जनता कर्फ्यु

Submitted by nimita on 21 March, 2020 - 06:34

जनता कर्फ्यु - म्हणजे जनतेने जनतेच्या हितासाठी स्वखुशीने स्वीकारलेला एक वसा!

मागच्या एक दोन दिवसांपासून या जनता कर्फ्यु बद्दल सगळीकडे खूप चर्चा चालू आहे. सध्या मी स्वतःच माझ्यावर कर्फ्यु लावून घेतल्यामुळे (म्हणजे self quarantine केल्यामुळे) बाहेरच्या जगाशी माझा संबंध हा फक्त टीव्ही आणि फोन या दोनच माध्यमांतून चालू आहे. आणि या दोन्ही ठिकाणी या जनता कर्फ्यु शी संबंधित बऱ्याच गोष्टी कळतायत; ज्ञानसंवर्धन होतंय ! समाजातली ही जागरूकता आणि लोकांना झालेली जबाबदारीची जाणीव बघून नक्कीच समाधान वाटतंय.. आणि मुख्य म्हणजे आपण स्वतः आपल्या परीनी या सगळ्याचा हिस्सा आहोत हे बघून उगीचच कॉलर ताठ पण होतीये.

पण या सगळ्या घडामोडींमुळे मनात मिश्र भावनांची, वेगवेगळ्या विचारांची गर्दी होतीये. ही सामाजिक जागरूकता म्हणजे 'तेरड्याचा रंग तीन दिवस' अशी तर नसेल ना ? आत्ता मानवाच्या जीवन मरणाचा, त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न समोर उभा ठाकला आहे ; आणि त्यातूनच त्याला ही उपरती झाली आहे. पण लवकरच परिस्थिती पुन्हा पूर्ववत होईल...हो, ती तर होणारच आहे- कारण हा सृष्टीचा नियमच आहे.. या पृथ्वीवर काहीच शाश्वत नाही.. जे सुरू होतं त्याचा शेवट हा निश्चित आहे! याच नियमाला अनुसरून सध्याच्या या आपत्कालीन परिस्थितीचा सुद्धा शेवट होईलच...

पण जेव्हा सगळं काही सुरळीत होईल तेव्हा मनुष्यप्राणी पण पुन्हा पहिल्यासारखा वागायला लागेल का ? पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' अशी परिस्थिती होईल का? मानवी अहंकार आणि निसर्गावर त्याची चाललेली अरेरावी लक्षात घेता ही शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच मनात कुठेतरी भीती वाटते. मानव सतत निसर्गाला गृहीत धरत आलाय. जेव्हा हे 'गृहीत धरणं' अति व्हायला लागतं तेव्हा ही सृष्टी, हा निसर्ग आपलं रौद्र रूप दाखवून मानवाला जागं करायचा प्रयत्न करतो. मानवाच्या बेधुंद आणि निर्बंध वागण्यामुळे बिघडलेला समतोल राखण्यासाठी निसर्ग त्याच्या परीनी पूर्ण प्रयत्न करतो ... गरज पडल्यास मानवाला त्याची 'पायरी' दाखवून देतो.

मानव आणि निसर्ग या दोघांच्या नात्यात खरा संयम जर कोणी पाळत असेल तर तो आहे निसर्ग ! पण म्हणून आपण सतत त्याच्या या संयमाची परीक्षा घेत राहणं कितपत योग्य आहे? अहो, काहीही झालं तरी शेवटी तो 'संयम' आहे..... आणि संयम हा एखाद्या रबरबँड सारखा असतो. जर जास्त ताणला तर शेवटी तुटतोच.... आणि नुसता तुटत नाही- तर ताणणाऱ्या व्यक्तीला चांगला जोरदार फटका देत तुटतो.

गेल्या कैक वर्षांत असे कितीतरी छोटे मोठे फटके बसलेत आपल्याला... पण तरीही आपण नव्या जोमानी निसर्गाला, त्याच्या या संयमाला आव्हान द्यायची घोडचूक करतो. आणि म्हणूनच मन साशंक होतं ! आपण कधी आत्मसात करणार हा संयम? हा समतोल राखायला कधी शिकणार आपण?

आपल्याला हे सगळं जितकं लवकर जमेल तितकं चांगलं आहे...आपल्या भल्यासाठी, या पृथ्वीवरच्या आपल्या अस्तित्वासाठी! The sooner ; the better !!

आणि हा 'जनता कर्फ्यु' म्हणजे त्या वाटचालीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे, असं मला तरी वाटतं ! काही जणांना वाटतंय की सध्याच्या या बिकट परिस्थितीमधे आपण जे काही उपाय करतोय, जी काही काळजी घेतोय तिच्यामुळे निसर्गाचा समतोल राखायला मदत होणार आहे...म्हणजे बघा... अजूनही मानवी अहंकार कमी नाही झाला. पण या अभाग्यांना एक सत्य लक्षात येत नाहीये ( किंवा त्यांना ते कबूल करायचं नाहीये) .. आणि ते म्हणजे.... आपण हे सगळं करतोय ते या पृथ्वीवरचं आपलं स्वतःचं अस्तित्व टिकून राहावं म्हणून!कारण आपल्या नसण्यानी या सृष्टीला काहीच फरक पडणार नाहीये...उलट जर आपण नसलो तर ती अजूनच बहरून येईल, इतर प्राणिमात्र मोकळा श्वास घेतील, वनसंपदा नव्यानी उभारी धरेल !त्यामुळे मनात स्वतःबद्दल उगीच गैरसमज बाळगण्यात काही अर्थ नाही.

या जनता कर्फ्यु बद्दल विचार करताना लहानपणीचा एक खेळ आठवला....

आम्ही लहानपणी जेव्हा मित्र मैत्रिणींबरोबर लंगडी, जोडसाखळी, लपंडाव यांसारखे ग्रुप गेम्स खेळायचो तेव्हा अधूनमधून एखादा खेळाडू 'टाइम्प्लिज (time please)' म्हणायचा आणि काही वेळासाठी खेळ सोडून निघून जायचा. यामागची कारणं वेगवेगळी असायची....कधी बाबांनी हाक मारली म्हणून, कधी आईनी सांगितलेलं एखादं काम आठवलं म्हणून, कधी निसर्गाच्या 'हाकेला ओ' द्यायला म्हणून , तर कधी 'आता आपल्यावर राज्य येणार' किंवा 'आपण आऊट होणार' या अटळ सत्याचा साक्षात्कार व्हायचा म्हणून!पण मग आपलं आवश्यक ते काम झाल्यावर तो खेळाडू पुन्हा यायचा आणि त्या सुरू असलेल्या खेळात सामील व्हायचा. आणि गंमत म्हणजे जितक्या निर्विकारपणे तो पुन्हा यायचा तितक्याच निर्विकारपणे बाकीचे खेळाडू त्याला पुन्हा आपल्यात सामावून घ्यायचे. त्या एका खेळाडूच्या 'नसण्यानी' खेळ आणि खेळाडू यांना काही फरक पडायचा नाही.

सध्याची परिस्थिती आणि तिला अनुसरून घेतलेला ' जनता कर्फ्यु' चा निर्णय.... हे सगळं त्या लहानपणच्या खेळांसारखं आहे. म्हणजे बघा ना.... विचार करा की - या पृथ्वीतलावर हा सृष्टीचा खेळ चालू आहे...त्यात वेगवेगळे खेळाडू आहेत- मनुष्य, पशु पक्षी, सगळ्यांना व्यापून राहणारा निसर्ग आणि त्यातली पंचमहाभूतं .... खेळ अगदी रंगात आला आहे... आणि अचानक आपल्या म्हणजे माणसाच्या लक्षात येतं की आता लवकरच या खेळातून तो 'आऊट' होणार आहे. अगदी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. जर वेळीच योग्य तो निर्णय घेतला नाही तर या खेळातून कायमची उचलबांगडी होणार हे नक्की! पण आपण जरी आऊट झालो तरी बाकी खेळाडूंना काही फरक नाही पडणार...त्यांचा खेळ चालूच राहणार!! त्यामुळे या खेळातलं स्थान टिकवण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तो खेळाडू एकदम ओरडतो ..."टाइम्प्लिज"

खेळातला हा टाइम्प्लिज म्हणजेच जनता कर्फ्यु !! सध्या हातघाईची परिस्थिती आहे; आपल्याला या खेळातलं आपलं अस्तित्व टिकवायचं आहे; म्हणूनच टाइम्प्लिज घेऊन थोड्या वेळासाठी खेळातून बाहेर पडायचं- बाजूला जाऊन थांबायचं... आपल्या बाहेर जाण्यानी खेळ नाही थांबणार... पण आपल्यावर 'आऊट' होण्याचं जे संकट आलंय ना ते टळेल! आणि जेव्हा ते संकट टळेल, परिस्थिती सामान्य होईल तेव्हा आपण 'ओव्हर' म्हणून परत त्या खेळात सामील व्हायचं.

फक्त त्यानंतर मात्र खेळाचे सगळे नियम अगदी तंतोतंत पाळायचे... कोणत्याही प्रकारची चीटिंग नाही करायची....मग बघा - हा खेळ कसा छान रंगतो ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! किती सुरेख विचार ! फारच मस्त लिहिलं आहे. सामाजिक आणि राजकिय दृष्टीकोनातून उद्याच्या कर्फ्युबद्दल खूप वाचते आहे, पण तुमचा दृष्टिकोन आणि लेखनशैली अतिशय आवडली.

अगदी बरोबर.. खूप छान पद्धतीने मांडलाय विचार.