एक सुंदरशी नाव

Submitted by द्वैत on 8 March, 2020 - 00:07

(कौटुंबिक हिंसाचार सहन न करता स्वतःचा नवीन मार्ग, स्वतःची नवीन ओळख निर्माण करू पाहणाऱ्या त्या धाडसी "नावे" साठी म्हणून कधी लिहिलेल्या ह्या ओळी आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने)

एक सुंदरशी नाव

एक सुंदरशी नाव
उतरली नदीच्या डोही
मागे सोडून अपुला गाव
जराशी गोंधळली, जराशी घाबरली
नव्हता तिला ह्या प्रवाहाचा ठाव

दिसतो स्तब्ध शांत संयमी
नेईल तारून मज मुक्कामी
जपेल मजला चहूबाजूंनी
मनी तिच्या हे भाव
एक सुंदरशी नाव
उतरली नदीच्या डोही
मागे सोडून अपुला गाव

स्तब्ध जरी हा गहिरा दिसतो
शांत कधी तर कधी खवळतो
चित्र विचित्र ह्याच्या लहरी
कधी तडाखे संशय जहरी
सहते सारे मुकेपणाने
वाटे कोणा करी बहाणे
पदरी आता फक्त वाहणे
एकच आशा देवावरती
पैलतीरी तू लाव
एक सुंदरशी नाव
उतरली नदीच्या डोही
मागे सोडून अपुला गाव

तो ही आता निष्ठुर झाला
गाव कधीचा दूर राहिला
पण नावेने निश्चय केला
ध्येर्याने मग मार्ग बदलला
नव्या प्रवाही स्वतः मी वाहीन
पैलतीराला एकदिन जाईन
अडेल वारा कधी जलधारा
मिळेल त्यांचा कधी सहारा
जाईन कुठवर कोण किनारी
दुरून पाहिल गाव
एक सुंदरशी नाव
उतरली नदीच्या डोही
मागे सोडून अपुला गाव
मागे सोडून अपुला गाव

- द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users