, मुलांची लग्ने, शिक्षणे, ईत्यादी बघण्यात जातो.. ५५-६० पुन्हा एकदा रिटायरमेंट्साठी तजवीज करणे, मुले आपापली स्वावलंबी झाली असल्यास, संसारात लागली असल्यास, स्वताच्या जोडीदाराबरोबर दिवस घालवणे, प्रसंगी नातवंडे यांची देखिल जबाब्दारी संभाळणे, अशा घरगुती गोष्टीत वेळ जातो. ६० नंतर सर्व जबाब्दार्‍या संपल्या असतील, तब्येतीने तुम्ही व जोडीदार धडधाकट असाल, आणि खिशात खर्चायला भरपूर पैसा असेल तर मग आजवरची राहिलेली हौस, प्रवास, ई. सर्व करता येते. मला वाटते थोड्या फार फरकाने हा प्रवास सर्वांच्या बाबतीत होत असावा. थोडक्यात ही झाली "रोजची वाट"... वेगळ्या वाटांवर जायचे तर प्रचंड आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, मोडून पुन्हा ऊभे रहायची ताकद, प्रसंगी सगे सोयर्‍यांकडून वाईटपणा घ्यायची तयारी, आणि त्यातही जमलेच तर आपले हितचिंतक कोण ते ओळखून त्यांना आयुष्यभर् धरून ठेवता येण्याची कुवत हे सर्व लागते. एव्हडे करूनही व्यावहारीक दॄष्ट्या तुम्ही यशस्वी व्हालच याचि खात्री नसते. "रोजच्या वाटेवर" जरा कमी धोके अन फारशा ऊलथापलथी नसतात (नैसर्गीक हानी, संकटे वगैरे वेगळे ते कुठेही कधिही होवू शकते!). "वेगळ्या वाटेवर" मात्र प्रत्त्येक वळणावर काहितरी नविन्/अकल्पित असू शकते.

यातला मधला मार्ग म्हणजे आपल्या पुढील पिढींत (मुले) आपली राहिलेली स्वप्ने पुरी करायला मदत करणे, अट्टहास वा सक्ती न करता. जसे मुलांना स्पोर्ट्स, कला, वा ईतर आपल्याला आवडत असलेल्या पण परिथितीमूळे जमू न शकलेल्या क्षेत्रात करियर करायची संधी, पैसा ऊपलब्ध करून देणे, पाठबळ देणे.
हाही मार्ग ५०% लोक चालतच असतात.

तात्पर्य, "तुझे आहे तुजपाशी".

प्रिन्सेस, अगदी नेमकं लिहिलं आहेस. Happy
<< वेगळ्या वाटांवर जायचे तर प्रचंड आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, मोडून पुन्हा ऊभे रहायची ताकद, प्रसंगी सगे सोयर्‍यांकडून वाईटपणा घ्यायची तयारी, आणि त्यातही जमलेच तर आपले हितचिंतक कोण ते ओळखून त्यांना आयुष्यभर् धरून ठेवता येण्याची कुवत हे सर्व लागते. एव्हडे करूनही व्यावहारीक दॄष्ट्या तुम्ही यशस्वी व्हालच याचि खात्री नसते. "रोजच्या वाटेवर" जरा कमी धोके अन फारशा ऊलथापलथी नसतात (नैसर्गीक हानी, संकटे वगैरे वेगळे ते कुठेही कधिही होवू शकते!). "वेगळ्या वाटेवर" मात्र प्रत्त्येक वळणावर काहितरी नविन्/अकल्पित असू शकते. >> अगदी अगदी ! मनापासून पटले हे.

आपल्याला आवडतं म्हणून एखादं क्षेत्र/करिअर पाथ निवडला तरी पुढे जाऊन तडजोडी कराव्या लागतच नाहीत असं अजीबात नाही.
मला मनापासून आवडत म्हणून मी Engineering किंवा Professional Degree च्या वाटेस न जाता, Pure Science मधे Post-Graduate झाले. संशोधन आणि शिकवणं, दोन्ही मला आजही मनापासून आवडतं. Post-Graduate झाल्यावर २ वर्ष मी ह्या दोन्ही क्षेत्रात उमेदवारी करून पाहिली. पण भारतात तरी ह्या दोन्ही क्षेत्रात तुटपुंजे पगार, मोठ्या प्रमाणावर राखीव जागांचे प्रस्थ आणि वशिलेबाजी अनुभवास आली.
त्यानंतर वयाच्या २५ व्या वर्षी मी राजी-खुषीने IT मधे जॉब पत्करला. शेवटी पैसा कितीही दुय्यम मानला तरी जगायला तो लागतोच.

स्वप्ना_राज <<<<तुम्ही कसे चूक आहात ते पटवणारे लोकच जगात जास्त भेटतात ही सत्यपरिस्थिती आहे.>>> १०० % खरय . अनुभवलय.

योग, वर रुणुझुणुने तुला अनुमोदन दिलय त्या भागाला माझेही अनुमोदन. पण <<<<यातला मधला मार्ग म्हणजे आपल्या पुढील पिढींत (मुले) आपली राहिलेली स्वप्ने पुरी करायला मदत करणे, अट्टहास वा सक्ती न करता. जसे मुलांना स्पोर्ट्स, कला, वा ईतर आपल्याला आवडत असलेल्या पण परिथितीमूळे जमू न शकलेल्या क्षेत्रात करियर करायची संधी, पैसा ऊपलब्ध करून देणे, पाठबळ देणे.
हाही मार्ग ५०% लोक चालतच असतात.>>>>यातुन नेमके काय म्हणायचेय ते कळले नाही. या पॅराचा अर्थ मला असा लागतोय की आपली " अधुरी स्वप्न मुलांच्या माध्यमातुन पूर्ण करायचीत. बरोबर का? तसे असेल तर माझा त्याच गोष्टीला विरोध आहे :(. दुसर्‍यांची अधुरी स्वप्न पूर्ण करतांना स्वतःच्या स्वप्नांशी तडजोड करावी लागत नसेल तर ठीक आहे पण मनाविरुद्ध असे करणे पटत नाही. अर्थात जगातले हजारो लोक हेच करत असतील.

सोहा खरय ... तडजोड स्वतःच्या मनाने केली असेल तर ठीक. पैसा आवश्यकच आहे. त्यातल्यात्यात समाधान हेच मानायचे की तुला हव्या असलेल्या वाटेवर तू चालुन तर पाहिलस.

सगळ्यांचे आभार.

यशस्वी??? हं... नौकरी मिळवली आणि दिलेले सगळी काम करतेय, बॉसही खुष असतो... यालाच यशस्वी म्हणतात ना? >>>> एकदम मस्त पंच लाईन...
लेख खुप छान आणी अंतर्मुख करणारा.. मला सुद्धा संगीत क्षेत्रा मधे करियर करायचे होते पण हे रिअलाईझ
झाले ईं.जी. च्या द्वीतीय वर्षामधे.. Uhoh (चुपचाप ईंजीं केले.. आणी आय. टी. च्या मेंढर भरती मधे जॉईन झालो.. अर्थात हे फक्त आर्थिक परिस्थीती मुळेच..)
तेंव्हा ईंजीं ला महिना २५०० हजार रु. महिन्याचा खर्च होत होता
आणी संगीत त्यात अ‍ॅड करणे कधीच परवडेबल नव्हते ..
आता नौकरीतुन वेळ काढुन शिकतोय जसे जमेल तसे Sad

आवळा, धन्यवाद. आजच तुमचा अभिप्राय पाहिला.
देर आये दुरुस्त आये. सध्या शिकताय ना... मग खुष व्हा !!!
काही लोकांना तर निवडलेला मार्ग दुरुस्त करण्याची संधी मिळत नाही, कधी हिम्मत होत नाही तर कधी नशीबच साथ देत नाही. ज्यांना मार्ग बदलण्याची संधी मिळ्ते त्यांनी ती जरुर घ्यावी.
वरच्या कथेतल्या मिकीचे रेस्टाँरंट जोरात चाललेय. रेस्टॉरंटच्या जोडीने अजुन एक बिझिनेसही त्याने काही महिन्यापूर्वीच सुरु केला आहे.

"नाही... हे माझे क्षेत्र नाही. this is not my cup of tea.">>>>>>>

इंजिनीयरींग करताना, इंजिनीयरींग करून आता कंपनीत जॉब करताना हा विचार कितीतरी वेळा माझ्या मनात आला असेल.

खुप छान लेख आणी अंतर्मुख करणारा..