मन वढाय वढाय (भाग ३०)

Submitted by nimita on 29 March, 2020 - 22:13

इतक्या वर्षांनंतर अचानक अजय चा फोन आलेला बघून स्नेहाला आश्चर्य वाटलं, " हाय अजय... कुठे असतोस आजकाल ? आज अचानक माझी आठवण कशी झाली? आणि माझा हा फोन नंबर कुठून मिळाला तुला?" स्नेहानी प्रश्नांचा भडिमार सुरू केला. तिला मधेच थांबवत अजय म्हणाला," तू बोलायची थांबलीस तरच सांगू शकेन ना मी? मी आता मुंबईला असतो.मागच्या आठवड्यात औरंगाबादला गेलो होतो; तेव्हा तुझ्या घरी गेलो होतो काका काकूंना भेटायला. त्यांच्याकडून तुझा नंबर घेतला. आपल्या ग्रुप मधल्या इतर जणांचे पण कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतलेत मी. किती वर्षं झाली गं सगळ्यांना भेटून !"

त्या दिवशी त्या दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या. एकमेकांबद्दल, इतर मित्र मैत्रिणींबद्दल ! बोलता बोलता अजयनी स्नेहाला विचारलं," अगं, तू फेसबुकवर नाहीयेस का? मी खूप शोधलं तुला.. माहेरच्या ,सासरच्या दोन्ही नावांनी... पण तुझा पत्ताच नाही." त्यावर हसत स्नेहा म्हणाली," नाही रे, मला वेळच नसतो. घर, श्रद्धा आणि स्टुडिओ यातच ऑलमोस्ट सगळा दिवस जातो ." तिचं स्पष्टीकरण काही फारसं पटलं नाही अजयला. तो म्हणाला," All that is fine, पण अगं, आपल्या ग्रुप मधले जवळजवळ सगळे जण आहेत फेसबुकवर.. it feels so great to connect with them again. बघ, जर तुला वाटलं तर तू पण जॉईन हो. आणि मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठव. माझ्या फ्रेंड लिस्ट मधे तुला आपले सगळे मित्र मैत्रिणी सापडतील."

त्या दिवशी खूप खुश होती स्नेहा. इतक्या वर्षांनंतर तिच्या गतस्मृतींना पुन्हा उजाळा मिळाला होता.'कधी एकदा रजत घरी येतो आणि त्याला सगळं सांगते' असं झालं होतं तिला. अर्थात, तिला स्वतःला जेवढी खुशी होत होती तेवढीच रजतलाही होईल याची काही खात्री नव्हती... In fact, त्याच्याकडून अशा प्रकारची कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही हे स्नेहा जाणून होती. इतक्या वर्षांत एक गोष्ट तिच्या लक्षात आली होती.... ती जितकी इमोशनल होती तितकाच रजत प्रॅक्टिकली विचार करणारा होता. त्यामुळे एकाच situation वर दोघांच्या प्रतिक्रिया अगदी दोन टोकांच्या असायच्या. पण तरीही स्नेहा तिच्या मनातली प्रत्येक गोष्ट रजतला सांगायची. तो जरी प्रतिक्रिया देत नसला तरी तिच्या बोलण्याची दखल घेतो याची खात्री होती तिला...

गेल्या काही वर्षांत त्यांच्या दोघांच्या एकमेकांबरोबर असलेल्या संवादात बरंच काही बदललं होतं.... निदान स्नेहाला तरी ते जाणवत होतं. रजत त्याच्या कामात इतका व्यस्त झाला होता... जणू काही त्याला कामाचं व्यसन लागलं होतं. आधी आठवड्यातला सुट्टीचा दिवस स्नेहा आणि श्रद्धा साठी राखून ठेवायचा तो...पण मग हळूहळू सुट्टीच्या दिवशीदेखील त्याला समोर काम दिसायला लागलं.

कितीतरी वेळा त्यांचे weekend family plans रजतच्या अर्जंट कामांमुळे त्यांना कॅन्सल करायला लागले होते. अशावेळी हिरमुसलेल्या श्रद्धाची समजूत काढणं स्नेहाला पण अवघड होऊन जायचं. पण त्याहीपेक्षा - 'रजतला या सगळ्याची जाणीव होत नाहीये'- याची तिला जास्त खंत वाटायची. बऱ्याच वेळा रजत जरी शरीरानी त्यांच्या बरोबर असला तरी मनानी मात्र तो ऑफिस मधेच आहे हे स्नेहाला जाणवायचं.पण या सगळ्यात एका गोष्टीमुळे स्नेहाचं मन सगळ्यात जास्त उदास व्हायचं.....आणि ती म्हणजे रजतच्या स्वभावात वाढणारा indifference....आधी त्याच्या या व्यस्तते मुळे तो घरच्यांना वेळ देऊ शकत नाही याबद्दल त्याला सतत एक टोचणी लागलेली असायची. तसं बोलूनही दाखवायचा तो ! पण आता त्याच्या वागण्या बोलण्यात स्नेहाला कुठेही ती खंत दिसत नव्हती. आता त्याच्या priorities बदलत चालल्या असल्याचं तिला जाणवत होतं. कदाचित आजपर्यंत प्रत्येक वेळी स्नेहानी दाखवलेला समजूतदारपणा आता रजतलाही सवयीचा झाला होता.. स्नेहा स्वतःलाच समजावत म्हणायची , 'मी नेहेमीच त्याला समजून घेत आले, त्याच्या हिशोबानी स्वतःला मोल्ड करत राहिले, कोणतीही तक्रार न करता नेहेमी adjust करून घेतलं .. आणि म्हणूनच आता हे सगळं त्याच्या इतकं अंगवळणी पडलंय की त्याला त्यात काहीच वेगळं वाटत नाही बहुतेक! आता तो मला गृहीत धरायला लागलाय!!'

पण इतकं सगळं होऊनही स्नेहाला एका गोष्टीची खात्री होती- रजतच्या तिच्यावर असलेल्या प्रेमाची !! हां, त्यांच्या नात्यातला रोमान्स कमी झाला असेलही पण त्यातलं प्रेम मात्र तसंच टिकून होतं... फक्त आता रजत ते प्रेम व्यक्त करणं विसरून गेला होता...किंवा कदाचित आता त्याला त्याची गरज वाटत नव्हती. आणि हीच गोष्ट सगळ्यात जास्त खटकत होती स्नेहाला!

तिनी एकदा रजतशी या बाबतीत बोलायचा प्रयत्नही केला होता. त्यानी अगदी शांतपणे तिचं सगळं बोलणं ऐकून घेतलं होतं. तिच्या मनातली ती चलबिचल, तिचे ते हळवे डोळे बघून रजतही विचारात पडला होता. पण कितीही विचार केला तरी त्याला स्नेहा म्हणाली तसा कोणताच बदल जाणवत नव्हता. स्नेहाला आपल्या मिठीत घेत तो म्हणाला होता,"उगीच नको नको ते विचार करत बसतेस तू! आणि मग असा स्वतःलाच त्रास करून घेतेस. तुला असं का वाटतंय की आपल्या दोघांतलं नातं आता आधीसारखं नाही राहिलं? उलट मला तर वाटतंय की आता आपलं हे नातं अजून घट्ट झालंय. आणि दिवसेंदिवस असंच स्ट्रॉंग होत जाईल ; अजून mature होत जाईल." त्याच्या या बोलण्यातला प्रत्येक शब्द स्नेहाला पटला होता. पण तिच्या म्हणण्यातला एक महत्वाचा मुद्दा रजतच्या लक्षात येत नव्हता. कदाचित तिला तिचं म्हणणं योग्य शब्दांत मांडता येत नव्हतं. तिनी थोडं स्पष्ट शब्दांत सांगायचा प्रयत्न केला, " मी असं म्हणतच नाहीये की आपलं नातं पूर्वीसारखं नाहीये...मी फक्त एवढंच म्हणतीये की आता आपलं दोघांचं एकमेकांबरोबरचं वागणं पूर्वीसारखं नाही राहिलं." तिचं हे वाक्य ऐकल्यावर रजतच्या कपाळावर आठी उमटली. नकारार्थी मान हलवत तो म्हणाला," मला तर असलं काही नाही जाणवलं अजून.. तुला असं का वाटतंय ?" रजत आपलं म्हणणं ऐकून घ्यायला तयात आहे हे कळल्यावर स्नेहाला थोडा धीर आला. ती म्हणाली," म्हणजे बघ ना; आधी आपण दोघं किती गप्पा मारायचो एकमेकांशी... अगदी वेगवेगळ्या विषयांवर... म्हणजे अगदी राजकारणापासून ते आपल्या रोजच्या दिनचर्येपर्यंत... माझ्या पेंटिंग्जस बद्दल जेव्हा तू तुझं मत सांगायचास ना तेव्हा मला किती बरं वाटायचं... माझ्या कामात काय चांगलं दिसतंय, कुठे सुधारणा हवी याबद्दल तुझा फीडबॅक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असायचा- अजूनही आहे. पण आता तुझ्याकडून काहीच प्रतिक्रिया नसते. मी तुला आवडतो तसा स्वैपाक करते, तुला हवी तशी तयार होते; पण तुझ्या ते ध्यानीमनी सुद्धा नसतं. त्यामुळे मला कधीकधी वाटतं की आता तुला माझ्या कामात, माझ्या interests मधे काहीच रस नाही राहिला. तू जेव्हा...." स्नेहा एकीकडे बोलत होती आणि एकीकडे तिच्या डोळ्यांत पाणी साठत होतं. आता कोणत्याही क्षणी तिनी तिच्या भावनांवर घातलेला बांध फुटणार आहे हे अगदी स्पष्ट दिसत होतं रजतला. तिला अजूनच जवळ ओढून घेत तो म्हणाला," खरंच वेडी आहेस तू! कुठले निरर्थक विचार डोक्यात साठवून ठेवले आहेस... आणि स्वतःच काहीतरी निष्कर्ष काढून स्वतःलाच त्रास करून घेतीयेस. आत्ता हे सगळं मला सांगितलंस म्हणून मला कळलं तरी... खरं सांगू का स्नेहा, माझा स्वभाव तुझ्यासारखा नाहीये. सुरुवातीपासूनच मी खूप प्रॅक्टिकल आहे...म्हणजे असं माझी आई म्हणते हं! त्यामुळे ते खरंच असेल. पण अगं, मी बोलून नाही दाखवत याचा अर्थ माझं तुझ्याकडे किंवा तुझ्या कामांकडे लक्ष नसतं असं नाहीये..." रजतच्या शेवटच्या वाक्यावर स्नेहानी चमकून त्याच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यातलं प्रश्नचिन्ह बघून तो ओशाळलेल्या स्वरात म्हणाला," हां, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर कधीकधी मी माझ्याच नादात असतो त्यामुळे नाही लक्षात येत माझ्या ... पण मला एक कळत नाही.... प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट बोलूनच दाखवली पाहिजे का? आता तू रोजच छान स्वैपाक करतेस; मग रोज रोज तेच काय सांगायचं! आणि कधीकधी तुझं वागणं किंवा तुझं एखादं काम मला पटत नाही....पण मी त्या बाबतीत तरी कुठे काही बोलतो !"

"तेच तर सांगतीये मी तुला.... तुझं हे असं गप्प राहणं मला अस्वस्थ करतं," रजतच्या बोलण्यातला नेमका धागा पकडत स्नेहा म्हणाली. पण रजत त्याच्याच विचारांवर ठाम होता.."अगं, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट काय सांगत बसायची ? आणि मी तरी काय करू ?? माझा स्वभाव असाच आहे...माझ्या मते तू नेहेमी एखाद्या गोष्टीकडे इमोशनल होऊन बघतेस; तसा विचार करतेस....आणि समोरच्यानी पण तसाच विचार करावा असं तुला वाटतं. पण मी कधी काही म्हणालो का तुला त्याबद्दल? कारण तुझा स्वभावच तसा आहे हे लक्षात आलंय माझ्या !"

स्नेहाचा चेहेरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरत रजतनी तिच्या डोळ्यांत पाहात म्हटलं," आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव ...मी जरी काही म्हणालो नाही, बोलून दाखवलं नाही तरी माझ्यासाठी तू नेहेमीच स्पेशल आहेस आणि आयुष्यभर राहशील.. I love you Sneha."

रजतच्या डोळ्यांत स्नेहाला त्याच्या मनातले सगळे भाव वाचता येत होते... त्याच्या स्पर्शातून ते समजत होते.... खरं म्हणजे अजूनही कितीतरी बोलायचं होतं तिला ; पण रजतच्या मिठीत ती सगळं काही विसरली !!!

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users