मन वढाय वढाय (भाग २१)

Submitted by nimita on 2 March, 2020 - 21:35

बघता बघता स्नेहा आणि रजतच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. दोन्ही परिवारांनी मिळून त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस अगदी थाटात साजरा केला. सकाळपासूनच घरात उत्साहाचं, उत्सवाचं वातावरण होतं. त्या दिवशी स्नेहाच्या माहेरचे सगळे तिच्या घरी आले होते... नेहेमीप्रमाणे वंदना आणि नीला ची थट्टा मस्करी, हसणं खिदळणं चालूच होतं.. इतरांनी त्यांना थोपवण्याचा निष्फळ प्रयत्न करून पाहिला- पण आज त्या दोघी कोणाचंच काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर त्यांची अवस्था अगदी 'आज मैं उपर, आसमाँ नीचे' अशी झाली होती. आणि त्याचं कारणही तसंच होतं... आज त्या दोघी सुद्धा स्वतःच्या नव्या नात्याचा पहिला वाढदिवस साजरा करत होत्या. आता त्या नुसत्या जिवाभावाच्या मैत्रिणी नव्हत्या तर एकमेकींच्या विहिणी सुद्धा होत्या ! आणि खरंच ; त्या दोघींचं हे नवं नात सुद्धा अगदी कोणालाही हेवा वाटावा असंच होतं.

स्नेहा तर खूपच खुश होती. रजतच्या सहवासात एक वर्ष कसं आणि कुठे निघून गेलं हे तिलाही कळत नव्हतं. गेल्या वर्षभरात असे कितीतरी प्रसंग घडले होते जेव्हा तिला तिच्या आईच्या बोलण्याची प्रचिती आली होती.....' आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्याशी लग्न करावं!' आता स्नेहाच्या मनाच्या सिंहासनावर फक्त आणि फक्त रजतच विराजमान होता. तरीही मधूनच कधीतरी तिला सलील आठवायचा- पण आता त्याच्या आठवणींनी ती पूर्वीसारखी व्याकुळ होत नव्हती. तिच्या शांत, समाधानी मनात उलथापालथ करण्याइतकी तीव्रता नव्हती उरली त्या आठवणीत! तिचं सगळं विश्व आता फक्त रजत आणि त्याच्या कुटुंबामधेच सामावलं होतं. आणि म्हणूनच त्या दिवशी तिच्या उत्साहाला उधाण आलं होतं.

पण रजत मात्र दिवसभर थोडा गप्प गप्पच होता. वरकरणी जरी सगळ्यांच्या थट्टा मस्करीला हसून उत्तरं देत असला तरी ते हसू मनापासून नाहीये हे स्नेहाच्या लक्षात आलं होतं. मागच्या वर्षभरात तिला रजतच्या स्वभावातले कंगोरे कळायला लागले होते. आता तिला त्याच्या डोळ्यांत बघून त्याच्या मनाचा ठाव घेता येत होता.

तिनी एक दोन वेळा त्याला नजरेनीच प्रश्नही केला पण त्यानी 'काही नाही गं' असं म्हणत उत्तर द्यायचं टाळलं होतं. मग स्नेहानी सुद्धा जास्त खोलात जायचा प्रयत्न नाही केला. 'योग्य वेळी सांगेलच काय ते'- असा विचार करून तिनी स्वतःचं समाधान करून घेतलं.

त्यानंतर एक दोन दिवस उलटून गेले. खरं म्हणजे स्नेहा रजतच्या उत्तराची वाट बघत होती. पण मुद्दामच स्वतः विषय नव्हती काढत... तिला माहीत होतं 'जोपर्यंत त्याच्या मनाची तयारी होणार नाही तोपर्यंत तो काहीही बोलणार किंवा करणार नाही.' आणि म्हणूनच ती त्याला पुरेसा वेळ द्यायला शिकली होती.

शेवटी एकदाचा रजतनी गौप्यस्फोट केला. रात्रीच्या जेवणानंतर जेव्हा दोघं वर गच्चीत कॉफी पीत बसले होते तेव्हा तो म्हणाला," स्नेहा, मला प्रमोशन मिळायचे चान्सेस आहेत..." रजतचं हे वाक्य ऐकून स्नेहाला खूप खूप आनंद झाला...पण पुढच्याच क्षणी तिला जाणवलं की बातमी फक्त इतकीच नाहीये; कारण तसं असतं तर रजतनी केव्हाच सगळ्यांसमोर ही गुड न्युज जाहीर केली असती.. इतका वेळ नसता लावला सांगायला. पण आपल्या मनातली ही शंका बाजूला ठेवत ती म्हणाली," अरे वा! किती छान बातमी आहे ही ! Congratulations !!! तुझ्या मेहनतीचं फळ मिळालं... And this is just the beginning !!! पण ही इतकी आनंदाची बातमी अशी मला एकटीला का सांगतोयस ? घरच्यांना का नाही सांगितलीस अजून ? " स्नेहानी नेमका प्रश्न केला. त्यावर तिचे हात हातात घेत रजत म्हणाला," अजून नक्की नाहीये गं...म्हणजे आमच्या कंपनीची एक नवी फॅक्टरी उभारणार आहेत- बडोद्याला ...आणि ते प्रोजेक्ट हॅन्डल करायला मला पाठवायचा विचार चालू आहे...पण त्यासाठी आधी दोन आठवड्यांचं एक ट्रेनिंग सेशन होईल; आणि तेही परदेशात....आणि त्यानंतर मग मला बडोद्याला जावं लागेल....निदान पुढची चार पाच वर्षं तरी ... म्हणजे जोपर्यंत फॅक्टरीचं काम नीट सुरळीतपणे चालू होत नाही तोपर्यंत तरी !"

इतकी आनंदाची बातमी असूनही रजत इतका उदास का आहे- हेच कळत नव्हतं स्नेहाला. "अरे, हे तर अजूनच चांगलं झालं ना? इतकी मोठी जबाबदारी तुला सोपवतायत ते तुझ्यावर त्यांचा विश्वास आहे म्हणूनच ना! हे कळल्यापासून मला तर इतकं मस्त वाटतंय !! I am so proud of you ." रजतच्या हातांवरची आपली पकड घट्ट करत स्नेहा म्हणाली.

तरीही रजत मात्र अजूनही थोडा काळजीतच वाटत होता, स्नेहाकडे बघत तो म्हणाला," ते आहेच गं...पण त्यामुळे आपल्याला आपल्या दोघांच्या घरच्यांपासून लांब राहावं लागेल... आणि आता या वयात त्यांना असं एकटं सोडून जाणं मला पटत नाहीये गं... इतकी वर्षं त्यांनी सगळ्यांनी आपल्यासाठी किती खस्ता खाल्ल्या. आपली काळजी घेतली- आपल्या सुखासाठी झटले ! आणि आता जेव्हा त्यांना आपली - आपल्या आधाराची खरी गरज आहे तेव्हा त्यांना असं सोडून जायचं का ?"

"अरे, पण त्यांना सोडून कशाला जायचं ? त्यांना घेऊनच जाऊ या ना आपल्याबरोबर !" स्नेहा पटकन म्हणाली.

"तसं झालं तर उत्तमच आहे, पण मला नाही वाटत ते सगळे आपल्याबरोबर तिकडे यायला तयार होतील," वस्तुस्थिती सांगत रजत म्हणाला," सुरुवातीपासून ते इथेच राहिले आहेत;या जागेशी त्यांच्या कितीतरी आठवणी जोडलेल्या आहेत. त्यांच्या ओळखीची माणसं, मित्र मैत्रिणी सगळे इथेच आहेत.. हे सगळं सोडून ते आपल्याबरोबर येतील असं खरंच वाटतंय का तुला?"

रजतच्या बोलण्यावर थोडा वेळ विचार करत स्नेहा म्हणाली," हं, तू म्हणतोयस तेही खरंच आहे म्हणा! त्यांच्या जागी आपण असतो तर कदाचित आपणही असाच विचार केला असता."

थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. मग काहीतरी ठरवल्यासारखं स्नेहा म्हणाली," आपण एक काम करू या ....आपले हे सगळे विचार त्यांच्यासमोर मांडू या आणि मग त्यांनाच ठरवू दे ना - काय करायचं ते...इथेच राहायचं का आपल्या बरोबर बडोद्याला यायचं ! कारण केवळ आपल्याला वाटतंय म्हणून त्यांना आपल्याबरोबर घेऊन जाणं योग्य नाहीये. आणि जर कधी त्यांना आपली किंवा आपल्या मदतीची गरज भासली तर आपण आहोतच की.. औरंगाबाद आणि बडोदा काही फार लांब नाहीये !! तू म्हणतोस तसं - इतकी वर्षं ते आपल्यासाठी जगले आता त्यांना स्वतःसाठी जगू दे....त्यांना जे योग्य वाटत असेल ते करू दे. पण एक मात्र लक्षात ठेवायचं - ते सगळे मिळून जे काही ठरवतील त्याला आपण पूर्ण पाठिंबा द्यायचा.... आणि तोही अगदी बिनशर्त ! शेवटी त्यांची खुशी, त्यांचा आनंद महत्वाचा आहे आपल्यासाठी....हो ना ?"

स्नेहाचं बोलणं रजतला पटलं. तिच्याकडे हसून बघत तो म्हणाला," किती सहज सोडवलास गं माझ्या मनातला गुंता ! उगीचच विचार करत बसलो होतो दोन दिवस... तेव्हाच तुला सांगायला हवं होतं सगळं !!" रजतनी केलेल्या या कौतुकानी स्नेहा हुरळून गेली. पण वरकरणी त्याला चिडवत ती म्हणाली," कोई बात नहीं। देर आए, दुरुस्त आए। आता यापुढे लक्षात ठेव... तुझी बायको खूप हुशार आहे ....तिचा सल्ला घेत जा नेहेमी...फायद्यात राहशील."

तिला आपल्या जवळ ओढून घेत, तिच्या डोळ्यांत बघत रजत म्हणाला," हं, खरं आहे !आहेच माझी बायको हुशार ! पण अजूनही एका महत्त्वाच्या बाबतीत सल्ला हवाय तुझा....बाब थोडी खाजगी आहे ,त्यामुळे सल्ला पण खाजगीतच हवाय ....देशील ना?" त्याच्या म्हणण्यामागचा खट्याळ अर्थ त्याच्या आतुरलेल्या डोळ्यांत अगदी स्पष्ट दिसत होता स्नेहाला .... कशीबशी आपली नजर सोडवून घेत ती अधीरपणे त्याच्या बाहुपाशात विसावली !!

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका दमात सगळे भाग वाचून काढले.... खूप सुंदर लिहिले आहेस ....
आई आणि आजीचा समजूतदारपणा छान रेखाटलं आहे.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.....
तुमचे कॅन्सर वरील, सैन्यगाथा, ची सिरीज वाचल्या आहेत छान लिहिता तुम्ही असेच लिहित राहा....