फिके सारे तुजविण

Submitted by सुप्रिया जाधव. on 13 March, 2020 - 23:46

कधी उत्सव फुलांचे 
कधी पानगळ झडे 
माझ्या उद्विग्न मनात 
रंग घालतात सडे

निळ्या सागराची माया 
मावे माझ्या काळजात 
बाष्पीभवन दुःखाचे 
पाणी आणते डोळ्यात

रंग कातळाचा काळा 
डोळ्यांमध्ये सामावतो  
अमावस्या-पौर्णिमेचे 
प्रतिबिंब रेखाटतो 

वेगळाले रंग-ढंग 
नित्य दावतो निसर्ग 
माझ्या तना-मना होतो 
रोज काव्याचा संसर्ग 

नको कातावू जीवना 
रया गेल्या मनावर 
इंद्रधनू उमटते 
रंगहीन पाण्यावर

बावरल्या ह्या मनास 
सतरंगी दडपण
सांग निवडू कुठला? 
फिके सारे तुजविण

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users