भगवद गीता - एक Motivational Toolkit ? - माझे मनोगत !

Submitted by jpradnya on 4 April, 2020 - 07:57

मी गीता वाचली आहे असं खरंतर म्हणण्याची सुद्धा माझी पात्रता नाही. परंतु माझ्या आई आणि आजी च्या अथक प्रयत्नांमुळे माझ्या सारख्या वांड कार्टीला “हू इज धिस गीता” असं प्रश्न पडत नाही. भागवद गीतेचं छोटसं पुस्तक कायम बरोबर राहू दे ही त्यांची शिकवण.. नव्हे अट्टहास होता. ही पुस्तक माझी काय आणि कशी मदत करणार आहेही मात्र गावी नव्हतं
नंतर एक वर्षी spirituality चं किडा चावला तेव्हा थोड्याश्या संशयानेच अर्थासकट गीता “वाचली”.
पूर्ण tangent ! किंबहुना चिडचिड झालेली स्पष्ट आठवते.
फळांची अपेक्षा न ठेवता कर्म करत रहा? व्हॉट द हेल !श्वासा श्वासाला रिटर्न ऑन इनवेसटमेन्ट चं हिशोब करणारी पिढी माझी .. झेपलंच नाही.
“मीच सर्वश्रेष्ठ आहे. तेव्हा मी सांगतो ते आणि तेच ऐक”..वगरे डायलॉग श्री कृष्णा च्या तोंडी वाचले आणि वाटलं ह्याला काय अर्थ आहे? असं थोडीच असतं? हाऊ egoistic !
“जिथे मी आहे तिथेच विजय आहे” म्हणे ...दिसत तरी नाही तसं आस पास
“यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत .. अभयउत्थानम अधर्मस्य तदायात्मानं सृजयमयहम ?”
मग अजून हा कसली वाट बघतो आहे अवतार घ्यायला? अजून किती ग्लानि यायला हवी आहे धर्माला ?
अश्या आणि अशा सारख्या असंख्य विचारांनी मन भेंडाळून गेलं. नकोच ती भानगड म्हणून ते पुस्तक ही मिटून बुकशेल्फ मध्ये मागे गेलं.
तरुण रक्त होतं. अशांत मन होतं. अंगात रग होती आणि डोक्यात राग होता. आपण स्वतःचं आयुष्य आणि जग घडवू शकतो असा विश्वास होता. बुद्धी आणि शक्ति वर गुर्मी होती. प्रश्न स्वतःचे होते आणि उत्तरेही स्वतःचीच होती ! स्वतःच्या ह्या ताकदीपुढे गीता कामाची वाटली नाही.

मग हळूहळू वर्ष उलटत गेली. आयुष्याने खरे रंग दाखवायला सुरुवात केली. बरे वाईट अनुभव गाठीशी जमात गेले. नीती-अनीति, मूल्य, संस्कृति आणि संस्कार, हक्क-कर्तव्य , चूक-बरोबर , फायदे-तोटे असे अनेक क्लिष्ट पेच समोर उभे ठाकत होते. उत्तरे मिळेनाशी झाली पण प्रश्न मात्र संपत नव्हते. हतबुद्धता जाणावली तेव्हा पुन्हा ह्या छोट्याश्या पुस्तकाची आठवण झाली. ह्या वेळी मात्र संशया ऐवजी अपेक्षा मिश्रित कुतुहलाने गीता वाचण्याचा प्रयत्न केला आणि मधूनच एखादा “फंडा “ पटकन सापडायला लागला. पुन:शच मान्य करते की गीता वाचते आणि टी समजली असं म्हणायला सुद्धा जीभ वळत नाही. पण काही गोष्टी आत कुठेतरी उमजायला लागल्या ही निश्चित!

मानवी मनाचे संपूर्ण कंगोरे अभ्यासून गीतांकरांनी गीता रचलेली आहे असं दिसलं. माणसाचा जेव्हा अर्जुन होतो, म्हणजेच आयुष्यात त्याच्या परिस्थिति वशात त्याचे सामर्थ्यच गळून जाते.. काय करायचे ही त्याला जेव्हा समजेनासे होते तेव्हाच्या ह्या नाजूक मानसिक स्थितीत त्याला लागणारी सगळी टॉनिक्स गीता पुरवते. अतिशय घाबरलेल्या मुलांचा चेहरा घट्ट धरून आई जस त्याच्या नजरेत नजर रोखून त्याला कणखरपणे जसे सांगते की “ लुक अॅट मी ! तुला काही झालेलं नाहीये. जस्ट breath ! मी आहे ना ?! “ तसंच गीता करते. कर्माच्या परिणामांची आणि त्याच्या यश-अपयशाची धास्ती असली की कर्मा च्या क्वालिटी वर परिणाम होतोच. म्हणून गीताकार कर्मफळांची जबाबदारिच माणसाच्या डोक्यावरून काढून घेतात. ही प्रचंड मोठा अॅंटी depressant आहे. म्हणून तर रॉबर्ट ओपेनहायमर सारख्या अणुबॉम्ब च्या जनकाला गीतेनेच दिलासा दिला. नाहीतर हिरोशिमा नागासाकी नंतर त्यांनी आत्महत्या न केली असती तर नवल.
[टीप: इथे मी कोणत्याही स्वरूपात अणुस्फोट justify करण्याचा प्रयत्न करत नाहीये. ही एक माहीत असलेलं उदाहरण होतं ते उद्धृत केलं एवढंच!]

मन ही नेहमी शंका-कुशंकांवर हिंदोळत असते. नेहमीच सतत साशंक असलेल्या मनाकडून फार काही विधायक होऊ शकत नाही. म्हणून “ मीच तुझा एकमेव मार्ग आहे” असं ठणकावून संगत गीताकार माणसांतल्या एनर्जि ला channelize करतात. मनाचा वाभरेपणा आटोक्यात आणतात.

सत्त्व रज् तम गुणांच्या वर्णनातून माणसाला स्वतःला ओळखायला मदत करतात. माझी वृत्ती आणि सवयी तामसी अर्थात घातकी आहेत ही जर माणसाला अात कुठेतरी जाणवलं तर तो कधी ना कधी सात्विकते कडे प्रवास करण्याचा प्रयत्न करेल आणि ही उत्थान नैसर्गिक असेल.

तसंच ज्ञान -कर्म-भक्ति योग ही विभागणी करून गीताकार प्रकांड बुद्धिवादी, कर्तव्य पारायण लोक आणि भाबडे भाविक ज्यांच्या बुद्धी ची झेप कदाचित थोडी कमी असेल – अशा सर्वांना आपलसं करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना एकाच पातळीवर आणून बसवतात. ही विविधतेत एकात्मतेचीच क्रिया आहे.

पुनर्जन्म, मोक्ष, अवतार अश्या संकल्पनांची बीजे लोकांच्या मनात रुजवून गीताकार माणसांना सत्कार्य प्रवण बनवतात.सध्या काही बरं चाललं नाहीये पण माझं पुण्य कुठे तरी जमतंय, आज नाही तर उद्या ते कामी येईलच हा विश्वास माणसाला आजचा खडतर निराश दिवस जगण्याची उमीद देतो. परमेश्वर आपल्या बरोबर आहे ही सगळ्यात मोठं पॉजिटिव affirmation हताश झालेल्या माणसाला नव्याने उठण्याची शक्ति देऊ शकतं. नेमकं हेच गीताकार प्रभावीपणे करतात.
शांत स्थिर आणि प्रगल्भ मन ही केव्हाही जास्त दक्ष, कुशल, कार्यक्षम आणि कर्तुत्त्ववान ठरतं हा मानस शास्त्रीय सिद्धांत आहे. तेव्हा उद्द्विग्न मनाला शांत आणि स्थिर करण्याची थेरपी भगवद गीतेत मांडली असावी.

मानवी बुद्धी ला अनाकलनीय अश्या कित्येक गोष्टी ह्या विश्वात आहेत त्या बद्दलही गीता भाष्य करते. परंतु त्याची शहानिशा खात्रीलायक आणि तर्कसंगत होऊ शकत नाही. तेव्हा त्या फंदात न पडता एक अतिशय उपयुक्त असे Motivational Toolkit म्हणून सध्या तरी गीता खुणावते आहे. पुढे ती स्वतःची आणखी काय काय ओळख करून देईल ते भगवान श्री कृष्ण च जाणोत!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथली चर्चा वाचून एखाद्या विद्वानसभेत बसल्यासारखं वाटतंय.
अजून प्रतिसादाच्या प्रतीक्षेत!

Pages