व्यथा

Submitted by निशिकांत on 20 March, 2020 - 23:59

(औरंगाबादच्या माझ्या घराच्या खिडकीत चिमणीने घरटे केले. पिले झाली; उडून गेली. चिमणी दोन दिवस भिरभिरत्या नजरेने शोध घेऊन ती पण उडून गेली. ते रिकामे घरटे अजून तसेच आहे खिडकीत. या वरून सुचलेली कविता काल झालेल्या चिमणी दिनानिमित्त )

गोड धडधड उरी तिच्या लागताच चाहूल
चिमणी लागली नाचायला होणार म्हणून मूल

वाळलं गवत अन् काड्या करत होती जमा
पडणार्‍या कष्टांची नव्हती तिला तमा

घरटं छान मऊ व्हावं एकच ध्यास मनी
काळजी करणं बाळाची सवय होती जुनी

दोन पिलं जन्मली खोप्यात होती घाई
आनंदात नहात होती वेडी त्यांची आई

पिलांना भरवण्यासाठी बाहेर जाई
शोधून शोधून दाणे घेउन घरी येई

चोंचीत दाणे भरवताना आनंदाची सर
पिले वाढता वढता त्यांना फुटू लागले पर

दाणे घेऊन पुढे चाले हळू हळू चिमणी
पिले मागे येता बघत होई सुखरमणी

एके दिवशी चिमणीला मिळेनात दाणे
कष्ट तिला किती पडले देवच एक जाणे

मिळाले ते घेऊन परत आली घरा
पिले नव्हती कुठे, खोपा मोकळा पुरा

भिरभिरत्या नजरेस तिच्या दिसत नव्हतं कुणी
पंख फुटता भुर्र उडाली कहानी ही जुनी

मीच तर त्यांच्या दिलंय पंखांना बळ
म्हणूनच तर आज भोगतेय काळजातली कळ

एक चिमणा पुन्हा तिच्या सान्निध्यात आला
अनुनय प्रणयासाठी सुरू होता झाला

अंगचटीला येऊ नकोस! नकोय मला मजा
लेकरं उडून गेली माझी, भोगतेय मी सजा

इतिहास परत घडणे नकोय मला आता
मरेन पण होणार नाही फिरून कधी माता

घरटे विरान अंगणी नुसतीच आहे शोभा
चिमणी गेली पिले गेली, गेलीय त्याची आभा

ओसाड खोपा सांगत आहे अजूनही कथा
प्रेमासाठी सवय हवी भोगण्याची व्यथा

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users