माझा दादा .

Submitted by डी मृणालिनी on 8 February, 2020 - 10:42

माझा विश्वास दादा . सर्वांचा लाडका आणि प्रेमळ . निरनिराळे अवतार घेऊनच तो या पृथ्वीतलावर अवतारलाय. खाण्यात भीमाचा अवतार ,खोड्या करण्यात कृष्णाचा अवतार मात्र विनोद करण्यात तो पुलंचा अवतार आहे असं मी काही म्हणणार नाही . कारण बऱ्याचदा त्याचे विनोद 'विनोद ' या गटात मोडत नाहीत . असो. तो म्हणजे आमच्या घराचं चैतन्य . बालिशपणा आणि जबाबदारपणा या दोहोंच्या मिश्रणाने बनलेलं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व म्हणजे माझा विश्वास दादा . सदैव दुसऱ्यांना विनोद करण्याचा प्रयत्न करून हसवणारा ,नटखट कृष्णासारखा खोड्या करणारा विश्वास दादा २२ वर्षाचा असला तरीसुद्धा त्याच्या आनंदी वृत्तीमुळे तो सर्वांसोबत रमतो आणि सर्वांनाच हवाहवासा वाटतो. मला तर खूपच ! मात्र कामाच्या वेळी हाच विश्वास दादा इतका जबाबदार असतो कि खरंच कोणाला सांगूनही आश्चर्यच वाटेल. 'अखंड कर्मयोगी ' ही बहुमानाची पदवी प्राप्त झालेला विश्वास दादा सतत काही ना काही करण्यात व्यस्त असतो. मला आठवतंय , एके दिवशी त्याने बाजारातून येताना टाकाऊ मोबाईलच्या बॅटरीज आणल्या . आम्ही त्याला म्हणलं '' काय हा कचरा आणलास '' . तो काहीच बोलला नाही. दुपारच्या फावल्या वेळात असंख्य वायरी ,बॅटरीज ,सर्किट ही त्याची मालमत्ता घेऊन तो नेहमीप्रमाणे बसला . हे त्याचं नेहमीचंच . दुपारी जेवण झाल्यावर आम्ही सर्वजण घराच्या पडवीत बसतो . कोणी सोफ्यावर ,कोणी झोपाळ्यावर . हे महाशय मात्र सदैव जमिनीवर आपल्या मालमत्त्याच्या ढिगाऱ्यात बसलेले असतात . अस्सल मालवण्यांसारखी गजाली आणि हातात उद्योग . त्यादिवशीही हेच दृश्य होतं. मालमत्त्यात मात्र एक नवीन मळकी टोपी आणि छोटा CPU च्या फॅनचा समावेश होता . नेहमीसारखी अविश्रांतपणे बडबड चालू होती . थोड्यावेळाने त्याच काम पूर्ण झालं . त्याच्या हातातली वस्तू जेव्हा आम्ही पाहिली ,तेव्हा चाटच पडलो. एका टोपीला त्याने सोलारवर चालणारा CPU चा फॅन लावला होता . जेणेकरून शेतात काम करताना गरम होणार नाही. हे त्याच भन्नाट डोकं ! आज जर कोणी मला विचारलं कि ,तुझी सर्वात जास्त काळजी कोण घेतं ? तर मी क्षणाचाही विलंब न लावता विश्वास दादाच म्हणेन. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची तालीम घेण्यासाठी मी कधीकधी महिनाभर कणकवली नावाच्या शहरात गुरूंकडे असते. तेव्हा अगदी दिवसातून तीन तीनदा फोन करतो ,तो माझा विश्वास दादा . अर्थात मी घरात सगळ्यात लहान असल्याने मी सगळ्यांचीच लाडकी आहे आणि माझी काळजी सर्वांनाच आहे. पण मी सर्वात जास्त लाडकी आहे माझ्या विश्वास दादाची. हे तो तोंडाने कधीच बोलत नाही पण त्याच्या कृतीतून हे स्पष्ट दिसतं. हेच त्याचं वैशिष्ट्य आहे . मात्र हाच विश्वास दादा तेवढ्याच शिस्तीने मला शेतातल्या कामांमध्येही तरबेज करतोय. आज genius म्हंटलं कि ,तुमच्यासमोर आईनस्टाईन चा चेहरा येईल . माझ्यासाठी मात्र माझा विश्वास दादाच genius आहे. विश्वास दादा तू माझा आइनस्टाइन आहेस . फक्त आता थोडा संगीतातही रस घे . म्हणजे झालं ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@साधना ताई , खूप धन्यवाद . खरंतर मी स्कूलिंग करतच नाही . मी तर लर्निंग करते. आणि निसर्गात राहून करते म्हणून मी त्याला 'होम स्कूलिंग ' नाही करत . ते फक्त घरापुरता मर्यादित नाही . त्यामुळे it's a life long process ...

छान लिहीलं आहेस, तुझा दादा एकदम खासच आहे. तुझी प्रोफाईल बघितली, मराठी भाषा दिनाच्या धाग्यावरचा तुझा प्रतिसाद वाचून आणि त्यावरचा वेमांचा प्रतिसाद वाचून. भारी वाटलं.