मन वढाय वढाय (भाग २०)

Submitted by nimita on 28 February, 2020 - 21:26

आजीचं मुद्देसूद बोलणं ऐकून स्नेहाच्या मनात चालू असलेली घालमेल शांत झाली. तिनी आजीच्या कुशीत शिरत विचारलं," तू आणि आई ... तुम्ही दोघी वरून जरी अगदी साध्या भोळ्या आणि कधीकधी अगदी 'गरीब बिचाऱ्या' वाटत असलात ना ; तरी एकदम ग्रेट आहात हं !! तुमच्याकडे जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं ; आणि समोरच्या व्यक्तीला आपलं म्हणणं कसं पटवून द्यायचं ते बरोब्बर जमतं तुम्हांला...मला का नाही जमत असं तुमच्यासारखा विचार करायला आणि असं वागायला ? "

आपल्या नातीला अजून जवळ ओढून घेत आजी म्हणाली,"जमेल की तुला पण...नक्कीच ! पाण्यात पडलं आणि आजूबाजूला कोणी वाचवणारा नसेल तर आपोआप पोहायला शिकतो माणूस .... आणि अगदीच काही लक्षात नाही आलं तर आम्ही आहोतच की. आणि आता तर वंदना पण आहे तुझ्या पाठीशी! त्यामुळे आमची तुझ्याबद्दलची काळजी मिटली." नंतर बराच वेळ आजी आणि नातीचं एकमेकींशी हितगुज चालू होतं.

ठरलेल्या मुहूर्ताला स्नेहा आणि रजत विवाहबंधनात बांधले गेले. लग्नाचे सगळे विधि खूप थाटामाटात संपन्न झाले. स्नेहाला आपल्या घरी घेऊन जाताना वंदना जेवढी खुश होती त्याहीपेक्षा जास्त आनंद नीलाला झाला होता. तिच्या मुलीला सासू सासऱ्यांच्या रुपात दुसरे आई वडीलच मिळाले होते. पण तरीही स्नेहाला निरोप देताना तिच्या आईचे डोळे पाझरले. आपल्या जीवाभावाच्या सखीला असं भावुक होताना बघून वंदना तिला म्हणाली," अजिबात काळजी नको करू स्नेहाची. थोड्याच दिवसांत ती तुला विसरून जाते की नाही बघ!" त्यावर स्वतःला सावरत नीला बळेच हसत म्हणाली," पण मला स्नेहाची काळजी वाटतीये हे तुला कोणी सांगितलं ? मला तर आता तुझीच काळजी वाटायला लागलीये.... आता तुझा सूनवास सुरू होणार गं बाई!" स्नेहाकडे इशारा करत ती पुढे म्हणाली," आमचं हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाहीये हं...काळजी घे !!!"

इतर वेळी आईचा हा टोमणा ऐकून कदाचित स्नेहा रुसून बसली असती; पण आता तिला तिच्या आईच्या या वरवरच्या हसण्यामागचं, तिच्या या विनोदी स्वभावामागचं हळवं भावविश्व दिसत होतं. स्वतःच्या मनात चालू असलेलं भावनिक वादळ आतल्या आत दाबून ठेवत इतरांना हसवणारी तिची आई आता तिच्या ओळखीची झाली होती. तिनी काही न बोलता आईचे डोळे पुसले ...पण यावेळी आपण आईच्या कुशीत शिरण्याऐवजी स्नेहानी आईला आपल्या कुशीत घेतलं....आणि नीला सुद्धा आपल्या मुलीच्या खांद्यावर डोकं टेकवून शांत झाली. हा candid shot फोटोग्राफर नी टिपला की नाही माहित नाही, पण तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या मनात हे चित्र छापलं गेलं.

काही क्षण असेच अवघड शांततेत गेले.. भानावर येत स्नेहा हसत हसत म्हणाली," इतकी काळजी वाटतीये मावशीची तर मग माझ्या ऐवजी तिलाच बोलावून घेत जा माहेरपणासाठी !आणि मग दोघी मिळून माझ्याबद्दल गॉसिप करा !!! मग तर झालं ?"

स्नेहाचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागले... स्नेहाला कौतुकानी जवळ घेत तिची आजी म्हणाली," बघ, जमलं ना तुला पण.…."कोणालाच आजीच्या या वाक्याचा संदर्भ लागला नाही... फक्त स्नेहा सोडून ! ती मात्र खुदकन हसत आजीच्या कुशीत शिरली.

आता हळूहळू स्नेहा तिच्या नव्या घरात, नव्या माणसांत रुळत होती. त्यांच्याबरोबर तिचं नातं आधीपासूनच होतं- अगदी तिच्या जन्मापासून!पण आता त्या प्रत्येक नात्याला एक नवीन नाव- नवी ओळख मिळाली होती ; याआधी कधीही न जाणवलेला हक्क जाणवत होता स्नेहाला..आणि त्यामुळे त्या नात्यांमधली गोडी अजूनच वाढली होती. पण तरीही आईचं बोलणं स्नेहा विसरली नव्हती...या नवीन नात्यांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तिची सतत धडपड चालू असायची. आणि खरंच तिचा हा प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांना दिसत होता..

रजतच्या आई बाबांना तिच्या या अशा वागण्याचं खूपच कौतुक वाटत होतं... आणि दोघंही येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकासमोर अगदी मुक्तकंठानी आपल्या सुनेची तारीफ करत होते... तिचा नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, तिची पेंटिंग्स आणि बाकी आर्ट वर्क बद्दल अगदी आवर्जून सगळ्यांना सांगत होते. हे सगळं बघून, ऐकून स्नेहाचं मन आत कुठेतरी सुखावत होतं. सलीलच्या वडिलांनी तिला नापसंत केल्यापासून तिला उगीचच स्वतःबद्दल एक प्रकारचा न्यूनगंड जाणवायला लागला होता. 'आपण कुठेतरी कमी पडतोय'- अशी भावना तिच्या मनात मूळ धरू पहात होती. पण आता हळूहळू तिचा कमी झालेला आत्मविश्वास पुन्हा परत येत होता. आणि साहजिकच त्यामुळे तिचं व्यक्तिमत्त्व ही पुन्हा बहरून येत होतं. आजीनी म्हटल्याप्रमाणे रजतबरोबर घालवलेला प्रत्येक दिवस स्नेहाच्या मनात नव्या आठवणी तयार करत होता- खूप हव्याहव्याशा वाटणाऱ्या आठवणी....

पण मधूनच कधीतरी तिच्या मनात सलीलचा विचार तरळून जायचा...त्यांच्या ग्रुप मधल्या इतर मित्र मैत्रिणींकडून अधून मधून तिला सलील बद्दल माहिती मिळत होती. तो अजूनही जर्मनी मधेच होता आणि बहुतेक तिथेच स्थायिक व्हायच्या विचारात होता. हे सगळं कळल्यामुळे स्नेहाला कधीकधी उगीचच कुठेतरी एक अपराधी भाव जाणवायचा.....वाटायचं- "माझ्याशी लग्न करता येत नाही म्हणून सलीलनी जन्मभर एकटं राहायचं ठरवलंय; माझ्या प्रेमाच्या, आठवणींच्या शिदोरीवर उभं आयुष्य काढायचं ठरवलंय ! आणि मी मात्र इथे माझ्या नव्या आयुष्यात, नव्या नात्यात रमले आहे. हा माझा स्वार्थीपणा तर नाहीये ना ? रजतशी लग्न झाल्यावर आता मला या नात्याचं महत्व लक्षात येतंय... 'सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी एका योग्य जोडीदाराचं असणं' हे किती महत्वाचं आहे हे पटलंय मला...आणि माझ्यासाठी रजत हाच योग्य जोडीदार आहे हेदेखील पदोपदी जाणवतंय !! पण मग सलीलच्या आयुष्यात माझ्या 'नसण्यामुळे' जे एकटेपण येईल ते कसं निभावून नेईल तो?"

अशा वेळी तिला तिच्या आजीचं बोलणं आठवायचं आणि मग तिचं भरकटलेलं मन पुन्हा ताळ्यावर यायचं. आजी म्हणाली होती,"या सगळ्यात तुझी काय चूक आहे ? मग तू स्वतःला अशी शिक्षा का बरं करून घेतीयेस? सलीलनी लग्न न करायचा जो निर्णय घेतलाय त्यात तुझ्यावरच्या प्रेमापेक्षा सुद्धा जास्त त्याचा पश्चात्ताप हे मुख्य कारण आहे असं मला तरी वाटतंय."
आजीच्या म्हणण्यातलं तथ्य स्नेहालाही दिसत होतं. आणि म्हणूनच अशा दोलायमान अवस्थेत अडकल्यावर ती आजीची शिकवण आठवून त्यावर अंमल करायचा प्रयत्न करायची..."दिल के साथ साथ दिमाग से भी सोचो।"

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणे उत्तम झालाय हाही भाग, शेवटचं वाक्य तर एकदम चपखल!!!
पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहोत Happy

शुभेच्छा...