मागील कथासूत्र
https://www.maayboli.com/node/73851
दुसऱ्या दिवशी सकाळीच मीराला सुहास आजारी असल्याची बातमी कळली आणि तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने प्रथम आग्रहाने सुहासला रुग्णालयात भरती करवले. उपाय लवकर सुरू झाले तर आपल्या हातात अधिक दिवस असतील याची तिला जाणीव होती. पार्थसारथींना ही घटना ताबडतोब कळवण्यात आली आणि ते लगोलग पुढील विमानाने परत आले. आल्याआल्या त्यांनी प्रथम सुहासची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तेथील डॉक्टरांना या पूर्वीच्या दोन केसची माहिती देऊन कसे उपचार करावेत या विषयी चर्चा केली. नंतर परत येऊन त्यांनी मीराला भेटायला बोलावले. या अपघातात मीराचा हात असेल अशी त्यांना अंधुक कल्पना होतीच. मीराने पार्थसारथींना कसलाही आडपडदा न ठेवता सर्व हकीकत सांगितली. आता यातून जर कोणी मार्ग काढू शकत असतील तर ते फक्त पार्थसारथीच, आहेत याची तिला कल्पना होती.
"किती मोठा घोळ घालून ठेवला आहेस याची काही कल्पना आहे का? " पार्थसारथी गरजले. मीरा मान खाली घालून उभी होती. "या पूर्वी दोघांचे प्राण गेलेत या प्रयोगात. नेमके कशाने गेलेत याची काहीच कल्पना नाहीये आणि तू तिसऱ्या माणसाला तोच प्रयोग करायला सांगतेस? "
"प्रथमेश आणि अनिमेष यांना नेमके काय झाले याची अंधुक कल्पना मला आहे", मीरा म्हणाली. "माझ्या अभ्यासातून मला असे दिसले की उच्च क्षेत्रात ठेवलेले विषाणू काही रासायनिक उत्तेजकांना वेगळ्या प्रकारचा प्रतिसाद देतात. आणि हा गुणधर्म अवस्था संक्रमणासारखा (phase transition सारखा) अचानक प्रकट होतो".
"पण गुणधर्मांतील नेमक्या कोणत्या बदलांमुळे हा परिणाम दिसतो आहे? आणि त्याचा औषधांना प्रतिसाद न देण्याशी काय संबंध? लक्षात घे. प्रथमेश आणि अनिमेषला काही असाध्य आजार झाला नव्हता. पण त्यांची प्रतिकारक्षमता काही कारणांनी या विषाणूंचा मुकाबला करू शकली नाही. "
"हाच अभ्यास करण्यासाठी मला नवीन नमुने हवे होते. मी तुम्हाला विचारणार तर तुम्हाला मीटिंगसाठी दिल्लीला जावं लागलं. मग मी सुहासला सांगून नवे नमुने तयार करून घेतले. "
"मग काही ठोस निष्कर्ष आहेत का सांगण्यासारखे? "
"हो. आधीच्या वेळी बनवलेल्या नमुन्यांवरून जे निष्कर्ष मी काढले होते ते बरोबर आहेत असं दिसतं. हा रासायनिक बदल विषाणूंमध्ये साधारणतः ३३० पृथ्वी एवढे क्षेत्र असताना होतो. इतर कोणतेही दृश्य बदल दिसत नाहीत. भौतिक बदलांचा प्रतिसाद सर्वसामान्यच राहतो. महत्त्वाचे जनुकीय बदल आढळत नाहीत. मात्र या बदलाचं कारण काही उमगत नाही. " मीराने एका दमात सगळे सांगून टाकले.
पार्थसारथी विचारात पडले. त्यांनी मीराला हातानेच जायची खूण केली. त्यांना या सर्व प्रकाराची संगती लागत नव्हती. संध्याकाळ झाली तरी ते खोलीमध्येच होते. मीराने दिलेल्या माहितीचा कसा अर्थ लावावा आणि कोणते निष्कर्ष काढावे हे त्यांना कळत नव्हते. हा एक संपूर्ण नवीन परिणाम आहे हे त्यांच्या अनुभवी मेंदूने ताडले होते. पण नेमके काय घडत आहे याचा कार्यकारणभाव शोधल्याशिवाय नुसत्या प्रयोगांना काहीही अर्थ नव्हता. त्यांनी थकून शेवटी विचारांचा नाद सोडला. एखादा कप कॉफी पिऊन यावी अशा विचाराने ते कँटिनच्या दिशेने निघाले. कॉफीबरोबर वाचायला म्हणून त्यांनी नेचरचा ताजा अंक बरोबर घेतला. वाचता वाचता त्यांची नजर 'हस्तसम औषधे' (chiral drugs) या विषयावरील एका लेखावर पडली. असे असू शकेल? त्यांच्या मनात विचार चमकून गेला. त्यांनी तडक मीराला बोलावणे पाठवले. मीरा भेटताच त्यांनी तिला संस्थेच्या गाडीने तातडीने आय. आय. एस. सी मध्ये जाण्यास व भौतिकशास्त्र विभागात जाऊन त्या विषाणूंच्या नमुन्यांवर काही विशिष्ट चाचण्या करण्यास सांगितले. सर्व संबंधित लोकांना अगोदरच फोन गेले होते. नंतर पार्थसारथी परत खोलीमध्ये जाऊन मीराच्या फोनची वाट पाहत बसले.
मीराचा फोन जवळपास रात्री दोननंतर आला. पार्थसारथींना अपेक्षित निकाल त्या चाचण्यांतून मिळाले होते. आणि हस्तसमतेशी (chirality) हा परिणाम संबंधित आहे हे त्यातून सिद्ध होत होते. बरेचसे नैसर्गिक रेणू आणि त्यांचे आरशातील प्रतिबिंब यात काही फरक नसतो. रेणू गोल फिरवला म्हणजे आरशातील प्रतिमेसारखा रेणू मिळाला. काही रेणूंचे मात्र तसे नसते. त्यांच्यासाठी आरशातील प्रतिमा मूळ रूपापेक्षा वेगळीच असते. एकाच रसायनाची दोन रूपे. ह्या दोन रूपांचे भौतिक गुणधर्म जरी बऱ्याच अंशी सारखे असले तरी रासायनिक गुणधर्म कधीकधी भलतेच निराळे असू शकतात. हल्लीच असे लक्षात आले होते की बरेचसे जैवीय रेणू हे अशा दोन रूपात अस्तित्वात असू शकतात. पण बरेचदा त्यातील एकच रूप निसर्गात आढळते. प्रयोगशाळेत मात्र दुसरे रूप निर्माण करून त्यांच्या चाचण्या घेतल्या गेल्या होत्या. पार्थसारथींच्या प्रयोगशाळेत अशाच प्रकारे उच्च चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विषाणूंच्या डीएनएची हस्तसमता बदलत होती. त्यामुळे त्यांचे रासायनिक गुणधर्मही बदलत होते. सामान्य रेणूंशी ते पूर्वीप्रमाणेच वर्तणूक करत. पण हस्तसम रेणूंशी मात्र इतर नमुन्यांच्या अगदी उलट. सामान्यतः प्रतिजैविके हस्तसममिती दर्शवतात. परंतु त्यातील एकच प्रकार उपयुक्त असल्याने दुसरा सामान्यतः काढून टाकला जातो आणि त्यामुळे ही प्रतिजैविके परिवर्तित विषाणूंवर परिणाम करत नव्हती. हा टाकून दिलेला भाग वापरून सुहासवर यशस्वी उपचार करता येतील हे पार्थसारथींनी ओळखले. लगोलग त्यांनी आपल्या ओळखीतील एका औषधकंपनीतील उच्चपदस्थाला फोन लावला. त्याच्या कंपनीतून हस्तसम विभाजन (chiral separation) करण्याआधीची प्रतिजैविके मिळवली आणि सुहासच्या रुग्णालयात पोचती करवली. रात्री पार्थसारथींना खोलीमध्येच झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सुहासचा वैद्यकीय अहवाल डॉक्टरांनी पाहिला तेव्हा त्यांना लक्षणीय सुधारणा दिसली. नवीन औषधाने काम केले होते आणि त्याबरोबर प्रथमेश आणि अनिमेषच्या मृत्यूचे रहस्यही उलगडले होते. तीन दिवसांनी सुहास पूर्ण बरा झाला आणि आठवड्याभरात कामावर रुजूही झाला. आता पार्थसारथींच्या प्रयोगशाळेतील प्रयोग पुन्हा जोमाने सुरू होऊ शकत होते, तेही पूर्ण क्षमतेने.
मीराने हा शोधनिबंध नेचरला पाठवला. 'रिव्हर्सल ऑफ डीएनए कायरालिटी इन द प्रेझेन्स ऑफ हाय मॅग्नेटिक फील्ड' या तिच्या निबंधास त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट शोधनिबंधाचा मानही मिळाला. हस्तसमता बदलल्याने डीएनएचे आणि पर्यायाने विषाणूंचे गुणधर्म बदलतात. थोडक्यात म्हणजे विषाणूंचे त्यांच्या आरशातील प्रतिमांमध्ये परिवर्तन होते. यामुळे जे रेणू हस्तसममिती दाखवतात, त्यांच्याशी या विषाणूंचा व्यवहार नेहमीच्या उलट होतो असे या निबंधातून मांडण्यात आले. मीरा, सुहास आणि पार्थसारथी यांनी अधिक संशोधन करून चुंबकीय बलाचे या परिणामातील नेमके कार्य शोधून काढले.
मीरा आपली पीएचडी पूर्ण करून परदेशी निघून गेली. सुहासही कालांतराने एका मोठ्या रुग्णालयात रुजू झाला. प्रा. पार्थसारथी मात्र अजूनही प्रथमेश आणि अनिमेषच्या आठवणींनी व्याकूळ होतात.
विज्ञानकथा हा आवडता प्रकार.
विज्ञानकथा हा आवडता प्रकार. छान लिहिलंय.
सुंदर.. कथा..
सुंदर.. कथा..
धन्यवाद!
धन्यवाद!
तीनही भाग वाचले.
तीनही भाग वाचले.
छान आहे कथा. विषेशतः सध्याच्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर.
विज्ञानकथा मला थोड्याशा डोईजड
विज्ञानकथा मला थोड्याशा डोईजड होतात त्यामुळे तितक्याश्या आवडत नाहीत.. पण तुमची कथा छानेय.. आवडली..
धन्यवाद.
धन्यवाद.
तीनही भाग आताच वाचले.
तीनही भाग आताच वाचले.
छान आहे कथा, आवडली.