मन वढाय वढाय (भाग१३)

Submitted by nimita on 7 February, 2020 - 20:43

स्नेहा लगबगीनी गच्चीवरून खाली घरात गेली. सगळ्यात आधी तिला आजीशी बोलायचं होतं.... आपला निर्णय सांगायचा होता. तिला घाईघाईत येताना बघून तिची आई म्हणाली," अगं, कुठे होतीस तू? मी तुलाच शोधत होते. वंदनामावशी नी खास तुझ्यासाठी म्हणून चकल्या पाठवल्या आहेत...." पण स्नेहाचं लक्षच नव्हतं आईच्या बोलण्याकडे. आईला घट्ट मिठी मारत ती म्हणाली," आत्ता वेळ नाहीये, खूप महत्त्वाचं काम करायचंय. नंतर बोलूया आपण."

स्नेहाला पुन्हा खोलीत येताना बघून आजी काही क्षण विचारात पडली. पण स्नेहाच्या चेहेऱ्यावरचे भाव बघून तिला बरं वाटलं. स्नेहा काय बोलणार आहे याचा अंदाज आला होता आजीला. खोलीत आल्यावर स्नेहा थोडा वेळ काहीच बोलली नाही. ती बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात तिची आई खोलीत येताना दिसली आणि स्नेहा पुन्हा गप्प झाली. आईच्या नजरेतलं कुतूहल आणि काळजी अगदी स्पष्ट वाचता येत होती. आजीनी नजरेनीच तिला इशारा केला. जणू काही तिला सांगत होती," काळजी नको करू. मी आहे." ते बघून आई पुन्हा माघारी वळली आणि जाताना खोलीचं दार लोटून घेतलं.

"आजी, तू सांगितलंस तसा मी अगदी शांतपणे विचार केला. मला खरंच अगदी मनापासून पटलंय तुझं म्हणणं. रजत खरंच खूप चांगला मुलगा आहे. आणि तू म्हणतेस तसं त्याचं प्रेमही आहे माझ्यावर. त्या दिवशी त्यानी मला तसं बोलूनही दाखवलं....म्हणजे अगदी शब्दशः नाही बरं का! पण आता मला त्याच्या मनात माझ्याबद्दल असणाऱ्या भावनांची जाणीव झाली आहे. अगदी खरं खरं सांगू का आजी तुला? आत्ता तरी माझ्या मनात त्याच्याबद्दल फक्त मैत्रीयुक्त प्रेम आणि आदर आहे. पण एकदा बोलता बोलता आई म्हणाली होती," आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्याशी लग्न करावं.." त्यावेळी मला तिचं हे लॉजिक अजिबात पटलं नव्हतं; पण आज त्या वाक्यामागचा खरा अर्थ लक्षात आलाय माझ्या! आणि म्हणूनच मी आता रजतशी लग्न करायचं ठरवलं आहे."

स्नेहाच्या विचारातली आणि तिच्या बोलण्यातली सुस्पष्टता बघून आजीला खूप अभिमान वाटला तिचा. इतक्या लहान वयातही भावनांची गुंतागुंत अगदी योग्य प्रकारे हाताळली होती तिनी. 'लहानपणी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याजवळ हट्ट करणारी आपली नात इतकी समंजस आणि मॅच्युअर कधी झाली '- आजी कौतुकानी स्नेहाकडे बघत होती. आपल्या वक्तव्यावर आजीची काहीच प्रतिक्रिया नाहीये हे बघून स्नेहा गोंधळली. आजीच्या चेहेऱ्यासमोरून हात हलवत ती म्हणाली," हॅलो , आजी !! काय झालं?"

अचानक भानावर येत आजी हसली आणि म्हणाली," खूप योग्य निर्णय घेतला आहेस तू स्नेहा ! I am really proud of you. मग आता ही गोड बातमी तू सगळ्यांना सांगणार आहेस का मी सांगू?" आपल्या डोळ्यांतले आनंदाश्रू लपवायचा प्रयत्न करत आजी म्हणाली.

"पण आजी, मला त्याआधी थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. सल्ला हवा आहे तुझा. मला वाटतंय की सगळ्यांना सांगण्या आधी एकदा रजतशी बोलावं ; हे नवीन नातं जोडण्यापूर्वी माझ्या जुन्या नात्याबद्दल त्याला सगळं काही सांगावं. आणि सगळं कळल्यानंतर सुद्धा जर तो तयार असला तरच पुढे जाण्यात अर्थ आहे. तुझं काय मत आहे याबाबतीत? काय करू मी ?" स्नेहानी अपेक्षेनी आजीकडे बघत विचारलं. आजीच्या मनातला आपल्या नातीबद्दलचा अभिमान अजूनच वाढला. मनोमन तिची दृष्टच काढली आजीनी. "मी तुला फक्त माझं मत सांगू शकते. पण तू काय करायचं हे तुझं तुलाच ठरवायला लागेल," आजीनी प्रेमानी स्नेहाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं.." तुझा विचार एका दृष्टीनी योग्यच आहे. कुठल्याही नात्याचा पाया हा विश्वास आणि प्रामाणिकपणा या दोन खांबांवर टिकून असतो. आणि तू तर रजतबरोबर आयुष्यभरासाठी मनाचं, प्रेमाचं नातं जोडायला निघाली आहेस . आणि मुख्य म्हणजे तुझ्या बाबतीत जे घडलंय त्यात तुझी काहीच चूक नाहीये.त्यामुळे त्यात लपवण्यासारखं काहीच नाहीये.हे सगळं जरी खरं असलं तरी मनात उगीचच एक शंका आल्यावाचून राहात नाहीये.... खरं काय ते कळल्यावर जर रजतनी त्याचा विचार बदलला तर?" आजीनी हळूच आपल्या मनातली भीती बोलून दाखवली. स्नेहाला आजीच्या शब्दांतून तिच्याबद्दलची काळजी जाणवत होती. स्नेहाची नजर चुकवत आजी पुढे म्हणाली,"आपण मागच्या महिन्यात तो इंग्लिश सिनेमा बघितला होता ना ? काय गं त्याचं नाव??? "आजी आठवायचा प्रयत्न करत होती.

"Titanic," स्नेहा म्हणाली,"पण त्याचा आत्ता या विषयाशी काय संबंध ?"

"हां, Titanic !! तोच तोच....त्यात ती हिरॉईन असते ना- रोझ- तिच्या तोंडी एक वाक्य आहे.. खूप आवडलं होतं मला ते, आणि पटलं सुद्धा होतं... आणि म्हणूनच लक्षात राहिलं ; ती रोझ म्हणते,"A woman's heart is a deep ocean of secrets."

आजीच्या बोलण्यामागचा खरा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करत स्नेहा म्हणाली," म्हणजे तुला असं वाटतंय का की मी रजतला हे काही सांगायला नकोय ?" पण आजीच्या उत्तराची वाट न बघता ती पुढे म्हणाली," नाही आजी, माझ्या मनाला अजिबात पटत नाहीये हा विचार. मी रजतला सगळं खरं खरं सांगणार आहे; त्यानंतर तो जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल. मी उद्याच बोलते त्याच्याशी."

"उद्या का गं? जर ठरवलंच आहेस तर मग आजच बोल ना.. इतक्या दिवसांपासून वाट बघतोय तो तुझ्या उत्तराची. एक एक दिवस किती अवघड जात असेल त्याच्यासाठी. तो बिचारा बोलून दाखवत नसला म्हणून काय ?" आजी रजतची बाजू मांडत म्हणाली.त्यावर तिचा हात धरून तिला आपल्या शेजारी बसवत स्नेहा म्हणाली," तुझा तो बिचारा रजतच म्हणतो नेहेमी की जर एखाद्या निर्णयाबद्दल तसूभरही शंका असेल तर त्याला थोडा वेळ द्यावा. त्याच्याच शब्दात सांगायचं तर....' just sleep over it'.आणि तुझ्या मनातली शंका अगदीच काही चुकीची नाहीये....म्हणून मी उद्यापर्यंत थांबणार आहे. उद्या सकाळी उठल्यावर बघीन मला काय वाटतंय ते आणि मग ठरवीन - त्याला काय आणि किती सांगायचं ते! "

स्नेहा जरी असं म्हणत असली तरी ती उद्या रजतला सगळं खरं सांगणार आहे हे आजीला माहीत होतं.' केवळ मला बरं वाटावं म्हणून ती उद्यापर्यंत थांबायची ही सगळी कारणं देते आहे,' आजीच्या मनात आलं. तिला स्नेहाच्या बोलण्यातून तिचा निर्धार जाणवत होता.पण तो ऐकल्यावर आजीची मात्र अगदी द्विधा मनस्थिती झाली होती...एकीकडे नातीचा प्रामाणिकपणा बघून अभिमान वाटत होता पण त्याचवेळी एक अनामिक हुरहूर लागून राहिली होती..' जर खरंच रजतनी नकार दिला तर ? बिचारी माझी पोर... आत्ता कुठे सलीलच्या नकारातून सावरतीये; लगेच हा दुसरा नकार पचवू शकेल ? " आजीनी मनोमन घृष्णेश्वराला साकडं घातलं..' माझ्या नातीसाठी जे योग्य असेल ते घडवून आण देवा ... आता सगळी मदार तुझ्यावरच आहे रे बाबा!'

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users