मी आसाराम बापूचा शिष्य बनलो होतो ( भाग दोन)

Submitted by परशुराम परांजपे on 17 March, 2020 - 06:07

सकाळी मंडपात एका बाजूला पुरुष आणि दुसरीकडे महिला शुचिर्भूत होऊन पूजेचं सामान घेऊन बापूची आतूरतेने वाट पहात होते. थोड्याच वेळात बापू हजर. माईक वरुन सुचना सुरू झाल्या. मध्येच सेवेकरी धावपळ करत होते. माझ्यासारख्या नवख्या भक्तांना सुचना समजून सांगत होते. बापूनं मग मंत्र सांगायला सुरुवात केली. एकूण पाच मंत्र सांगितले पैकी आपणास हवा तो दीक्षामंत्र म्हणून घ्यायचा. पहिला मंत्र राम किंवा श्रीराम हा होता. मन म्हणत होते दोनच अक्षरं आहेत. जप लवकर पूर्ण होईल, माळा ओढण्याचा त्रास कमी वगैरे वगैरे.. पण मी मनाला समजावत ॐ नमः शिवाय हा माझ्या आवडत्या देवाचा श्री शंकराचा मंत्र घेतला.
थोड्याच वेळात मंत्रदीक्षा समारंभ आटोपला. बापूनं प्रत्येकाकडून वचन घेतले की रोज दहा माळा जप करीन.
नंतर जेवण केले. हजारो अनोळखी साधक स्त्री पुरुष तिथं असूनही आश्रमात गडबड गोंधळ अजिबात नव्हता. दोन दिवस माझं ( सर्वांचंच) सामान, चपला, बूट असेच उघड्यावर होते. कोणीही कुणाच्या वस्तूला हात लावत नव्हते, सगळीकडे एक उल्हास, आनंद भरुन राहिला होता. पंधरा रुपयांत नाष्ता, जेवण, चहा सर्व उपलब्ध होतं. वाढणारे खाणाऱ्याला प्रभू संबोधून वाढत होते. आश्रमातील सेवेकरी साधक सेवेसाठी तत्पर होते. सगळीकडे स्वच्छता होती. मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळी फॉगिंग मशीनने मच्छरांचा बंदोबस्त केला जात होता. सर्व साधकांची स्वयंशिस्त वाखाणण्याजोगी होती. दीक्षेच्या दुपारी बापू धुलिवंदनाच्या रंगानं सर्वांना रंग लावणार होता. एका पटांगणात सर्व जण उभे राहिले. मोठ्या स्टेजवरून बापूनं अग्नीशामक सारख्या पाईपातून रंग उडवायला सुरुवात केली. पळसाच्या फुलांपासून तयार केलेला केशरी रंग आहे हे बापू सांगत होता आणि हा भक्तीचा रंग तूम्हाला लागला आहे. भक्ती करायला विसरू नका. मी नेहमी तुमच्या बरोबर आहे. कसलीही चिंता करू नका. तुमच्या सर्व चिंता माझ्यावर सोपवा. निर्धास्त रहा. आश्रमात " हरी ओम" हा परवलीचा शब्द होता. काहीही हवे असेल तर हरी ओम म्हणायचं.
रंगोत्सव झाल्यावर दुरुनच बापूला नमस्कार केला आणि सुरत बस स्टॅण्ड वर आलो. पुण्याला जाणारी गाडी मिळाली नाही. मग नाशिक पर्यंत एशियाडमध्ये प्रवास केला. प्रवास करताना एक गंमत झाली. गाडी सापुतारा घाटात आली. आणि गाडीत उभ्या असणाऱ्या एकाचे मागे लक्ष होते त्यानं दोन माणसांना शिडीवरून टपावर चढताना पाहिले आणि गाडीत आरडाओरडा सुरू झाला. ड्रायव्हरने तशीच गाडी सुरू ठेवली. घाट चढत असताना एका वळणावर वेग कमी झाला तेव्हा ते चोर उतरुन गेले. पुढे एका वळणावर पोलिस उभे होते. तिकडे चालत्या वाहनांतून चोऱ्या होत असाव्यात. घाट संपल्यावर गाडी थांबवून ड्रायव्हर ने वर चढून पाहिलं. काही चोरी झाली नव्हती.
घरी आल्यावर मग मी रोज मंत्रजप चालू केला. आसारामायण म्हणून एक छोटं पुस्तक होतं. त्यात बापूचा जीवनक्रम, चमत्कार वगैरे काव्यासारखा लिहिले होते व ते चालीवर म्हणायला मजा येत होती. मी येताजाता ते मोठ्यानं म्हणत असे. पुढे गुरुपौर्णिमा आली. मी अहमदाबाद ला जायचं ठरवलं. घरी नं सांगताच परस्पर अहमदाबाद ला गेलो. तेव्हा गुजरातमध्ये खूप पाऊस झाला होता. अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेले होते. अनेक गाड्या बदलत अहमदाबाद ला पोहोचलो. साबरमती स्टेडियम मध्ये राहण्याची सोय केली गेली होती. खाली झोपायला फक्त एक कापड. पण इतका उल्हास आणि आनंद की विचारु नका. जसे पंढरीच्या वारीतील वारकरी. अनेक लोक भजनं म्हणत होती. आसारामायणाचे पाठ करीत होती तर काही शांतपणे माळेवर जप करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून फ्रेश होऊन लायनीत लागलो. बापूचं दर्शन घेतले. प्रसाद घेतला. दिवसभर आश्रमात होतो पण अतिशय आनंदात होतो. ओळखीचा एक सुध्दा नव्हता पण अनेक जन्मांची सोबत असल्यासारखे सगळे वागत होते. साधकांच्या सेवेसाठी आश्रमवासी झटत होते. लाखांवर लोक होते पण सगळीकडे शिस्त होती. तीन दिवस थांबून घरा कडे निघालो. गुरुपौर्णिमेला हजेरी लावली याचं समाधान मनात भरून राहिलं होता.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults