मायमराठीची खंत

Submitted by Asu on 27 February, 2020 - 04:17

आज मराठी भाषा दिनी महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी सक्तीची करावी लागत आहे. हे बघून मायमराठीला काय वाटत असेल…

मायमराठीची खंत

परदेशातून आली इंग्लिशमॅडमची स्वारी
माय मराठीचा केला तिनं दुस्वास भारी

तरणी होती माय आता म्हातारी झाली
मातृभाषा मराठी तिला राहिला ना वाली

दुधावर माझ्या मुलं एवढी मोठी झाली
वाघिणीचे दूध पिण्या आता सोकावली

शिकून सवरून मुलं झाली साहेबावानी
वाटते माय आता त्यांना गरीब अडाणी

हाय-हॅलो करी मुलं झाली मोठी श्रीमंत
ओळखही ना देती मनी वाटे मला खंत

देशील मला हात म्हणून वाट पाहते तुझी
परदेशी गेला लेका आबाळ केलीस माझी

अशी कशी देवाजीने मला मुलं पण दिली
गाडाभर असून मुलं कोख वांझोटी झाली

व्हेंटिलेटरवर माय तुझी शेवटच्या क्षणी
भेटायला तरी येशील आस माझ्या मनी

राग नको मानूस लेका बोलले वेड्यावानी
मेल्यावर तरी तुझ्या डोळा येईल का पाणी

मातृभाषा मराठी तिला राहिला ना वाली
मातृभाषा मराठी तिला राहिला ना वाली

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.27.02.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अतिशय वास्तववादी आज मराठी बोलणारी नवी पिढी दुर्मिळ होते आहे. एक भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तिला व्हेंटिलेटर वर ठेवले आहे या कल्पनेतच सारे आले