झुळूक!

Submitted by अज्ञातवासी on 19 February, 2020 - 13:29

"उतर मी गाडी साईडला लावते." मनाली म्हणाली.
अनंता खाली उतरला.
"याच बाजारातून आम्ही जायचो, ती माझ्याकडे चोरून बघायची, याच खिडकीतून." तो एका खिडकीकडे बोट दाखवत म्हणाला.
"गप रे बाबा."
"अग खरंच. तुमच्या नवीन पिढीला ना, जुन्या प्रेमाची महती नाही कळणार."
"तू यासाठी आज माझ्यासोबत आला आहेस का?"
"हो."अनंता हसला.
"बरं. पिशवी पुढे कर."
"अग इतकी फुले?"
"पूजेला लागतातच."
"बरं. चार पाच गुलाबही टाक. वेळेवर जावईबापूंची फजिती व्हायला नको."
"यावेळी नाही विसरणार तो. मागच्या वेळचा रुद्रावतार लक्षात आहे त्याच्या."
"भाग्यवान! नाहीतर तुझ्या आईच्या नशिबी हा असला धोंड. एक गजरा लक्षात राहत नाही. बरी आठवण झाली, चार पाच गजरेही टाक."
"टाकते... पण आईला तुझ्या ह्या 'अनंत' प्रेमगाथा सांगणार आहे मी."
"नको ग, पन्नाशीच्या आसपास घटस्फोट घेणं बरं दिसणार नाही."
मनालीही या विनोदावर खळखळून हसली.
फुलबाजारात फुलांचा घमघमाट पसरला होता.
"ऐक ना, तिला चमेली खूप आवडायची."
"अहाहा, काय चॉईस." मनाली तोंड वेन्गाडत म्हणाली.
"मग. शुभ्र पांढरी सलवार कमीज घालून जेव्हा ती याच फुलबाजारात यायची ना, तेव्हा, जाऊदे मनाली... तुला नाही कळणार."
"बरं. नाही कळत."
"बरं पुढे काय?"
"कर्दळीची पाने हवीयेत. बघ कुठे दिसतेय का?"
"चल रखमाबाईकडे."
दोघेही बाजाराच्या जरा आत गेले. टोकाला एक म्हातारी केळीची, कर्दळीची, नागवेलीची कित्येक पाने घेऊन बसली होती.
"रखमाबाई, ओळखलंत का?"
त्या बाईने जरा निरखून बघितले.
"अरे अनंता तू? कित्येक दिवसांनी. ही कोण?"
"ओळखा."
बाईने मनालीला निरखून बघितले.
"शैलासारखी दिसत्ये. मुलगी. केवढी मोठी झाली, आणि तुझा बाप आता भेटवतोय?"
"कधी चुकणार नाहीत रखमाबाई. बरं, हिला कसली पाने पाहिजेत ती द्या."
"पाच कर्दळीची, दोन केळीची आणि पंचवीस नागवेलीची." मनालीने यादी सांगितली.
"अग जे लागतील आणि जेवढे लागतील तेवढे काढून घे. आजपर्यंत रखमाबाईंनी स्वतः पाने किंवा पैसे मोजले नाहीत."
"गरज नाही पडली. माणसं चांगली सगळी. देवाच्या नावाने कुणी लुबाडत नाही." रखमाबाई म्हणाल्या.
"हे तर खरं." अनंता म्हणाला.
"बरं, बाकी सगळं ठीक ना? सुनबाई काय म्हणत्ये?"
"म्हातारी झालीये आता. बाकी सगळं ठीक."
"म्हातारी म्हणतो तिला, तू बरा तरणाताठा गडी." रखमाबाई कुजकट हसल्या.
मनालीही गालात हसली.
"आजी एवढी घेतलीत बरं का."
"बरं, ठेव पिशवीत. अनंता, एकशे चाळीस झालेत."
अनंताने शंभर आणि पन्नासची नोट टेकवली.
"आशीर्वाद असू देत!" म्हणून रखमाबाईच्या पायावर डोकं टेकवून तो निघाला.
"या रखमाबाईंचा मागे वाडा दिसतोय बघ. ही आमची हक्काची भेटण्याची जागा. ती आणि मी आलो, की सुनबाई आली म्हणून भरल्या तोंडाने स्वागत करायच्या."
"अच्छा? थांब त्यांना विचारते."
"गप ग. म्हातारीला इतकं थोडीच आठवणार. उगाच तुझी आई आली तर कळ काढायची." अनंता गडबडून म्हणाला.
"इतका आईला घाबरतोस, तर का असे उद्योग करतोस?" मनाली हसली.
"कारण हमने भी किसी से प्यार किया था, कम नहीं बेशुमार किया था, ज़िंदगी बदल गई थी तब उसने कहा कि, पागल तू सच समझ बैठा? मैने तो मज़ाक किया था..." अनंता मान झुकवत म्हणाला.
"वाह वाह!!! क्या बात है अनंत पुणेरी साहब."
"शुक्रिया शुक्रिया! त्याकाळी असे शेर फार प्रसिद्ध. या शेरोशायरीच्या नादात बऱ्याच नालायकांनी सुंदर मुली गटवल्या."
"अनुभवाचे बोल."
"हो, घे फिरकी माझी अजून. पण तिचा हा आवडता शेर. प्रेम करता करता कधीच दाखवायची नाही, प्रेम करतेय असं."
"ओके... किती वाईट." मनालीने चेहऱ्यावर केविलवाणे भाव आणले.
"वाईट हा फार कमी शब्द आहे. लोण्यावर सुरी फिरवावी असे तिचे शब्द फिरत."
"खूप खूप वाईट. खरंच फार वाईट."
"हम्म. आईस्क्रीम खाशील?"
"विथ पायनॅपल ज्यूस?"
"नक्की. चल."
दोन्हीही दुकानात पोहोचले.
"दो पायनॅपल ज्यूस विथ आईस क्रीम." मनालीने ऑर्डर दिली.
"बाबा तुम्ही इथेही येत असाल ना."
"हो मग, तिला पायनॅपल ज्यूस..."
"फेकू नकोस. पाच वर्षांपूर्वी हे दुकान चालू झालंय." मनाली लटकेच चिडत म्हणाली
अनंता गप्पच बसला, आणि ज्यूस पिऊ लागला.
"चल तुला एक शेवटचं ठिकाण दाखवतो."
दोघेही गणपती मंदिराजवळ आले.
"दररोज कॉलेज सुटल्यावर इथे प्रार्थना करायचो आम्ही."
"अच्छा, तुझं कॉलेज इथून कमीत कमी आठ किलोमीटरवर होतं. फक्त प्रार्थना करण्यासाठी?"
"हो मग. आखीर..."
"बस कर. नेक्स्ट टाईम नवीन स्टोरी तयार कर. चल निघूयात."
"मी खोटं बोलत नसतो. आह!!!"
"काय झालं? पाय दुखावला का परत?"
"हो ग, तिच्या भावाची आणि माझी झटापट झाली आणि..."
"पुरे हिरो. आपल्याला साधी माशी मारता येत नाही, आणि फाईट देताय."
अनंता थोड्यावेळ कळवळला, आणि लंगडत चालू लागला.
"कितीदा सांगितलंय, चांगला दवाखाना कर. आयुष्यभराच दुखणं धरून बसलाय."
तो हळूहळू रस्त्याच्या कडेला आला.
"इथेच थांब मी गाडी आणते."
"बघ हीच ती खिडकी..."
"पुरे. बाकीच्या कथा नंतर. नीट उभा रहा. मी गाडी आणतेय. मनालीने सूचना दिल्या आणि ती गाडी आणायला गेली."
तो रस्त्यावर उभा होता... खिडकीकडे टक लावून बघत होता.
अचानक एक वाऱ्याची झुळूक आली...
...आणि त्याला खिडकीत ती दिसली...
'म्हातारी झालीये, पुढचे केस पांढरट दिसतायेत...'
अनंता तिच्याकडे बघून हसला. तीही हसली.
अचानक पायाची हालचाल झाल्याने पाय दुखावला गेला.
तिच्याही चेहऱ्यावर एक वेदनेची झलक उमटली.
अनंताने हातानेच 'बरं आहे,' अशी खूण केली.
'काळजी घे.' ती पुटपुटली, आणि खिडकीतून दूर गेली.
'तुझ्या भावानेच जन्मभराच दुखणं लावलंय, आणि मी प्रेमाची निशाणी म्हणून अभिमानाने मिरवतोय,' तो स्वतःशीच म्हणाला.
मनालीने एव्हाना गाडी आणली.
तो गाडीत बसला.
'बरं झालं हिला त्या आईसक्रीम वाल्याची जुनी गाडी आणि कॉलेजच्या बसचा रूट माहीत नाही ते.' तो डोळे मिटून गालातल्या गालात हसत होता.
गाडीत गाणं लागलं होतं...
'देखिये वो काली काली बदलियाँ
ज़ुल्फ़ की घटा चुरा न ले कहीं
चोरी चोरी आके शोख बिजलियाँ
आपकी अदा चुरा न ले कहीं
यूँ क़दम अकेले न आगे बढ़ाइये
आपको हमारी कसम लौट आइये...'
मनाली गाणं गुणगुणत होती.
गाडी भरधाव वेगाने रस्त्यावर धावत होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

खूप छान अज्ञातवासी!!! फक्त संवादातून (ते हि इतक्या मोजक्या लांबीच्या) कथेची सगळी पार्शवभूमी उभी करणं थोडं कठीण असू शकतं, पण कथेच्या पार्श्वभूमीसोबतच, व्यक्तिरेखांना जिवंत करणं, कथेच्या तत्कालीन काळानुरूप, भुतकाळात पटकन डोकावून येणं खरंच फार अवघड आहे आणि जे जमलय तुम्हाला!... हि आठवणींची 'झुळूक' छान ताज-तवानं करते!

@ मन्या - धन्यवाद. पहिलाच प्रयत्न प्रॉपर लवस्टोरी लिहिण्याचा.
@ नौटंकी - धन्यवाद. तुम्हाला आवडलं लिखाण हे बघून छान वाटलं. Happy
@VB - धन्यवाद!
@माऊमैया - अगदी बरोबर.
@एमी - धन्यवाद, पण यावेळी कथा अगदी सरळसोट लिहिलिये. पुन्हा वाचून बघ.
@उर्मिलाजी - धन्यवाद!
@अपूर्व जांभेकर - खूप खूप धन्यवाद.
@नित्सुश - धन्यवाद!

कथेचं जॉनर - रोमँटिक ड्रॅमा
मनाली ही अनंताची मुलगी. अनंता तिचा बाबा, त्या दोघांच्या बोलण्यात जावईबापूंचा उल्लेख येतो, म्हणजे मनालीच लग्न झालंय, आणि इथेच अनंताच वय कळून येतं.
अनंता आणि मनाली जुन्या बाजारात फिरत असतात. तिथे अनंता मनालीला त्याच्या प्रेमाची एक एक आठवण सांगत असतो, ते मनालीला खरं वाटत नाही. अनंताही तिला खरेखोटे करण्याच्या फंदात पडत नाही, कारण त्याला फक्त आठवणीत जगायचं असतं.
मात्र ज्या स्त्रीवर त्याच प्रेम असत, ती स्त्री अजूनही तिथेच असते. दोघांची क्षणभर नजरानजर होते, आणि त्यातच समाधान मानून अनंता तिथून निघतो.
कुठेही अडकून न पडता, जुने क्षण पुन्हा आठवून, जशी वाऱ्याची झुळूक क्षणभर येऊन निघून जाते अगदी तशीच.

म्हणजे मी म्हणाले ते बरोबर होतं ना!
मनालीला वाटतंय की बाबा आपल्या आईबद्दलच बोलतोय; पण तो प्रेयसीबद्दल बोलत होता किंवा काही आठवणी बायकोच्या काही प्रेयसीच्या अशा मिक्स करत होता...वयामुळे...
प्रेयसी मेली आहे; बहुतेक तरुणपणीच. आणि आता त्याला जी खिडकीत म्हातारी दिसली तो भास आहे - शारुखला मोहोबतें मधे म्हातारी ऐश दिसण्यासारखं

मेलेली नाही ग, ती खरोखर खिडकीत येते. आणि हा बायकोविषयी नाही, तर प्रेयसीच्याच आठवणी सांगत असतो. सगळ्या आठवणी प्रेयसीच्याच असतात.
आणि मोहोब्बतेच नावही धाग्यावर काढू नकोस, कुणीतरी लगेच माग काढत धाग्यावर यायचं. Lol

अज्ञा, तु आधी कधी सरळसोप्या कथा लिहिल्या नाहीस ना त्याचा परिणाम आहे बघ हा.>> ही कथा त्याच्या बाकीच्या कथांच्या मानाने बरीच साधीसरळ आहे. Happy

म्हणजे मला कथा खरंच कळली नव्हती तर, कारण शेवट वाचल्यावर मला वाटलेली की अनंतची बायको आता जगात नाहीए. पण मनालीच्या बोलण्यातून ती आहे हे जाणवत होतं, त्यामुळे गोंधळ उडाला होता.
धन्यवाद अज्ञातवासी कथा ईस्कटून सांगितल्याबद्दल.

> तु आधी कधी सरळसोप्या कथा लिहिल्या नाहीस ना त्याचा परिणाम आहे बघ हा. Lol > Lol Lol +१

पण खरंच > अचानक एक वाऱ्याची झुळूक आली...
...आणि त्याला खिडकीत ती दिसली...
'म्हातारी झालीये, पुढचे केस पांढरट दिसतायेत...'
अनंता तिच्याकडे बघून हसला. तीही हसली.
अचानक पायाची हालचाल झाल्याने पाय दुखावला गेला.
तिच्याही चेहऱ्यावर एक वेदनेची झलक उमटली.
अनंताने हातानेच 'बरं आहे,' अशी खूण केली.
'काळजी घे.' ती पुटपुटली, आणि खिडकीतून दूर गेली. > हा भास आहे असं वाटतंय. झुळूक येऊन ती लाल पानं उडताहेत वगैरे Proud Wink

झुळूक येऊन ती लाल पानं उडताहेत वगैरे>>>>
हो व्हायोलिनवर म्युजिकसुद्धा वाजतय, लताबाई लाला करत गाणं म्हणताय...
Rofl

..

छान...

धन्यवाद दत्तात्रयजी! खूप दिवसांनी मायबोलीवर दिसलात.
तुमचं लेखन मिस करतोय मी, लिहा भरपूर!

Pages