माझे बाबा

Submitted by डी मृणालिनी on 5 April, 2020 - 13:07

माझे बाबा म्हणजे माझे आजोबा . श्री . आनंद देसाई , नावाप्रमाणेच आनंदी . यांच्याकडे बघून कोणाला सुधीर जोशींचा 'आनंदी आनंद गडे ' हा नाच आठवला नाही तरच नवल ! ऐन तारुण्यातच कॉर्पोरेट विश्वाचा उंबरठा ओलांडल्यामुळे ३ रुपये ५० पैशाचं केळं ५० रुपयाला विकण्याचीही ताकद त्यांच्या अंगी आहे .मानेमागून डोकावणारी पांढरी शुभ्र केस जणू या अंगीकृत गुणांचं आ,णि अनुभवांचं दर्शनच घडवीत असतात. कोणतंही स्थळ ,काळ आणि विषयाचे बंधन नसलेले माझे बाबा जगातल्या कोणत्याही विषयावर कितीही वेळ बोलू शकतात . आजची युवा पिढी google वरून ज्ञान डाउनलोड करून ते आपल्या मेंदूत अपलोड करते. मात्र बाबा यापैकी काहीच करत नाहीत. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांचा बुद्धिजीवी मेंदू सर्व विषयांवर टुणूक टुणूक उड्या मारत असतो. मेंदूप्रमाणेच तेसुद्धा या प्रदेशातून त्या प्रदेशात अश्या उड्याच मारत असतात. माणसाच्या निवृत्ती जीवनात त्याने घरी बसावं ,आराम करावा या सामाजिक प्रघाताला सपशेल तुडवत बाबा मनसोक्त भटकंती करतात. तेही वयाच्या ७८ व्या वर्षी ! वाचन आणि भ्रमंती ही त्यांची भूक आणि तहान .. पायाला भिंगरी लावल्यासारखे ते सतत फिरत असतात . मला तर त्यांच्या या फिरण्याच्या वेडावरून कधीकधी असं वाटतं , बहुधा बाबांना जगप्रसिद्ध प्रवासी युआंगश्वांग किंवा फरियान यांच्यासारखा नावलौकिक मिळवण्याची सुप्त इच्छा असावी.
'सध्या कोणतं पुस्तक वाचताय' असा एकवचनी प्रश्न न विचारता 'सध्या कोणती पुस्तकं वाचताय' असाच त्यांना प्रश्न विचारावा लागतो. बाबांचा बिच्चारा मेंदू मात्र त्यांच्या प्रेमापोटी एखाद्या भारवाहकासारखा काम करत असतो. ज्याप्रमाणे एक पहेलवान भर उचलून उचलून पिळदार शरीरयष्टीचा बनतो त्याचप्रमाणे बाबांचा मेंदूही बुद्धिमत्तेच्या अत्युच्च शिखरावर पोचतोय. याचे श्रेय आजपर्यंत बाबांनी वाचलेल्या अनेक पुस्तकांच्या लेखकांना जाते. याचे ऋण फेडायला मात्र बाबा कध्धीच विसरत नाहीत. प्रत्येक पुस्तकातील सारांश घेत ते आपलं पुस्तक किंवा लेख लिहितात. यामुळे अनेक लेखकांचे ऋण आपसूकच फेडले जातात. मित्रांनो ! मला खात्री आहे , एकाचवेळी अनेकांचे ऋण फेडण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल.
बाबांचा लेखन प्रवास कधी सुरु झाला ,ते मलाही माहित नाही . परंतु जेव्हा ही सुरु झाला , तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांनी कधीच आपल्या लेखनाने कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. समाजात कितीही कलह असला तरीही बाबा कोणाच्याही विरोधात लिहिण्याचं धाडस करत नाहीत. एकूणच कोणाचेही शत्रुत्व घेऊन उगाच कशाला आपल्या आनंदी जीवनात व्यत्यय आणा ? हा त्यामागील मुळमुळीत आणि समाधानी विचार असतो. म्हणूनच कोणत्याही वर्तमानपत्राचे संपादक त्यांचा लेख अगदी डोळे झाकून छापतात. बाबा जिथेही जातात तिथे आपली ओळख निर्माण करतात. यामागेही बाबांची एक रणनीती आहे. समोरच्या माणसाची ग्रहणशक्ती ध्यानात न घेता बाबा आपल्या ज्ञानाचा भडीमार त्याच्यावर करत असतात . परिणामी , या भरमसाट ज्ञानाचं त्याला अजीर्ण होऊन तो आपोआपच बाबांच्या अचाट ज्ञानशक्तीचा चाहता होतो. मात्र बाबा कधीही आपल्या ज्ञानाचं स्रोत समोरच्याला कळू देत नाहीत. ' तुम्हाला हे कुठून कळलं ?' किंवा ' तुम्ही हे कुठे वाचलंत ' असे प्रश्नही बाबा कौशल्याने उडवून लावतात .
बाबा आणि विश्वास दादाचं छान जमतं . त्याच्या अनेक जुगाडांसाठी पण बाबाच त्याला भंगार पुरवीत असतात .
एकूणच काय तर बाबा म्हणजे चैतन्य आणि आनंदाचा धबधबाच !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच आहेत की तुझे बाबा! Happy त्यांचं लिखाण आॅनलाईन कुठे इतरत्र प्रकाशित झालं असेल तर कळवशील?