प्रेताकल्प!

Submitted by अज्ञातवासी on 2 April, 2020 - 02:19

कडक उन्हात एस टी फाट्यावर थांबली. उन्हाचा पारा चांगलाच वर होता. अंगाची लाहीलाही होत होती.
सोनाली वैतागाने खाली उतरली. तिने स्कार्फ गच्च आवळून बांधला.
'तार तर केली होती, काका अजून कसा आला नाही?,' तिने मनाशीच विचार केला.
फाट्यापासून दोन किलोमीटरवर गाव होतं. सोनालीच घराणं गावातील मोठं प्रस्थ. सोनालीचे बाबा सरपंच होते. घरातील तीन सदस्य ग्रामपंचायतीत होते. शेकडो एकर शेती होती. गुरे ढोरे यांची ददात नव्हती. घरातच बेचाळीस माणसे होती.
...पण या घराण्यात शिकली फक्त सोनाली... सर्वांची लाडकी.
सोनाली विचार करतच उभी राहिली, तेवढयात तिला आजी दिसली.
आज्जी..... तिने जोरात हाक मारली.
आजी... नामुआजी!!!!
तरातरा चालत ती सोनालीजवळ आली.
"आलीस होय? केव्हाची वाट बघत होते."
"आले, पण तू इथे काय करतेय?"
"मीही आधीच्या गाडीने आले, श्रीहरी तुला घ्यायला येणार म्हणून थांबले."
"अजून आला कसा नाही?" सोनाली विचारात पडली.
आजी थोड्या वेळ घुटमळली.
"मरू दे, चालतच जाऊ चल. दोन किलोमीटर तर आहे."
सोनालीनेही मान हलवली.
दोघी चालू लागल्या. तशी रस्त्यावर दुतर्फा झाडी होती, त्यामुळे चालणाऱ्याला हायसं वाटत होतं.
"सोनाली, किती दिवस झाले भेटली नाहीस मला."
"काय आजी, मागच्याच महिन्यात आले होते ना?"
"बरं, पण कामाच्या गडबडीत राहून जातं बोलणं. आता ऊस जातोय कारखान्यावर, कामच वाढलंय... मी मेली कुठेकुठे पुरणार."
"तूच सगळं करावं असं थोडीच आहे?" सोनाली हसली.
"मग कोण करणार? तुमच्या आया घर सोडत नाही. मजूर आले तर त्यांच्या जेवणखाण्यापासून सगळं बघावं लागत. माणसं कुठेकुठे पुरणार. त्यात तुझ्या काकांची नजर वाईट. मजूर बाईच्या कुणी नादी लागला म्हणजे?"
सोनालीला मागच्याच वर्षीचा किस्सा आठवला, एका मजूर मुलीने गर्भार राहिली म्हणून नदीत जीव दिला होता.
"आजी, असं का बोलतेय?" तिने चमकून विचारलं.
"मोठी झालीये पोरी तू आता. ही बघ आली संगमी..."
सोनालीने संगमी नदीकडे बघितलं. मोठं विस्तीर्ण पात्र आता आटलं होतं. तीन नद्यांचा संगम म्हणून नाव संगमी.
"राधीने इथेच जीव दिला ग. डोळ्याला डोळा नव्हता चार दिवस. तरुण पोरं, अवखळ. साडीतसुद्धा आली नव्हती."
"लोकही किती नीच असतात ना आजी." सोनाली हताश होऊन म्हणाली.
"आपल्याच घरातली कीड. तुझा काका, गजानन..."
"आजी काय बोलतेय..." सोनालीला शॉक बसला.
"खरं तेच बोलतेय. तुझ्या घरातलं तुला माहिती पाहिजे. तुझ्या काकाचाच हा प्रताप. त्यानेच मारलं तिला."
आजी थोडावेळ गप्प बसली.
"मी गेल्यानंतर त्याला सोडू नको... त्याला शिक्षा दे, त्याशिवाय माझा आत्मा थंड व्हायचा नाही."
सोनाली सुन्नच झाली.
"थांब..." आजी अचानक म्हणाली.
काय झालं.
आजीने एका जागी वाकून नमस्कार केला. समोर एक शेंदूर लावलेला दगड होता.
"हा रांबाईचा म्हसोबा. अग या म्हसोबाची शपथ घेऊन किती पापे लपली असतील गणती नाही..."
"म्हणजे????"
"तुझा आजा, यशवंतराव थोरात. माणूस खूप मोठा ग, खूप मोठा... पण बाहेरच्यासाठी. घरात हैवान. बाया म्हणजे त्याला पायताण. कशाही बाया भोगायचा. त्याला सीमा नव्हती ग. रात्र झाली की सैतान जागा व्हायचा त्याच्यातला."
"आजी..."सोनालीला कसनुस होत होतं.
थोरातांची लेक म्हणून मिरवते ना? मग पापही ऐकायला शिक...अजूनही आठवत ग मला... एकदा एका रात्रीत मायलेकी भोगल्या तुझ्या आज्याने. बलात्कार केला म्हण ना. कोपऱ्यात बसून रात्रभर रडत होत्या. पोरगी दुसऱ्या दिवशी तापाने फणफणली आणि सहाव्या दिवशीच गेली. बाईने न राहवून गावकीत फिर्याद केली, तर म्हसोबाची शपथ घेऊन तुझा आजा नाही म्हटला. बाई शेवटी म्हसोबासमोर डोकं आपटून गेली."
सोनालीला घरी कधी पोहोचते असं झालं होतं.दोघीजणी झपाझप पावले टाकत होत्या. आजी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होती.
एक जुनाट वडाच्या झाडासमोर आजी पुन्हा थांबली. झाडाच्या मागेच एक पडकी भिंत होती.
आजीने वडाला नमस्कार केला.
"सोनाली, नमस्कार कर..."
तिनेही गडबडून नमस्कार केला.
"फाश्या वड. या वडावर कित्येक लोकांनी फाशी घेतली असेल, गणना नाही. तुझ्या आज्याने पण बरेच जीव घेतले, आणि शेवटी इथेच फास लावून मेला."
"का आजी?"
"पोटची पोर गेली बाईची. रात्रभर तुझ्या आज्याला त्रास द्यायची. रात्री विहिरीत, परसाकडे सगळीकडे दिसायची. सहन नाही झालं आज्याला आणि दिला जीव."
गाव अजून १ किलोमीटरवर होतं. वखारीजवळ दोघीजणी पोहोचल्या.
"बघ वखार. तुझा बाप शिकून आला, आणि ही वखार काढली. बक्कळ पैसा. अनेक व्यवसाय केले थोरातांनी, पण वखार म्हणजे स्यमंतक मणी...पैसा कधी आटला नाही.
...सोने, बापाला नीट शिकव तुझ्या. काका वखारीवर हात मारतायेत. कर्ज काढताय तुझ्या बापाच्या नावावर. असंच चालू राहील तर बापाला नागवतील तुझ्या."
"आजी... तुझीच मुले आहेत सगळी."
"पोटापुढे खोट्याच खर होतं नसतं सोनी. सगळे बोचकारतायेत वाड्याला. बडा घर पोकळ वासा अशी गत झालीये."
सोनाली आज थक्कच झाकी होती. शिकतोय शहरात याचा तिला अभिमान होता. पण घरातल्या कशाचीही तिला जाणीव नाही, याची शरमही वाटत होती.
"आजी... आजच सगळं का बोलतेय ग?"
"मग, सगळं लटांबर असतं वाड्यावर. मला मेलीला वेळ नसतो. तू एकटी सापडणं मुश्किल. कधी बोलणार या गोष्टी?"
"मी बसेन आता तुझ्याजवळ."
"वेळ नाही मिळणार ग पुन्हा. थांब जरा. ही इमारत बघितलीस? नसीमची कोठी..."
इमारतीत बरीच वर्दळ होती. इमारत बरीच मोठी होती. अनेक मजली होती.अनेक खोल्या होत्या, खाली दुकाने होती.
"नसीम पक्की धंदेवाली बाई, पण तिची मुलगी सकिना म्हणजे रूपाची खाण... बाप कोण माहिती नाही, पण सकिनाकडे कुणाची बघायची टाप नव्हती. तुझा सगळ्यात मोठा काका माहितीये ना?"
"हो महादेव काका..."
"ऐक. सगळ्यात मोठा होता शरद. मोठा गुणी होता ग... शाळेत हुशार.... मात्र शाळेतच त्याचा सकिनावर जीव जडला, आणि...
काय आजी... सोनालीच्या थरकाप झाला.
भर पावसाचे दिवस होते. संगमी काळीज फाडून वाहत होती. तिथेच दोघांनी हातात हात घेऊन जीव दिला."
सोनालीला काय बोलावं तेच सुचेना.
"दोघांचं प्रेत कुठे वाहून गेलं, थांगपत्ता लागला नाही. नसीम वेडी झाली. तिच्या लोकांनी तिला सांभाळलं. आणि माझ्या लोकांनी शरद आणि सकिनाला..."
"म्हणजे आजी?" सोनालीला आता वेड लागायची पाळी आली होती.
"डॉक्टर गंधे. आपल्या गावात सरकारी डॉक्टर होते, नंतर शहरात गेले. तुझा आजा शरद आणि सकिनाचा जीव घेणार होता... सैतान होता तो. म्हणून हे नाटक रचलं. शरद थोरात नावाचा एक मोठा ह्रदयविकारतज्ञ आहे मुंबईला. तोच तुझा शरदकाका. तुझ्या काकांना वाटत, म्हातारी बरंच दडपून बसलीय. एक सांगते. माझ्याकडे दमडी नाही, सगळं शरदसाठी पुरवलं. तुझ्या बापाला सांग, जाऊन भेट त्याला, आणि भाऊ व्हा एकत्र."
"आजी... काय काय लपवलय ग तू? वेड लागेल मला आता." सोनाली म्हणाली.
दूरवर वाडा दिसत होता. वाडा जवळ येत होता.
"बरं शेवटचं ऐक आता. लक्ष देऊन. "
सोनालीने फक्त मान हलवली.
"तुझा आणखी एक काका होता. शांताराम नावाचा."आजीचा आवाज घोगरा झाला.
"त्याचं काय?"
"लहानपणीच तो बेपत्ता झाला." आजीच्या आवाजात आता विलक्षण कोरडेपणा आला होता.
"आजी पुढे काय?'सोनाली ओरडलीच.
"एका बाईचे एका डॉक्टरबरोबर संबंध होते, आणि शांतारामाने ते बघितलं. तो वाच्यता करू नये म्हणून त्या बाईने त्याला मारलं."
"कोण होती ती बाई....आजी?????"
"तुझ्या बापाला सांग सोनी, वाड्याच्या उजव्या बाजूच्या गोठ्यात म्हशीच्या कोपऱ्याजवळ खणून काढ. सांगाडा झाला असेल, विधिवत विसर्जित करायला लाव."
"आजी कोण होती ती बाई?"
"मी......!!!!!!"
सोनालीला भोवळ आली, अचानक सगळं जग तिच्याभोवती फिरतय असा तिला भास झाला.
संगमी, राधा, म्हसोबा, वड, आजा, शरद, सकिना...
...शांताराम...
ती शुद्धीवर आली. तिच्या उशाशी बाबा बसले होते. घरात रडारड चालू होती.
"सोनाली, बरं वाटतंय ना."आई अजूनही रडत होती.
"आजी... "सोनालीने क्षीण स्वरात विचारले...
"सकाळीच गेली ग, तुझी खूप आठवण काढत होती." आई रडतच म्हणाली.
...सोनाली पुन्हा बेशुद्ध पडली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अज्ञा, खुप घाईघाईत लिहिल्यासारखी वाटतेय कथा.. अजुन चांगली मांडता आली असती..

मस्तेय

थोडी लवकर आवरल्यासारखी वाटतेय .>>>+१११११

मस्त कथा!

आजी गेली असेल हा अंदाज होताच पण शेवटी तिने जे सांगितल ते अकल्पित

कथा आवडली. आजी गेली असणार असा अंदाज आला तरी कथेचा वेग , घटनांचे भयानकपण यामुळे कथा पकड घेते.

एकदम भारी...
आजीच भुत असेल हे आल होत ध्यानात... आजीचे सुद्धा कांड असतील हे नव्ह्त वाटल

आजी आधीच गेली आहे याचा अंदाज आला होता पण तिने पण असं काही केलं असेल असं वाटलं नव्हतं. पण छान वेगवान कथा. कथेतली पात्रं पण खतरनाक!

शैली झकास.
नारायण धारप व अधेमधे पेंडसे जाणवत राहीले.

धन्यवाद मी अनु, मी माझा, मन्या, जाई, निलुदा, आदू, VB, मास्टरमाइंड, मामी, उर्मिला, आसा, आदिश्री, स्वाती२, अजय चव्हाण, उनाडटप्पू, नानबा, जयश्री, नौटंकी, तैमुर, urmilas, पद्म!

ही गोष्ट स्त्री विशेषांकात प्रसिद्ध झाली होती.
या गोष्टीचा शेवट खूप घाईत आटपल्यासारखा झाला याची जाणीव मलाही आहे, पण तेव्हा वेळ नव्हता म्हणून पटकन आवरती घ्यावी लागली. असो!
अजून एक, या गोष्टीतील बरीच पात्रे मी वास्तविक आयुष्यात बघितली आहेत, किंवा त्यांच्या दंतकथा ऐकल्या आहेत. अजूनही फाश्या वड एका गावात अस्तित्वात आहे. Happy
या कथेचा प्लॉट मला खूप मोठा ठेवायचा होता, खूप दिवसांपासून ही कथा मनात घोळत होती, पण क्रमशः कथांचा माझा रेकॉर्ड तितकासा चांगला नसल्याने संपवली Lol
याचा भाग २ काढण्याचा विचार माझ्या मनात तर नव्हता, पण आता असं वाटतंय, ही कथा अजून फुलवता येईल.

Pages