ईमायनं आल्याती का..?

Submitted by जव्हेरगंज on 24 March, 2020 - 00:07

पुज्य सकाळी कामे आवरून नित्यनेमाने शिरस्ता बाहेर पडलो. आजकालच्या जमान्यात पत्रकारांना काडीची म्हणून किंमत राहिली नाही. पण जिवनावश्यक, अत्यावश्यक, चौथा स्तंभ वगैरे संबोधून नमोजींनी आम्हांला अशा स्मशानवैराग्याच्या दिवसांत पण बाहेर पडण्यास भाग पाडीले. मौजे बाभुळगाव येथील 'जनता कर्फ्यू' नामक ऐतिहासिक दिनाचे वार्तांकन करण्यासाठी आम्ही सायकलवर टांग टाकली.

आखिरकार दोन डोंगर उतरून, पायवाटेने प्रसंगी सायकल उचलून आम्ही त्या दिडदमडीच्या गावात पोहोचलो. उन्हातान्हात रापून तहान लागली होती. सर्वत्र सामसूम होती. या आडवळणाच्या गावात होटेल नावाचे काही असावे का, याचा काही तपास लागला नाही. गाव कसले, आठ दहा घरांची वस्तीच ती. दुकान वाटण्याजोगे पत्र्याचे एक शेड दिसले. तेही बंद होते. गरीब बिचारं एक कुत्रं तिथं एका फाळक्यावर मस्त ताणून झोपले होते.

दुसऱ्या एका फाळक्यावर बसून मी आजूबाजूचा परिसर न्याहळू लागलो. पण कुत्र्याला ते आवडले नसावे. शुभ्र पांढऱ्या रंगाचे 'मोत्या' किंवा तत्सम नाव असणारे ते आकर्षक कुत्रे भलतेच फैलावर आले. आम्ही पुरते टरकून गेलो. पण अचानक कुठूनतरी एक दगड सणकत येऊन त्याच्या फेकाटात बसला तेव्हा कुठे ते शेपूट योग्य ठिकाणी घालून पळून गेले.

"कोण रे तू फाटक्या, हितं कशाला आलाय मरायला?" एक दांडगा म्हातारा हातातली काठी पारजत ढांगा टाकतंच पुढे येऊन ठापला.

"पत्रकार आहे मी, शहरातून आलोय, बातमी घ्यायला.... पण आता निघतोच आहे.. लगेच" ती काठी कुठे कशी बसेल या विचारात आम्ही महत्वपूर्ण माहिती पुरवली.

"आस्सं आसं... ए बंटे पाणी घीऊन यी... टिवीवाले आलेत... आप्पास्नीबी बुलीव..." म्हातारा फळकुटावर बसत म्हणाला.

"टिव्हीवाले नाही, वर्तमानपत्र. 'बळीराजा टाईम्स'.." आमच्याकडे दाखवण्यासाठी ओळखपत्र वगैरे काही नव्हते.

मग तांब्याभर पाणी आले. ते आप्पा नामक अजूनच वयस्कर गृहस्थ आले. गेलाबाजार बंटी नामक आकर्षक तरूण मुलगी तिथेच थांबल्याने माहोल एकप्रकारे
खुला झाला.

"मग कधी यायच्याती ईमायनं?" वयस्कर आप्पाने अतिशय गंभीरपणे तोंड उघडलं. हा म्हातारा असला काही बाऊन्सर टाकेल असं वाटलंच नव्हंतं.

"ईमायनं..? अहो युद्ध नाही सुरु झालं. त्या कोरोना व्हायरसमुळे कर्फ्यू लावलाय मोदींनी."

"हा त्येच की, ईमायनानं औषध फवारणी करणार म्हंत्याती... किटाणू मारायला.."

"आहो नाही नाही.."

"न्हाय कसं. आवो व्हाट्स्स्याप ला आलंय. टाळ्याबी वाजवाय लावल्यात संध्याकाळी.." समोरच्या गोठ्यात बसलेला एक तरूण सुंभ चेहऱ्याने आमच्याकडे बघत म्हणाला. हा मला अजून कसा दिसला नव्हता.

"जळ्ळा मेला तो ईषाणू. कशाला आलाय म्हणावं बाबा हिकडं.." त्याच्याच मागे एक बाई उभी होती. ती तिथे कधी आली?

"बरका..." तो तरूण उठून माझ्याकडे येत म्हणाला, " भांडगावला एकजण सापडला... गोळ्या घातल्या की राव त्याला."

"गोळ्या घातल्या..?"

"मग, करोना सक्सेस झाला त्याला.. टिवीला बातमी हुती की.."

टिव्हीला बातमी म्हटल्यावर आम्हीही चपापलो. पत्रकार असूनही ही असली बातमी आमच्याकडून कशी निसटली?

अखेर त्यांनी आम्हाला इतक्या प्रमाणात 'ठोस' माहिती पुरवली की आज संध्याकाळपर्यंत 'ईमायनं' येण्याची खात्रीच पटली.

सायकलवर टांग टाकून जेव्हा आम्ही माळेगाव मार्गे हायवेला लागलो तेव्हा असल्या अचाट प्लॅनबद्दल नमोजींना मनातल्या मनात सलाम ठोकला. पण मागून पोलिसांची गाडी आली आणि काहिही न विचारता असभ्य वाटेल अशा ठिकाणी दोन बांबू ठेवून दिले.

शहरात आलो तेव्हा संध्याकाळी ढोल ताशे लावून जंगी मिरवणुका सुरू होत्या. आणि आम्ही सिटावर न बसता सायकल चालवून पार मेटाकुटीला आलो होतो. तसाच दामटत ऑफिसला गेलो तर संपादक महाशयांनी अगोदरच बातमी तयार करून ठेवली होती.

"बाभुळगावमध्ये 'जनता कर्फ्यू' ला उदंड प्रतिसाद!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. संपादकांना बसल्या जागी रिपोर्त कळला म्हणायचं. पोलिसांनी बाकी छान काम केले. कर्फ्यू न पाळणारांच्या बुडावर फटके लावून. पुढच्या वेळी ओळखपत्र जवळ ठेवा.

Lol मस्त!

पण मागून पोलिसांची गाडी आली आणि काहिही न विचारता असभ्य वाटेल अशा ठिकाणी दोन बांबू ठेवून दिले.

भेंडी हे बाकी छान केलं पोलिसांनी एकदम पटल.
सद्य परिस्थितीत विनाकारण बाहेर हिंडणार्‍यांसाठी वेताचे फटकेच योग्य.

सही!

Rofl

भारी झालाय की मौजे बाभुळगाव कर्फ्यु चा लेख. ते आयकार्ड जवळ ठिवत चला म्हंजे पोलीसांचे बांबू नको त्या भागावर नाही बसणार Lol