:- पुतळे -:

Submitted by jayshree deshku... on 13 March, 2020 - 09:31

:- पुतळे -:
“ चंपा, लई भारी.....लई भारी बघ. आजच्या घागरा चोली मध्ये तू लई भारी दिसत आहेस. तशी तू कुठल्याही ड्रेसमध्ये भारीच दिसतेस, पण आज लाजवाब!” असे म्हणत विनयने मॉडेलच्या हातात एक मोत्याची पर्स अडकवली, तिला एक फ्लाईंग किस दिला. विनय मोठ्या प्रेमाने मॉडेल्सना ड्रेस चढवत होता. त्यांना तो काही ना काही नावाने संबोधत होता. त्यांच्याशी बोलत होता. विनयचे हे नित्याचेच वागणे मोह्नच्याच काय पण दुकानातल्या सर्वांच्याच परिचयाचे झाले होते. दुसऱ्या एका मॉडेलला साडी नेसवत असलेला मोहन विनयला म्हणाला,
“ए विन्या, बास झालं त्या चंपाच कौतुक आणि तिच्याशी गप्पा मारण. साडेदहा वाजले. कस्टमर यायची, आपली भवानीची वेळ झाली. काऊटरला कोण नसल तर मालकाचा ओरडा खावा लागेल.”
मोहनच्या बोलण्याने विनय भानावर आला. त्याने मनगटावरच्या घड्याळात पाहिलं, पुन्हा एकवार चंपाकडे म्हणजे त्या मॉडेल पुतळ्याकडे प्रेमपूर्वक पाहिलं आणि तो काऊटरकडे वळला.
‘ Fashion Era’ ह्या मोठ्या बुटीक मध्ये विनय गेल्या दहा वर्षा पासून म्हणजे वयाच्या १७-१८ व्या वर्षापासून काम करत होता. त्याला आता कपड्यांची, त्याच्या सूताची चांगली पारख झाली होती. कुठले ड्रेस मॉडेल्सना चढवावे, कुठले गिऱ्हाईकांच्या नजरेत भरतील, कुठल्या fashion चा ट्रेंड किती दिवस चालेल, सारे सवयीने त्याने आत्मसात केले होते. मुळातच कल्पक दृष्टीकोन असलेला विनय, सणवार पाहून शोकेसची सजावट बदलायचा. त्या सजावटीला अनुसरून असे मॉडेल्सना चढवलेले सर्व ड्रेस गिऱ्हाईकांच्या मनाचा वेध घेतल्यावाचून रहात नव्हते. मॉडेल्सवरच्या सर्व ड्रेसची विक्री व्हायची.
बुटीकचे मालक शिवरामन विनायवर खुश होते. विनय काऊटरवर असला की दुकानात आलेले आणि विनयने हाताळलेले गिऱ्हाईक दुकानातून रिकाम्या हाताने कधीच परत जात नसे.
“ताई, हा ड्रेस तुम्ही घ्याच, एकदम एक्सक्लूझिव्ह आहे बघा, असा पुन्हा कुठे मिळणार नाही, माझ ऐका, तुम्हाला एकदम खुलून दिसणार बघा, ताईबरोबर तुम्ही पण घेऊन टाका काकू, तुमच्यासाठी पण आपल्याकडे बेस्ट ड्रेस आहेत बघा, साड्या हव्या असतील तर साड्या पण एकसे एक दाखवतो तुम्हाला. बघा तर तुम्ही सगळ्याच सिलेक्ट करणार!”
गिऱ्हाईकांशी असं काहीबाही मिठ्ठास बोलण्यात विनय चतुर होता. ह्या सर्व गोष्टींमुळे बुटीकच्या इतर सर्व कामगारांपेक्षा विनयचा पगार पण जास्त होता. इतरांना पंधरा हजार तर विनयला वीस हजार पगार होता. त्यामुळे बुटीक मध्ये सर्वजण त्याच्यावर जळायचे. कल्पक दृष्टीकोन असलेल्या विनयच्या दृष्टीमध्ये मात्र दोष होता. विनयचे ते न्यून पकडून बुटीक मध्ये त्याचे काही साथीदार त्याला ‘ए डूचक्या’ म्हणून हाक मारायचे. तो ती गोष्ट कधीच मनावर घेत नसे. असे बोलणाऱ्यांच्या बोलण्याकडे तो दुर्लक्ष करत असे. शिवरामनच्या नजरेतून ह्या गोष्टी सुटत नव्हत्या. सगळ्यांना जास्त पैसे मिळवण्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी इन्सेटिव्ह सुरु केला. दिवसभरात कोण किती गिऱ्हाईक हाताळतो, किती माल खपवतो ह्यावर प्रत्येकाचा इन्सेन्टिव्ह ठरत असे. अर्थातच विनय इन्सेन्टिव्ह पण जास्त कमवत असे. त्यामुळे इतर बरोबरीच्या कामगारांची होणारी चरफड विनयला रुचेनाशी झाली होती.मग त्याने आपणहून स्पर्धेतून माघार घेतली आणि शोकेस सजावट, मॉडेल्स सजावट, नवीन मालाचं लेबलिंग ही कामे करायला त्याने सुरुवात केली.
सगळ्या पुतळ्यांना त्याने नावे दिली. चंपा,सोना, रिना, टीना, मोना अशी. नवीन मालाच लेबलिंग झाल की, तो आज कुठल्या पुतळ्याला कुठला ड्रेस चढवायचा हे ठरवत असे. वेळोवेळी डिझायनर कडून शोकेससाठी डिझाईन तयार करून घेत असे. हल्ली तो पुतळ्यांमध्ये जास्तच रमायला लागला होता. मैत्रिणींशी गप्पा माराव्यात तशा त्याच्या त्या निर्जीव पुतळ्याशी एकतर्फी गप्पा चालू झाल्या होत्या.
“ टीना तू आज जीन घालायची. रिना तुला चुडीदार देऊन टाकू. चंपा, तुझ्या हेअर कटला जरदोशी वर्कची साडी सूट होईल. सोना, तुला आज वधू पोशाखात नटवू. हा डिझायनर शालू आज तुला. कालच आलेल्या मालातला आहे. न्यू ब्रान्ड एकदम!”
पुतळ्याशी बोलता बोलता तोंडाबरोबर त्याचे हातही तसेच भराभर चालायचे. एखाद्या बाईला सुध्दा येणार नाही इतकी सफाईदार साडी तो मॉडेलला नेसवत असे.
ह्या पुतळ्यांसारख्या सुंदर वस्त्रे परिधान केलेल्या सुंदर सुंदर युवती आपल्या मागे पुढे करत आहेत. कोणी आपल्याला चहा ऑफर करत आहे, तर कोणी जेवण, कोणी आपल्या खांद्यावर हात ठेवत आहेत तर कोणी आपला भंग पाडत आहे आणि आपण सलमान,शाहरुख यांच्याप्रमाणे रुबाबदार दिसत आहोत. आपल्या अंगावर उंची पोशाख आहे, अशी स्वप्ने वारंवार विनयच्या डोळ्यांसमोरून तरळून जायची. तेवढ्यात त्याची नकटी, मिचमिच्या डोळ्यांची बायको त्याला प्रश्न करायची,
“काय हो कसला विचार चाललाय? मेला सारखा तो पुतळ्यांचाच आणि दुकानातल्या मालाचाच विचार करता.मी म्हणते दुकानात एवढे सुंदर सुंदर ड्रेस,साड्या येत असतात, पण बायकोसाठी काही आणावं असं कधी वाटत नाही का हो तुम्हाला?” विनयची तंद्री त्यामुळे भंग पावत असे. मान वर करून तो आपल्या बायकोकडे बघे आणि म्हणे,
“छा! काय पण तू ना!” काय पण ही बायको आपल्याला मिळाली असा त्याचा बोलण्याचा गर्भिर्तार्थ असे,पण तिला बिचारीला वाटे, आपण नवऱ्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवतो म्हणून हा असा बोलतो की काय? मग ती गप्प बसत असे.
तिच्या डोळ्यांपुढे नवऱ्याचा तुटपुंजा पगार, घरातला वाढता खर्च, वाढती महागाई दिसत असे. उंची वस्त्रे फक्त दुकानातल्या शोकेस मधल्या पुतळ्यांसाठीच असतात असेच ती समजून होती. पुन्हा स्वत:साठी ड्रेस घ्यायचा म्हणल की तिच्या नजरेसमोर त्याचं छोट बाळ,त्यांचा दोन वर्षाचा मुलगा आश्विन दिसत असे. ‘आपल्याला कमी पडल तरी चालेल,पण अश्विनला सगळ मिळालं पाहिजे.’ अस तिला वाटे. आश्विन दिसायला पण गोंडस होता. आईचा गहू वर्ण, वडीलांचं सरळ नाक, टपोरे डोळे. तरतरीतपणा त्याने घेतला होता. आश्विन दोघांच्या काळजाचा तुकडा होता.
विनयच्या खांद्यावर हात ठेवत त्याच्या बायकोने अनघाने त्याच्या मागे टुमण लावलं,
“ अहो, आपल्याला नको काही नव,पण आपल्या आशुसाठी तरी नवीन कपडे आणू या ना! दसरा दिवाळी सगळे सणाचे दिवस जवळ आले आहेत. तुमच्या दुकानात गर्दी वाढली की, तुमचा पाय घरात ठरणार नाही. रात्री यायला उशीर होणार, तेव्हा एवढ्यातच आशूची खरेदी व्हायला हवी.”
विनयला बायकोचे बोलणे पटले. तो मोठ्या उत्साहाने म्हणाला, “ ह्या गुरुवारी मी लवकर घरी येईन तेव्हा आपण संध्याकाळी जाऊन आशूला कपडे आणूयात. तिथल्या शोकेसमधल्या पुतळ्यांना घातलेले कपडेच आपण सिलेक्ट करूयात.”
“तुम्हीपण ना ! जिथे तिथे पुतळ्यां शिवाय तुम्हाला काही दिसत नाही. शेवटी पुतळे ते पुतळेच. पुतळ्यांच्या विश्वातून जरा सजीवांच्या विश्वाकडे पहात जा. आपण कुठे वावरतो याचे भान ठेवत जा.” अनघा विनयवर डोळे वटारत बोलली.
गणपतीचे दिवस चालू होते. विनयने पुतळ्यांना शरारा,घागरा,चनिया चोली, शालू अशी उंची वस्त्रे, साड्या परिधान केल्या होत्या.ब्रोकेडचे ब्लाउजपीस मोदकाच्या आकारात घडी घालून शोकेसमध्ये ठेवले होते.पुतळ्यांच्या हातात फुलांची परडी,आरतीचे ताट दिले होते. नंतर त्याने सगळ्या सजावटीकडे एक प्रेमाचा कटाक्ष टाकला. मोनाने त्याच्याकडे बघून डोळा मारला. विनयने चंपाकडे पाहिले. चंपाने पण तसेच केले. टीना, रिना त्याच्याकडे बघून हसल्या.
“ काय ग बायांनो आज काय तुम्ही नवीन आरंभल आहे? रोज मी तुम्हाला हाय बाय करतो आणि आज तुम्ही स्मित करताय, डोळे काय मारताय, च्यायला मला भास झालेला दिसतोय.”
एक दोन दिवसांनी पुन्हा असचं घडलं. सोना,टीना,रिना, चंपा विनयकडे बघून हसल्या तर मोनाने तोंड वाकड केलं. विनय अजीजीने म्हणाला,
“ मोना तुला स्कर्ट आणि टीशर्ट आवडला नाही काय? पण राहू दे आज. आपण उद्या तुला जीन देऊ, रुसू नकोस बाई!” अस म्हणत विनयने एक कटाक्ष शोकेस सजावटीवर टाकला. आणि स्वत:वरच खुश होत बारीक शिळ घातली आणि तो दुसऱ्या कामाला लागला.
हल्ली वारंवार पुतळ्यांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव विनय निरखित असे. आपण कुणाला तरी हे सांगाव असं त्याला वाटू लागलं. दुकानात काम करणारा मय्यपा त्याची कधी चेष्टा करत नसे. म्हणून विनय सहजच मय्यपाला म्हणाला,
“अरे आजकाल हे पुतळे मला चक्क डोळा मारतात, माझ्याकडे बघून हसतात.” कधीही विनयची चेष्टा न करणारा मय्यपा पण विनयचं अस बोलण ऐकून त्याला म्हणाला,
“अबे तुझी बायको तरी तुझ्याकडे बघून कधी हस्ती का? का कधी तुला डोळा मारती? काय पण खुळ्यागत स्वप्न बघतय आणि काय पण बोलतय.”
विनय हिरमुसला, आणि स्वत:शीच पुटपुटला, ‘माझ्या ह्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार? कुणाला काही सांगण्यात अर्थच नाही.’
त्या दिवशी रात्री घरी आल्यावर विनयला राहवले नाही. तो बायकोला अनघाला म्हणला,
“आजकाल हे पुतळे तुम्हा बायकांप्रमाणे एखाद्या ड्रेसवर नाराजी व्यक्त करतात तर एखाद्या ड्रेसवर खुश असतात.”
“अस का! आणि हे तुम्हाला कळत? तुमच्या कानात सांगतात वाटत.” अस म्हणून अनघा खळखळून हसली.
“विश्वास वाटणार नाही तुला, पण हे खर आहे. त्यांना एखादा ड्रेस आवडला तर त्या मला डोळा मारतात किंवा माझ्याकडे बघून हसतात. नाही आवडलं तर तोंड वाकड करतात.”
“त्या पुतळ्यांच्या आणि कपड्यांच्या सहवासात राहून तुम्हाला दुसर काही सुचतच नाही बघा. बर मी काय म्हणते ते ऐका. माझ्या भावाचा, दिनूचा दिवाळीच्या पाडव्याला साखरपुडा आहे. तेव्हा मी दिवाळीला आईकडेच जाईन म्हणते. तुम्ही या मागून तुम्हाला सणाची काही सुट्टी मिळणार नाही.” अनघा म्हणाली.
अनघा म्हणते ते कदाचित बरोबरही असेल. पुतळ्यांच्या सहवासात, त्यांच्यांशी गप्पा मारत राहिल्याने असे भास होत असतील, असा विचार करत विनय झोपी गेला. स्वप्नात त्याला सरळ नाकाची, टपोऱ्या डोळ्यांची सुंदर युवती दिसली. सुंदर फ्रॉक घालून ती त्याच्याबरोबर डान्स करत होती.विनयने तिला विचारले, “कोण ग तू?” तेव्हा ती लाजत म्हणाली,
“इश्श! हे काही विचारण झाल? मी तर तुमची अनघा” अनघा बरोबर डान्स करत असलेल्या विनयला पाहून साऱ्याजणी टीना,रिना, सोना, मोना त्याच्याकडे गुश्यात डोळे वटारून पहात होत्या. विनयला जाग आल्यावर, पडलेल्या स्वप्नाबद्दल त्याचे त्यालाच हसू आले.
दसरा दिवाळी साठीचा नवा माल गणपती उत्सवातच दुकानात येऊन पडला होता. सर्व माल चेक करण्याचे, लेबलिंग करण्याचे,मोठे जोखमीचे काम विनयकडे होते. शिवरामननी आणि व्यवस्थापकांनी मिळून बनवलेली प्राईस लिस्ट विनयच्या हातात पडली. गणपती झाल्यावर लगेच अनघा मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. दिवाळी झाल्यावरच आता ती परत येणार होती. विनयलाही अर्थात बरेच वाटले. दुकानातून घरी यायला रोज रात्र होणार, मग अनघा रुसणार, भांडणार, त्यापेक्षा ती सध्या नाही तेच बरे आहे.अनघाचे माहेरी जाणे, दुकानातल्या इतर कामगारांच्या पण पथ्यावर पडले. सगळेजण म्हणू लागले,
“ए विन्या रातच्याला थांबून तू सगळी काम जात जा.दिवसा आम्ही बघू. तू उशिरा येत जा. नाहीतरी तुला घरी जाण्याची घाई नाहीच.” विनयने सर्वांच्या बोलण्याला होकार दिला.
लेबलिंग झालेला नवा माल तो लगेच पुतळ्यांवर चढवू लागला. साऱ्याजणी खुश होत्या. टीना,रिना, सोना, मोना, चंपा विनयकडे बघून गोड हसत होत्या. विनयला रात्री घरी यायला १२-१२:३० वाजू लागले. त्याने रात्री घरी जाण्याआधीच पुतळ्यांचे ड्रेस बदलून जायला सुरुवात केली.
त्यादिवशी रात्रीचे १२:१५ वाजेपर्यंत विनयचे काम चालले होते. त्यानंतर त्याने पुतळ्यांना चढवायचे ड्रेस काढले. शोकेसपाशी तो सारे ड्रेस घेऊन आला, तो सोनाचा पाहिला ड्रेस उतरवणार तोच सोना त्याला म्हणाली,
“ए विन्या मला हा ड्रेस नको आहे.” विनय एकदम चमकून सोनाकडे पाहू लागला, तोच चंपा म्हणाली, “ ए विन्या त्या पाच नंबरच्या वॉडरोब मध्ये तिसऱ्या खणात घागर आहे, तो मला चढव.” तोच टीना म्हणू लागली, “ए खुळ्या बघतोस काय असा, तिथेच वरच्या खणात असलेला घागरा मला आण.” तेवढ्यात रिना ठसक्यात बोलली, “आम्ही सगळ्याजणी आज घागराच घालू.” विनयच्या नकळत त्याचे पाय त्या दिशेला वळले. त्याच्याही लक्षात न राहिलेले घागरे त्या खणातून त्याला आढळले. त्याने पहिले ड्रेस तसेच ठेवले आणि त्या सर्व पुतळ्यांना घागरे चढवले. साऱ्याजणी विनयकडे पाहून गोड हसल्या.
दुसरे दिवशी मोहनने सकाळी दुकान उघडल्या बरोबर शोकेस न्याहाळली. नव्या ड्रेस ऐवजी जुना माल काढलेला पाहून त्याने व्यवस्थापकांकडे विनयची चुगली केली. तेव्हा तो उलट त्याला म्हणला,
“जाऊ देना बे, जुना माल खपवायचा विन्याचा विचार असेल बहुतेक.” त्या दिवशी नेमके पुतळ्यांवरचे चारही घागरे कस्टमरला आवडले आणि विकलेही गेले. विनयच्या हुशारीची वाहवा झाली. मोहन मात्र चरफडत राहिला. खरे काय घडले हे विनायाखेरीज कुणालाच ठाऊक नव्हते. विनयने पण कुणाला काही सांगितले नाही.
दुसरेदिवशी विनय काम उरकून रात्री पावणेबारा वाजताच घरी जायला निघाला. जाऊदे उद्या बदलू ड्रेस असा त्याने मनाशी विचार केला. कारण त्याला काल रात्रीचा प्रसंग अजुनी आठवत होता. आणि त्याच्या अंगावर शहारा आणीत होता. तोच त्याला हाक ऐकू आली. रिना त्याला बोलवत होती. ती चक्क विनयकडे वळली होती. “ए विन्या अस बर जाऊ देईन मी तुला, सात नंबरच्या वॉड्रोबमधला डिझायनर साड्यांचा गठ्ठा काढ. आम्ही सर्वजणी त्या साड्या परिधान करू. विनयची पाऊले तिकडे वळली. त्याने साड्या काढल्या. त्याच्याही नकळत पुतळ्यांनी त्या स्वत:च परिधान केल्या. गळ्यात मोत्यांचे सर चढविले गेले. हातात पर्स दिल्या गेल्या. दुसरेदिवशी साड्यांबरोबर मोत्याचे सर, पर्स सगळ्याचीच गिऱ्हाईकांनी मागणी केली. शिवरामन विनयवर भारीच खुश झाले. नव्याने मोत्यांच्या दागिन्यांची त्यांनी ऑर्डर दिली. कपड्यांच्या बरोबर आता शोकेसमध्ये दागिनेही झळकू लागले.
पुतळ्यांवरच्या कपड्यांची, दागिन्यांची,विक्री झपाट्याने होत राहिली. दुकानात विनयची वाहवा होत होती. पण त्याला त्याचे काहीच वाटत नव्हते. तो खुश नव्हता. उलट अबोल झाला होता. एक दोनदा मय्यपाने त्याला डिवचले पण,
“काय बे आजकाल तू पुतळ्यांशी बोलणे सोडले गड्या, हे काय बरोबर नाही आता आमची करमणूक कशी होणार?” तरी विनय त्यावर काहीच बोलला नाही. नुसते हसण्याचा केविलवाणा प्रयत्न त्याने केला. तो मनाशीच म्हणाला, ‘पूर्वी मी पुतळ्यांशी बोलत होतो आणि ते ऐकत होते. आता ते बोलतात आणि मी ऐकतो आणि तसे वागतोही. सध्या अनघा पण इथे नाही.कुणाशी बोलायचे आणि कुणापाशी मन मोकळे करायचे? ती फोनवरून हालहवाल विचारते, पण हि गोष्ट तिच्याशी फोनवर बोलण्यात अर्थ नाही.’
दिवस चालले होते.दसरा झाला. दिवाळी आता तोंडावर आली. दुकानात खरेदीसाठी नुसती झुंबड उडाली. नव्याने सुरु केलेल्या दागिन्यांचा सेल पण वाढला. शिवरामननी विनयला सांगितल, अगदी खडसावून, “आता जुना माल काढू नकोस. फ्रेश माल आहे त्यातलेच ड्रेस शोकेसमध्ये झळकायला हवेत.”
रात्री दुकानात एकट्याने थांबायची विनयला थोडी भीतीच वाटायला लागली होती. त्याने आज सिक्युरिटी गार्डला बाहेर थांबण्या ऐवजी दुकानातच थांबण्याची विनंती केली. सगळे काम उरकल्यावर विनयने नव्या लॉटमधले ड्रेस निवडून काढले आणि शोकेसपाशी गेला.सिक्युरिटी गार्ड विनयच्या पाठोपाठ होताच. विनयने पुतळ्यांना नवीन ड्रेस चढवले. सोना सोडून सगळ्याजणी विनयकडे बघून गोड हसल्या. सोनाने नाक मुरडले. पण काहीच बोलली नाही.
दुसरे दिवशी मोहनने दुकान उघडले. शोकेसकडे नजर टाकली तर सोनाच्या अंगावरचा अनारकली कुर्ता खांद्यावर फाटलेला दिसला. मोहनला विनयची चुगली करण्याची आयती संधी मिळाली. विनय दुकानात आल्यावर व्यवस्थापकाने विनयला फैलावर घेतले.
“ चेकिंगच्या वेळी ड्रेसमध्ये काही डीफेक्ट नव्हता.आणि आत्ताच कसा ड्रेस फाटला? तू झोपेत ड्रेस बदललेस आणि खिळ्याला लागून त्याचा भोसका निघाला. तुझ्या पगारातून नुकसानभरपाई का म्हणून घ्यायची नाही?”
ड्रेस डिफेक्टीव पीस मध्ये टाकला गेला. आणि त्या पीसची कमी केलेली किंमत विनयच्या पगारातून वसूल करण्याचा निर्णय घेतला गेला. ऐन दिवाळीच्या वेळी विनयच्या पगारातून दोन हजार रुपये कात झाले. विनय मनात म्हणाला ‘ही सर्व सोनाची करामत आहे. पण मी कितीही ओरडलो तरी विश्वास कोण ठेवणार? कोणीही म्हणेल पुतळ्यांना का भावना असतात? पण हे पुतळे तीव्र अभिलाषेने जागृत झालेले पुतळे आहेत. माझी अनघा मात्र आपल्या भावनांवर मात करून पुतळ्यासारखी जगत आहे. कधी कशाची अवास्तव,अवाजवी अपेक्षा माझ्याकडून करत नाही. असा समंजसपणाचा पुतळा नकोस बनू बाई! कधी कधी हट्ट करत जा, असं मला अनघाला म्हणावसं वाटत. कधी ती दुकानात येत नाही. ‘अहो,नको मला मोह होतो, त्यापेक्षा तुमच्या दुकानातला कपडा बघणच नको ना!’ अस म्हणते. हल्ली इथ माणस पुतळ्यां प्रमाणे वागायला लागली आहेत. आणि पुतळे माणसांप्रमाणे! मला वाटत गिऱ्हाईकांच्या वासनांनी भारावलेले हे पुतळे असावेत.
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची आदली रात्र. दुसरेदिवशी विनयने सासुरवाडीला जायचे ठरवले होते. तसे त्याने अनघाला फोनवर सांगून ठेवले. व्यवस्थापक आणि शिवरामननी विनयला पुतळ्यांना पारंपारिक पोशाख चढवायला सांगितले होते. विनयने सिलेक्टेड पैठण्या आणि शालू काढले. तो घाबरतच शोकेसपाशी गेला. त्याच्या हातातल्या पैठण्या पाहून सोना म्हणाली,
“ ए विन्या, ते बाजूला ठेव. आम्हाला आज जीन, टी-शर्ट, कॅप हवी आहे.” तेवढ्यात चंपा म्हणाली, “मला शालू आवडेल” सोनाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विनयने चंपाला शालू चढवला. चंपाने विनयला डोळा मारला. ‘हुश्श’ चंपा तरी खुश आहे. सोना रागाने विनयकडे पहात होती. विनय तिला म्हणाला, ‘ए बाई जरा ऐक ना! माझी नोकरी जाईल.’ असं म्हणत पैठणी घेऊन विनय सोनाकडे वळला. सोना जवळ उभ्या असलेल्या टीनाने विनयचे हात गच्च मागे आवळले. आणि सोनाने एकदम करकचून विनयचा गळा आवळला. त्या क्षणीही विनयला अनघाची आठवण झाली. ‘तूच ग माझी खरी रिना, टीना, मोना, चंपा. ‘सोना .... आवळल्या गेलेल्या गळ्यातून विनयने अस्फुट शब्द उच्चारले, “अनघा ...मी..मला..माफ” विनयचे सुटकेचे प्रयत्न असफल ठरले.त्याचा निष्प्राण देह खाली कोसळला. विनयच्या सांगण्यावरून सिक्युरिटी गार्ड आज केव्हाच बाहेरून दुकान लॉक करून गेला होता. कारण आज विनय दुकानातच झोपणार होता. पण तो कायमचाच निद्रिस्त होणार होता, हे नियतीच्या मनात होते की काय कुणास ठाऊक?
सकाळी आठ वाजता सणाचे लवकरच म्हणून मोहनने दुकान उघडले. नेहमीप्रमाणे आल्या आल्या त्याची शोकेसकडे नजर गेली. शोकेसमधील दृश्य पाहून मोहन चक्रावलाच आणि स्वत:शी बडबडायला लागला,
“काय ह्या विन्याच डोक बिक फिरलय की काय?काय पण सीन. मध्ये चंपा शालू मध्ये उभी होती. टीना तिचे हात मागे आवळत होती. सोनाचे हात चंपाच्या गळ्याभोवती होते. रिना आणि मोनाने आपल्या डोळ्यांवर हात ठेवले होते. सगळ्यांनी जीन टी-शर्ट घातला होता. डोक्यावर कॅप होती. मोहन पुन्हा बडबडला, “दिवाळीच्या पहिल्या दिवशी हि सजावट? छे! छे! शोकेसवर ताबडतोब चादर किंवा कापड टाकून ती झाकली पाहिजे.” मोहन कापड घेऊन शोकेसपाशी गेला त्याने झोपलेल्या विनयला पाहिले आणि हाक मारली, “ए विन्या उठ उठ लवकर.” टीना बोलली, ‘विनयचा खेळ खल्लास.’ सोनाने मोहनचा हात गच्च पकडला आणि मोहनची एकदम दातखीळच बसली.

Group content visibility: 
Use group defaults

कथा छान फुलवली आहे. पण पहील्यांदा जो लाईट , गोड मूड होता तो नंतर नंतर म्हणजे खरं तर शेवटी फार गंभीर होउन गेला. पण मस्तच फुलवली आहे.

जशी काही अनुवादित केली आहे असं वाटत होतं, पण शेवट रुचला नाही. उलट चंपा सजीव होऊन विन्याबरोबर रोमान्स करते असे वाचायला आवडलं असतं.

छान कथा,आवडली
पण असा शेवट नकोसा वाटला, बिचारा विनय अन्तत्याचं कुटुंब..!

सामो. मामी, परशुराम, वावे, मिनाक्षी, मन्या , प्राचीन सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद
जगात दिसायला सुंदर दिसणाऱ्या गोष्टी किंवा माणसे प्रत्यक्षात सुंदर असतातच असे नाही. माणसाने दिखाव्याच्या मागे लागू नये. जेव्हा आपल्या माणसाची किंमत कळते तेव्हा आपल्या जवळच्या माणसांना गमावण्याची पाळी आलेली असते. मनाने सुंदर माणसांचा संग करावा. असं मला यातून सूचित करायचं आहे.