एक उदासी

Submitted by सुप्रिया जाधव. on 22 February, 2020 - 01:21

एक उदासी
व्यापून उरते

अस्तित्वाच्या
चिंध्या उडवत
स्वप्नांचा पाचोळा तुडवत
भल्या पहाटे
चक्क कुडकुडत
मिठीत येते

एक उदासी
भक्क दुपारी
झुळकीसोबत
गालांवरच्या बटा सरकवत
सुकल्या ओठा
स्पर्शून जाते

एक उदासी
संध्याकाळी
गहिरी होते
डोळ्याच्या पापण्या पाणवत
गालांवरती जरा विसावत
देवघराच्या समयीमध्ये
वातीसोबत जरा थरथरत
घरभर उरते

एक उदासी
उघड्या डोळ्यांसमोर
नाचत
रात्र-रात्रभर उश्या-पायथ्याशी
रेंगाळत
जागत बसते

एक उदासी
फक्त तिच तर
अखंड माझी सोबत करते

एक उदासी

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users