पाहता समाज

Submitted by Silent Banker on 7 February, 2020 - 12:50

२०१९ हे वर्ष सरत आलेले असल्याने अणि "Thanksgiving" चे सोपस्कार झाल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये ऑफिसमध्ये जरा निवांत वातावरण अनुभवायला मिळाले। २०२० साठी बाह्या सरसाहून कामाला जुंपणापूर्वी "Enjoy The Festivity " किंवा " Spend Time With your Family " च्या गोंडस नावाखाली मिळालेले काही विसाव्याचे क्षण अणि त्याबरोबर येणारे खुमासदार "Canteen Sessions ". जिथे संवाद हा समोर असलेल्या माणसाला "headcount " समजून केलेला नसून तो जीवनातील सहयात्री (Companion) म्हणून केला जातो अणि मग एक मस्त मैफिल जमून जाते। असाच योग मागील आठवड्यामध्ये आला। कुणी जानेवारी मधील मुंबई मॅरेथॉनची तयारी वर बोलत होते तर कुणी "kick boxing " मध्ये किती लाथा खाल्ल्या याचे सहभिनय वर्णन करत होते। कुणी नुकत्याच केलेल्या ट्रेकिंगची हकिगत सांगून समोरच्या अंगावर रोमांच उभे करत होते। तर माझ्यासारखे बैठ्या प्रवृतीचे लोक काय नवीन वाचले किंवा कुठले नवीन पुस्तक "स्टोरीटेल App " वर ऐकले ते सांगत होते। तेवढ्यात चेहऱ्यावर कुतूहल अणि आश्चर्य याच्या मिश्रणातून होणारे भाव दाखवत एका सहकाऱ्याने प्रश्न केला "तू वाचतोस ? "वाचन कला किंवा वाचणारा समाज हीच एक दुर्मिळ गोष्ट होत चालली आहे त्यामुळे प्रश्र काही अगदीच चुकीचा नव्हता।

माणसाला मनुष्यप्राणी असे पण म्हटले जाते कारण भय ,भूक ,भीती, तहान या भावना माणसामध्ये सुद्धा प्राण्यांप्रमाणे असतात त्याला मनुष्य बनविण्याचे काम करते त्याचे कुतूहल। कुतूहल नावाचे हे रसायन अजब आहे जे त्याला एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायला भाग पाडते , त्याचा पाठपुरावा करायला लावते। अडखळणे , धडपडणे , यश , अपयश , एखादी गोष्ट सापडण्याचा आनंद किंवा अपेक्षाभंगाचे दु :ख अशा सर्व भाव भावनांनी संपन्न जीवनानुभव ( Life Experience)घ्यायला भाग पाडते। या भावनेतून आचार विचार , भाषा , धर्म , राजनैतिक जाणिवा अश्या प्रवृत्तीचे दुवे जोडले जातात ज्यातून काही बंधने स्वखुशीने स्वीकारून राष्ट्र नावाची गोष्ट आकार घेते। राष्ट्रीय अस्मिता निर्माण होते।आपल्या जगण्याला विशेष अर्थ आहे हे दाखविणारे सांस्कृतिक विकासाचे टप्पे गाठते। साहित्य , कला निर्मिति होते , ज्यातून जगण्याच्या प्रेरणेची माहिती मिळते। हे कुतूहल शमविण्यासाठी , आणि संपन्न जीवनानुभव अनुभवण्यासाठी साधन असते ते म्हणजे " वाचन " & ते उपलब्ध व्हायचे " पुस्तकातून " अणि म्हणून "शहाणे " होण्याचा एकमेव मार्ग हा शिक्षण अणि पर्यायाने "वाचन " ही गेल्या काही शतकांची मळलेली वाटच म्हणा ना।

त्यातूनच मग "वाचाल तर वाचाल " किंवा " चार बूके शिकलास तर काय लै शहाणा झालास हो " या सारखे उपदेश किंवा सुसंवाद आपल्या परिचयाचे आहेत। वाचनातून ज्ञान मिळते, गोष्टी समजतात हे आपल्या मनावर इतके बिंबले आहे की एखाद्या माणसाबद्दल मत व्यक्त करताना आपण सहज म्हणून जातो की "माझे त्या माणसाबद्दलचे "Reading " अमुक अमुक आहे। समृद्ध जीवनासाठी लक्ष्मी (पैसा ) बरोबर सरस्वतीची (ज्ञान, पुस्तके ) उपासना पण तितकीच गरजेची आहे हे किती जरी ठासून सांगितले तरी प्रत्यक्ष वास्तविकता ही काहीशी वेगळी आहे। लक्ष्मीपुत्रांची समृद्धी( ;यश , कीर्ति , पैसा ) मिळविण्यासाठी चाललेली स्पर्धा ही मोजून मापून केलेल्या सरस्वती पूजनावर आधारित आहे। "अपेक्षित प्रश्न संच ","वर्गातील सहकाऱ्याच्या नोट्स ", ऑफिस मधील प्रेजेंटेशन साठी बनविले जाणारे "Talking Points" ही आपण सर्वांनी अनुभवलेली मोजून मापून सरस्वती पूजनाची काही ठळक उदाहरणे। खरे म्हणजे आपल्यापैकी बहुतेकाना "वाचन " या गोष्टीचा प्रचंड कंटाळा असतो। आपला देश जसा क्रिकेट खेळण्याबरोबरच " बघणारा किंवा बोलणारा" पण देश आहे तसेच वाचन " जरुरी है "म्हणत त्याचा प्रचंड कंटाळा असणारा अणि सार्वनजिक जीवनात तो न्युनगंड लपविण्यासाठी धडपडणारा वाचनप्रेमी (?) देश आहे। अरे काल "Cross World" मध्ये मस्त नविन पुस्तक पाहिले असे सांगणारे ८०% लोक तिथे A. C ची थंड हवा अणि वाफाळती कॉफ़ी याचा आस्वाद अधिक घेतात। अशा पुस्तकांच्या दुकानात जर तुम्ही नजर फिरविली तर तुमच्या लक्षात येईल की खुप लोक एखादे पान वाचून इकड़े तिकडे सौंदर्य (?) न्याहाळन्यात जास्त गुंतलेले असतात। बळेच आपण पण वाचतो हे दाखविण्याचा तो एक अट्टहासच।

अशा परिस्थितीत जर आपण शांतपणे या गोष्टीचा विचार केला तर बहुदा " वाचनाला " असलेले अवास्तव महत्त्व आपल्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही। आपण वाचतो म्हणजे नक्की काय तर

" पेपर " वाचून आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची माहिती घेतो।
"अग्रलेख (Editorial )" वाचून अवतीभवती घडणाऱ्या सामाजिक , राजकीय , आर्थिक बाबींवर आपले मत बनवितो किंवा आपला विचार त्या लेखाबरोबर तपासून पाहतो।
"प्रवासवर्णन " वाचून घरबसल्या जगाच्या सफरीचा अनुभव अणि आनंद घेतो।
"कथा ", "कांदबरी " किंवा " इंग्लिश वाङमयाचे भाषांतर " यातून वेगवेगळ्या घटना , माणसे , अनुभव , कल्पना यांची माहिती करून घेतो
"शालेय पुस्तके " वाचून आपण विषय शिकतो अणि परीक्षेची तयारी करतो
" Cooking Recipe " ची पुस्तके गृहिणींना चवदार पाककृतींची ओळख करून देतात।
" Online Blog" वाचन त्यातील विविधतेमुळे आकर्षित करते।

थोडक्यात काय तर एखादा विषय समजावून सांगून त्याला अनुभवसंपन्न करण्याच्या प्रक्रियेला "वाचन " म्हणतात।

आता या स्मरणरंजनातून बाहेर पडून " जियो जी भरके " च्या दुनियेत आपण केलेला प्रवेश म्हणजे " वाचणारा समाज " ते " पाहणारा समाज " असा प्रवास आहे। आजकाल "Updated" राहण्यासाठी सकाळच्या पेपरची वाट पहावी लागत नाही। मिनिटा मिनिटाला येणारे ऑनलाइन अलर्टस आपल्याला सतत "alert " ठेवतात। राजकीय , सामाजिक किंवा आर्थिक घडामोडींवर मत जाणून घेण्यासाठी आता अग्रलेख (Editorial ) बरोबरच " Cut the Clutter " सारखे १५-२० मिनीटाचे वीडियो उपलब्ध असतात किंवा "Knapilly " सारख्या app वर " एखाद्या बातमीचा "(Why/ What/ When/ How)सर्वांगाने आढावा घेतलेला असतो। गणिताचे थेरम पुस्तकातून पाठ करण्यापेक्षा " Byju 's लर्निंग App वर ते चित्रमय भाषेत उपलब्ध असते। एखाद्या मुलाला काही गोष्टी कळल्या नाहीत तर त्याला समजेल अश्या वेगात तो मुद्दा समजावून देऊ शकणारे "Video on demand at our own pace" सारखे पर्याय समोर आहेत। "Blog " वाचायचा कंटाळा आला तर blog writer चा आपले म्हणणे सांगणारा "Video " पण आजकाल मागणीत असतो किंबहुना "blog " च्या वाचकांपेक्षा " blog Video " पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे। " अपूर्वाइै " किंवा " जावे त्यांच्या देशा " ही पुलंची पुस्तके वाचून जग प्रवास अनुभवणारी पिढी मागे पडून " Fox Life " / "Travel XP " पाहून , " भा डी पा " सारख्या ऑनलाइन पोर्टलवर डोळ्यांनी घरबसल्या जग पाहणारी पिढ़ी आज मजा करत आहे। " Cooking Recipe" च्या पुस्तकाची जागा " Cooking Shows " ने घेतली आहे।

माहिती तंत्रज्ञानाने जग जवळ आणले हे खरेच पण ही जी "दृकश्राव्य (Audio visual)" क्रांति त्याने केली आहे त्याने अनुभवसंपन्न करण्याच्या प्रक्रियेतुन " वाचनाला " मागे टाकून "पाहण्याला " अग्रक्रम दिला आहे. पाहणे या शब्दाला निराळेच वलय प्राप्त झाले आहे। कदाचित त्यामुळे आता भविष्यात " मी तुला पाहून घेईन " याचा निराळाच अर्थ निघू शकेल।

या पाहणाऱ्या समाजासाठी रामदासांच्या भाषेत इतकेच म्हणेन :

" जे जे आपण पहावे। ते ते दुसऱ्याशी फॉरवर्ड करावे।

पाहून ऐकुनि शहाणे करावे। सकळ जन। "

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy सुरेख लिहीले आहे. अतिशय मार्मिक!!!
>>>>>>>> सार्वनजिक जीवनात तो न्युनगंड लपविण्यासाठी धडपडणारा वाचनप्रेमी (?) देश आहे। अरे काल "Cross World" मध्ये मस्त नविन पुस्तक पाहिले असे सांगणारे ८०% लोक तिथे A. C ची थंड हवा अणि वाफाळती कॉफ़ी याचा आस्वाद अधिक घेतात। अशा पुस्तकांच्या दुकानात जर तुम्ही नजर फिरविली तर तुमच्या लक्षात येईल की खुप लोक एखादे पान वाचून इकड़े तिकडे सौंदर्य (?) न्याहाळन्यात जास्त गुंतलेले असतात। बळेच आपण पण वाचतो हे दाखविण्याचा तो एक अट्टहासच।>>>>>>>>>

वाचन आवडणे परंतु न जमणे म्हणजे, शॉर्ट अटेंशन स्पॅन मुळे अथवा आळशीपणामुळे अथवा अन्य मोहांमुळे न जमणे आणि त्यातून आलेला न्यूनगंड लपविण्याकरता सततची धडपड - महामार्मिक वाटले मला हे.

थोडक्यात काय तर एखादा विषय समजावून सांगून त्याला अनुभवसंपन्न करण्याच्या प्रक्रियेला "वाचन " म्हणतात।>>वाह क्या बात है |

अरे वाचनातून सूख आनंद स्फूर्ति प्रेम समाधान मिळव णारे लोक्स पण आहेत. व ते फॅन्सी बुक शॉप मध्येच जातात असे नाही.

आवडला लेख.
> अशा परिस्थितीत जर आपण शांतपणे या गोष्टीचा विचार केला तर बहुदा " वाचनाला " असलेले अवास्तव महत्त्व आपल्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. > पटलं.

>>> वाचणारा समाज " ते " पाहणारा समाज " असा प्रवास
मुळात वाचणारा समाज ही जमात जेमतेम चारेक हजार वर्षांपूर्वीच जन्माला आली नाही का? आणि त्यातलीदेखील अनेक वर्षं लिहिण्यावाचण्याची मक्तेदारी अत्यंत मर्यादित गटांपुरतीच होती. तेव्हा बहुतांश काळ बहुतांश मानवजात हा 'पाहणारा', फारतर बोलणारा आणि ऐकणारा समाजच होता! Happy