आठवणीतील 'शाळा' :-4

Submitted by Cuty on 19 February, 2020 - 05:55

त्याकाळी लहान गावात, वाड्यावस्त्यांमध्ये अंगणवाड्या नसत. मग तेथील गरीब लोक मुलांना पाच वर्षांपर्यंत शाळेतच पाठवत नसायचे. कधी कुणी शिकलेले पालक घरीच मुलांना थोडेफार शिकवायचे. तर इतर कमी शिकलेले, कष्टकरी लोक मुलांच्या शिक्षणाचा अजिबात विचारच करायचे नाहीत. मात्र मूल पाच वर्षाचे झाले की, मग मात्र ही सर्व मुले जवळच्या गावी थेट पहिलीत जात असत. त्याकाळी एकच एसटी शाळेच्या वेळेनुसार एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी आसपासच्या खेडेगावांमध्ये जाई. त्यातूनच ही पहिली ते चौथीची सर्व मुले एकटी, गावातील इतर लोकांबरोबर शाळेच्या गावात येत जात असत. त्यांचे पालक कधीच शाळेत ने-आण करण्यासाठी येत नसत. आम्हा गावातील मुलांना याचे खूप अप्रूप वाटे. आमच्या गावातील सधन चाकरमानी लोक, अगदी घराजवळ शाळा असली तरी मुलांना ने-आण करायला यायचे. रोज एकदा तरी शिक्षकांशी बोलायचे. मुलाच्या अभ्यासावर लक्ष ठेवायला सांगायचे. शिक्षकही मग, पालक विचारपूस करत असल्याने अशा मुलांकडे ' विशेष' लक्ष द्यायचे. या मुलांशी कोणी भांडले, यांच्याकडे कधी एखादे पेन्सिल, खोडरबर इ. साहित्य नसले, एखादी वस्तू हरवली किंवा यांना शाळेत शिकवताना काही समजले नाही तर शिक्षक तत्परतेने मदत करीत. याचा परिणाम, ही मुले जरा काही झाले तर लगेच शिक्षकांकडे धाव घ्यायची किंवा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर आईवडिल यायची वाट पहायची. याउलट आम्ही जरा मध्यमवर्गीय म्हणा किंवा गरीब किंवा व्यवसायधंदेवाल्या लोकांची मुलं. आमचे पालक शाळा घरापासून कितीही लांब असली तरी, ऊन असू दे, पाऊस असू दे किंवा थंडी असू दे, कधीच शाळेत सोडायला आणायला यायचे नाहीत. मग थंडीत स्वेटर घालून, ऊन्हाळ्यात टोपी नसली तर दप्तर डोक्यावर घेऊन, पावसाळ्यात एका छत्रीत तीन, तर कधी चक्क चारजण असे शाळेत जायचो. आम्ही भिजलो तरी दप्तर कधीच भिजू द्यायचो नाही. इतर गावातून एसटीने येणार्या गरीब मुलांच्या पायात तर चप्पलही कधीकधी नसायची. फार थोड्या सधन घरातील मुलांकडे रेनकोट असायचा. अशी सर्व वेगवेगळ्या परिस्थितीतील, वेगवेगळ्या घरातील, वेगवेगळ्या जातीधर्माची मुले एकाच वर्गात, एकमेकांजवळ बसायची. मात्र एक गोष्ट सर्वांच्याच लक्षात आली होती. मधल्या सुटीत जेवायला बसताना मात्र सर्वजण एकत्र नसत. सधन घरातीत मुलांचे डबे स्टीलचे, दोन किंवा तीन कप्प्यांचे, त्यात पोळी भाजी याशिवाय एखादे फळ किंवा खाऊ असायचा. ही मुले एकत्र ग्रूप करून बसायची. इतरांकडे बघायचीही नाहीत. यांच्याकडे वाॅटरबॅगमध्ये घरचे पाणी असायचे. गावातील इतर मुलांच्या डब्यात फक्त भाजीपोळी. पाणीही आम्ही सर्वजण शाळेच्या टाकीतील नळाचे, तोंड लावून प्यायचो. तिथेच हातपाय धुवायचो आणि नळाच्या नंबरवरून भांडायचोसुद्धा! याऊलट बाहेरच्या खेड्यापाड्यातून आलेल्या मुलांचे डबे साधे, त्यात ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, बरोबर तोंडी लावायला भाजी नसली तर तेल आणि चटणी असे. गंमत म्हणजे आम्ही भाजी खाऊन कंटाळायचो अन डब्यांची अदलाबदल करत तेलचटणी आवडीने खायचो. मला तर बाजरीची भाकरीच खूप आवडायची!
एकदा मधल्या सुटीत मला वडिल घरी न्यायला आले. माझा मामा आला होता. त्याने मला खूप मोठे असे एकच चाॅकलेट आणले होते. ते मी घरी खाल्ले नाही, तसेच खिशात ठेवले आणि सुटी संपायच्या आत शाळेत पोहोचले. नळावर पाणी पिले आणि खाण्यासाठी चाॅकलेट बाहेर काढले.
इतक्यात ते बघून आमच्या वर्गातला एक मुलगा, माझ्याकडे हात दाखवून जोरात ओरडला, "कॅडबरी.........!" झाले! आख्खा वर्ग धावत आला. त्या कॅडबरीचे बारीकबारीक किती तुकडे झाले काय माहीत, पण सगळे भेद गळून पडले !
मला त्यादिवशी कळले, मोठ्या चाॅकलेटला कॅडबरी म्हणतात!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

आमच्या वर्गात हॉस्टेलमधे राहणाऱ्या ४-५ मुली होत्या. त्यातर डब्बाच आणायच्या नाहीत. बहुतेक रयत शिक्षण संस्थेच हॉस्टेल होतं. जेवूनच शाळेत येतो असं सांगायच्या. काय माहीत दुपारचं जेवण मिळायचं की फक्त रात्री एकदाच जेवायच्या. सगळ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुली. राऊत, नंद्याळ, ढोणसळे अशी आडनावं. कुणबी बहुतेक...

लेखन फारच छान चालूय. I can relate to this. बाकीचे लोक रेडिओ ऐकत आई स्वैपाक करते आणि मुलं गरमगरम जेवून धावतपळत शाळेत जातात वगैरे लिहतात तेव्हा मला त्याच्याशी रिलेट करता येत नाही. ते काहीतरी वेगळंच विश्व आहे Proud

मी दहावीचा १७-१८% निकाल लागणाऱ्या गरीब मुलींच्या शाळेत शिकले आणि माझं दहा वर्ष लहान भावंड १००% निकाल लागणाऱ्या कॉन्व्हेंट शाळेत शिकलं. दोन्हीवेळी सध्या राहतोय त्या घराच्या सगळ्यात जवळ जी शाळा असेल तिथे ऍडमिशन घ्यायची हाच एकमेव क्रायटेरिया Lol
त्या कॉन्व्हेंट शाळेत एका पालकाने > रोज एकदा तरी शिक्षकांशी बोलायचे. मुलाच्या अभ्यासावर लक्ष ठेवायला सांगायचे. शिक्षकही मग, पालक विचारपूस करत असल्याने अशा मुलांकडे ' विशेष' लक्ष द्यायचे. > हा प्रकार करायचा प्रयत्न केला. याला शेवटच्या बेंचवर का बसवलं पुढे बसवा वगैरे. टीचरने बराबर हुसकावून लावलं त्या आईला "आम्ही सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष देतो, पुढे बसलेले असो नाहीतर मागे बसलेले. तुम्ही उगाच कायतर सांगायला येऊ नका!" Rofl Rofl

माझा दहा वर्षाचा मुलगा असल्या तक्रारी घेऊन कधी आला की मीच त्याला हुसकावते. तूच बघ काय करायचं ते म्हणून. जागेच्या तक्रारी, व्रात्य मुलांनी काढलेल्या खोड्या, वस्तू हिसकावून घेणे इ. प्रकार यात मी लक्ष घालतच नाही. त्यालाच सांगते शिक्षकांकडे जायला.

मी शाळेला माझ्या शिक्षणात ढवळाढवळ करू दिली नाही ( I have never let my schooling interfere with my education.)
मार्क ट्वेन / ग्रांट ऍलन