महिलांचा सन्मान

Submitted by ShamalSawant on 10 March, 2020 - 05:19

काही दिवसांपूर्वी महिला सुरक्षितता व सन्मान या विषयावर आमची कार्यशाळा झाली. वाटल होत प्रत्येकाचे काही सुंदर विचार ऐकायला व स्वीकारायला मिळतील. काही जनांचे विचार चांगले होतेही, नाही अस नाही. परंतु काहींचे विचार ऐकुन मनात कुठेतरी खंत वाटली की, आज सलग 4 ते 5 वर्ष आपण फुले, शाहु, आंबेडकर, छत्रपती शिवराय यांचे समाज प्रबोधनात्मक विचार समाजापर्यंत पोहचवण्याचे काम करतोय पण अजुनही समाजसुधारकांचे विचार आपणच आत्मसात करु शकलो नाही आहोत. काहींचे ते मागासलेले विचार ऐकुन खरच राहावल नाही आणि त्याचवेळी ठरवल की, थोडस का होईना आपणही आपले विचार सर्वांसमोर लिखाणच्या माध्यमातून मांडावे. माहीत नाही याचा कितीसा परिणाम होईल पण निश्चितच आपण कुठेतरी चुकतोय याची जाणीव प्रत्येकात निर्माण होईल अस मनापासून वाटतय.
काल जागतिक महिला दिनामित्त प्रत्येक ठिकाणी महिलांचा सन्मान केला जाईल त्यांना हार, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला जाईल. एक दिवस त्यांना सन्मान आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा महिलांवरील अत्याचाराच्या घटना नव्याने ऐकु येतील. मुळात महिलांचा सन्मान म्हणजेतरी नेमक काय हे किती जणांना केळलय हे त्यांच त्यांनाच माहित. महिलांचा सत्कार केला म्हणजे त्यांना सन्मान दिला अस वाटणच मुळात चुकिच आहे. महिला दिनामित्त समाजातील प्रत्येक स्त्रीला एकदा विचारुन बघा की, नेमक तिला काय हवय समाजाकडुन. तिच्यासाठी अशी कोणती गोष्ट केली पाहीजे ज्याने तिचा सन्मान होईल.
मला वाटत कोणत्याही स्त्रीला तिच स्वातंत्र्य देण, समान वागणुक देण, तिच्या कतृत्वाला प्रोत्साहन देण म्हणजेच तिचा सन्मान. मग आपण म्हणतो की, स्त्रियांना स्वातंत्र्य दिल तर त्या स्वैर वागतील. पण स्वातंत्रयाचा अर्थ स्वैराचार असा होतो का? हे समजून घेण गरजेच आहे. स्वातंत्र्य किंवा समानता म्हणजे जे पुरुष करतात ते आम्हालाही करु द्या असं नाहीय. तर एका व्यक्तीला जे हक्काने करता आल पाहिजे ते करु द्या. एखादी गोष्ट न करण्याच कारण ‘तु मुलगी आहेस’ हे असु नये एवढच. मुलगा- मुलगी भेद न करता समान वागणुक द्या.
यावर काहीजण म्हणतात कि, आमच्या घरात मुलगा- मुलगी असा भेद केला जात नाही. मुली जी काम करतात तिच काम मुलही करतात. घरातील प्रत्येक कामात मी सुद्धा माझ्या पत्नीला मदत करतो. पण मला वाटत, यात घर कामात मदत करण ही भावनाच चुकिची आहे. मुळात घर दोघांच असत दोघांनी ते सावरायच असत, एकाने पसरवल तर दुसऱ्याने ते आवरायच असतच पण ते पसरुच नये याची काळजी दोघांनीही घेतली तर मदत हा शब्दच दोघांच्याही संसारात राहणार नाही. घरातल काम करण ही फक्त स्त्रीचीच जबाबदारी आहे हा विचारच जर प्रत्येकाने आपल्या मनातून काढून टाकला तर स्त्री किंवा पुरुष श्रेष्ठ ही भावनाच मनात येणार नाही. घर सांभाळण हे जस स्त्रीच कर्तव्य आहे तेवढच ते पुरुषाचही आहे, हा विचार प्रत्येकाने केलातर नक्कीच तो प्रत्येक स्त्रीचा सन्मान असेल. स्त्रीयांना तुमच्याकडून फारस काही नकोय, फक्त तिच्या विचारांचा सन्मान करा. तीच कधी काही चुकलच तर समजावुन सांगा, कधी अडखळलच पाऊल भितीने तर तुमचा खंबीर पाठींबा द्या.
समाजात वावरताना आपली मुलगी,पत्नी,आई किंवा बहिण यांच्याशी जस इतरांनी वागु नये अस आपल्याला वाटत तसच इतर स्त्रीयांशीही आपण वागु नये याचे संस्कार लहानपणापासुनच प्रत्येक मुलावर करा. डोळयाला दिसत आहे, मनाला जाणवत आहे, बुद्धिला पटत आहे की, एखादी गोष्ट चुकीची आहे तरीही त्याला प्रथेने चालल आहे म्हणुन किंवा आपली गैरसोय होईल म्हणुन स्वीकारु नका. त्याला विरोध करा. आज आपली मुल छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवुन किंवा तलवार घेऊन अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते अनुकरण संस्कारांच्या, विचारांच्या बाबतीत असेल तर ते चांगल आहे. केवळ दाढी वाढवल म्हणुन आपण महाराजांचे अनुयायी होणार नाही तर त्यांचे आचार-विचार अंगी बानुन तसे वर्तन केल तर निश्चितच महाराजांचा आदर होईल. महाराजांनी परस्त्रीला मातेसमान मानले. एक सुंदर स्त्री समोर येऊनही त्यांचे विचार बदलले नाहीत. त्या स्त्रिला पाहुन त्यांच्या मुखातून उद्गाार आले ते, “हे स्त्री लावण्यवती, सुंदर स्वरुपवान आहे, आमचे मातोश्रींची तसबीर अशी असती तर आम्हीही चांगले सौंदर्यवान विशेष, आपले मातोश्रींचे उदरी जन्मतो.” छत्रपती शिवरायांचा हा स्त्रीयांविषयीचा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला तर समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल आणि स्त्रीयांना आपोआपच सन्मान मिळेल.
स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक जीवनात मानाचे स्थान मिळाले पाहिजेच पण त्याआधी जीच्या सन्मानासाठी आपण झगडतोय अशा प्रत्येक स्त्रीने जागरुक होऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठविला पाहिजे. देशातील प्रत्येक घटनेबद्दल तिच्यात जागरुकता व सजगता असली पाहीजे. त्यासाठी ती शिकली पाहिजे. ‘मुलगी शिकली तरच तीची प्रगती होईल’ ही भावना तिने सर्वप्रथम स्वत:त रुजविली पाहिजे. साहस आणि निर्भयतेच्या पंखात तिने स्वबळ निर्माण करुन स्वच्छंद भरारी घेतली पाहिजे.
म्हणुनच मुलीला गर्भातच मारु नका, तीला जन्म घेऊ द्या. लहान असताना तीला मनसोक्त बागडु द्या, किशोरवयात तिला समजुन घ्या, लग्न करुन देताना तिचाही विचार घ्या, पत्नी / सुन म्हणुन घरात आणलात तर तिच मन हळुवार जपण्याचा प्रयत्न करा, वृद्धापकाळात तीला सावरून घ्या. तिला केवळ मुलगी म्हणुन झिडकारु नका. तिचही स्वत:च अस वेगळ अस्तित्व तिला निर्माण करु दया. मग बघा स्वातंत्र्याच्या स्वच्छंदी आभाळात ती सन्मानाने मुक्त विहार करेल.
स्त्रीला तिच स्वातंत्र्य, समता हक्काने मिळु द्या. मागुन मान मिळतो सन्मान नाही. म्हणुनच या महिला दिनामित्त स्त्रीच्या मनातील भीती नष्ट होऊन तिला स्वतंत्र अस्तित्व् मिळाल तर निश्चितच तिचा सन्मान होईल अस मला वाटत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users