मसाला पुठ्ठा (ओट्स) :खोखो:

Submitted by योकु on 12 February, 2020 - 18:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओट्स म्हणजे बारीक केलेला पुठ्ठा आहे हा समज काहीकेल्या जात नाही आणि नाश्त्याकरता हा प्रकार बेस्ट असतो. तर हा मसाला ओट्स करून पाहिले. सुरेख चवीचं प्रकरण जमलं म्हणून इथे देतो आहे.
- कुठलेही क्विक कुकिंग ओट्स (प्लेन, मसाला इ.) - पाऊण ते एक मध्यम वाटी
- अर्धी वाटी मटार दाणे
- अर्ध गाजर
- एक पातीचा कांदा, पातीसकट
- एक सिमला मिरची
- २ मध्यम टोमॅटो
- मीठ (मसाला ओट्स असतील तर त्या प्रमाणात कमी)
- जरासं लाल तिखट, हळद
- मॅगी कंपनीचे मसाला ए मॅजिक मसाल्याचे २ पाकिटं (हे नसतील तर त्या प्रमाणात तिखट, हळद + गरम मसाला घ्यायला लागेल; अर्थातच चवीत आठआणे फरक)
- गरम पाणी
- चमचाभर तेल

क्रमवार पाककृती: 

- सगळ्या भाज्या मध्यम बारीक चिरून घ्या
- चमचाभर तेलावर कांद्याच्या (पात नाही) फोडणीचं अंथरूण द्या, जरा मौ जाहला की मटार, गाजर, सिमला इ. घालून जरा परता
- यात आता सगळे कोरडे मसाले घालून काही सेकंद परतून पाणी घाला. हे भाज्या शिजणे + ओटस ला लागेलाइतकं घालायचंय.
- भाज्या बोटचेप्या झाल्या की ओट्स घालून ३/४ मिनिटं चांगलं रटरटू द्या. ओट्स क्विक कुकिंग वाले असल्यानी तेव्हड्या वेळात शिजतात.
- वरून कांद्याच्या पातीनी सजवून गरमागरम खायला घ्या.

वाढणी/प्रमाण: 
दोन लोकांच्या नाश्त्यापुरेसे झाले या प्रमाणात
अधिक टिपा: 

- भाज्या, मीठ, मसाले, तिखट आवडीनुसार कमी जास्त करता येतात. मुळात ओट्स ला अंगची विशेष चव नसते सो आपल्या चवीचं करता येतं.
- पाण्याचं प्रमाण एकदा ओट्स च्या पाकिटावर पाहून घेणे, साधारण पणे ४० ग्रॅम (मध्य आकाराच्या वाटीने अर्धी ते पाऊण वाटी) ओट्स ला २०० एमएल (एक मध्यम आकाराचा पाणी प्यायचा पेला) पाणी लागतं.

माहितीचा स्रोत: 
उगाच केलेले आणि बर्‍यापैकी यशस्वी झालेले प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाककृती छान वाटते पण ओट्सवर एव्हढे संस्कार करण्यापेक्षा मी सांजा/उपमा करुन खायला पसंत करेन.
ओट्स जर लगेच शिजतात तर मग pre cooked असतील ना? म्हणजे मग प्रोसेस्ड फूड झाले ना?>>> हो.
ते लगेच शिजणारे ओट्स खूपच गिळगिळीत लागतात. स्टील कट ओट्स खाल्यापासून मी क्विक ओट्स आणणेच बंद केले.
स्टील कट ओट्स रात्री पाण्यात भिजवून ठेवते. सकाळी ते मंद गॅसवर शिजवते. त्यात dry fruits, dry cranberries घालते. शिजल्यावर वरून मध/ब्राऊन शुगर/गुळ पावडर/मेपल सिरप हवे ते घालता येते. मस्त कणीदार लागतात.

मी डब्यात लंच ला न्यायचे असले तर ड्राय क्विक ओट्स वर लसूण, हि. मिर्ची. कढिपत्त्याची फोडणी करून घालते. त्यात अंदाजाने मीठ, आणि आमचूर पावडर घालते. अन असे कोरडेच मिक्स्चर डब्यात नेते. ऐन वेळी पाणी घालून मायक्रोवेव्ह केले की मस्त खमंग ओटस उपमा तय्यार! सोबत घट्ट दही असलं की मस्त जेवण होतं.

Kiti वेगवेगळ्या पाकृ आहेत.
मसाला ओटस एकदाच खाऊन पाहिलेत.चांगले लागले.पण परत खावेसे नाही वाटले.रव्याची खीर करतो तशीच ओटसची खीर माझे वडील नेहमी घ्यायचे.

ब्लॅन्ड ओटस मात्र नक्किच खाण्याच्या पलिकडे असतात अर्थात सवयिचा पण भाग असु शकतो .
योकु फोटो टाकायला हवा होतास

माझी मुलगी तिच्या छोट्या मुलीला फोडणीत जिरं ,हिंग हळद घातलेले, जरा जास्त पाणी घालून शिजवलेले ओट्स देते, त्या छोटीला मऊ सर खिचडी सारखे लागणारे ते ओट्स आवडतात खूप .

मला मात्र पॉरीच म्हणजे ओट्स ची खीरच जास्त आवडते.

योकुटल्या रेसीपी चांगलीच आहे रे. ताजा मसाला घातला म्हणुन पोषण मुल्य कमी होतात अस पण नाही. (मॅगीचा मुद्दा वेगळा)
"ओट जर आवडत नसतील तर इतके प्रयोग करून खाल्लच पाहिजे अस नाही. उपमा/सांजा आणि क्वीक ओटचा उप्मा कॅलरी वाईज सेमच होईल "अस म्हणायच आहे. ओट चा उपमा खाल्ला म्हणुन जस्ट एक फॉल्स सॅटिसफॅक्शन मिळेल कि मी अति हेल्दी खाल्ल. बट इन रियालिटी उप्मा पण सिमिलर होईल. याचा अर्थ असा नाही आहे कि फोडणी घातलेला ओटस चा उपमा वाईट अनहेल्दी आहे. मुद्दा हा आहे कि उपमा रव्याचा खाल्ला तरी फारसा फरक पडत नाहीये.
म्हणुन ते उपम्याच लिहिल. Happy जर ओट आवडत नसतील तर इतका खटातोप कशाला असा विचार आहे. होप मला काय म्हणायच आहे ते लिहिलं जातय. पण उपम्याच्या चवी पेक्षा तुला ओटची चव आवडत असेल तर जरुर कर. पण तो वेगळा मुद्दा.

मॅगी मसाला मात्र नक्कीच आपल्या घरच्या मसाल्या पेक्षा वाईट होईल. पण तो आणखी एक वेगळा मुद्दा.

खरेतर भारतीय आहारात बरीच तृणधान्ये वापरली जातात त्यामुळे होल ग्रेनची गरज सहज भागते. कडधान्यांच्या वापरातून सोल्यूबल फायबरही आहारात असतो. त्यामुळे आवडत नसेल तर मुद्दाम ओट्स आहारात हवेतच अशातला भाग नाही. पाश्चात्य आहारपद्धतीत मैद्याचा वापर भरपूर असतो, कढधान्ये फारशी वापरत नाहीत , हिरव्या पालेभाज्याही आहारात पुरेश्या नसतात. साहाजिकच डॉक्टर ओट्स खायचा सल्ला देतात.> हे पटलं स्वाती.

Pages