पाडवा

Submitted by निशिकांत on 25 March, 2020 - 00:35

(सर्वांना कवितेद्वारे गुडी पाडव्याला सुरू होणार्‍या नवीन संवत्सराच्या निमित्ताने शुभेच्छा)

हिशोब नवखा खाते नवखे
टिकून नाते जुने असावे
सालही नवे ध्येयही नवे
कुणास कांही उणे नसावे

क्षितिज नवनवे रुंद कडांचे
मिठीत पकडून बंद करावे
नवी असावी उंच भरारी
ओंजळीत आकाश भरावे

श्वास नवे विश्वास नवे
नव्या यशांच्या वाटा
पसरुन मार्गी फुले असावी
कुठे नसावा काटा

जुनाच निश्चय एक अधूरा
स्त्रीमुक्तीचा पुन्हा करू या
खडतर रस्ता, निघण्यापूर्वी
श्वास जरासा खोल भरू या

गवक्षातुनी दूर पहाव्या
नव्या चांदण्या नवीन तारे
ध्येय तयांच्या पुढे असावे
उचलू पाउल नवे चला रे!

शब्द नवे अन् गीतही नवे
सूर गोडवा तोच असावा
गुड्या तोरणे नवी असूद्या
मनी पाडवा तोच असावा

निशिकांत देशपांडॅ मो.क्र. ९८९०७ ९९०२३

एकेवीस दिवस फक्त घरात
करोनाचा जाईल झंझावात

Group content visibility: 
Public - accessible to all site users