कर्फ्यु(शतशब्दकथा)

Submitted by स्वप्ना_राज on 27 March, 2020 - 10:14

'आपण बसलोय इथे बांधावर पण पोलीस आले तर?'

'सांगायचं की कर्फ्यू उठल्यावर डाळतांदूळ आणायला गेलो होतो. पिशव्या जड आहेत म्हणून टेकलोय.' रमाबाई वैतागल्या.

आनंदी इथेतिथे पहात बसली. हा परिसर इतका शांत तिने कधीच पाहिला नव्हता.

‘तो दिवा बघ कसा उघडझाप करतोय.’ दूरवर बघत ती म्हणाली. रमाबाईही निरखून बघायला लागल्या. ‘आता अश्या दिवसात इलेक्ट्रिशियन तरी कुठून मिळायचा. दिवा बंद करून ठेवावा. रीतच उरली नाही आजकाल. चल, ८:३० झाले’
--------------
‘ऐकलं का बाई? सकाळी पार्कसमोरच्या बिल्डींगमध्ये बॉडी सापडली पोलिसांना.’

‘काय म्हणतेस?’

‘काल रात्री गेला. एकटाच होता. हार्टएटेक आला. बाल्कनीतला दिवा उघडझाप करत ठेवला होता मदतीसाठी. पण कोणाचं लक्ष नाय. माणुसकी राहिली नाही जगात.’

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!

छान !

छान आहे कथा...

कथेच शिर्षक कर्प्यु ऐवजी कर्फ्यु कराल का?