ती गेली तेव्हा रिमझिम...

Submitted by अजय चव्हाण on 1 April, 2020 - 13:37

हाटेपासून "हा" पाऊस कोसळत होता. नुसताच रिमझिम आणि चिंब चिंब. पहाटेचा पाऊस मला आवडतच नाही कारण तो मला खुप भकास वाटतो अगदी संध्याकाळच्या पाऊसापेक्षाही. संध्याकाळचा पाऊस मुसमुसणं असतं तर पहाटेचा पाऊस मला हुंदक्यासारखा वाटतो. अगदी कंठापर्यंत दाठून आलेला आणि न आवरता येणारा. खरं सांगू का? त्या सुरांत मला दुःखाची, एका अपूर्णतेची छटा दिसते. रडणारे ढग तेव्हा दिसतच नाहीत. दिसतात फक्त अस्पष्ट थेंबाच्या रेषा आणि पाण्यांचा तो केविलवाणा आवाज. असं वाटतं मनातलं काही न सांगता तो बरसत आहे आणि त्याचवेळी तो काही अंशी बहरत असल्याचा भास होतो अगदी शांत, मधुर, स्वखुशी बरसत असल्याचा. शास्त्रीय गायकाला तो सुखकारक राग वाटत असेलही पण नीट पाहील तर दिसेल "ही" गझल आहे अस्पष्ट, सुरूवातीला ऐकावीशी वाटणारी, मंत्रमुग्ध करणारी आणि शेवटी अलगद नकळत मनाला चटका लावणारी.

अशीच एक गझल मला सापडलेली. मूर्तीमंत, सचेतन. ऐकत रहावीशी वाटणारी,मंत्रमुग्ध करणारी आणि एका अनोळखी, अनपेक्षित वळणावर संपणारी. गझलेतच सांगायचं झालं तर..

"बरसने के राझ कितने खुब निभाए तुमने..
खुशबु दे भी दी और कितना रूलाया तुमने.."

खरचं ती बरसत होती. कधी सर होऊन तर कधी धबाधबा होऊन. धबाधब्याच्या पांढर्या शुभ्र प्रवाहात सुंदरता कितीही असली तरी आतला तळ कळतच नाही. वाहणं इतकचं माहित असतं त्याला. अशीच होती "ती"धब धब्यासारखी..
खळखळणारी..अवखळं..सुंदर..कित्येक तळातलं लपवून वाहणारी..वाहवत नेणारी.. आज पहाटे तसाच पाऊस, तशीच रिमझिम आणि "ती" आठवण..

तिच्यात नि माझ्यात 12 वर्षाच अंतर..मी काॅलेजकुमार तर ती विवाहीत गृहणी. नातं असं काहीच नाही. धड ओळखही नाही. मी तिच्या घरी वर्तमान टाकणारा साधारण मुलगा. रोज सकाळी बेल वाजवली की, कित्येक आकसलेले चेहरे, काही नुसत्याच बंद कड्या आणि "पेपर कडीला अडकवा" असल्या सुचनावजा पाटया पण "ती" मात्र अर्ध्या मिटलेल्या डोळ्यांनी दार उघडायची..तिचे ते अर्धे मिटलेले डोळे, कपाळावर अस्ताव्यस्त पसरलेले काहीसे भरकटलेले कुरळे दाट केसं आणि सुरकतलेल्या काॅटन मॅक्सीतही कमाल दिसायची. बंद दरवाजे, गंजलेल्या कड्या, काही आकसलेले चेहरे पाहील्यानंतर हे ताजं टवटवीत नुकतचं फुललेलं फुल पाहायला मिळायचं..

तिच्या चेहर्यात रबडी जिलेबीपेक्षाही गोडवा होता. रबडीच्या पाकात लाल जिलेबी उठून दिसते तशी तिच्या गोर्या रंगावर तिचे लाल ओठ उठून दिसतात..आधी इतरांसारखीच "ती" माझ्याकडे मख्ख चेहर्याने पेपर टाकणारा एक गरीब मुलगा ह्या नजरेने पाहायची पण 2008 च्या दिवाळीत बिलं द्यायला गेलो तेव्हा दिवाळी किंवा बक्षिस म्हणून 50 रूपये ज्यादाचे दिलेले आणि ते परत करताना मी इंग्रजीत डायलाॅग मारलेला..

I don't accept bribe..i can make money myself..blessing is enough for me.."

तेव्हा तिला आश्चर्य वाटलं तसं मला कुणाकडूनच घ्यायला आवडलं नसतं पण हिच्याकडून तर खासच. तिला कौतुक का आणखी दुसरं काही वाटलं हे कळलं नाही पण तिच्या नजरेतला ते गरीब मुलग्याचे भाव परत कधी दिसले नाहीत आणि ते खरंचं आहे. मी गरीब होतो पण बिचारा नव्हतो. स्वाभिमानी होतो आणि अजूनही आहे. कष्ट करून किंवा फार फार तर खालच्या दर्जाच काम करून कमवत होतो पण खरं सांगू माझ्यालेखी कुठलचं काम खालच्या किंवा वरच्या दर्जाच नसतं आणि मेहनत करायला कसली आलीय लाज?

तिच्यावर माझं प्रेम होतं किंवा आकर्षण ह्यातलं काहीच नव्हतं. फक्त ती आवडायची. मृदगंधासारखी. मृदगंध आपण साठवून ठेऊ शकत नाही. पाऊसाच्या आधी हवाहवासा वाटणारा सुखद अनुभव फक्त..त्यात अत्तरासारखी वासना नसते...लोभ नसतो, मोह नसतो..प्रेम नसतं. असते ती फक्त नैसर्गिक सुखद अनुभती.

त्या दिवसानंतर "ती" गुड माॅर्निंग वैगेरे विश करायला लागली. तिच्या तोंडून ऐकताना प्रसन्न पहाटेच्या पडलेल्या दवाचं फिल यायचं आणि मनातलं फुलपाखरू तेव्हा दिवसभर बागडायचं..आवडणार्या माणसानं विश केलं की, छान वाटतंचं..
कुठेतरी बागडणार्या मनातल्या फुलपाखारांना देवाने फुलाजवळ आणलचं.. त्यादिवशी गुजरात समाचाराची गाडी पाऊसामुळे उशिरा आली आणि म्हणूनच मला उशिर झालेला.

दरवाजा उघडाच होता. आतून काहीतरी खटपटीचा आवाज येत होता. मी आवाज दिला. लगबगीत "ती" बाहेर आली.
कपाळावर घामाचे थेंब जमा झालेले..काही केसांच्या बटा घट्ट चिकटलेल्या..त्या बटा म्हणजे लाटा आणि ते घर्मबिंदू म्हणजे अळवावरचं लोभस पाणी जणू..

"अच्छा हुआ आप आ गए..आपको सिलेंडर लगाने आता है?"

कपाळावरचा घाम कोपर्याने पुसत ती म्हणाली.

मी मान डोलावली नि आत गेलो..सिलेंडर लाऊन दिला.
आणि परत जाणार तोच..

"थॅन्क्यू ..रूकीये चाय पिके जाइये.." ती

खरंतरं मला खुपचं संकोचल्यासारखं झालं होतं..मी नकार देत होतो पण तिने आग्रह केला आणि मला थांबावचं लागलं..

त्या दिवशी पहिल्यांदाच तिचं घर मी आतून पाहत होतो..
भिंतीना फिकट लव्हेंडर रंग..दाराजवळच्या भिंतीला मोठं शोकेस. त्यात टी.व्ही., डाव्या बाजूला फुलदानीत लीलीची खरी वाटणारी खोटी फुले..उजव्या बाजूला लाल लव्हफ्रेममधला फोटो..फोटोत ती आणि तिचा नवरा..प्रत्यक्षात मी त्याला कधीच पाहीलं नाही पण मला थोडं आश्चर्य वाटलं कारण तिचा नवरा खुपच साधारण आणि तिच्यापेक्षा वयाने खुपच मोठा वाटत होता..मी काही विचार करत असतानाच "ती" चहा घेऊन आली..

चहा पिता पिता जुजबी प्रश्न तिने विचारले. इंग्रजी कुठे शिकलास? काय करतोस. मी काॅलेज करता करता कुंटुंबाला हातभार म्हणून वर्तमानपत्र टाकतो हे ऐकल्यावर तिला माझं कौतुक वाटलं. बोलता बोलता असं कळलं की, ती सी.ए आहे.
आधी काम करत होती पण लग्नानंतर ब्रेक घेतलेला. नवरा कामानिम्मत बाहेरच असतो खुपदा. आठवड्यातून फक्त दोनदा घरी येतो वैगैरे.. काही अभ्यासात मदत हवी असल्यास निसंकोचपणे सांग इतकं बोलून तिने तिचा नंबर दिलेला.

अभ्यासासंदर्भात मी तिला विचारू लागलो. कधी फोनवर तर कधी तिच्या घरी. हळूहळू आमच्यात एक अस्पष्ट नातं निर्माण झालेलं. त्या नात्याला काही नाव नव्हतं पण हे असणं खुप होतं माझ्यासाठी. " ती" सांगायची कधी नवर्याबद्दल. घरातल्या प्रोब्लेम्सबद्दल. बहुतेक तिला मोकळं वाटतं असावं.. कधी कधी लेट नाईट चॅटींगही व्हायचं. " ती" व्यक्त व्हायची. तिचं ते माझ्यासमोर व्यक्त होणं मला आवडायचं..

हे "ती" मला का सांगते ह्या प्रश्नाचं उत्तर मी कधी शोधलंच नाही. काही प्रश्न अनुत्तरीत राहीलेलेच बरे असतात.. वर वर दिसणारं खुशहाल आयुष्य तिचं किती उदास आणि विचित्र आहे हे मला कळतं होतं. तिच्या हसर्या चेहर्यामागे कित्येक वेदना तिने लपवल्या होत्या. त्या वेदना उघडपणे ओळखीच्या किंवा नात्यातल्या लोकांना दाखवता येतं नाही. मग तेव्हा अशा नात्याची गरज भासत असावी.

त्यादिवशी "ती" नेहमीप्रमाणे प्रसन्न दिसत नव्हती. नक्कीच काहीतरी बिनसलं होतं. रात्रभर झोपली नसावी हे तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसतं होतं.. मला तिची काळजी वाटली. मी आत गेलो. काहीही न विचारता फक्त तिला सोबत देत होतो.
इतक्या वेळ दाबून ठेवलेल्या तिच्या अश्रूंचा बांध फुटला. ती रडू लागली. मी फक्त थोपटतं राहीलो.. एकाएकी "ती" मला बिलगली. मला संकोचल्यासारखं झालं पण तिला मोकळं होऊ द्यायचं ठरवल. "ती" काहीही न बोलता अश्रूवाटे खुप बोलत असावी. कदाचित स्वतःशीच. काहीवेळाने " ती" शांत झाली. मी काहीही न बोलता डोळ्यांनीच तिला दिलासा दिला आणि निघून आलो.

त्यादिवसानंतर तिचं घर बंदच होतं. परत "ती" कधी दिसलीच नाही. मॅसेजला रिप्लाय नाही की, फोनला उत्तर नाही.
काही दिवसानी तिच्याबद्द बातमी कळाली. तिने गावी जाऊन आत्महत्या केलेली. मन अगदी सुन्न झालं.. तिच्या मनातलं तिने वरवर जरी सांगितलं असलं तरी. खोलवर तिने खुप सहन केलेलं.. तिच्या आयुष्यात नेमकं काय घडलं किंवा काय घडलेलं. तिने असं का केलं असावं..हे मला कधीच कळलं नाही आणि ते कधी कळणारंही नव्हतं. "ती" माझ्या आयुष्यात घटकाभर आली नि गेली. पहाटेच्या सरीसारखी कोसळत राहीली. ह्या कोसळणार्याला सरीला मी कधीच समजू शकलो नाही. अगदी त्या न कळलेल्या पहाटेच्या पाऊसासारखं..

समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा म्हणुन ठीक आहे. पण प्रत्यक्षात असं घडलं असतं तर फुकटची चौकशी मागे लागली असती मेसेज आणि चॅटींग वरुन.

वेलकम बॅक अजय...
भारी लिहिलंय, नेहमीप्रमाणे!!!

खुप आतून लिहिलं आहे... खुप छान!

एक छोटीशी सुचवणी:
ही कविता ग्रेसची, कवितेची पार्श्वभूमी आईचे निधन. पूर्ण कविता वाचली तर नक्की कळेल. एखाद्या संध्याकाळी कविता फक्त ऐकताना रडवून जाते. ग्रेसचं ते दु:ख पोचतं आपल्यापर्यंत, त्याच्या त्याच इंटेनसिटीने. सबब तुमच्या लिखाणात ग्रेसच्या ह्या ओळी फार खटकतात. अर्थात हे माझे मत आणि निरीक्षण आहे, तुमच्या भावना वेगळ्या असू शकतात.

मला ही कविता आईबद्दल आहे हे माहीत नव्हतं.
मला प्रेयसी बद्दलचीच वाटायची.(तसंच संदीप सलील च्या नसतेस घरी तू जेव्हा गाण्याबद्दल.कधी बायको कधी आई वाटते.)
मूळ कथेबद्दल: खरी असेल तर कठीण आहे.

संपुर्ण कविता: (गाण्यात फक्त ३ कडवी आहेत)

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता |

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता |

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता |

तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता |

हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता |

धन्यवाद मी अनु.. शशांक सर,

@अजिंक्यराव : मला आईवर ही कविता आहे हे माहीत नव्हतं. शाळेत असताना होती मराठीच्या पुस्तकात.. त्या वेळी मलाही वाटायचं कविता करावी वैगेरे...पण काय सुचतं नव्हतं फक्त कवितेची पहिली ओळख कायम मला आर्कषित करत आली आहे आणि माझ्या कित्येक वर्षे लक्षातही आहे..

आणि त्या पहिल्या ओळीपासून सूचलेली...

माझी ही पहिली कविता

ती आली तेव्हा रिमझिम..
ती गेली तेव्हाही रिमझिम...
ती येतच नाही आजकाल..
आणि माझ्या डोळ्यांत अजुनही रिमझिम..
पाऊसाळी गुलाबी छत्री तिची गळकी..
ओला मंद वारा अन् गार गार खिडकी..
साचलेल्या पाण्यांत भावनांच्या होड्या सोडलेल्या..
ना कधी तिला सांगितलेल्या न कधी बोललेल्या..
वाफळत्या कपाबरोबर जुनं पेन अन् जुनीच ती वही..
लिहलेलं सारं काही फक्त टींब टींब सोडून नावं नाही..
आताही लिहतोय बरंच काही...
तेव्हाही टिंब टिंब आणि आताही टिंब टिंब...

बाकी दुसरं संमर्पक शिर्षक सुचलं तर तुमच्या प्रतिक्रियेला मान देऊन बदल करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन..

फार छान अजय सर!
आजपासून तुमच्या लेखनाचा चाहता झलोय. Happy

तुमच्या अजुन लिखाणाच्या प्रतिक्षेत....

अजय खूप सुंदर लिहिले आहे . इमोशन्स किती सुरेख मांडल्या आहेत .
तिची सुटका झाली असती फार बरे
वाटले असते .

छान लिहिलंय. डिटेलिंग सुरेख आहे.
फक्त पेपर टाकणार्‍या मुलाला दिलेल्या बक्षिसीला ब्राइब का म्हणावं ते कळलं नाही.

रीडर्स डायजेस्टमध्ये एका पेपर टाकणार्‍या शाळकरी मुलाची गोष्ट - कदाचित सत्यकथा होती. त्याचे सगळे ग्राहक पैसे जमवून त्याला एक सायकल ख्रिसमस गिफ्ट म्हणून देतात.